|
हिममय अलास्का
Author: गंगाधर गाडगीळ
Publisher: सुरेश एजन्सी
|
|
Price: $2.78 $2.22 20% OFF ( ~116 Pages, R90)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Review courtesy of Maharashtra Times: ३सप्टेंबर२००० चिंतनगर्भ, अदभुत तरीही वास्तव प्रवास वर्णन - निलीमा पालवणकर
मराठी साहित्यात चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वी ललित प्रवास-लेखनाची एक नवी परंपरा निर्माण झाली. अनंत काणेकर, रा. मि. जोशी, प्रभाकर पाध्ये, पु. ल. देशपांडे, गंगाधर गाडगीळ हे या परंपरेतील महत्त्वाचे लेखक आहेत.
गंगाधर गाडगीळ यांनी गोपुरांच्या प्रदेशात व सातासमुद्रपलीकडे अशी दोन प्रवासवर्णनपर पुस्तके लिहिली. हिममय अलास्का हे त्यांचे अलीकडे प्रसिद्ध झालेले तिसरे प्रवासवर्णनपर पुस्तक होय. यात गाडगीळांनी एकूण आठ लेखांतून अलास्काचे वन्यजीवन, निसर्ग जीवनविषयक अनुभव चित्रित केले आहेत.
प्रवास वर्णन हा साहित्यप्रकार अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून निवडण्यामागे गाडगीळांची काही एक भूमिका आहे. ती अशी : प्रवासवर्णन हा साहित्यप्रकार मुक्त करणारा आहे. तो कधी कविता होतो, कधी कथा होतो आणि कधी विक्षिप्ताच्या अगर अदभुताच्या प्रदेशातही तुम्ही जाऊन पोहोचता. प्रवासवर्णन लिहिताना माणूस कधी इतिहासकार होतो, कधी समाजाचा निरीक्षक होतो तर कधी मौजमजा करायला निघालेला उडाणटप्पू होतो. यात मोठी गंमत असते. आव्हान असतं. विमुक्त निर्मितीचा आनंद असतो. तो अनुभवता यावा म्हणून मी पुन: पुन्हा प्रवासवर्णनं लिहीत असतो. (पृष्ठ ६).
ही प्रवास वर्णनं लिहिताना गाडगीळ एकाचवेळी वेगवेगळया भूमिका घेतलेल्या निवेदक पात्राची निर्मिती करतात. उदा. हिममय अलास्काचा इतिहास हा निवेदक सांगतो, तेव्हा तो इतिहासकाराची भूमिका घेतो. हा निवेदक कधी कधी दोन संस्कृतींची तुलनाही करतो. ही तुलना करताना काही वेळी तो उपरोधाचा वापर करतो. उदाहरणार्थ, अलास्कातील ग्लेसियर्सची (हिमनद्या) माहिती सांगताना कॉलेज फिऑर्ड या विषयी ते लिहितात- अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांना असं आढळून आले की ही खाडी म्हणजे निसर्गानं अभ्यासासाठी व संशोधनासाठी निर्माण केलेली एक प्रयोगशाळाच आहे. अमेरिकन सरकारला याचं फार महत्त्व वाटतं; म्हणून या खाडीला कॉलेज फिऑर्ड असं नाव दिलेलं आहे आणि तिथल्या ग्लेसियर्सना वेलस्ली, रासार, हार्वर्ड, येल इत्यादी उच्चशिक्षणाच्या संस्थांची नावं दिलेली आहेत. अशी खाडी आपल्या देशात असती, तर तिथे काय नावं दिली गेली असती, त्याची नुसती कल्पना करू लागलो तरी अंगावर काटा उभा राहतो. (पृष्ठ ५४) प्रवासाच्या सुरुवातीला आलेल्या अमेरिकेतल्या अनुभवाविषयी गाडगीळ उपरोधगर्भ शैलीत लिहितात- अमेरिकेत अमका वेळेवर आला नाही. तमक्यानं काम व्यवस्थित केलं नाही, असं सहसा होत नाही. आम्ही भारतातले असल्यामुळे जिथे जिथे घोटाळा होणं शक्य असेल, तिथे तिथे तो होणारच असं गृहीत धरणारे. त्यामुळे टॅक्सी ड्रायव्हर वेळेवर आला याचं आम्हाला आश्चर्य वाटलं. नंतर लॉस अॅंजलीसच्या अतिप्रचंड अनेक टर्मिनल्स असलेल्या विमानतळावर त्यानं आम्हाला नेमकं हव्या त्या टर्मिनलला नेऊन सोडलं, याचं अतीव आश्चर्य वाटलं. त्यानंतर विमान वेळेवर सुटलं तेव्हा आश्चर्याची परमावधी झाली आणि मग अधिक आश्चर्य वाटून घेणं अशक्य झाल्यामुळे आम्ही तो नादच सोडून दिला. (पृष्ठ २१).
या प्रवासवर्णनात कधी निवेदक कथाकाराची भूमिका घेतो आणि अनेक अप्रतिम कथा सांगतो. उदा. अलास्कातील ठकसेन सोपी स्मिथची अदभुतरम्य कथा, सामनमाशांच्या जन्माची कथा, केटचिकन इथल्या टोटेम पोल, म्हणजे लाकडाच्या स्तंभावरील, रेव्हन करतो चोरी ही कोरीव लोककथा, जावई आणि सासू ही टलिंगिट इंडियन लोककथा इत्यादी. या सर्व कथा निवेदक रसाळपणे सांगतो आणि हे सांगताना निवेदकातील लेखकही जागा असतो. या कथांविषयी हा लेखक भाष्यही करतो. ते असे- एक लेखक म्हणून मला त्यांचा विलक्षण ताजेपणा, निरागसता आणि त्यात व्यक्त होणारी कल्पकता याचं विलक्षण आकर्षण वाटतं. सुसंस्कृत झाल्यामुळे, सुसूत्रपणे विचार करायची पात्रता प्राप्त झाल्यामुळे आपण काहीतरी मोलाचं गमावलं आहे असं वाटतं. त्यामुळे मी अस्वस्थ होतो. वाटतं की त्या निरागसतेकडे पुन्हा जावं (पृष्ठ १११).
हा निवेदक कधी कधी मौजमजा करायला निघालेला उडाणटप्पूही होतो. क्राऊन प्रिन्सेसवरील शाही इतमामाचं, तिथल्या जेवणाचं वर्णन हा निवेदक करतो तेव्हा त्याचा प्रत्यय येतो. या प्रवासवर्णनात निसर्गाचे वर्णन करताना यातील निवेदक समुद्र, रात्र, ग्लेसियर्स, आकाश, ढग, झाडे यांच्या रूपात सौंदर्याचा अनुभव घेतो आणि त्याच्याशी मूल्ययुक्त आंतरिक नाते जोडतो. अशावेळी निवेदक कविवृत्तीने निवेदन करतो. बोटीतून प्रवास करताना खिडकीबाहेरील दृश्याचं वर्णन करताना निवेदक सांगतो- खिडकीबाहेर पाहिलं तर तिथं चांदण्यानं चेटूक केलं होतं. दूरवर धूसरपणे दिसणारी डोंगरांची रांग मुळी या जगातली नाहीच; एखाद्या यक्षभूमीतली आहे, असं वाटत होतं. क्षितिजापर्यंत तुडुंबपणे पसरलेल्या आणि त्याच्या पलीकडे ओसंडणार्या सागराच्या लवथवत्या पाण्यात कोणी चांदी ओतली होती आणि असं वाटत होतं की एक तेजोमय आनंदाचा महोत्सवच नि:शब्दपणे साजरा केला जातो आहे... असीम चैतन्याचा साक्षात्कार होतो आहे. ती शांती, तो आनंद आपलं सारं अस्तित्वच व्यापून टाकत आहेत. (पृष्ठ ४०) अशी अनेक काव्यात्म वाटणारी वर्णनं पुस्तकात जागोजागी दिसतात.
अशा प्रकारे हिममय अलास्का या प्रवासवर्णनात जुनू स्कॅ गवे, केंटचिकन इत्यादी गावांचे, कॉलेज फिआर्ड, मेन्डेनहॉल बे इत्यादी ग्लेसियर्सचे विशिष्ट शैलीतील वर्णन आहे. परंतु लेखकाने हे वर्णन आहे तसे न करता ते दिसते तसे केले आहे. या सर्व लेखनामागे लेखकाची विशिष्ट जीवनदृष्टी आहे. ती अशी- एखादा चवदार पदार्थ खाऊन अगर थंडीच्या दिवसात गरम अंघोळ करून किंवा अशाच सुखकारक शारीरिक अनुभवांपासून मिळणारा आनंद कमी दर्जाचा असतो, असं मला वाटत नाही. उत्तम कादंबरी वाचून अगर उत्तम संगीत ऐकून मिळणारा आनंद जसा मला हवासा वाटतो, तसाच या प्रकारच्या सुखांपासून मिळणारा आनंदही हवासा वाटतो. त्यांची तुलना करणं, अगर प्रतवारी लावणं अप्रस्तुत आहे, असं मला वाटतं. ते भिन्न कोटीचे अनुभव आहेत आणि एक प्रकारच्या अनुभवाची गरज दुसर्या प्रकारचा अनुभव भागवू शकत नाही. त्यामुळे माझ्यापुरता तरी मी हे दोन्ही प्रकारचे आनंद अगदी मनापासून मिळवत असतो. मोकळया निरोगी मनोवृत्तीचं ते निदर्शक आहे, असं मला वाटतं. (पृष्ठ ८५) ही मोकळी निरोगी मनोवृत्ती लेखनामागे असल्यामुळे हे प्रवासवर्णन वाचनीय झाले आहे.
गाडगीळांनी कथालेखनाच्या बाबतीत जसे रुढ संकेत मोडले आणि त्यांना त्यामुळेच नवकथाकारांत अग्रगण्य स्थान लाभले. तसे प्रवासलेखनाच्या बाबतीतही त्यांनी रुढ संकेत मोडलेले दिसतात. उदा. प्रवासलेखनात वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा रुढ संकेत त्यांनी मोडला आहे. तसेच प्रवासलेखनात अनेकदा लेखक प्रदेशाचा, माणसांचा एकाच दृष्टीतून, एकाच भूमिकेतून अनुभव घेत असतो. इथे मात्र लेखक इतिहासकार, सामाजिक निरीक्षक, कवी, कथाकार, मौजमजा करायला निघालेला उडाणटप्पू या वेगवेगळया भूमिकांतून आपला प्रवासाचा अनुभव अभिव्यक्त करतो. त्यामुळे इथेही रुढ संकेताचे उल्लंघन केले आहे. या प्रवासलेखनात निवेदकाच्या अनेक भूमिका घेतल्यामुळे या प्रवासलेखनात वैचित्र्य आले आहे. त्यामुळे एकाच वेळी चिंतनगर्भ, उपहासगर्भ, काव्यात्म, अदभुत फॅंटसीयुक्त आणि वास्तवपूर्ण असे विविध प्रकारचे अनुभव देणारे हे प्रवासवर्णन वाचनीय झाले आहे.
|
 |
 |
|