|
विश्वमानव स्वामी विवेकानंद
Author: वि. रा. करंदीकर
Publisher: रामकृष्ण मठ
|
|
Price: $25.59 $20.47 20% OFF ( ~1200 Pages, R550)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: स्वामी विवेकानन्दांचे व्यक्तिमत्त्व हे कोणत्याही एका जाति-धर्मात, प्रदेशात वा राष्ट्रात अडकून राहणारे नव्हते, तर ते विश्वजनीन सार्वजनीन असे होते. अखिल मानवजातीला आपले खरे दिव्य स्वरूप अभिव्यक्त करण्याचे आवाहन करून तिच्या मनातील सर्व भ्रम व अवसाद झटकून टाकून तिला नव-संजीवन देण्याचे सामर्थ्य त्यांच्या देदिप्यमान जीवन-संदेशात आहे. अशा प्रकारे त्यांनी सर्व मानवमात्राला आपल्या विशाल शुद्ध हृदयात स्थान दिले, म्हणून त्यांना विश्वमानव हे अन्वर्थक नाव दिले आहे. वास्तविक श्री. सत्येंद्रनाथ मजुमदार यांनी मूळ बंगालीत लिहिलेल्या अधिकृत चरित्राचा मराठी अनुवाद या मठातर्फे प्रकाशित झाला असून तो फार लोकप्रिय आहे. स्वामी अपूर्वानन्दांचे स्वामी विवेकानन्द : संक्षिप्त चरित्र आणि उपदेश हे पुस्तकही आम्ही प्रकाशित केले आहे. इतरत्रही मराठीतून स्वामी विवेकानन्दांची चरित्रविषयक पुस्तके सतत प्रसिद्ध होताना दिसतात. तेव्हा पुन्हा अशा चरित्रग्रंथाचे प्रयोजन का भासावे असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. इतरत्र प्रकाशित होणारी पुस्तके ही पुष्कळदा जशी विशिष्ट भूमिका समोर ठेवून लिहिलेली असतात तशीच पुष्कळदा लेखकाने स्वामीजींच्या व्यक्तिमत्त्वाचा एक विशिष्ट पैलू व्यक्त करण्यासाठीही ती लिहिली गेली असल्याचे दृष्टीस पडते. त्यामुळे त्यातून होणारे विवेकानन्दांचे दर्शन हे सम्यक दर्शन असण्याची शक्यता क्वचितच असते. श्री. सत्येंद्रनाथ मजुमदार लिखित स्वामी विवेकानंद यांचे चरित्र या ग्रंथाच्या अनेक आवृत्त्या आतापर्यंत निघाल्या असून त्यातून होणारे स्वामीजींचे दर्शन हे सम्यक राखण्याचा सतत प्रयत्न केला आहे.
अलीकडील काळात नव्याने ह्या संबंधीची माहिती उपलब्ध झाली आहे. श्रीमती मेरी ल्युई बर्क या विदुषीने परिश्रम घेऊन Swअमि Vइवेकनन्द इन थे Wएस्त णेw डिसcओवेरिएस नावाची नव्या माहितीची सहा खंडांची ग्रंथ संपदा लिहिली आणि अद्वैत आश्रम, कलकत्ता यांनी प्रकाशित केली. स्वामीजींच्या जीवनातील अनेक नवीन घटना व विचारधन प्रकाशात आले असल्याने मराठी भाषेतही स्वामी विवेकानन्दांचे त्रिखंडात्मक विस्तृत चरित्र प्रकाशित करण्याचा संकल्प आम्ही केला होता. त्याची पूर्ती आता होत असल्याने आम्हाला समाधान वाटत आहे.
पुण्याचे प्रथितयश लेखक डॉ. वि. रा. करन्दीकर यांनी हे बृहत चरित्र लिहिण्याची जबाबदारी आनंदाने स्वीकारली आणि त्यांनी जुन्या-नव्या अनेक ग्रंथांचा सखोल अभ्यास करून मोठ्या साक्षेपाने हे विस्तृत चरित्र लिहिले आहे. अनेक ग्रंथांच्या परिशीलनाबरोबर लेखकाने स्वामी विवेकानन्दांशी संबंधित देश-विदेशातल्या असंख्य स्थळांचे निरीक्षण केले; त्या त्या ठिकाणच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या भेटी घेतल्या, त्यांच्याशी चर्चा केल्या; आणि अखेर स्वत:च्या चिंतनाची सखोल बैठक या सगळ्यांना देऊन मराठी वाचकांसाठी प्रस्तुत ग्रंथ सिद्ध केला. स्वामी विवेकानन्दांच्या विस्तृत अध्ययन व लिखाणासाठी त्यांना रामकृष्ण मिशन इन्स्टिट्यूट ऑफ कल्चर, कलकत्ता तर्फे विवेकानन्द पुरस्कार-१९९९ देऊन गौरवान्वित केले आहे. त्यांचे आम्ही मन:पूर्वक आभार मानतो.
स्वामी विवेकानन्दांचे चरित्र आणि विचार भारतीय संस्कृतीच्या उच्चतम आदर्शांना अनुसरून विकास पावले आहेत. आधुनिक युगातील बुद्धिवादी, प्रतिभावंत नवयुवकांचे स्वामी विवेकानन्द प्रतिनिधी आहेत. अलौकिक बुद्धी, असामान्य प्रतिभा आणि प्रखर आत्मनिष्ठा यांनी युक्त असलेला बालक नरेन्द्रनाथ विश्ववरेण्य, विश्वमानव स्वामी विवेकानन्द कसा झाला याचे विस्तृत चित्रण या चरित्र-ग्रंथात केलेले आहे. त्यात बालक नरेन्द्रनाथांच्या कुटुंबाची, बंगालमधल्या सामाजिक स्थितीची, भारतातल्या राजकीय व जगाच्या एकूण परिस्थितीची अत्यंत बारीक निरीक्षणे लेखकाच्या प्रतिभेने सूक्ष्मपणे टिपली असून त्यांच्या तपशिलाचे फिकट व गडद रंग पार्श्वभूमी म्हणून कौशल्याने वापरले आहेत. नरेंद्रनाथांची मानसिक जडण-घडण, श्रीरामकृष्णांशी जडलेले त्यांचे नाते, त्यांची निर्विकल्प समाधी व नंतर श्रीरामकृष्णांनी योजिल्याप्रमाणे स्वामी विवेकानन्दांच्या जीवन-कर्तृत्वाचा बहरलेला प्रचंड वृक्ष या सार्यांचे एक मनोज्ञ दर्शन या ग्रंथातून वाचकांना घडते.
युगावतार भगवान श्रीरामकृष्ण यांच्या अवतरणाने भारतात आणि जगात एका नव्या युगधर्माची पहाट उगवली आहे. सर्व धर्मांचा समन्वय त्यांनी आपल्या दिव्य जीवनातून आणि अलौकिक साधनोपलब्ध अनुभवातून प्रकट केला आहे. त्यावरच स्वामी विवेकानन्दांनी भाष्य करून आधुनिक काळानुरूप त्याचे सिद्धान्तीकरण केले. त्यांच्या आविर्भावाने भारतीय अध्यात्म ज्ञानाचा प्रकाश सर्व जगात पसरला आणि मान्यता पावला. नव्या युगाच्या प्रबोधनाचा एक मूर्तिमंत आविष्कार म्हणूनच स्वामीजींच्या जीवन-संदेशाकडे बघायला हवे.
भारतात आणि भारताबाहेर विदेशात सध्या मनुष्याचे वैयक्तिक व सामाजिक जीवन गुंतागुंतीचे आणि जटिल झाले असून सर्वत्र आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचे कारण पंचेन्द्रियगम्य जडवाद व भोगवाद यांचा प्रभाव जनमानसावर वाढला आहे. जनजीवन अस्थिर झाले आहे. जे बुद्धिवादी आणि विचारवंत आहेत त्यांना मानवी जीवनमूल्ये जनमानसात कशी रुजविता येतील व समाजाचे स्थैर्य कसे टिकविता येईल याविषयी चिंता वाटत आहे. अशा प्रसंगी श्रीरामकृष्ण-विवेकानन्द यांचा जीवन-संदेश रामबाण उपाय आहे. जागतिकीकरणाच्या भाषेला आज वेग आला असला तरी या संकल्पनेची मुहूर्तमेढ फार पूर्वीच रोवली गेली आहे. वसुधैव-कुटुंबकम ही आमच्या प्राचीन ऋषींची उदार दृष्टी, श्रीरामकृष्णांच्या अद्भुत जीवनाने व शिकागोच्या परिषदेतील स्वामी विवेकानन्दांच्या आविर्भावाने नवा आकार घेऊन जगासमोर आली आहे.
स्वामी विवेकानन्द म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांचेच त्यांचा संदेश समस्त जगतात पोहोचविणारे जणू दुसरे रूप होय. भगवान श्रीरामकृष्ण ज्ञानसूर्य असून स्वामी विवेकानन्द विश्वाच्या कानाकोपर्यात पोचणारी किरणे होत. श्रीरामकृष्णांची अपूर्व आध्यात्मिकताच स्वामीजींच्या रूपाने कार्यरत होऊन जगाला आणि भारताला नव संजीवन देऊन परम शांतीचा मार्ग दाखवून गेली आहे.
सत्यवचन आणि सत्यव्यवहार हा स्वामीजींच्या जीवनाचा भरभक्कम पाया होता. या सत्यनिष्ठेच्या आधारावरच किशोर नरेंद्रनाथांना सत्यस्वरूप ईश्वराच्या प्राप्तीची तळमळ लागली होती. ह्या पंचेन्द्रियग्राह्य बदलत्या देखाव्यामागे काही शाश्वत सत्य आहे काय, ते अनुभवण्याची तीव्र उत्कण्ठा त्यांना लागली होती; आणि भगवान श्रीरामकृष्णांच्या असीम कृपेने त्यांना निर्विकल्प समाधी लाभून नित्य शुद्ध बुद्ध मुक्त एकमेवाद्वितीय, सत्याचा अनुभव आला अन त्यांची ती तीव्र उत्कण्ठा उपशम पावली. आता त्यांच्या जीवनात एका नवीन अध्यायाला सुरुवात झाली. ईश्वराच्या अचिंत्य इच्छेने नरेंद्रनाथांच्या शक्तिमंत चित्तात अवघ्या मानवमात्राला त्याच्या ठायी असलेल्या ईश्वरत्वाची जाणीव करून देण्याची व ही जाणीव मानवजीवनात प्रत्येक वेळी आविष्कृत करण्याची स्पृहा स्पंदू लागली. हीच युगप्रयोजनाची नांदी होय.
स्वामी विवेकानन्दांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू त्यांच्या समाधिलब्ध सत्याचे निरनिराळे आविष्कार आहेत. ते हिंदुधर्म सुधारक होते, समाज सुधारक होते, राष्ट्र द्रष्टे होते, राष्ट्रभक्त संन्यासी होते, योद्धा संन्यासी होते, उत्कृष्ट गायक होते, महान कलाप्रेमी व कलावंत होते, असमान्य वक्ते होते हे सर्व त्यांच्या साक्षात्कारी युगप्रयोजनकारी योगैश्वर्यांचे विभूतिमत्त्व होते. त्याग व सेवा हाच त्यांच्या जीवनाचा मूल मंत्र होता. अशा या लोकोत्तर विश्वमानवाला ग्रंथाद्वारे मराठी वाचकांसमोर आम्ही यथाशक्ति सादर करीत आहोत.
मराठी वाचक या अभिनव ग्रंथाचे स्वागत करतील व स्वामी विवेकानंदांबद्दल अधिकाधिक जाणून घेण्यासाठी श्रद्धायुक्त अंत:करणाने या ग्रंथाचे अनुशीलन करतील, तसेच जिज्ञासू, भक्त व साधकही ह्या ग्रंथाचा उचित लाभ घेतील असा आमचा विश्वास आहे.
हा तीन पुस्तकांचा संच (~१२०० पृष्ठे) अत्यंत माफक किंमतीत उपलब्ध करण्यात आलेला आहे.
|
 |
 |
|