|
लांडगा
Author: अनंत सामंत
Publisher: मॅजेस्टिक प्रकाशन
|
|
Price: $6.85 $5.48 20% OFF ( ~204 Pages, R225)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: त्याची आई कुत्री होती. त्याचा जन्म लांडग्यांच्या कळपात झाला. माणसांच्या क्रूर जगात तो लहानाचा मोठा झाला. कुत्र्यांशी त्याचं फक्त शत्रुत्वाचं नातं होतं. माणसांनी नेहमीच त्याला झिडकारलं. खुनी म्हणूनच त्याला सगळे ओळखत होते. तो चोर्या करून जगत होता. तो लांडगा होता का कुत्रा ते कधीच कोणी ठरवू शकलं नाही. तो लांडग्यांपेक्षा हिंस्र होता. माणसांपेक्षा कुटिल होता. तो बुद्धिमान होता. तो योद्धा होता, त्याच्या एकांड्या, अस्थिर आणि रक्तरंजित वाटचालीत तो फक्त एकच गोष्ट शोधत होता, ... प्रेम! मानवी वाटावी एवढी हळुवार, चिंतनशील तरीही अविस्मरणीय कहाणी.
जॅक लंडनच्या "व्हाईट फॅंग" या सुप्रसिद्ध पुस्तकाचा भावानुवाद
Review courtesy of Maharashtra Times: ३डिसेंबर२००० लांडगा नावाची प्राणिमात्राची कालातीत कथा - दीपक घारे
जीवनातल्या मळलेल्या वाटेने जाण्यापेक्षा निसर्गाच्या आदिम विश्वासारखी अनोखी आणि साहसाने भरलेली वाट चोखाळण्यात काही लेखकांस रस असतो. अनंत सामंत यांचा पिंड अशा प्रकारच्या अनुभवांना सामोरे जाण्याचा असल्यामुळे जॅक लंडनच्या कादंबर्यांशी त्यांचे नाते जुळले नसते, तर नवलच होते.
लांडगा हा जॅक लंडनच्या व्हाइट फॅंग या कादंबरीचा अनंत सामंत यांनी केलेला भावानुवाद आहे आणि अनुवाद करताना त्यांनी मूळ लेखकाला पुरेपूर न्याय दिलेला आहे. सामंत हे या कादंबरीच्या अनोख्या विश्वाशी इतके एकरूप झाले आहेत, की शेवटचा जॅक लंडनचा उल्लेख वाचला नाही, तर ही कादंबरी मराठीतीलच असावी, असे वाटण्याइतकी सहजता त्यात आहे. व्हाईट फॅंग ही लांडग्यांच्या कळपात जन्माला आलेल्या एका कुत्र्याची हिंस्त्र आणि निर्दय कहाणी आहे. कादंबरीची सुरुवात होते, ती उत्तर ध्रुवाजवळच्या रानटी, क्रूर आणि हृदय गोठवणार्या जगात. जीवनमरणाच्या रेषेवर सतत जागे ठेवणार्या प्रदीर्घ रात्री आणि आशेचा प्रकाश दिसता दिसताच मावळणारे क्षणभंगुर दिवस अशा या वातावरणात सारे जीवनच गोठल्यासारखे, भावहीन भासते. पण आतून मात्र जगण्यासाठी चाललेली सजीवांची धडपड आणि आक्रोश रात्रीच्या स्तब्ध वातावरणावर ओरखडा उमटवून जातो. व्हाईट फॅंगचा जन्म आणि ग्रे बिव्हर या रेड इंडियनचे त्याने स्वामित्व पत्करणे इथपर्यंत कादंबरीचा पहिला भाग मानला, तर त्यात मुख्यत्वे येते ती आदिम वृत्तींना प्रमाण मानणारी आणि आदिम शक्तीपुढे माणसांच्या आणि एकूणच जीवसृष्टीच्या धडपडीला क्षुद्र आणि निरर्थक ठरवणारी आदिशक्ती. प्रत्येक हालचाल थांबण्यासाठीच चालू झालेली असते, हा सृष्टीचा नियम. माणसाची वळवळ आणि धडपड या नियमाला आव्हान देत चालू असते. पण माणसाचे माणूसपण हिरावत ती त्याला शरण आणते. कादंबरीच्या सुरुवातीलाच दृश्य दिसते, ते लांडग्यासारख्या कुत्र्यांचे आणि त्यांच्या मागोमाग सरकणार्या स्लेडचे. या स्लेडवर लादलेल्या सामानात एका माणसाचे प्रेत आणि आणि कुत्र्यांच्या रांगेसोबत धडपडत चालणारी दोन माणसे आहेत. तीदेखील मृत्यूपासून दूर पळताहेत. लंडग्यांची शिकार झालेला त्यातला एक शेवटी मृत्यूला कवटाळतो आणि एक अर्धमेल्या अवस्थेत ऐनवेळी माणसांची कुमक आल्यामुळे मृत्यूच्या जबडयातून सुटतो!
ग्रे बिव्हरचा प्रवेश होईपर्यंत ही कादंबरी कोणती वळणे घेणार आहे याचा पत्ता लागत नाही. कारण जंगलातले जीवनमृत्यूचे रौद्रभीषण तांडव आणि या क्रौर्यात लपलेली निरागसता आणि पशूपातळीवर होणारे त्याचे आकलन याचेच चित्रण मुख्यत: या भागात आलेले आहे. कादंबरीला अर्थाच्या ज्या विविध पातळया आहेत, त्यापैकी ही पहिली पातळी. व्हाईट फॅंगची जन्मकथा या भागात येते. कांदबरीची दुसरी पातळी आहे, ती व्हाईट फॅंगसारख्या एका लांडग्याच्या दृष्टिकोनातून उलगडत आणि उमजत जाणार्या भोवतालच्या परिसराची. ज्या गुहेत त्याचा जन्म झाला, त्या अंधार्या क्षणापासून ते अमेरिकेतल्या विस्तीर्ण विश्वापर्यंत त्याला उलगडत गेलेले जग आणि त्यातून घडत गेलेली त्याची उपजत समज लेखकाने विलक्षण ताकदीने रंगविली आहे. गुहेबाहेरचे जग ही त्याला झालेली बाहेरच्या जगाची पहिली ओळख. मग त्याची ओळख माणूस नावाच्या प्राण्याशी झाली आणि भीतीने पळून न जाता तो संपूर्ण शरणागती स्वीकारत, दबकत खाली बसला. ग्रे बिव्हर या रेड इंडियनने त्याचे नामकरण केले, पांढरेशुभ्र सुळे असलेला म्हणून, व्हाईट फॅंग. त्या दिवसापासून स्वामित्व ही एक नवीच वस्तुस्थिती त्याच्या जीवनात निर्माण झाली आणि व्हाईट फॅंग हा आपले निसर्गदत्त स्वातंत्र्य गमावून बसला. व्हाईट फॅंगला स्वत:चे वेगळे व्यक्तिमत्व आहे. त्याच्यात कुत्र्याचे ईमान आहे आणि लांडग्याची हिंस्त्रताही आहे. लांडग्यांच्या कळपात राहून तो कुत्र्यांचा शत्रू झाला. त्याला साथ आहे, ती फक्त जिवावर उठलेल्या भोवतालच्या जगाबद्दलच्या प्रचंड उद्वेगाची. व्हाईट फॅंग त्याच्या कुटिल आणि बुद्धिमान डावपेचांमुळे कुत्र्यांच्या आणि माणसांच्या जगात भीतीयुक्त दरारा निर्माण करू शकला; पण प्रेमाची जवळिक तो कुणाशी साधू शकला नाही. प्रेमाची व्हाईट फॅंगला पहिली ओळख झाली, ती विडन स्कॉटमुळे. विडन स्कॉट व्हाईट फॅंगच्या आयुष्यात आला नसता, तर प्रेम नावाची चीज त्याला कळलीच नसती. विडन स्कॉटच्या आलिशान घरात आणि कुटुंबियांमध्ये व्हाईट फॅंग गुबगुबीत, ऐषारामी आणि आनंदी आयुष्य जगू लागला. लांडग्याचा जंगली हिंस्त्रपणा खोल दडला गेला आणि माणुसकीच्या उबेत तो खेळकर बनला, हसायला शिकला. दुसर्यांसाठी जगायला तो शिकला. व्हाईट फॅंग म्हणजे शुभ्र दंताडया हे नाव त्याला कुचेष्टेने देण्यात आलेले होते. कादंबरीत अखेरीला तो स्कॉट कुटुंबियांचा लाडका ब्लेस्ड वुल्फ झाला! व्हाईट फॅंगचे जगणे, माणसांच्या सहवासाने झालेले त्याच्यातले परिवर्तन यातून माणसाच्या जीवनातल्या प्रेरणा, त्याचा अनेक पातळयांवरचा झगडा आपल्या मनात जागा होतो आणि काही साम्यस्थळे दिसू लागतात. कादंबरीतल्या आशयाची ही तिसरी आणि अधिक महत्त्वाची पातळी आहे. एका लांडग्याच्या परिप्रेक्ष्यातून आपण कादंबरी वाचत असतानाच माणूस म्हणून असलेले परिप्रेक्ष्य आपल्या मनात जागे असते. त्यामुळे व्हाईट फॅंगला देवांप्रमाणे भासणारे ग्रे बिव्हर आणि ब्यूटी स्मिथ आणि त्यांच्या वागण्याचा एका लांडग्याने लावलेला अर्थ त्याच्यापुरता किती खरा आणि तरीही किती मर्यादित आहे, हे आपल्या लक्षात येते आणि वास्तवाचे आकलन करण्यात आपणही या लांडग्यापेक्षा फार वेगळे नाही याचेही भान येते. व्हाईट फॅंगला गुलामाप्रमाणे नाचवणार्या पहिल्या दोन देवांपेक्षा विडन स्कॉटच्या रूपाने भेटलेला तिसरा देव अधिक मायाळू आहे, उदार आहे; पण तोही शेवटी स्वामीच आहे. त्यामुळे क्रमाक्रमाने सुरक्षित होत जाणारे व्हाईट फॅंगचे आयुष्य त्याने चुकविलेल्या किमतीच्या मोबदल्यात कितपत आदर्श मानायचे, हाही प्रश्न उरतोच. जिम हॉल हा गुन्हेगार म्हणजे व्हाईट फॅंगचाच मानवी अवतार आहे. क्रूर समाजाच्या दुष्ट वागणुकीने अधिकच पिसाळलेला. अंतरातला क्रोधाचा आणि आंधळया त्वेषाचा अग्नी प्रज्वलित ठेवणे हा जीवनतृष्णेचाच एक नाकारता न येणारा भाग आहे. स्वत: जॅक लंडनचे आयुष्यही साहसी वृत्ती आणि असमाधानाने भरलेले होते. तो ज्या काळात जगला, त्या काळात भांडवलशाहीचे दुष्परिणाम आणि डार्विन-स्पेन्सरचे उत्क्रांतीवादी विचार यांचे पडसाद उमटत होते. लांडगामधला संघर्ष एका अर्थाने अनंत योजने दूर आहे आणि तरीही कधीतरी तो या विचारव्यूहांच्या जवळ आल्यासारखा वाटतो. मात्र त्यातून मानवी तर्कशक्तीच्या मर्यादाच अधोरेखित होतात आणि कसलीही मॉरल्स काढण्याची सक्ती नसलेले हे संवेदनांचे, वेदनांचे विश्व शब्दांपलीकडचे खूप काही सांगून जाते.
Other Links:
|
 |
 |
|