|
मराठी साहित्य इतिहास आणि संस्कृती
Author: वसंत आबाजी डहाके
Publisher: पॉप्युलर प्रकाशन
|
|
Price: $13.71 $10.96 20% OFF ( ~310 Pages, R450) Was recently Out of Print.*
Was recently Out of Print. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books.
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: जीवनाच्या विविध क्षेत्रांत होणार्या घडामोडींनी लोकसमूहाचे मानस घडते आणि त्याचीच साहित्य उपकर्मांमध्ये अभिव्यक्ती होत असते. त्यामुळे साहित्याच्या क्षेत्रात विविध कामे चाललेली असताना जीवनाच्या इतर क्षेत्रांमध्ये कोणकोणत्या घडामोडी होत गेल्या आणि त्यांचा साहित्य क्षेत्रातील कामांशी काही संबंध राहिलेला आहे की नाही, असल्यास कसा आणि कोणता याचा शोध घेण्याच्या विचारांतून आलेले लेखन या ग्रंथात समाविष्ट केले आहे.
Review courtesy of Maharashtra Times: महाराष्ट्र टाईम्स रविवार जून ११ २००६ महाराष्ट्राचा साक्षेपी शोध दोन हजार वर्षांच्या काळात डहाके आपल्याला सोबत घेऊन जी मुशाफिरी करतात, ती अत्यंत मनोज्ञ आहे. एकीकडे आपल्याला त्या त्या काळातला, मग तो शिवकाल असो वा पेशवाई, ब्रिटिश वसाहतवादाचे दिवस असोत वा स्वातंत्र्योत्तर मराठी भाषेला आलेला सुगीचा वा अवनतीचा काळ असो, त्या काळात आपल्याला लेखक घेऊन जातो आणि तेव्हाचं भेदक वास्तव आपल्यापुढे उभं करतो.
काळाच्या ओघात समाज नेहमीच बदलत जातो. कालानुरूप सभोवतालचं वास्तवही बदलत असतं आणि त्या बदलत्या सामाजिक ताण्याबाण्यांचं दर्शन साहित्यातून आपोआप घडत जातं. कधी त्या उलटही होतं. साहित्यानुसार समाजाचं वर्तन वा शैली बदलत जाते. या सार्या बदलांचा समाजाच्या संस्कृतीवरही परिणाम होतो आणि या सार्या परिवर्तनाच्या नोंदींचाच पुढे इतिहास होतो.
पण साहित्य, इतिहास आणि संस्कृती यांच्यातील अनुबंधांचा वेध घेणं हे एक जिकिरीचं वा कष्टाचं काम असतं. जी. एम. ट्रॅव्हेलियन या ख्यातकीर्त ग्रंथकाराने 'इंग्लिश सोशल हिस्टरी' या नावाने शब्दबद्ध केलेला इंग्लंडचा सहा शतकांचा सामाजिक इतिहास सुप्रसिद्ध आहे. या ग्रंथाची खरी ओळख त्याच्या उपशीर्षकातून होते. ते आहे, 'ए सव्हेर ऑफ सिक्स सेंच्युरीज : फ्रॉम चॉसर टू क्वीन व्हिक्टोरिया'! ब्रिटनच्या सामाजिक इतिहासात इंग्लिश वाङ्मयाचं स्थान फार मोठं आहे आणि तो समाज आणि ते साहित्य यांचं एक आगळं-वेगळं नातं आहे. इंग्रजांचा सामाजिक इतिहास शब्दांकित करताना ट्रॅव्हेलियन साहेबांनी हे नातं मोठ्या मनोज्ञ पद्धतीनं उलगडून दाखवलं आहे.
खरंतर असं नातं हे कोणताही भाषिक समूह आणि त्या भाषेतलं साहित्य यांचं असतंच. तसंच ते मराठी साहित्य आणि समाजाचंही आहे. पण सामाजिक संदर्भांचं भान ठेवून त्या नात्याचा इतिहास अभ्यासपूर्ण पद्धतीने फारच क्वचित लिहिला गेला. कवी, कादंबरीकार आणि समीक्षक म्हणून साहित्याच्या विविध प्रांतात बाजी मारणारे प्रख्यात लेखक वसंत आबाजी डहाके यांनी असा अभ्यास तर केलाच आणि मुख्य म्हणजे तो 'मराठी साहित्य, इतिहास आणि संस्कृती' या ग्रंथातून आपल्यालाही उपलब्ध करून दिला, याबद्दल मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या प्रेमींनी कायम त्यांच्या ऋणातच राहायला हवं, इतका तो अनमोल आहे.
डहाके यांनी ग्रंथाच्या प्रारंभीच आपली या लेखनामागची प्रेरणा स्पष्ट केली आहे. 'प्रस्तुत ग्रंथात मराठी भाषकांचे मौखिक-लिखित-मुदित साहित्य आणि त्यांचा इतिहास व त्यांची संस्कृती यांत काही अनुबंध आहे का, याचा शोध घेण्याचा एक प्रयत्न केलेला आहे,' असं डहाके आपल्या या ग्रंथाच्या प्रारंभीच नमूद करतात, तेव्हा त्यात ओढून ताणून आणलेली विनम्रता मुळीच नसते. कारण एखादी व्यक्ती जेव्हा इतिहास, संस्कृती आणि साहित्य यांच्यातील नात्यांचा वेध घेण्याचा असा प्रयत्न करते, तेव्हा तो सर्वांनाच मान्य होणारा असतो, असं नाही. 'इतिहास आणि संस्कृती असलेल्या लोकसमूहाची साहित्य ही एक अभिव्यक्ती असते आणि साहित्यकृतीतून याच लोकसमूहांच्या विविध अवस्थांचं चित्रण होत असतं,' हे गृहीत धरून डहाके यांनी हा सारा अभ्यासप्रपंच केला आहे.
आपल्याला मराठी साहित्याचा इतिहास लिहायचा नाही, हे लेखकाने ग्रंथ सुरू करतानाच निश्चित केलं होतं. डहाके यांनी त्याऐवजी मराठी भाषेच्या उगमापासूनच्या फार मोठ्या आणि विस्तीर्ण पटावर आपला डाव टाकायचा ठरवलं आणि ते करताना या अतिविशाल कालखंडातली राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी चित्रित करण्याचा निर्णय घेतला. हे चित्रण करताना त्या त्या काळातलं साहित्य आणि त्यात उठलेले समाजतरंग यांचा धांडोळा डहाके घेत गेले आणि त्यातूनच पुढे अनेक वर्षं संदर्भासाठी उपयुक्त ठरेल, अशा या ग्रंथाची निमिर्ती झाली.
महाराष्ट्र या मराठी भाषकांच्या राज्याची निमिर्ती एक मे १९६० रोजी झाली, पण 'महाराष्ट्र' या देशनामाचा उल्लेख इसवीसनाच्या चवथ्या शतकापासून आढळतो. त्या सार्या तपशीलापासून डहाके यांनी आपल्या संशोधनास आरंभ केला आहे. इसवीसनाच्या पहिल्या शतकात 'महाराष्ट्री प्राकृत भाषे'त रचल्या गेलेल्या 'गाथासप्तशती' या ग्रंथापासून मराठी साहित्याची निमिर्ती झाली, असं म्हटलं जातं, तेव्हापासून पुढच्या दोन हजार वर्षांच्या काळात डहाके आपल्याला सोबत घेऊन जी मुशाफिरी करतात, ती अत्यंत मनोज्ञ अशी आहे. एकीकडे आपल्याला त्या त्या काळातील, मग तो शिवकाल असो वा पेशवाई, ब्रिटिश वसाहतवादाचे दिवस असोत वा स्वातंत्र्योत्तर मराठी भाषेला आलेला सुगीचा वा अवनतीचा काळ असो, त्या काळात आपल्याला लेखक घेऊन जातो आणि तेव्हाचं भेदक वास्तव आपल्यापुढे उभं करतो. पण तरी हा महाराष्ट्राचा सामाजिक वा राजकीय इतिहास होणार नाही, याची काळजी डहाके यांनी आवर्जून घेतली आहे.
उदाहरणच द्यायचं झालं, तर ते अगदी अलीकडल्या म्हणजे गेल्या अर्धशतकातले ताणेबाणे आणि त्या दिवसातल्या साहित्याच्या नात्याचं घेता येईल. अर्थात डहाके यांचं 'व्हीजन' हे केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही. त्या त्या काळात जागतिक पातळीवर होणार्या घडामोडींचे आणि उलथापालथींचे परिणाम मराठी भाषक समूहावर होतच होते. त्यांचेही संदर्भ डहाके देत राहतात, त्यामुळे त्यांचे विवेचन अधिक सखोल बनत जातं. १९३९ ते ४७ हा कालखंड जगाच्याच नव्हे, तर भारताच्याही दृष्टीने कठीण असा काळ होता. याच काळात दुसर्या महायुद्धात चार ते साडेचार कोटी माणसं मृत्युमुखी पडली. हिरोशिमासारखी दुर्घटना घडली आणि अमेरिका व रशिया यांचा महासत्ता म्हणून उदय झाला. भारतात त्याच काळात 'क्विट इंडिया' आंदोलन सुरू झालं, बंगालमध्ये मानवनिमिर्त दुष्काळ पडला. अशा वेळी कवीने काय करायचं असतं? डहाके यावेळी मढेर्करांच्या ओळींचा अचूक दाखला देतात. 'प्रेमाचे लव्हाळे, प्रेमाचे नव्हाळे, शोधू?' हा प्रशन्ही मढेर्करांचा आणि त्याला त्यांनीच दिलेलं उत्तर असं : 'आसपास| मुडद्यांची रास; यंत्रांची आग; गोळ्यांचे पराग'. वास्तवाच्या या प्रखर जाणीवेने मढेर्करांना रविकिरण मंडळ आणि समवयस्क कवींपासून वेगळं केल्याचं डहाके यांनी इथे व्यक्त केलेलं मत वादातीत आहे.
असेच दाखले या मोठ्या आकाराच्या आणि अगदी बारीक टाइपातल्या ३०४ पृष्ठांच्या ग्रंथांत पानोपानी विखुरले आहेत. त्या सार्यांचा उल्लेख इथे अपेक्षित नाहीच; पण कोणत्याही लेखकाच्या समोर असलेल्या 'व्यामिश्र समाजवास्तवा'चं दर्शन त्याच्या साहित्यातून कसं अंशाअंशाने घडत असतं, ते अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीने डहाके यांनी या ग्रंथातून दाखवून दिलं आहे. डहाके साहित्याचे जाणकार आहेत तसंच समाजशास्त्र व राजकीय इतिहासाचीही जाण त्यांना असल्याची साक्ष हा ग्रंथ वाचल्यावर मिळते. इतका व्यासंग अलीकडल्या काळात क्वचितच बघायला मिळतो. तो अत्यंत साक्षेपी पद्धतीने वाचकांपुढे आणल्याबद्दल खुद्द डहाके यांच्याबरोबरच 'पॉप्युलर प्रकाशना'चे रामदास भटकळ यांनाही समस्त मराठी भाषकांनी धन्यवाद द्यायला हवेत!
- प्रकाश अकोलकर
|
 |
 |
|