Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


अक्षर मैत्री
Author: रागिणी पुंडलीक
Publisher: संस्कृती प्रकाशन
Add to Shopping Cart
Price: $6.85 $5.48 20% OFF ( ~180 Pages, R200)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
विद्याधर पुंडलिक यांच्या साहित्यामुळे जी माणसे जोडली गेली त्या व्यक्तींचे चित्रण या पुस्तकात आहे. या पुस्तकाची खासियत अशी की, रागिणी पुंडलिक त्या व्यक्तींचा आणि आपल्या नात्याचा शोध घेताना दिसतात. या पुस्तकात जुन्या साहित्यिकांच्या दुर्मिळ आठवणी हा अनमोल ठेवा आहे.
-- वीणा देव

Review courtesy of Loksatta:
लोकसत्ता रविवार १२ डिसेंबर २०१०
अक्षरमैत्री
-- वीणा देव
पुणे शहरातल्या सांस्कृतिक घडामोडींनी आजवर किती जीवनं समृद्ध झाली, त्याची मोजदाद करता येणार नाही. रोजच्या संध्याकाळी तिथं असं नवनवीन ऐकायला, पाहायला मिळत असतं, ज्यातून आनंद लुटावा. रागिणी पुंडलिक यांचं अक्षरमैत्री हे पुस्तक पुण्यातल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं एक फलित म्हणावं लागेल.
साहित्य-कलांशी निगडित विविध उपक्रमांना आवर्जून जाऊन कलास्वाद घेणं, हा रागिणीबाईंचा छंद. विद्याधर पुंडलिक या त्यांच्या प्रतिभावंत पतीच्या सोबतीनं त्यांनी दीर्घकाळ हा आस्वाद घेतलेला. त्यातल्या काही लेखकांशी, कलाकारांशी या दाम्पत्याचा स्नेह जुळलेला. या स्नेहाच्या आणि त्या त्या व्यक्तींच्या कलाकृतींच्या आठवणींसंबंधी साहित्यसूची या मासिकासाठी बाईंनी केलेलं लेखन अक्षरमैत्रीमध्ये संग्रहित केलेलं आहे. मला लाभलेली साहित्यिकांच्या सहवासाची निर्भेळ आनंद देणारी ऊब वाचकांनाही अखंड लाभावी, म्हणून या लेखनाला पुस्तकरूप द्यायची धडपड मी केली, असं त्यांनी प्रस्तावनेत म्हटलं आहे.
गेल्या चाळीसेक वर्षांत मराठी साहित्यात व्यक्तिपर लेखन मोठा प्रमाणात होत आहे. लेखकपत्नींची आत्मचरित्रं हाही त्याच्याजवळ जाणारा लेखनप्रकार म्हणता येईल. पतीसंबंधी, त्याच्या आपल्याशी आणि इतरांशी असलेल्या नात्याबद्दल लिहून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा आपल्याला लागलेला अर्थ शोधून तो शब्दबद्ध करणारी आत्मपर लेखनं मराठीत अनेक आहेत. साथसंगत या रागिणीबाईंच्या आत्मचरित्रातलं त्यांचं प्रांजळ, स्वच्छ, कोणताही आव न आणता केलेलं आत्मकथन वेगळेपणानं उठून दिसलं.
मराठीतल्या व्यक्तिपर लेखनात वैविध्यही भरपूर दिसतं. व्यक्तिगुणांना दाद देणारी, त्यांच्या कलावृत्तीची नोंद करणारी, कलात्मक व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणारी, आठवणी सांगणारी, त्यांच्या व आपल्या नात्याचा शोध घेणारी अशी विविध प्रकारची व्यक्तिपर लेखनं मराठी साहित्यात दिसतात. जिगसॉ (रामदास भटकळ), शुभ्र काही जीवघेणे (अंबरीश मिश्र), सोयरे सकळ (सुनीता देशपांडे), रत्नकीळ (आनंद अंतरकर) ही त्यातली काही दर्जेदार लेखनं. आवडलेली माणसं हे पुंडलिकांचं व्यक्तिपर लेखनही आवर्जून नोंदवायला हवं. या लेखनांनी मराठीतलं ललितगद्य समृद्ध केलं आहे. मराठी रसिकांना केवळ साहित्यातून भेटलेल्यास कलाक्षेत्रातून सतत डोळ्यासमोर असणार्‍या व्यक्ती त्यातून शब्दरूपानं साकार झाल्या.
अक्षरमैत्रीमध्ये पुंडलिक पती-पत्नी दोघांनी घेतलेल्या सह-अनुभवाची चित्रं अधिक प्रमाणात दिसतात. माणसं जाणून घेणं, त्यांच्या सहवासात असणं, त्यांच्यामध्ये परस्परसंवाद असणं, हाही रागिणीबाईंच्या साथसंगतीचा एक भाग आहे. विवाहानंतर साहित्याची सोबत त्यांना लाभली. संवेदनशील, जाणत्या, चिकित्सक कलावंतांबरोबर वाचणं, ऐकणं झालं. हळूहळू जीव कलांमध्ये अधिक रमू लागला. कलाकृतींची र्मम उलगडायला लागली. पुढे त्या लेखनही करू लागल्या.
मराठी साहित्याच्या प्रवाहात स्त्रियांच्या लेखनामध्ये आत्मचरित्रांच्या निमित्तानं थोडा मोकळेपणाही येऊ लागला होता. स्त्री-पुरुष असा भेद न करता माणसाबद्दल लिहिण्यासारखा बदलही त्यात स्पष्टपणे दिसायला लागला होता. या रागिणीबाईंच्या लेखनामध्येही त्या मोकळेपणाच्या खुणा दिसतात.
रागिणीबाईंचं व्यक्तिपर लेखन एकूण त्या त्या व्यक्तींचं कर्तृत्व, लेखन, कला यांच्यासंबंधी असलं तरी ते आठवणींच्या अंगानं अधिक जातं. सर्वच लेख सदरासाठी लिहिले गेलेले असल्यानं शब्दसंख्येची मर्यादा त्याला आहे. पुस्तकरूपानं प्रसिद्ध करताना बाईंनी पुनर्लेखन केलं असतं, तर ते लेखन अधिक विस्तृत, घाटदार, ठाशीव झालं असतं. अनेक वाक्यांमधली रचनेची संदिग्धताही कमी झाली असती.
साहित्याच्या क्षेत्रात वावरणार्‍यांना या संग्रहातली बरीचशी माणसं परिचित असतील; पण रागिणीबाईंच्या लेखनातून काही व्यक्ती अधिक उजळलेल्या दिसतात. नेमक्या, मोजक्या शब्दांमधून काही व्यक्तींसंबंधी त्यांनी दिलेले अभिप्राय बोलके आहेत. शांताबाई शेळक्यांविषयी लिहिताना, चैतन्यमय हिरवं मन असलेल्या शांताबाई- असं त्या सहज म्हणून जातात. साहित्याचा बुलंद आधार असं त्या श्री. पु. भागवतांसंबंधी लिहितात तेव्हा ते शब्द व्यापक अर्थ प्रसवणारे आहेत असं वाटतं. स. ह. देशपांडे हे पुंडलिकांचे अतिशय जवळचे मित्र. त्यांना त्या पुंडलिकांचा जिवाभावाचा लंगोटीयार म्हणतात. अशा वर्णनांमधून त्या माणसांविषयी लेखिकेला जे उमगलं, त्याला शब्दरूप लाभतं आणि केवळ आठवण अशा स्वरूपापेक्षा त्याला अधिक वजन प्राप्त होतं. पंचवीस व्यक्तींसंबंधी रागिणीबाईंनी अक्षरमैत्रीमध्ये लिहिलं आहे.
बाईंच्या स्वभावांमधली शोधक वृत्ती इथे दिसते. माणसांमधलं वेगळेपण शोधायचा त्या प्रयत्न करतात. पुंडलिकांच्या बरोबर असताना जयवंत दळवी स्वत:विषयी जे बोलले, त्याची नोंद बाईंच्या मनात झालेली असते. दळवींच्या लेखनाचे काही विशेष सांगताना त्या लेखकाच्या वृत्तीचं वेगळेपण सूचित करणारं एक दळवींचं वाक्य बाई नोंदवतात. माझ्या स्वभावात एक चमत्कारिक गुप्ततेचा भाग आहे. मला शिंपल्यात राहायला आवडतं. वाचकांना हा स्वत:च्या स्वभावासंबंधीचा दळवींचा अभिप्राय निश्चित मार्मिक वाटेल.
लेखकस्नेह्यांचं वर्णन करताना बाईंची लेखणी स्वच्छ मोकळी होते. व्यक्तिरेखा उभी करण्याच्या दृष्टीनं हा मोकळेपणा उपयोगी ठरतो. व्यंकटेश माडगूळकर यांच्याबद्दल त्या म्हणतात, बोलताना किंवा एखादा प्रसंग सांगताना ते बैठकीवर राजामाणूसच होऊन जायचे. त्यांचे डोळेही बोलके. नजर कुतूहलाची. चेहरा व हाताच्या हालचाली यांचं संगनमत प्रसंगाला उचित असायचं. तोंडाचं बोळकं करून लाडं लाडं बोलण्याची पद्धत समोरच्या माणसाला आकर्षित करून जायची.. असं चित्रमय वर्णन या लेखनात आढळतं. शरद्चंद्र चिरमुल्यांवरच्या लेखातही याचा प्रत्यय येतो.
माता द्रौपदी या पुंडलिकांच्या नाटकाच्या निमित्तानं वास्तविक त्यांनी या नाटकामध्ये कृष्णाचं काम करणार्‍या यशवंत दत्तांबद्दल लिहिलं आहे. पण त्या लेखातला एक संदर्भ मनाला स्पर्श करणारा आहे. तो रागिणीबाईंच्या व्यक्तिगत दु:खाशी जोडला गेला आहे. अश्विन या त्यांच्या ऐन उमेदीत अपघातात मरण पावलेल्या मुलाच्या मृत्यूचं दु:ख त्यांना सोसावं लागलं. त्यामुळे द्रौपदी आणि गांधारी या मातांच्या दु:खाकडे त्यांनी अधिक बारकाईनं पाहिलं. जिच्या पाच मुलांची झोपेतच निर्घृण हत्या झाली, अशी द्रौपदी आणि महायुद्धात मारल्या गेलेल्या शंभर मुलांच्या मृत्यूचे घाव सहन केलेली गांधारी या दोघींच्या दु:खाचा विचार करताना त्यांचं मन चिंतनमग्न होतं आणि लेखातल्या त्या भागाला एक उंची लाभते. दोन मातांमधली व्यक्तिभिन्नता त्या दाखवतात. द्रौपदी उमद्या मनाची होती. धैर्यवान होती. ती आपल्या मुलांची हत्या करणार्‍या अश्वत्थाम्याच्या कपाळावरचा मणी उपसून त्याला जखमी करते, पण त्यानंतर त्याच्या दु:खाची जाणीव होऊन ती जखमेवर तेलही घालते. तिचं वात्सल्य तिच्या उमद्या कृतीत दिसतं. एका अर्थानं तिच्या सुखाला या मृत्यूंनी अंतिमत: हुलकावणीच दिलेली, पण द्रौपदीनं ते दु:ख सर्वागांनी अनुभवलं. गांधारीच्या शंभर पुत्रांच्या मृत्यूचं दु:ख रागिणीबाईंना या पाश्र्वभूमीवर अधिक तीव्र वाटतं. कारण तिनं तिचे पुत्र पाहिलेलेही नसतात. म्हणूनच तिचं हरवलेलं मातृत्व बाईंना अधिक चटका लावणारं वाटतं. रागिणीबाईंमधल्या लेखिकेनं माता द्रौपदी या नाटकाच्या निमित्तानं केलेलं हे चिंतन मानवी जीवनातल्या एका सत्याकडे स्पष्ट निर्देश करतं. मृत्यूकडे अधिक जाणकारीनं पाहायची नजर देतं.
पुंडलिकांसंबंधी स्वतंत्र लेख अक्षरमैत्रीमध्ये नाही, पण त्यांच्या स्वभावामधला अघळपघळपणा, निवांतपणे काम करण्याची मनस्वी वृत्ती, शिस्तीनं वागणार्‍या मित्रांमुळे त्यांची अनेकदा होणारी तिरपिट, त्यांच्या मिस्कीलपणे केलेल्या उल्लेखांमुळे वाचकाच्याही ओठावर हसू उमटतं. सर्व लेखांमधून पुंडलिकांसंबंधीच्या ज्या आठवणी येतात, त्यातून त्यांचं माणूसपण, पती-पत्नींमधलं नातं आणि उभयतांची समृद्ध करणारी सुखद सोबत प्रतिबिंबित होत राहते.
अक्षरमैत्रीसारखी लेखनं वाचकाला विविधरंगी, गुणवंत माणसांच्या आठवणींमधून, माणसांमधलं वैविध्य उलगडून दाखवत असतात, हे त्यांचं महत्त्व असतं. हा आनंद इथेही मिळतो. मात्र अशुद्ध लेखनाच्या अनेक ठेचा लागल्यानं तो डहुळतो हेही नोंदवायलाच हवे.

Write your review for this book

Other works of रागिणी पुंडलीक
   अश्विनः एक विलापिका
   साथसंगत

Similar books:
  व्यक्तिपरिचय
   दाद
   वपुर्झा
   कोल्हापुरी साज
   गोकर्णीची फुले
   चिअर्स
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.