|
सहवासातील साहित्यिक
Author: रमेश तेंडुलकर
Publisher: प्रभात प्रकाशन
|
|
Price: $11.63*
Reaches you in 4 to 5 weeks (More options)
|
* Price is inclusive of "Standard" shipping charges. Additional charges will apply for "Express" shipping.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: संपादनः प्रदीप कर्णिक Review courtesy of Maharashtra Times: १३मे२००१ समीक्षक रसिकाच्या भूमिकेत - आ. श्री. केतकर
प्रा. रमेश तेंडुलकरांनी अगदी मोजकंच लिहिलं, तरी त्यांचा अनेक साहित्यिकांशी वेगवेगळया नात्यांनी संबंध आला. वेळोवेळी त्यांनी व्यक्तिचित्रपर लिहिलेल्या चौदा लेखांचा समावेश असलेले एक पुस्तक प्रदीप कर्णिक यांनी संपादन करून सहवासातील साहित्यिक या नावाने प्रकाशित केले आहे.
मात्र तेंडुलकरांनी लिहिलेल्या या व्यक्तिरेखांव्यतिरिक्त त्यांचे अन्य काही लेखही आहेत. शिवाय खुद्द तेंडुलकरांविषयी त्यांचा मुलगा नितीन यांनी लिहिलेला राहून गेले आणि वाहून गेले हा आणि संपादक प्रदीप कर्णिक यांनी लिहिलेला बाप दोस्त हा लेखही व प्रस्तावनारूप अनोखं नातं निर्माण करणारे प्रा. रमेश तेंडुलकर हे निवेदन हेही एक प्रकारे व्यक्तिचित्रात्मकच आहे. म्हणजे अन्य साहित्यिकांबरोबर खुद्द लेखकाचे व्यक्तिचित्रही वाचण्याची संधीही वाचकाला मिळते.
लेखकाची अशी ओळख पटल्यावर व्यक्तीबरहुकूम त्याच्या लेखनाची धाटणी बदलते, ती का, हेही उमगल्यासारखे होते. प्रा. तेंडुलकरांची ओळख साहित्यिक म्हणून असण्यापेक्षा समीक्षक-कवी म्हणूनच होती. त्यांचे समीक्षालेख वैशिष्टयपूर्ण तर आहेतच; पण लेखकावर कोठेही अन्याय होणार नाही, याचे भान त्यांनी ठेवले असल्याचे जाणवते- खरे तर तो त्यांच्या समीक्षेचा अंगभूत गुणच आहे. त्यामुळे त्यांचे समीक्षालेख हे तसे आस्वादात्मक लेखच आहेत.
असा हा लेखक प्रियजनांची, सुहृदांची व्यक्तिचित्रे रेखाटतो, तेव्हा त्यात आपुलकी, जिव्हाळा आढळतो. क्वचित एखाद्याच्या वेगळया वागण्याची संगती लावण्याचाही प्रयत्न करतो. त्याच्यावर जराही अन्याय होणार नाही, याची काळजी घेतो. म्हणजेच समीक्षक हा येथे रसिकाच्या भूमिकेत अवतरतो. त्याला भावलेले तेवढेच व्यक्तिविशेष सादर करतो. त्या व्यक्तीबद्दलच्या स्वत:च्या प्रतिक्रियाही सांगून टाकतो. त्यामुळे मे. पुं. रेगे यांच्यावरील लेखात त्यांच्या विनोदाला- ज्यासाठी ऍनिमेटेड हा शब्द लेखकाच्या मनात येतो- प्राधान्य मिळते. पण त्यांची मांडणी अशा प्रकारे होते की, ज्ञानसाधनेला नैतिकतेची धार लाभलेले हे वर्णनही वाचकाला मनोमन पटून जाते. तेंडुलकर म्हणतात, विनोद हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक विलोभनीय विशेष आहे. त्याची जात आणि प्रत स्वतंत्र आहे. मूर्खांची लक्षणे सांगणार्या रामदासांची सर्वस्पर्शी अशी तीक्ष्ण दृष्टी त्यांच्यापाशी आहे. पण रामदासांप्रमाणे ठोसर, परखड शैलीत तो प्रकट होत नाही. तो खालच्या स्वरात, संथ, धीम्या लयीत प्रकट होतो. मग अनपेक्षित धक्का देऊन जातो. आपणास हलवितो. मग अनेक किस्से त्या लेखात येऊन याची प्रचीती देतात.
या सर्व लेखांचा कालावधी गेल्या वीस वर्षांतला आहे. कुसुमाग्रजांवरील लेख म्हणजे आपल्या हीरोविषयी लिहावे, तसा आहे. भारावून गेल्यासारखा. कारण तेंडुलकरांचे कुसुमाग्रज आणि जीवनलहरी हे स्फूर्तिस्थानच आहे. त्याच्या आधारेच त्यांना विशाखानंतरची कुसुमाग्रजांची कविता आतून वाचायला यायला लागली. त्यामुळेच तेव्हा स्फुरलेल्या रचनांना त्या धर्तीवर मानस लहरी असे नाव दिले, असे त्यांनी सांगितले आहे. म्हणूनच आधुनिक जगाचे नागरिक अनंत काणेकर यांच्याबरोबर ते कुसुमाग्रजांच्या घरी गेले, तेव्हा दोन निष्कलंक चंद्र एकत्र पाहिल्यासारखी आठवण त्यांच्या मनात कोरली गेली. वाचकाला मोजक्या शब्दांत व्यक्तीची ओळख होईल, असे हे लेखन तेंडुलकरांमधल्या कवीचीही ओळख पटवते.
विंदा करंदीकरांना त्यांनी नव्या युगाच्या तिठयावरील उमदा कवी; तर पाडगावकरांना साठीतील श्रावणझाड म्हटले आहे. या लेखात कवी आणि त्याची कविता यांच्यात कसे बदल होत गेले, याचे लक्षणीय चित्रण आहे. माधव मनोहर यांच्यावरील लेखात लेखक आपण त्यांच्या ऋणात असल्याचे कसे मानतो, हे जाणवते आणि मनस्वी साहित्यप्रेमी हे लेखाचे नाव माधव मनोहर यांचे वर्णन सार्थपणे करते.
रा. भि. जोशी यांच्यावरील लेखात त्यांच्या संस्कृत, रुदू आणि इंग्रजीच्या संस्काराबद्दल तेंडुलकर लिहितात : या तीन भाषांनी चांगले संस्कार तेवढे त्यांच्या साहित्यावर केले आहेत. त्याला चिकटून येणारे दोष मात्र आपोआपच दूर राहिले. म्हणूनच संस्कृतवरील प्रेमामुळे अनेकांच्या साहित्यात आलेला रमणीय शब्दलालित्याचा निव्वळ हव्यास- शब्दलोलुप वृत्ती त्यांच्या ठिकाणी नाही. रुदू भाषेच्या आक्रस्ताळेपणापासून त्यांची लेखणी अलिप्त आहे आणि फाजिल शिष्टाचारापोटी येणारी कृत्रिमता, कोरडेपणा, उच्चभ्रूपणा हे दोष इंग्रजी संस्कारांतूनही त्यांच्यात आलेले नाहीत. उलट तिन्ही भाषांतील संस्कारांतून एक विशिष्ट तोल त्यांच्या साहित्याला, शैलीला आणि जीवनविषयक व्यक्तित्वालाही आला आहे. म्हणून त्यांचे वर्णन एक अभिजात व्यक्तित्व असे केले आहे.
माणसांचा आणि ग्रंथांचा व्यासंग असलेले मालशे. साहित्य, नाटय, संगीत, कला, संशोधन, व्यासंग आणि ज्ञान हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा अखेरपर्यंत अभंग होता, असं लेखकानं म्हटलं आहे. वाङ्मयीन संस्कृतीचे उपासक श्री. पु. भागवत यांच्यावर लिहिताना, ग्रंथनिर्मिती हादेखील साहित्यनिर्मितीसारखाच एक सर्जनशील व्यापार आहे, ही जाणीव मौज प्रकाशनने निदान आमच्या पिढीच्या मनावर बिंबविली. टाइप, कागद, स्पेसिंग, अलाइनमेंट, मुखपृष्ठ, मलपृष्ठ, रेखाटने, बाइंडिंग ही सगळी साहित्यवस्तूची अविभाज्य अंगं असतात. साहित्यकृतीचा सौंदर्याकार या अंगांतून मूर्त होत असतो, ही जाणीव अत्यंत साक्षेपाने मौज प्रकाशनने रसिकांपर्यंत नेली असे म्हणतात. सहृदय रसिक काय वाचतो, कोणती शिल्पे वारंवार पाहतो, कोणते संगीत फिरून ऐकतो, या गोष्टीला खरोखर पक्क्या मूल्यांचे महत्त्व आहे हे पॉल व्हॅलेटीचे उदगार आवर्जून नमूद करणारे श्री. पु. व्हॅलेटीला अभिप्रेत वाङ्मयीन संस्कृतीचे निष्ठावंत उपासक ठरतात. त्यांच्या साहित्यसेवेचे मर्मही त्यातच आहे, असेही तेंडुलकर सहजपणे सांगतात.
वा. ल. कुलकर्णींना ते पूर्णार्थाने समीक्षक संबोधतात; तर रा. श्री. जोगांना सहृदय टीकाकार म्हणतात. विद्याधर पुंडलिकांवरील लेखात या दोघांचे मैत्र जागोजागी प्रत्ययाला येते. शाश्वताच्या रंगांचा व्याकुळ ध्यास पुंडलिकांना होता. पुत्रवियोगानं आलेले हळवेपण आणि पार्किन्सनसारख्या आजाराने मनाच्या क्षितिजावर दाटलेले खिन्नतेचे रंग, केवळ त्या शब्दयोजनेनेच प्रकट होतात.
प्र. के. अत्रे यांना तेंडुलकर आम्ही चे पहाड असे गौरवतात. त्यांचे प्रचंडपण वर्णन करताना सहजपणे, ते निवर्तले तेव्हा आजच्या पिढीच्या जीवनाची क्षितिजे थोडावेळ संकोचली आहेत, असे वाटले. सामाजिक जीवनाच्या स्पंदनाचा ठेका थोडा वेळ चुकला... चुकचुकला असे वाटले, असे लिहून जातात आणि मग त्यांच्या ध्यानात येते- हे खरे नाही. महाकाव्यातील व्यक्तिरेखांना मरण नसते. त्या आपल्या सांस्कृतिक जीवनाच्या धन होऊन राहिलेल्या असतात. त्यांचे आवाहन कधीच संपत नाही. अत्रे ही आपल्या पिढीची एक पुराणकथा होय. पुराणकथा कधीच नष्ट होत नाहीत. अत्रे दिवंगत झाले; पण अत्रे अमर आहेत.
या संग्रहाच्या प्रकृतीशी न जुळणारे माझ्या पाखरांनो, माझ्या चिमण्यांनो, उमलती पिढी आणि भावी पिढी हे लेख आणि अमिताभ ही, त्याच्या जीवाला धोका निर्माण करणार्या अपघातानंतरच्या आजारपणात लिहिलेली मराठी आणि त्यांचे शेंडेफळ सचिन याच्या पराक्रमामुळे उमलून आलेली, त्याचा खेळ हे क्रिकेट मैदानावरील काव्यच कसे बनते, हे सांगणारी सचिन ही इंग्रजी कविताही समाविष्ट आहे. संपादकाने त्याची कारणे दिली आहेत आणि स्वतंत्र लेखन म्हणून ते चांगले असले, तरी थोडे अस्थानी असल्याप्रमाणेच वाटते. अर्थात संपादकांनी म्हटले आहे, त्याप्रमाणे प्रा. रमेश तेंडुलकर यांचे वाङ्मयीन आत्मचरित्र अल्पसे का होईना पूर्ण होऊ शकते, म्हणून या लेखांचे महत्त्व हे म्हणणे खरे आहे. तरीही.
कर्णिक यांनी मनावर घेऊन हा संग्रह प्रसिद्ध केला हा एक प्रकारे गुरुऋण फेडण्याचाच प्रयत्न म्हणायला हवा.
|
 |
 |
|