|
तुकाराम दर्शन
Author: सदानंद मोरे
Publisher: सकाळ पेपर्स लिमिटेड
|
|
Price: $22.85 $18.28 20% OFF ( ~750 Pages, R750)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: ई-सकाळ १८ मे २०१४ मोरे यांनी "सकाळ साप्ताहिकात' तुकारामांच्या अभंगांबद्दल एक प्रदीर्घ लेखमाला लिहिली. या लेखमालेचं संकलन असलेलं "तुकाराम दर्शन' हे पुस्तक आता "सकाळ प्रकाशना'च्या वतीनं नव्या स्वरूपात प्रसिद्ध होत आहे. या ग्रंथाबद्दल मोरे सांगतात ""तुकोबांमध्ये वारकरी परंपरेची आणि मराठी संस्कृतीची गुणवैशिष्ट्ये सारभूत होऊन प्रकटली आहेत. त्यामुळे आपोआपच "तुकाराम दर्शन' हे मराठी संस्कृतीचंही दर्शन झालं. तुकोबांचा एवढा प्रभाव या संस्कृतीवर आहे, की गेल्या साडेतीनशे वर्षांमधील तुकाराम आकलनाचा नुसता आलेख काढला, तर त्यातून मराठी संस्कृतीचे सारे धागे, ताणतणाव, अंत-संघर्ष स्पष्टपणानं दिसू लागतात. एरवी नजरेतून सुटणार्या अनेक बाबी नजरेच्या टप्प्यात येतात. तुकोबा हे महाराष्ट्राचे "संस्कृतिपुरुष' आहेत. त्यांचं दर्शन हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचंही दर्शन झालं. या पुस्तकात मोरे यांनी केवळ तुकारामांच्या अभंगांचा अर्थ सांगितलेला नसून, त्यांनी आजच्या वर्तमान परिस्थितीचा विचार करून आजही तुकारामांची शिकवण कशी उपयोगी आहे आणि आजही त्यांचं तत्त्वज्ञान कसं मार्गदर्शक ठरतंय, हे स्पष्ट केलं आहे. वारकरी संप्रदायाची नेमकी माहिती देऊन, संत तुकारामांचे अभंग राज्यातील नाही, तर देशातील अनेक मान्यवरांना कसे प्रेरणादायी ठरले, हे सांगून मोरे येथे राज्याच्या सांस्कृतिक वाटचालीचा आणि तत्कालीन समाजजीवनाचा नेमका वेध घेतात. या पुस्तकाला दिवंगत ज्येष्ठ विचारवंत राम बापट यांची प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेतच त्यांनी या ग्रंथाचं आणि मोरे यांच्या लेखनाचं मर्म सांगितलं आहे. ते म्हणतात, ""तुकोबांच्या अभंगांतून त्यांचं दर्शन घडवणं, हा या लेखनाचा प्रधान हेतू नव्हता. त्याचप्रमाणे तुकोबांसंबंधी कोणी काय लिहिलं, याचा आढावा घेणं, हेही या लेखनाचं उद्दिष्ट नव्हतं. भाविक विवेचनाला त्यात स्थान नव्हतं, तर पारलौकिक आणि लौकिक किंवा तत्त्वदर्शन व व्यवहार असे कप्पे न पाडता तुकारामरूप महाराष्ट्र संस्कृतीचं मूल्याधिष्ठित व सर्जनशील विश्लेषण करण्याचा हा प्रकल्प आहे. मराठी संस्कृतीची चोख समीक्षा व्हावी आणि त्याकरिता तुकोबांच्या दर्शनाचा अंजन म्हणून उपयोग व्हावा, अशी त्यामागची धारणा आहे.'' मोरे यांनी या पुस्तकात महाराष्ट्राच्या इतिहासाची तुकारामकेंद्रित मांडणी केली आहे. साहित्य अकादेमी पारितोषिक १९९८
Review courtesy of eSakal: ई-सकाळ २३ मे २०१० 'तुकारामदर्शन'ने सजग बनविले -- डॉ. केशव देशमुख, नांदेड 'तुकारामदर्शन' हा डॉ. सदानंद मोरे यांनी लिहिलेला ग्रंथ माणसाचे उत्तुंगत्व जोखणारा आणि वर्तन शिकविणारा आहे. वारकरी संस्कृती ही सेवा आणि आतिथ्य शिकविते. संतवाङ्मय सात्त्विकता आणि समर्पणवृत्ती शिकविणारे आहे. याच्याही पलीकडे जाऊन असेही म्हणता येईल की : खेडूत, सामान्य, साध्या, सरळ, गरीब, कष्टाळू परंतु इमानी अशा सगळ्याच माणसांसाठी सावलीचे स्थळ होण्याची संधी वारकरी संस्कृतीने बहुजनांना उपलब्ध करून दिलेली आहे. "तुकारामदर्शन' हा ग्रंथ याअर्थी बहुगुणी ग्रंथ होय. संत तुकाराम यांचे मुळातच साधेपणातून उन्नत होत गेलेले श्रेष्ठ मोठेपण, संत तुकाराम यांचे सांस्कृतिक योगदान, त्यांच्या अभंगलेखनातील मूल्यसार, महाराष्ट्रमातीसाठी त्यांनी दिलेली सांस्कृतिकता या सर्व गोष्टी "तुकारामदर्शन'मुळे माझ्या मनात मी शिदोरीसारख्या साठवून ठेवलेल्या आहेत. खुद्द डॉ. सदानंद मोरे हे तुकाराम महाराजांचे वंशज; त्यामुळे या ग्रंथलेखनाला साधार, साक्षेपी बलस्थळच लाभलेले आहे. संशोधनासाठी हवे असणारे निगर्वीपण, विश्लेषणाशाठी हवी असणारी विलक्षण आस्था आणि सत्यान्वेषापर्यंत पोचण्यासाठी आवश्यक असणारी श्रद्धा आणि प्रज्ञा हे दुर्मिळ गुण डॉ. मोरे यांच्याकडे आहेत. हा ग्रंथ म्हणजे त्याचाच सबळ दाखला होय. माझ्यासारख्या भाषा-वाङ्मय-बोली शिकविणार्या शिक्षकाला "तुकारामदर्शन' ग्रंथाने निरामय सांस्कृतिकता पढविली आहे. वारकर्यांचा हा महाराष्ट्र मुळाबरहुकूम समजून सांगितला आहे. शिवाय, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पर्यावरणाची मांडणी अशीही सहज, सुगम आणि सुंदर करता येऊ शकते, याचा मानदंड म्हणजे हा ग्रंथ होय. हा ग्रंथ मला सतत अप्रूपाचा व आनंदाचा वाटतो. जे मूळ आहे, ते अप्रतिम असते, हे सूत्र मी वाचनसंस्कारामधून जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. सत्याकडे प्रवास करायचा तर, मूल्यांकडे कूच करायची तर, सुंदरतेकडे जायचे तर जे मूलभूत, ते वाचल्याबिगर अन्य इलाज नाही. मराठीत पुस्तकांची निर्मिती-विक्री प्रचंड आहे. या विक्रीच्या गर्दीत "सटरफटर' असे खूप विकले जाते. जे सर्व विकले जाते, ते चांगलेच असते, या अज्ञ मताशी आपणही सहमत होण्याचे कारण नाही. निवडून वाचावी आणि घरात जपून ठेवून पुरवून पुरवून, पुन:पुन्हा वाचवी, अशी ग्रंथसंपदा हीच वाचनसंस्कारांची "कार्यशाळा' असते. म्हणूनच संत तुकारामांची गाथा, गोडसेकृत "माझा प्रवास', एकनाथांची भारुडे; तसेच लीळाचरित्र, "दृष्टान्तपाठ' आदींची अनवट चव जन्मभर पुरणारी ठरते. महात्मा फुले यांचे समग्र वाङ्मय हा विचारशक्तीचा ऐवज म्हणून कायम सोबतीला असतो. मराठी वाङ्मयाचा इतिहास संदर्भसुंदर वाटतो. ना. गो. कालेलकरांची सगळी पुस्तके भाषाविवेक बहाल करतात. मोरो केशव दामल्यांचा महान ग्रंथ व्याकरणाचे भव्य सैद्धान्तिक धन हयातभर देऊन जातो. एक शिक्षक म्हणून जुने, मूळचे वाचावे, वाचून दाखवावे आणि जतन करावे हा चांगल्या ग्रंथपालाचा धडा मी कायम स्मरणात ठेवतो आणि त्यातूनच सरल "शिक्षकी वृत्ती' जपत वाटचाल करतो. एकूण वारकरी वाङ्मय केवळ घोकंपट्टी करून कळत नाही. एकांतात, एकरूप होऊन आणि अवघे तत्कालीन, समकालीन सर्व सांस्कृतिक सामाजिक वर्तनविषयक, विचारविषयक किंवा लोकविषयक सारे सारे मागील-पुढील सर्व संदर्भ नीट समजून घेतल्याशिवाय वारकरी वाङ्मयात उतरताच येत नाही. "तुकारामदर्शन' या ग्रंथाचा संपूर्ण संस्कार हा असा शहाणा आणि सजग बनविणारा आहे. निर्मोही समाधान आणि संपूर्ण शहाणपण शिकविण्याचे भव्य बळ "तुकारामदर्शन'ने दिले आहे, हे कृतज्ञतापूर्वक सांगताना मला खूप आनंद होतो.
Other Links:
|
 |
 |
|