Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


श्यामिनी
Author: तारा वनारसे
Publisher: मौज प्रकाशन
Add to Shopping Cart
Price: $5.14 $4.11 20% OFF ( ~172 Pages, R150)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
ही शूर्पणखेच्या उद्धवमस्त जीविताची कहाणी आहे तशीच ती जानकीच्या-कनवाळू, हळव्या मनाच्या, भावनाश होणार्‍या-व्यथेचीही. मिथरूपात असलेल्या या कहाणीची, तारा वनारसे श्यामिनी मधे पुननिर्मिती करत आहेत. कालाच्या गहन धुक्यातून मिथकाला वरती आणत, त्या कहाणीतले काव्य आणि कारुण्य अलवारपणे उलगडत, तिच्या मूलस्वरूपातला अदृश्य अवकाश अधिक भावगर्भ करत, तिला स्वत:ची अशी तर्कसंगत दिशा देत, तारा वनारसे श्यामिनीचे आणि जानकीचे अविस्मरणीय दर्शन इथे घडवतात. तसेच अर्यमासारख्या नव्या मिथकाला जन्म देतात. मिथकाचा विस्तार करणारे लेखन आढळत असते. मात्र मिथकाच्या पुननिर्मितीचा योग सर्जनशील लेखकाच्या लेखनात भेटतो. तसा दुर्मिळ, आनंददायक अनुभव श्यामिनी वाचताना येत राहतो.

Review courtesy of Maharashtra Times:
निमित्त 'श्यामिनी'चे

'काळया वर्णाची असून एका गोर्‍या, विवाहित तरुणावर प्रेम करण्याचा, ते व्यक्त
करण्याचा अक्षम्य अपराध तिने केला होता. त्या अमर्यादेकरिता मिळायला हवे ते
शासन तिच्या वाटयाला आले- तिचा वंश गुलाम झाला, पायाखाली तुडविला गेला.
तिची माणसे मूक झाली. हजारो वर्षांची जतन केलेली परंपरा धुळीला मिळाली...'

'श्यामिनी' या तीन प्रकरणांच्या कादंबरीच्या नायिकेसंबंधी लेखिकेने, तारा वनारसे यांनी, केलेली
ही नोंद. ही श्यामिनी कोण, असा प्रश्न येणार हे ठाऊक असल्याने लेखिकेने त्याचे उत्तर दिले
आहे. लंकेच्या प्रगल्भ, सुसंस्कृत राजघराण्यातील ही मुलगी. तिचे खरे नावही इतिहासाने नमूद
केलेले नाही. 'शूर्पणखा' या नावाने एक निर्लज्ज, हिंस्र राक्षसीण म्हणून ती जनमानसात केवळ
एक उपहासाचा आणि कुचेष्टेचा विषय तेवढी होऊन राहिली, अशा चिंतनातून ही कादंबरी
साकार झाली.

शूर्पणखेचे विटंबन करून लंकाधिपती सम्राट रावणाच्या हृदयाच्या एका अतिकोमल भागाला
रामाने जखम केली. केवळ रामाशी युद्ध करून, त्याचे रक्त सांडून त्या अघोर कृत्याची भरपाई
होणार नव्हती. रावणासारखाच त्याच्या जिव्हारी घाव लागायला हवा होता. त्यासाठी रामाला
अतिशय प्रिय ते हिरावून नेण्याचा घाट त्यांनी घातला. त्यांनी कपटनीतीने सीतेचे पर्णकुटीतून
अपहरण केले आणि तिला लंकेला नेले. लंकेमध्ये त्यांना आपल्या सत्तेचे पाठबळ होते.

रुवरित रामायण घडले, ते सीतेमुळे नाही, तर 'शूर्पणखे'मुळे. उत्तर-दक्षिणेच्या संघर्षात आर्यांच्या
विजिगीषू, धडाडणार्‍या दंष्टृकराल रथचक्राखाली श्यामिनी आणि सीता, दोन अजाण राजकन्या
भरडल्या गेल्या, असे लेखिकेने नमूद केले आहे. भूमिपुत्रांची भूमी बळकावून त्यांना परतंत्र
करणार्‍या वसाहतवाद्यांच्या दंडेल, कारस्थानी, निर्दय वृत्तीमुळे त्यांनी केलेल्या अत्याचाराची
तुलना प्राचीन भारतात आर्यांनी अनार्यांच्या केलेल्या हेटाळणीशी आणि हुसकावणीशी करता
येण्याजोगी लेखिकेला वाटली.

म्हणूनच ती म्हणते : राम-रावणांच्या कडव्या, व्यक्तिगत शत्रुत्वाला सुरुवात झाली, ती
शूर्पणखेच्या विटंबनेनंतर. राम-लक्ष्मण आणि खर-दूषण यांच्या प्रत्यक्ष युद्धाला तोंड लागले, ते
राजकन्येच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी. नंतर रावणाने सीतेचे अपहरण केले, तेही रामाच्या
क्रौर्याचे उत्तर म्हणून. शत्रुपक्षाला डिवचण्यासाठी तर राजकन्येचा अवमान केला गेला नसेल?
राजकारणी मतलबासाठी तर तिच्या आयुष्याचा चोळामोळा झाला नसेल? या विचारांनी
शूर्पणखेच्या कथेला एक वेगळे परिमाण लाभले. यामुळे लेखिकेने वेगळयाच दृष्टिकोनातून
शूर्पणखेच्या कथेकडे पाहण्याचा प्रयत्न केला आहे. वाल्मिकी रामायणातील परिचित कथेला
वेगळी कलाटणी देण्याची कल्पनाही लेखिकेचीच आहे. त्यासाठी काही काल्पनिक प्रसंग आणि
व्यक्तिरेखांची जोड तिने दिली आहे.

तिसर्‍या व संपूर्णपणे लेखिकेच्या कल्पनेतून उपजलेल्या प्रकरणाचा नायक अर्यमा हा आधीही
आला आहे. शौनक मुनींचा हा पुत्र कल्पिला असून आई अनार्य. त्यामुळे त्याला दोन्ही
संस्कृतींची ओळख आहे. तो ज्ञानी आणि अगदी श्रीरामाच्या बोलीभाषेच्या तुलनेत त्याचे संस्कृत
विदग्ध आणि विद्वत्तापूर्ण आहे. उंचनिंच, सावळा आणि विशेष देखण्या रूपाचा हा तरुण
श्यामिनीवर मूक प्रेम करतो. ज्याची तिला जाणीवच नाही. आपले हे प्रेम यशस्वी हेणार नाही,
याची जाणीव असूनही अर्यमा भरकटलेला नाही. उलट वाल्मिकी आश्रमात शूर्पणखेचे
टिंगलवजा वर्णन होऊ लागताच तो मौन सोडून उसळून 'आपली अविवेकी काव्यबुद्धी आवरून
धरा, अहो काव्यपंक्तींनी जिचा आज धिक्कारून अवमान केला, ती रूपमती स्वत:च खरोखर
एक अनुपम कवितारती होती' असे सांगतो. 'रावणायन' लिहून आपल्या सम्राटाचे रूप
जगासमोर आणायचा त्याचा विचार असतो. वाल्मिकींच्या आशीर्वादाने तो तसा प्रयत्न करतोही.
पण त्याचे काव्य निसर्गाच्या कराल करणीने भूमीगत होऊन गेले. मात्र अजूनही कदाचित,
क्वचित एखादे वेळी भूमीला हृदयाचे कान देऊन एएकणार्‍याला श्यामिनीची खोल गाडून
टाकलेली विराणी एएकू येतही असेल.

रामायण-महाभारतातील कथा-व्यक्तींचे आपल्याला भावलेले रूप किंवा हवे असलेले रूप
प्रकट करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत. कथांचे अन्वयार्थही वेगवेगळया प्रकारे लावले
जातात. रामायणकालात आर्य-अनार्य संघर्ष होता. तो नंतर तितका राहिला नसावा; कारण
महाभारतात तसा सध्याच्या भारताच्या सर्व भूभागांचा समावेश आहे आणि संबंधही आहे. अर्थात
रामाच्या लंकागमनामुळेच हे झाले. लेखिकेने काही मुद्दे उपस्थित केले आहेत व त्यांची उत्तरे
शोधण्याचा प्रयत्नही कांदबरीत व निवेदनात केला आहे. दक्षिणापासून दाक्षिण्य व यांचा संबंध
कदाचित दक्षिणेकडील देशांतील लोकांची, दाक्षिणात्यांची, शालीन सौष्ठवपूर्ण आचरणपद्धती
यावरून रुढ झाले असतील, असा अंदाज ती करते.

म्हणूनच रावणाच्या अंतर्गृहामध्ये दीर्घकाळ बंदिवासात राहूनही सीतेचे शील अकलंकित राहिले,
असे वाल्मिकींनीच मान्य केले आहे. म्हणजे विरोधाभास असा की, सुसंस्कृत आर्यांनी- घरी
प्रेमाची भीक मागण्यासाठी आलेल्या कुमारिकेला त्या 'सत्यवचनाचे' शासन म्हणून कान, नाक
कापून तिची घोर विटंबना केली; तर अनार्यांच्या राजाने मात्र स्त्रीत्वाचा पूर्ण आदरच केला. पण
त्याचे हे मोठेपण, थोरवी आणि सुसंस्कृतपणा जनसामान्यांच्या नजरेत भरू नये, म्हणून मग
त्याला 'शाप' होता, त्यामुळे घाबरूनच तो सीतेपासून दूर राहिला, वगैरे पुरवण्या, सीता त्याची
मुलगीच- येथपर्यंत जोडल्या गेल्या. म्हणजे प्रत्यक्षात तर नाहीच, पण कथांमध्येही अनार्यांच्या
चांगल्याला चांगले म्हणणे, 'सुसंस्कृत' आर्यांनी टाळलेलेच दिसते.

शूर्पणखेच्या विटंबनेचाही अशाच पद्धतीने विचार केला, तर काय दिसेल?

तर अयोध्येच्या या राजकुमारांचे क्रौर्य आणि विकृती. सीता, राम आणि लक्ष्मण यांच्यात आपल्या
गौरवर्णाबद्दल नको तेवढा अभिमान होता आणि त्यामुळे आपण श्रेष्ठ ही समजूत होती. जाऊ
तेथील उपचार, रीतीरिवाज, साध्या चालीरीती न पाळण्याचे औद्धत्य होते आणि आपण जाऊ ती
भूमीही आपलीच (त्यासाठी परवानगी मागण्याचा साधा उपचारही ते पाळत नाहीत. मग बाकी
गोष्टी दूरच.) असा अहंगंडही होता. त्याचे दर्शन वारंवार होते. पण त्यांच्याबद्दलचे त्या
भूमीपुत्रांचे मत काय, तर या गोर्‍या लोकांची कीर्ती बरी नाही. त्यांच्यातल्या लुटारू टोळयांनी
विंध्य पर्वतापलीकडील भागात घुसून धुमाकूळ घातला, काय काय अत्याचार केले... त्याच्या
हकिकती कळवळून टाकणार्‍या आहेत. शूर्पणखेचा समवयस्क संताली हे सांगतो. अर्यमा-
त्यांच्या भाषेत 'एरी एमा' झाला आहे. तोही या गोर्‍यांना पूर्णपणे ओळखून आहे. 'या तिघा
आगंतुक माणसांचा सुरुवातीसच समाचार घ्यायला हवा,' असे त्याला वाटते; कारण त्या गोर्‍यांची
आत्मप्रौढी जाणवण्याजोगी आहे आणि स्थानिक रहिवाशांना कस्पटासमान लेखण्याचा ताठा
आणि माज त्यांच्यात आहे. या लोकांकडे पाहण्याची त्यांची दृष्टी तुच्छतेचीच आहे.

श्यामिनी रंगाने गोरी नसली, तरी रेखीव, सुंदर, मुख्य म्हणजे नुकतीच तारुण्यात पदार्पण केलेली
आहे. सीतेच्या तुलनेत आपण खूपच उजव्या आहोत; त्यामुळे रामाने आपली इच्छा पूर्ण करून
आपला स्वीकार करावा, यासाठी ती प्रयत्नशील आहे. सीतेसाठी वेगळा राजप्रासाद बांधून
देण्याएवढी तिची तयारी तिच्या मनाचा उमदेपणाच दाखवून देते. कुणाचेही वाईट ती चिंतित
नाही. हे तीन आर्य आपले पाहुणे आहेत; त्यांनी उपचार, रीतभात पाळले नाहीत, तरी आपण ते
पाळावेत, सौजन्य सोडू नये, अशीच तिची भूमिका आहे. त्यामुळे व कदाचित प्रेमापोटीही
असेल, ती अपमान विसरून पुन्हा रामाची आर्जवे करते.

पण दुसर्‍याच्या मनाचा विचार न करता त्यांचा उपहासच करायची 'त्यांची' रीत आहे. ती
टवाळीची मजल गाठते. त्यामुळे तिला नकार देऊन राम तिला, तू लक्ष्मणाला विचार असे सांगतो
आणि तोही आपल्या थोरल्या भावाचाच कित्ता गिरवितो. अशा प्रसंगी कुणालाही राग येईल, तसा
श्यामिनीलाही येतो. तरी ती आर्जवे सोडत नाही. पुन: पुन्हा प्रयत्न करते. रामाचा संयम संपतो.
तो लक्ष्मणाला तिला अपमानित करण्यास सांगतो. पण ती स्त्री असल्याने जीवे मारू नको, असे
राम सांगतो. म्हणून लक्ष्मण तिचे कान, नाक छाटतो. ती बेशुद्ध होते.

कुत्सित हसून, टिंगल करून तिला या ना त्या प्रकारे धडा शिकवावा, या हेतूनेच त्यांनी तिला
पर्णकुटीत बोलावलेले असते. पण गोष्टी या थराला का जातात, तर सीतेला वाटणारा हेवा आणि
द्वेष. याला कारण अर्थातच ही सुस्वरूप सुंदरी रामाला हिरावेल, ही भीतीच असणार. त्यामुळे
प्रथमपासूनच या बंधूंचे मत तिच्याविषयी कलुषित होईल, असाच प्रयत्न ती करते. तरीही
त्राटिकेला ठार करणारा राम ती स्त्री असल्याने तिला ठार करू नको, असे का म्हणतो?
त्याच्याही मनात चलबिचल झाली असेल का आणि लक्ष्मण तिला अपमानित करायचे, म्हणून
थोडयाफार शरीरदंडाची शिक्षा देण्याएएवजी तिचे कान-नाक छाटून टाकतो, याचे कारण त्याला
आलेला राग. हा राग तिने आपल्या भावजयीवर हात टाकल्याचा होताच; पण आदिम प्रवृत्ती
जाग्या झाल्याने श्यामिनीविषयी आकर्षण वाटू लागल्याचाही असावा. म्हणजेच स्वत:चाच
असावा. आपल्याला असे विचलित व्हायला लावणार्‍या, मोहात पाडणार्‍या स्त्रीवरच मग तो
राक्षसी पद्धतीने राग काढतो. तिच्याबद्दल आकर्षणच वाटू नये, यासाठी ही तरतूद असावी. कारण
आपल्या तप:श्चर्येत आलेले विघ्न त्याला डाचले व त्याहीपेक्षा आपले स्खलन होऊ लागल्यामुळे
तो अस्वस्थ झाला असावा, अशीही शक्यता आहे.

उद्दामपणे दुसर्‍याच्या भूमीवर जाऊन, शिष्टाचार न पाळता वस्तीसाठी पर्णकुटी बांधून व
'आपल्या' या जागेच्या रक्षणाची तजवीज, स्थानिकांची उपेक्षा, त्यांच्याकडे तुच्छतेने पाहण्याची
वृत्ती असे अनेक गुणधर्म असलेले आर्य आणि परक्यांच्या या औद्धत्याकडे दुर्लक्ष करून
त्यांच्याशी जुळवून घेण्यास उत्सुक, त्यांनी रीतीरिवाज पाळले नाहीत, तरी उदारबुद्धीने त्यांना क्षमा
करणारे दाक्षिणात्य 'अनार्य'. त्यांची संभावना रानटी, असंस्कृत म्हणून करण्याचे धाडस या
आर्यांनी केले. लोकमानसात ते रुजवले. इतके की अनार्यांच्या भूमीतही रामाला देव मानणारे
अनेक भक्त झाले. अर्थात त्यालाही कारण असावे.

रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर राम जवळपास असहाय बनला. त्यामुळे- तसे पाहिले तर
आर्यांच्या दृष्टीने अनार्यांच्याही खालच्या पातळीवरील- वानर, अस्वल अशा टोळयांशी त्याने
सलोख्याचे संबंध जोडले. त्यातही वालीचा दगाबाजीने घात करून आपली संस्कृती
दाखविलीच. आणि रावणाने सीतेच्या शीलाला धक्काही लावलेला नाही, हे पुरते ठाऊक
असूनही तिला एकदा नव्हे तर दोनदा शुद्धी करायला लावली. याची त्याच्या सुसंस्कृतपणाशी,
देवपणाशी संगती कशी लावली गेली, ते आपण जाणतोच. उलट शत्रूच्या तावडीतून सोडवून
आणलेल्या मुलींबाबत कुणी वावगे बोलू नये, म्हणून त्यांना पत्नीपद देणार्‍या कृष्णाला भोगी
म्हणून उपहासले जाते, ते याच सुसंस्कृतपणामुळे!

शेवटी चांगले आणि वाईट हे व्यक्ती आणि प्रसंगसापेक्षच असते, तसा हा सुसंस्कृतपणाही
असावा. जो तो आपल्या सोयीने तो ठरवितो.

यातून वेगळया स्वच्छ दृष्टीने शूर्पणखेच्या कथेकडे पाहून तिचा अर्थ लावण्याचा, ती साकार
करण्याचा लेखिकेचा प्रयत्न म्हणूनच दाद देण्याजोगा आहे. तरीही एकूण लेखनाचा आणि
त्यातील व्यक्तींच्या चित्रणाचा विचार केला, तर ती राम, सीता आणि लक्ष्मणाला थोडे झुकते
माप, नकळत का होईना, देते असे वाटते. कारण तिने वापरलेली भाषा आणि केलेली काही
वर्णने, यांमुळे अनाहूतपणे तिच्याच हेतूला बाधा पोहोचते. असे का व्हावे याचा विचार केला, तर
'एक आर्यत्व आहे, तिच्याही मनात दडून' असे वाटते आणि चुकचुकायला होते.

- आ. श्री. केतकर

Write your review for this book

Other works of तारा वनारसे
   तिळा तिळा दार उघड
   गुप्त वरदान
   बारा वार्‍यांवर घर
   नर्सेस क्वार्टर्स
   सूर

Similar books:
  कादंबरी
   मृत्युंजय
   श्रीमान योगी
   स्वामी
   पार्टनर
   ययाति
   More ...  
  पौराणिक
   युगांत
   वेदातील गोष्टी - भाग १ व २
   कौंतेय
   मृत्युंजय (नाटक)
   श्रीमहाभारत कथा
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.