Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


काजळल्या दिशा
Author: सुभाष भेंडे
Publisher: मॅजेस्टिक प्रकाशन
Add to Shopping Cart
Price: $6.85 $5.48 20% OFF ( ~194 Pages, R200)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
"ज्या जगाची भळाभळा वाहणारी जखम दुनियेच्या नजरेसमोर यावी म्हणून तुम्ही मोर्चे-बिर्चे काढले; ते जग होते तिथंच आहे की रे! तुम्ही नेते मंडळी या जगापासून दूर गेलात, तळागाळातल्या माणसाला आणखी रसातळाला ढकलून आपल्या ऐष्वर्याचे इमले उभे केलेत -"
डॉ. आंबेडकरांचे अनुयायी म्हणवणार्‍या तथाकथित नेत्यांचे राजकारण कसे आहे?
यासारख्या प्रश्नांवर विदारक प्रकाश टाकणारी डॉ. सुभाष भेंडे यांची वास्तवदर्शी परखड कादंबरी.

Review courtesy of Maharashtra Times:
२४सप्टेंबर२०००
भेदक संघर्षाची अस्वस्थकारक कहाणी
- श्रीराम शिधये

वर्षानुवर्षं अन्याय आणि अत्याचार यांच्याच पकडीमध्ये सापडलेल्या दलित समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रकाश दाखवला. नवा मार्ग दाखवला. आपली प्रगती करून घ्यायची असेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे त्यांनी सोदाहरण दाखवून दिलं. त्यांच्या तेजस्वी आणि स्फूर्तिदायी चरित्राचा आदर्श डोळयासमोर ठेवून दलित समाजातले अनेक तरुण शिकले.

त्यांनी स्वत:चा असा मार्ग शोधून काढला. सांगलवाडीसारख्या खेडयामध्ये राहून आणि सर्वस्वी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिकलेला, प्राध्यापक झालेला शिवराम हा असाच एक बुद्धिमान तरुण. त्याच्या गुणांवर भाळून उमा ही ब्राह्मण मुलगी त्याच्याशी लग्न करते. शिवराम एका कॉलेजात प्राध्यापक होतो. उमाही शिक्षणव्यवसायातच आहे. दोघंही एकमेकांवर प्रेम करणारे आणि सामाजिक बांधिलकी मानणारे आहेत. आपल्या समाजासाठी, त्यातील होतकरू मुलांसाठी जे काही करणं शक्य आहे, ते सारं करण्याची शिवराम आणि उमाची नेहमीच तयारी आहे.

आपल्याला आपल्या आई-वडिलांनी शिकवलं याबद्दलची अपार कृतज्ञता शिवरामच्या मनात आहे. आपला भाऊ सांगलवाडीत राहतो; पण त्यानं मुंबईत यावं, लहानसा कोर्स करावा, स्वत:च्या पायावर उभं राहावं असं शिवरामला मनापासून वाटत असतं. तसं तो यशवंताला, आपल्या धाकटया भावाला, सांगतो. शिवराम आणि यशवंता यांच्यामध्ये जमीनअस्मानाचं अंतर आहे. शिवराम समतोल विचार करणारा, उच्चशिक्षित विचारी तरुण आहे. तर यशवंता हा भडक डोक्याचा, मॅट्रिकही न झालेला आणि सारासार विचार न करणारा आहे. शिवरामची मुंबईला येण्याची सूचना धूडकावून लावणारा यशवंता अचानकपणे मुंबईस येतो. शिवरामच्या घरी राहू लागतो. आला तेव्हा साध्या जुन्या कपडयांतल्या यशवंताकडे प्रचलित समाजव्यवस्थेवरच्या रागाखेरीज काहीही नव्हतं. मुंबईत आल्यावर त्याला त्याचे समविचारी साथी भेटतात. नागनाथ हा त्यातलाच एक. हे दोघेजण हळूहळू दलित समाजाचे नेते बनतात. सभा, मोर्चे, लॉंगमार्च आयोजित करू लागतात. अंगार फुलवणार्‍या त्यांच्या शब्दांनी ते नेहमीच सभा जिंकतात. समाजाला गुंगवून ठेवतात. मात्र या सार्‍यामधून दलित
समाजाची प्रगती होत नाही. नागनाथ आणि यशवंता यांची भौतिक प्रगती मात्र झपाटयाने होते. या त्यांच्या प्रगतीमध्येच त्यांच्या आणि पर्यायाने चळवळीच्या र्‍हासाची बीजं आहेत...

संभाव्य कारणांचा वेध

सुप्रसिद्ध साहित्यिक सुभाष भेंडे यांनी ‘काजळल्या दिशा’ या आपल्या नव्या कादंबरीमध्ये दलित चळवळीस लागलेल्या ओहोटीच्या संभाव्य कारणांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. ही कादंबरी अलीकडेच प्रसिद्ध झाली आहे. ज्या चळवळीने महाराष्ट्रामध्ये खळबळ उडवून दिली होती, एक मन्वंतर घडणार असं वाटत होतं, त्या दलित चळवळीची आज वाताहत का झाली, याचा आपल्या परीने वेध घेणारी ही कादंबरी. कादंबरीमध्ये शिवराम आणि यशवंता या दोन मुख्य व्यक्तिरेखा आहेत. या व्यक्तिरेखा दोन प्रवृत्तींचं प्रतिनिधित्व करतात. शिवराम हा सदसदविवेक बुद्धीचं; तर यशवंता हा आगखाऊ भाषण करणार्‍या आणि चळवळीपेक्षा आपल्या पोळीवर जास्तीतजास्त तूप कसं आढता येईल, याचा सदोदित विचार करणार्‍या स्वार्थी पुढार्‍याचं प्रतीक आहे.
महाविद्यालयातील आपली नोकरी संभाळून आपल्या समाजाच्या उन्नतीची स्वप्नं पाहणारा शिवराम समाजामधल्या होतकरू मुलांना मदत करणारा आहे. समाज सर्वार्थानं सुधारायचा असेल, तर भडक भाषणांपेक्षा आणि सदोदित सवर्णांना नावं ठेवण्यापेक्षा आपण आधी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सक्रिय झालं पाहिजे, शिकलं पाहिजे, आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि विचारांचा मुकाबला विचारांनीच करायला पाहिजे; त्यामध्येच आपल्या समाजाचं हित आहे, अशी त्याची धारणा आहे. प्रचलित समाजव्यवस्थेला केवळ शिव्या देऊन आणि समाजातील अशिक्षितांपुढे दिवास्वप्नं रंगवून स्वत:ची खोळ भरता येईल, नाव मिळेल, मंत्रालयातली वट वाढेल, सत्ताधार्‍यांशी जवळिक वाढेल; पण त्यातून आपल्या समाजाचं भलं होणार नाही, ही शिवरामची भावना आहे. यशवंताला तो वारंवार याची जाणीव करून देतो. पण यशवंता ते मनावर घेत नाही. शिवरामची भूमिकाच तो समजू शकत नाही; कारण ती त्याला परवडणारी नाही. म्हणूनच तो शिवरामची कायम ‘प्रोफेश्वरराव’ म्हणून संभावना करतो.

वैचारिक बांधिलकीकडून स्वार्थाकडे

यशवंताला श्रीमंतीची आणि लीडरपणाची चटक लागली आहे. ती पुरी करण्यासाठी तो नागनाथच्या बरोबर अनेक स्टंट करतो. कोणत्याही प्रश्नच्या मुळामध्ये न जाता समाजातल्या लोकांची माथी फिरतील, आपलं नाव होईल, आपल्या लीडरगिरीला उठाव मिळेल, अशाच कार्यक्रमांमध्ये त्याला रस आहे. त्यातूनच त्याला बक्कळ पैसा मिळतो. सुसज्ज फ्लॅटचा तो मालक होतो. महागडया मोटारी पदरी बाळगतो. अनेक स्त्रियांशी संबंध ठेवतो. धनिकांकडून मिळणार्‍या पैशापायी दादागिरी करून तो पैसे उकळतो. यामध्ये तो सवर्ण-दलित असा भेद करत नाही. पैसा, मानमरातब, नेतेगिरी हेच उद्दिष्ट झालं की विचारांची बांधिलकी संपते; उरतो तो केवळ स्वार्थ, हेच यशवंताच्या प्रत्येक कृतीमधून स्पष्ट होत जातं. नागनाथच्या वागण्याची रीत काही वेगळी नाही. किंबहुना त्यांच्या मैत्रीचा पाया त्यांची समान वृत्ती हाच आहे. पण कालांतरानं निवडणुकीच्या राजकारणातून नागनाथ आणि यशवंता ही अभेद्य वाटणारी जोडी फुटते. दोघे एकमेकांना पाण्यात पाहतात. त्यांच्यामध्ये पडलेली फूट शिवरामला अस्वस्थ करते. त्यांनी आपापसांत भांडू नये, असं त्याला मनापासून वाटत असतं. पण दोघांच्या डोक्यामध्ये आता वेगळे हिशेब सुरू झालेले असतात.

नागनाथ यशवंताबद्दल शिवरामला जे सांगतो, त्यानं शिवराम थक्क होतो. तशी यशवंताच्या ‘चढत्या’ प्रगतीची कहाणी शिवरामला त्याच्या महाविद्यालयामधील डॉ. देठे यांच्याकडून तुकडयातुकडयानं कळत असते. पण नागनाथ जे सांगतो, त्यानं त्याचं मस्तक पार फिरतं. तो अस्वस्थ होतो. आपल्या भावाचा झालेला हा अध:पात त्याला सहन होत नाही. त्याच्या मनामधील अस्वस्थतेची परिणती यशवंताच्या निवडणूकप्रचार सभेमध्ये जाऊन यशवंताचे वाभाडे जाहीरपणे काढण्यामध्ये होते. तिथे शिवरामला मारहाण होते. शुद्ध हरपलेल्या शिवरामला आपण घरी कसे आलो, ते कळत नाही. आता या जगात उमाशिवाय आपल्याला कोण नाही, असं वाटत असतानाच उमा त्याला नव्या जीवाच्या आगमनाची बातमी सांगते. हे बाळ ‘बिनजातीचं, बिनधर्माचं, बिनवर्णाचं, बिनवर्गाचं’ असेल असं उमा म्हणते, तेव्हा शिवरामनं आतापर्यंत बाळगलेला आशावादच तिच्या तोंडून बाहेर पडत आहे, असं वाटतं. सार्‍या दिशा अंधार्‍या वाटत असताना शिवराम-उमाला आशेची पहाट दिसू लागते आणि कादंबरी संपते.

अनेक तपशील

सुभाष भेंडे यांनी या कादंबरीच्या आशयाशी सुसंगत असे अनेक तपशील, कादंबरीची लय हरवणार नाही अशा पद्धतीने, दिले आहेत. मात्र उमाचं शिवरामच्या घरामध्ये मिसळून जाणं अधिक ठसठशीतपणे यायला हवे होते. विशेषत: ती जेव्हा शिवरामच्या गावी जाते, तिथल्या गावकुसाबाहेरच्या त्याच्या घरात वावरते, तेव्हा ती तिथे कसं जुळवून घेते, हे अधिक प्रभावीपणे यायला हवे होते. यशवंताबद्दल उमाच्या मनात ममत्व आहेच; पण आपण त्याच्याशी नीट वागलो नाही, तर आपल्या ब्राह्मण असण्यावर त्याचा ठपका येईल, याची धास्ती तिच्या मनात आहे. ही धास्ती वाचकालाही जाणवते. कादंबरीमध्ये अनेक घटना आहेत. त्या घटनांतूनच कादंबरीचं कथानक पुढे सरकतं. त्या घटनांच्या मागे असलेल्या वृत्ती, राजकारण भेंडे यांनी चांगल्या रंगवल्या आहेत. मात्र त्यामध्ये असलेले अंत:प्रवाह अधिक धारदारपणे सामोरे आले असते, तर कादंबरी अधिक उंचीवर गेली असती. दलित समाजामध्ये असलेली जातीची उतरंड आणि त्याचा असलेला अहंकार याचं एखादं उदाहरण कथानकाच्या ओघात आलं असतं, तर बरं झालं असतं.

जन्मानं ब्राह्मण असूनही मनात ‘ब्राह्मण्य’ नसलेली आणि दलित समाजातील मुलांनी पुढे यावं अशी आस असलेली उमा आणि विचारी, उदार दृष्टिकोन बाळगणारा शिवराम, एकेकाळी डोक्यात विस्तवच असलेला आणि पैसा आणि नेतेगिरीमुळे तोंडात आगखाऊ भाषा उरलेला यशवंता, त्याचा चळवळीतला सहकारी नागनाथ, कष्टानं शिकून सुस्थापित झालेले पण आपल्या आई-वडिलांना झटकून टाकणारे डॉ. देठे या सार्‍या व्यक्तिरेखा सुरेखपणे उभ्या राहिल्या आहेत. कादंबरीतील दोन वृत्तींमधला संघर्षही प्रभावीपणे उभा राहिला आहे. एका अर्थानं ही कादंबरी म्हणजे दोन वृत्तींमधल्या संघर्षाची अस्वस्थकारक कहाणी आहे. मात्र कादंबरीच्या शेवटच्या काही भागांमध्ये शिवराम बोलत नसून भेंडे बोलत आहेत, असं लक्षात येतं. एरवी भेंडे यांनी केलेला परकायाप्रवेश इथे गळून पडतो. ही त्रुटी सोडली, तर दलित चळवळ आणि त्यातून दलित समाज मोठा करण्याची शक्ती असलेल्या दोन तरुणांची आणि म्हणूनच त्या चळवळीच्या र्‍हासाची संभाव्य कारणं अधोरेखित करणारी ही कादंबरी वाचकालाही अस्वस्थ करून जाते.


Review courtesy of Loksatta:
लोकसत्ता रविवार १३ ऑगस्ट २०००
दलित चळवळीच्या प्रवासाचे भेदक चित्रण

समाजातील जातिव्यवस्थेची उतरंड आणि त्यामुळे उपेक्षित वर्गावर वर्षानुवर्षे होत असलेले अन्याय, अत्याचार यातून दलित चळवळीचा जन्म झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या अत्याचारग्रस्त वर्गात स्वाभिमानाचा स्फुलिंग चेतवला आणि आपल्या समाजाच्या उत्थानासाठी आजीवन प्रयत्न केले. दलित चळवळीला दिशा दाखवणारे नेतृत्व मिळाले. पण नंतरच्या काळात ही चळवळ भरकटत गेलेली दिसते. "काजळलेल्या दिशा" या पुस्तकात सुभाष भेण्डे यांनी दलित चळवळीच्या वाटचालीचा आढावा घेतला आहे. उच्चवर्णीय व दलितवर्ग यांच्यात आजही जाणवत असलेली दरी, एकमेकांबद्दलचा द्वेष, तिरस्कार, क्रोध यावरून हा सामाजिक प्रश्न आजही धुमसत आहे याची कल्पना येते. आपले समव्यावसायिक, कुटुंब, जन्मगाव, गावकुसाबाहेरची वस्ती आणि नंतर भावाच्या चळवळीतून आलेले अनुभव याकडे डोळसपणे बघितल्याने शिवरामच्या व्यक्तिरेखेद्वारा यासंबंधातील अनेक प्रश्नांच्या विविध पैलूंवर प्रकाश पडतो.

पिढ्यान पिढ्या अवहेलना, अत्याचार, लाचारी सहन करीत आलेल्या दलितवर्गाच्या मनातील विद्रोहाचा विस्फोट झाला. दलित चळवळीची दखल सर्व पातळ्यांवर घेण्यात येऊ लागली. त्याची झळ उच्चवर्णीयांना पोहोचू लागली. परस्परांमधील विद्वेषाची भावना अधिक तीव्र, धारदार होत चालली. तळागाळापर्यंत पोहोचलेल्या शिक्षणाने दलितात एक सुशिक्षित वर्ग निर्माण झाला. साहजिकच या सार्‍याचे पडसाद दलित साहित्यातून उमटू लागले. सवलती मिळत गेल्याने दलितांना संधी मिळू लागली तर दुसरीकडे आपल्या हक्कांवर, अधिकारांवर अतिक्रमण होत असल्याचे पाहून दलितेतरांनी आपल्या असंतोषाला तोंड फोडले.

प्रस्तुत कादंबरीचा नायक शिवराम स्वत: दलित वर्गातील असून खर्‍या अर्थाने विचाराने सुशिक्षित व सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व. एका उच्चवर्णीय मुलीने त्याच्याशी विवाह करण्याचे धाडस दाखवून विवाह यशस्वी करून दाखविला आहे. त्यांच्यामध्ये जातिभेदामुळे कडवटपणा येत नाही. शिवरामच्या गावाकडची गावकुसाबाहेरची गलिच्छ वस्ती, त्याची झोपडी, अशिक्षित, अडाणी, दरिद्री असे त्याचे कुटुंबीय, त्यांची राहणी, विचारआचार एकूणच त्यांचे जीवन या सार्‍यासकट तिने शिवरामला स्वीकारलेले दिसते. नव्या पिढीतील ही स्त्री खर्‍या अर्थाने स्वतंत्र, प्रगल्भ विचारांची आहे. शिवरामची केवळ त्याच्या जन्मगावाशीच नव्हे तर वंशपरंपरागत मुरलेल्या संस्कारांशीही बांधिलकी आहे हे जाणून घेणारी उमा. शिवरामचे आपल्या जन्मदात्यांशी, भावाशी, गावाशी एक आंतरिक नाते आहे. ते लाजिरवाणे जिणे आता त्याला नकोसे वाटले तरी आतून त्याची ओढ कायम आहे. या लाजिरवाण्या, अपमानजनक जिण्यातून त्यांना बाहेर काढावे अशी त्याच्या मनात कळकळ आहे. कारण ती त्याची माणसे आहेत. पण तरीही तो आपल्या पत्नीस उमास आपल्या गावी नेण्याची टाळाटाळ करतो कारण आपल्या या भूतकाळातील काळा कोपरा, आपल्या माणसांचे जिणे याबद्दलचे एक शरमिंधेपण त्याच्या मनात आहे. इतक्या वर्षानंतरही हा काळा कोपरा हा वर्ग विसरू शकलेला नाही, हे वास्तव आहे.

शिवरामची पत्नी उमा त्याच्या गावी जाण्याचा हट्टच धरते तेव्हा तो म्हणतो, "तू एक दिवसही राहू शकणार नाहीस तिथे. कल्पना थिटी पडेल असं ते जग आहे उमा! ज्याच्या अनेक पिढ्या तिथं गेल्या आहेत, ज्याची नाळ तिथं पुरलीय तोच तिथं राहू शकतो विनातक्रार. नरक कसा असतो असं कुणी विचारलं तर मी माझ्या वर्गाकडे बोट दाखवीन. नितळ शरीरावर ठिकठिकाणी खरूज झाल्यासारख्या या गावकुसाबाहेरच्या गलिच्छ वस्त्या!" शिवरामच्या वर्णनातून या वर्गाच्या जिण्याचे मूर्तिमंत दर्शन होते. माणूस म्हणून जगण्याचाही अधिकार नसलेला, समाजाने नाकारलेला हा वर्ग आजही उपेक्षितांचे जिणे जगत आहे. उमाशी लग्न करण्याचा निर्णय कळल्यावर त्याच्या कुटुंबियांच्या प्रतिक्रियांतून उच्चवर्णीयांबद्दलची चीड व्यक्त होते. शिवरामचा भाऊ यशवंता म्हणतो, "ती बामन नसंल, बामन आसलीच तर तिच्यात काय बी खोट आसंल."

उमाच्या व्यक्तिरेखेतलं वेगळेपण तिच्यावर झालेल्या संस्कारात आहे. तिचे वडील हायकोर्टात अॅडव्होकेट होते. त्यांच्या घरी स्वयंपाकाची बाई दलित होती. वडिलांचे पक्षकार, मित्रमंडळी यांच्यात विविध जातीजमातींचे लोक असत, पण त्यांच्यात कधीच पक्षपात केला जात नसे. वडिलांच्या या संस्कारांचा प्रभाव उमाच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीवर दिसून येतो. म्हणूनच यशवंताचा संताप, त्याचे रासवट बोलणे, वागणे समजून घेण्याची प्रगल्भता तिच्यात आहे. शिवरामच्या घरी यशवंत उमाचा अपमान करतो. "उकिरड्यावरील ही डुकरांची पिलावळ, मरन येत न्हाय म्हनुनशान जगनारी मान्सं. हे बामनाच्या पोरीला दाखवायची गरज काय व्हती!"

शिवराम ज्या कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे तेथेही दलित वर्ग आपल्या खांद्याला खांदा लावून बरोबरीच्या नात्याने काम करतात, वागतात याबद्दलचा राग, द्वेष उच्चवर्णीयांच्या वागण्याबोलण्यातून व्यक्त होत राहतो. सामाजिक स्तरातील ही दरी एका घटनेने तीव्रतेने जाणवते. एका सच्छिल, तरुण दलित प्राध्यापकावर विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा खोटा आळ घेऊन त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न ब्राह्मण स्त्री प्राध्यापिकेकडून केला जातो. द्वेषाग्नीने माणूस किती हीन पातळीवर जाऊ शकतो, त्याचे हिणकस दर्शन लेखक घडवतो. प्रस्तुत कादंबरीत प्रा. देठे यांची व्यक्तिरेखा आधुनिक सुशिक्षित दलित पिढीचे प्रतिनिधित्व करते. या व्यक्तिरेखेतून उच्चशिक्षित दलित पिढीचे आपल्या समाजबांधवांशी होत गेलेले तुटलेपण, अनास्था, स्वार्थी वृत्तीचे दर्शन होते. स्वत:ला प्रतिष्ठा, पैसा, उच्चवर्णीयात स्थान हे प्राप्त झाल्यावर जन्मदात्यांचे ऋण विसरण्याचा कृतघ्नपणा प्रा. देठे करतात. आपल्या वृद्ध मातापित्यांना घरातून घालवून देण्यापर्यंत त्यांची मजल जाते. शिक्षणाने कृतज्ञतेएएवजी कृतघ्नतेची भावना मूळ धरते. कोणत्याही वादग्रस्त मुद्द्यांबाबतही प्रा. देठे नेहमीच असे कातडी बचाऊ धोरण स्वीकारून अलिप्त राहतात. एकीकडे प्रतिष्ठेची ओढ तर दुसरीकडे दलितवर्गासाठी असलेले लाभ, सवलती घेण्याची तयारी, वेळी जात लपविण्याची वृत्ती असे दुटप्पी धोरण या वर्गाने अवलंबिलेले दिसते.

शिवरामच्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून उच्चवर्णीयांच्या दांभिकतेवर कोरडे ओढले आहेत. ""सार्‍याच प्रश्नांकडे जातीचा, चातुर्वर्ण्याच्या दृष्टिकोनातून पाहायची तुम्हा उच्चवर्णीयांना वाईट सवय आहे. मनूनं आम्हाला कोणत्या पायरीवर बसवलं याची तुम्ही आम्हाला उठसूट आठवण करून देता! हे सगळं आम्हाला विसरायचं आहे. पण तुम्ही विसरू देता कुठं?"" शिवरामच्या या परखड बोलण्यातून उच्चवर्णीयांवरील जातीव्यवस्थेचा पगडा किती खोलवर रुजला आहे ते प्रखरपणे व्यक्त होते. शिवरामवर बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव आहे. शिक्षणाचा उपयोग आपल्या समाजासाठी, समाजबांधवांच्या उन्नतीसाठी करण्याचा त्याचा हेतू उदात्तच आहे. म्हणूनच तो या कामासाठी वेळ मिळावा म्हणून प्राचार्यपद नाकारतो. शिक्षणाने "परीटघडीचे दलित" अशी उपजात निर्माण होणार असेल तर असे शिक्षण खड्ड्यात जावो, अशी तीव्र प्रतिक्रिया तो व्यक्त करतो. कारण मग दलितांमध्येच दोन स्तर निर्माण होऊन दलित वर्गाच्या उत्थानाचे कार्य थंडावेल, अशी भीती त्याच्या मनात उद्भवते. आपापसात विद्वेषाचं राजकारण खेळण्यात नेत्यांचा जन्म खर्च होतोय. त्यामुळे दलितांच्या एएक्याची, उद्धाराची कोणालाच व्यक्तिगत स्वार्थापुढे पर्वा नाही असे चित्र दिसू लागले आहे. बाबासाहेबांच्या शिकवणुकीच्या, विचारांच्या या पराभवाचे शल्य व्यक्त होते. बाबासाहेबांच्या पश्चात चळवळीची जी वाताहत झाली तिच्या कारणांची सविस्तर मीमांसा लेखकाने केली आहे.

सिवरामचा भाऊ यशवंता हा कादंबरीच्या केंद्रस्थानी मानला तर वावगे ठरणार नाही. दलित चळवळीच्या प्रवासाची वाटचाल ही यशवंताच्या व्यक्तिरेखेतून विकसित होत जाते. यशवंता शिवरामकडे शहरात येऊन राहतो. गावात पुढारीपण करणारा यशवंता येथे येऊन मोर्चा, भाषणबाजी यातून आपल्या समाजासाठी झगडतो आहे. पण मग पुढे त्याचा प्रवास वेगळ्या वाटेने होत जातो. चळवळीच्या, क्रांतीच्या मुखवट्याआड एक मुरब्बी, राजकारणी, स्वार्थी, दांभिक, संधीसाधू नेता जन्माला येतो. विद्रोहाची आग हृदयात घेऊन शहरात आलेला यशवंता अत्याचारग्रस्तांचे प्रतीक होता. फाटके कपडे, अन्यायाविरुद्ध झगडण्याचा स्फुल्लिंग, समाजबांधवांसाठी कार्य करण्याची जिद्द घेऊन तो आला होता. पण आज बुडाखाली गाडी आली आणि लक्ष्मीच्या चमचमाटाने त्याच्यात अंतर्बाह्य परिवर्तन झाले. यशवंताचा हा लढा क्राआरYयाची परिसीमा गाठतो तो नामांतर चळवळीच्या प्रसंगी. त्याची भाषा अत्यंत असंस्कृत, शिवराळ आहेच, पण वर्तनही हीन दर्जाचे आहे. तो म्हणतो, ""आपल्यातले शिकून डॉक्टर, वकील, खासदार झालेले लोक आपल्या कामाला येत नाहीत. गरिबांचा कोणी वाली नाही."" तर दुसरीकडे सत्तेसाठी, संपत्तीसाठी भ्रष्टाचार करून राजकारण खेळतो. आपल्याच लोकांची लहानमोठी कामे करताना त्यांना लुबाडतो आहे. दलित चळवळीच्या एका पुढार्‍यानं चळवळीच्या या अध:पतनाचं वर्णन केलं आहे. "ही नेते मंडळी डोंबार्‍याची भूमिका बजावतायत. कोलांट्या उड्या मारून गल्ला जमवून डोंबारी पोबारा करतात, मग दुसरा डोंबारी येऊन तेच करतो." यशवंता हे याचेच एक प्रातिनिधिक रूप.

शिवराम म्हणतो, "प्रस्थापित राक्षसी व्यवस्थेविरुद्धचा त्याचा क्रोध खराखुरा होता. त्याच्या वाणीत तेजाब होतं. भस्म्या रोगाचं व्हायरस त्याच्या अंगात भिनलं आणि तो होत्याचा नव्हता झाला. त्या धनदांडग्या संधीसाधू भडव्याचं जग दांभिक, उलट्या काळजाचं झालं. हेच भीषण चित्र आज चळवळीचं आहे. यशवंत्या ते यशवंतराव या प्रवासात तो आपल्याच जगापासून दूर गेलाय न परतीच्या वाटेवर. त्याचा हा प्रवास दलितदलितेतर संघर्ष आहे तसेच दलित चळवळीचे प्रतीकात्मक रूप आहे. आजही प्रस्थापितांच्या रूढींच्या दास्यात खितपत पडलेल्या दलित वर्गाच्या जगातील दिशा काजळल्या आहेत. त्याचे हे वास्तव व भेदक चित्रण लेखकाने केले आहे. त्याचबरोबर जगनच्या व्यक्तिरेखेद्वारा दलितवर्गाच्या चळवळीचे हे चित्र बदलण्याबद्दलचा आशावाद व्यक्त केला गेला आहे. लेखकाने उभे केलेले हे चित्र केवळ दलितदलितेतर संघर्षाचे नाही तर शोषित व शोषकांमधील संघर्षाचे हे वास्तव चित्रण आहे.
-- माधुरी महाशब्दे

Write your review for this book

Other works of सुभाष भेंडे
   पैलतीर
   फुल ना फुलाची पाकळी
   किनारा
   होमकुंड
   नेपोलियन नंतर तुम्हीच

Similar books:
  कादंबरी
   श्रीमान योगी
   मृत्युंजय
   शोध महात्मा गांधींचा - भाग १ आणि २
   स्वामी
   तुंबाडचे खोत - खंड पहिला
   More ...  
  राजकीय
   झाडाझडती
   मराठी रियासत - खंड १ ते ८
   ताम्रपट
   बकासुर!
   मी अत्रे बोलतोय
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.