Marathi CDs & Cassettes Online Marathi Books Shopping Cart

Quick Search:   

    Advanced Search

You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com"  

About Us New
Marathi Books - Select books and Diwali amk.
- Pay by Credit Card,
- Receive package via air-mail.
- Sent word-wide.
- NO shipping charges!
Marathi Library - Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
  Read Synopsis of Books
  Browse Authors
  New Additions
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
English Books
  Maharashtra
  India
Tell us your favorite marathi books

मराठी पुस्तकांचा अमेरिकेतील खजिना
Wednesday, April 23, 2008 11:43 [IST]

माणसाच्या संस्कृतीमध्ये साहित्याचे स्थान खूप वरचे आहे. अगदी वेद-उपनिषदांपासून ते अलीकडील काळात लोकप्रिय झालेल्या उपयोजित साहित्याने माणसाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कसदार साहित्याच्या निर्मितीने माणसाचे सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन समृद्ध करणा-या साहित्यिकांना रसिकांच्या मनात कायम अजरामर स्थान असते. विल्यम शेक्सपिअर अशाच सार्वकालिक लोकप्रिय साहित्यिकांपैकी एक. शेक्सपिअर या महान नाटककाराचा 23 एप्रिल हा स्मृतीदिन जागतिक पुस्तकदिनाच्या स्वरूपात लक्षात ठेवला जातो.

पुस्तके ही तर सुशिक्षित आणि सुसंस्कृत समाजाची खूणच म्हणायला हरकत नाही. साहित्यिकांचे विचार वाचकांपर्यंत पोहोचविणा-या या सुटसुटीत माध्यमाने साहित्याचा प्रसार सर्वत्र करण्याचे महत्त्वाचे काम पार पाडले आहे. साहित्याला पुस्तकाच्या स्वरूपात बसविणारे मुद्रक-प्रकाशक, पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध करणारे विक्रेते आणि ते वाचणारे रसिक या साखळीमार्फत वाचनसंस्कृती जोपासली जाते. या वाचनसंस्कृतीच्या जोपासनेतील आणखी एक महत्त्वाचा कोन म्हणजे वाचनालये.

भारतात आणि मुख्यत्त्वे महाराष्ट्रात मध्यमवर्गीय लोकांमध्ये वाचनसंस्कृती जोपासली जाण्याचे श्रेय वाचनालयांनाच द्यावे लागेल. प्रत्येक पुस्तक विकत घेऊन वाचणे सर्वांनाच आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते. शिवाय पुस्तकांचा संग्रह ठेवण्यासाठी आवश्यक ती जागा अभावानेच आढळते. अशा परिस्थितीत वाचनाची आवड पूर्ण करण्यासाठी वाचनालये हा मोठाच आधार असतो. पूर्वीच्या काळातली, सध्या आऊट ऑफ प्रिंट झालेली पुस्तकेही वाचनालयांतून सहज मिळू शकतात. त्यामुळेच कोणत्यातरी वाचनालयाची मेंबरशीप मराठी भाषीक घरांमध्ये आवश्यक बाब असते.

अर्थातच ही परिस्थिती थोडीफार बदलत चालली आहे. भाचाच्या किंवा भाचीच्या बाराव्या-तेराव्या वाढदिवसाची भेट म्हणून त्याला किंवा तिला घराजवळच्या लायब्ररीची मेंबरशीप घेऊन दिली असे सांगणा-या आत्या-मावशा आता अभावानेच दिसतात. मराठी साहित्याच्या वाचकांची संख्या भारतात झपाट्याने घटत आहे की हा निव्वळ कांगावा आहे या मुद्दयावर अनेक ठिकाणी वाद रंगतात.

मराठी साहित्याच्या बाबतीत महाराष्ट्रात ही स्थिती असताना देशाबाहेर राहणा-या मराठी माणसांमध्ये मात्र एक ऑनलाइन लायब्ररी लोकप्रियता कमावून आहे. कॅलिफोर्निया राज्यात सॅन जोसेमध्ये राहणा-या रवि आपटे व अजित भावे यांनी सुरू केलेल्या या ऑनलाइन लायब्ररीच्या मदतीने अमेरिकेत स्थायिक झालेली मराठी भाषिक मंडळी घरबसल्या मराठी साहित्याच्या वाचनाचा आनंद घेऊ शकतात. मराठी वाचकांसाठी सुरू असलेली रसिक.कॉम ही अशा प्रकारची जगातील पहिलीच सेवा असल्याचे रवि आपटे यांनी सांगितले. अमेरिकेत राहणा-या मराठी भाषिकांना मराठी पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध होत नाहीत ही सर्वांचीच खंत होती. भारतात सुट्टीसाठी आल्यानंतर किंवा भारतातून येणा-या पाहुण्यांकरवी मराठी पुस्तके आणण्यावर तशा ब-याच मर्यादा असतात. त्यामुळे ब-याच जणांना मराठी वाचनाची तहान भागविणे शक्य होत नसे. अशा परिस्थितीत मराठी भाषिक लोकांसाठी मराठी पुस्तकांच्या खरेदीची ऑनलाइन सुविधा आपटे व भावे या दोघांनी रसिक.कॉमच्या माध्यमातून सुरू केली.

रसिक.कॉम 1999मध्ये सुरू झाले. त्यापूर्वी वर्षभर अमेझॉन.कॉमने पुस्तकांच्या ऑनलाइन खरेदीची सुविधा उपलब्ध करून दिली होती. हीच सुविधा मराठी पुस्तकांसाठी करून देण्याचे आपटे-भावे या संचालकद्वयांनी ठरविले. तोपर्यंत रवि आपटे यांच्या व्यक्तिगत पुस्तक संग्रहानेही तीन हजारांचा आकडा पार केला होता. या संग्रहाचा उपयोग अन्य मराठी भाषिकांनाही करून देण्याची त्यांची इच्छा होती. यातूनच मराठी पुस्तकांची ऑनलाइन विक्री सुरू झाली.

या उपक्रमाला अमेरिकेतील मराठी मंडळींचा चांगला प्रतिसाद लाभला. मात्र यात थोडीशी अडचण होती, असे रवि आपटे यांनी इंडियाइन्फो.कॉमशी ई-मेलद्वारे साधलेल्या संवादात सांगितले. मराठी पुस्तकांची मागणी करणारी मंडळी ही मुख्यत्त्वे मोठ्या वयोगटातील होती. इंटरनेटचे जाळे पसरण्याअगोदर ही मंडळी अमेरिकेत स्थायिक झाली होती. त्यामुळे तरुण पिढीच्या तुलनेत ऑनलाइन खरेदी वगैरे प्रकारांशी त्यांचा परिचय थोडा कमी होता. हे लक्षात घेऊन संचालकद्वयांनी खरेदी प्रक्रिया शक्य तेवढी सुलभ करण्याचा प्रयत्न केला. काही काळानंतर ज्येष्ठ नागरिकांचा कॉम्प्युटरशी परिचयही वाढला आणि ऑनलाइन खरेदी सफाईदारपणे सुरू झाली. मराठी मनांत मानाचे स्थान असलेल्या दिवाळी अंकांची विक्रीही मग रसिक.कॉमवरून सुरू झाली.

ऑनलाइन विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आपटे व भावे यांच्या मनात ऑनलाइन लायब्ररी सुरू करण्याचा विचार आला. त्यानुसार ही लायब्ररी सुरू झाली आणि अल्पावधीत प्रचंड लोकप्रियही झाली. या लायब्ररीत सदस्यांना पुस्तकांची, लेखकांची, साहित्यप्रकारांची यादी वेबसाइटवर बघायला मिळते. पुस्तकांची परीक्षणेही वाचण्यासाठी उपलब्ध असतात. सदस्यांना युजर्स आयडी दिला जातो. सदस्य हवी ती पुस्तके निवडून मागवितात आणि नंतर ठराविक प्रक्रियेने परत पाठवितात. सध्या लायब्ररीतील पुस्तकांची संख्या हजारांवर गेली आहे. काही गाजलेल्या पुस्तकांच्या एकापेक्षा अधिक प्रतीही आहेत, असे आपटे यांनी आवर्जून सांगितले.

या वाचनालयाचे सदस्यत्त्व तीन महिन्यांसाठी, सहा महिन्यांसाठी, एक वर्षासाठी किंवा फक्त दिवाळी अंकांपुरती असते. ब-याचदा अमेरिकेत राहणा-या मराठी कुटुंबांमध्ये मराठी वाचनाची विशेष आवड नसते पण येणा-या पाहुण्यांसाठी त्यांना मेंबरशिप हवी असते. अशा परिस्थितीत तीन किंवा सहा महिन्यांसाठीचे सदस्यत्त्व उपयुक्त ठरते. वर्गणी क्रेडीट कार्डाद्वारे स्वीकारली जाते.

मराठी वाचनाची आस बाळगून असणारे बहुतांश लोक ज्येष्ठ नागरिक श्रेणीतील असल्याने मुख्यत्त्वे पु. ल. देशपांडे, वि. स. खांडेकर, व. पु. काळे. चिं. वि. जोशी आदी लेखकांच्या पुस्तकांना मागणी असते, असे रवि आपटे यांनी सांगितले. यापेक्षा थोड्या कमी वयाच्या गटातून सुहास शिरवळकरांसारख्या लेखकांच्या पुस्तकांना मागणी असते, असे ते म्हणाले. एच-1 व्हिसामुळे 2000 सालानंतर मोठ्या प्रमाणात अमेरिकेत गेलेल्या तरुणांमध्ये मराठी वाचनाचे प्रमाण फारच कमी असल्याचे आपटे यांनी नमूद केले. मात्र भारतातून काही काळासाठी येणा-या आई-वडिलांसाठी ही मुले रसिकचे सदस्यत्त्व घेतात, असे ते म्हणाले. भारतातील मराठी साहित्यिकांच्या पुस्तकांसोबतच अमेरिकेतील मराठी लोकांचे साहित्यही उपलब्ध करून देण्यावर रसिकचा भर असतो, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

पुस्तके माणसाचे आयुष्य समृद्ध करतात हे वेगळे सांगण्याची किंवा लिहिण्याची गरजच नाही. त्यातूनही मातृभाषेतील वाचनाला एक निराळा पोत असतो. मातृभूमीपासून हजारो मैलांवर राहणा-या मराठी भाषिकांना मातृभाषेतील साहित्याचा आस्वाद घेण्याची संधी पुरविणा-या रसिक.कॉमसारख्या ऑनलाइन वाचनालयांचे वाचन संस्कृतीतील योगदान म्हणूनच फार मोठे आहे.


Source : Indiainfo Team

 

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.