Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


पौराणिक नाटक - नवा अन्वयार्थ
Author: डॉ. अरूण प्रभुणे
Publisher: प्रतिमा प्रकाशन
Add to Shopping Cart
Price: $8.37 $6.69 20% OFF ( ~300 Pages, R275) Was recently Out of Print.*
Was recently Out of Print. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books.

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
पौराणिक नाटकांनी मिथकांना कोणकोणते नवे अर्थ व नवा संदर्भ प्राप्त करून दिले आणि त्यांचे स्वरूप कसे राहिले याचा हा चिकित्सक अभ्यास, पौराणिक नाटकांच्या आजवरच्या अभ्यासांपेक्षा खूप निराळा आहे.
मराठी नाट्यसमिक्षा एका नव्याच अंगाने विकसित करणारा हा महत्वाचा ग्रंथ ठरावा.
====
डॉ. प्रभुणे यांचा प्रस्तुत ग्रंथातील पौराणिक नाटकांचा नवा अन्वयार्थ सांगणारा अभ्यास, पौराणिक नाटकांच्या आजवरच्या अभ्यासांपेक्षा खूपच निराळा आहे. पौराणिक नाटक हे मूलत: पुराणकथेचा म्हणजे ंय्थ्चानाट्यरूप आविष्कार असते, हे डॉ. प्रभुणे यांच्या अभ्यासाचे भक्कम आदिसूत्र आहे. पौराणिक मिथकांमध्ये नवसर्जनाची आणि नवार्थदानाची एक अंगभूत शक्ती असते. ही शक्ती हेरून नाटककार आपल्या नाट्यहेतूनुसार मिथकांना आकार देतो, काळानुरूप काही नवसंदर्भही बहाल करीत जातो. हे लक्षात घेऊन मराठीतील पौराणिक नाटकांनी मिथकांना कोणकोणते नवे अर्थ व नवसंदर्भ प्राप्त करवून दिले आणि त्यांचे स्वरूप कसे राहिले याचा चिकित्सक अभ्यास डॉ. प्रभुणे यांनी येथे केला आहे. असा अभ्यास पौराणिक नाटकाच्या कलात्मक अभ्यासाकरिता आवश्यक आहे, अशीही भूमिका डॉ. प्रभुणे यांनी येथे घेतली आहे.
नाट्यगत मिथकांची मीमांसा | असलेली प्रा. पुष्पा भावे यांची प्रस्तावना म्हणजे या ग्रंथाचे 'अधिकचे फल' होय.
मराठी नाट्यसमीक्षा एका नव्याच अंगाने विकसित करणार्‍या या ग्रंथामुळे अभ्यासक व नाट्यरसिक समृद्धच होतील.
- डॉ. दत्तात्रय पुंडे
====
भूमिका
पुराणकथेचे आकर्षण सदासर्वकाळ सर्वांना असते. तसेच ते. मलाही होते व आहे. या पुराणकथांना नाट्यरूप देणार्‍या नाटकांचेही त्यामुळे आकर्षण वाटणे स्वाभाविकच आहे. मराठीमध्ये तर पौराणिक नाटकांची एक बलिष्ट, वैशिष्ट्यपूर्ण व समृद्ध अशी परंपराच आहे. तेव्हा आपण या नाट्यपरंपरेचा अभ्यास करावा अशी इच्छा झाली. म्हणून पीएच. डी. साठी 'मराठी पौराणिक नाटकातील पुराणकथांना प्राप्त झालेल्या अर्थांचे स्वरूप : इ. स. १८४३ ते १९४३' असा विषय गुरुवर्य डॉ. सुधीर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मी घेतला होता. प्रबंधाचे काम पूर्ण झाल्यावरही या संदभातला अभ्यास आणि या विषयावरचा विचार करणे चालूच राहिले. हा अभ्यास अभ्यासकांसमोर ग्रंथरूपाने ठेवावा अशी इच्छा झाली आणि त्यातूनच हा ग्रंथ सिद्ध झाला. हा प्रबंध माझ्या प्रस्तुत पुस्तकाचा पाया आहे, परंतु हा प्रबंध म्हणजे माझा ग्रंथ नव्हे.
पौराणिक नाटक: नवा अन्वयार्थ' या ग्रंथनामातूनच अभ्यासाची दिशा वेगळी कशी आहे हे सूचित करण्याचा प्रयत्न आहे. या अभ्यासाचे वेगळेपण काय आहे, अभ्यासाचा विस्तार कुठवर आहे व मर्यादाही काय आहेत हे लक्षात येण्याच्या दृष्टीने या अभ्यासामागील भूमिका व अभ्यासदिशा पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येईल.
पौराणिक नाटक हे पुराणकथेचा नाट्यरूप आविष्कार असते. ही पुराणकथा तिच्या मूळ रूपात नाटककार स्वीकारीत नाही. मूळ पुराणकथेचा जन्मकाळ अज्ञातच असतो. कारण, मानवी संस्कृतीच्या आधतम काळात या पुराणकथा जन्मत असतात. मानवी संस्कृतीच्या विकासाबरोबर या पुराणकथांत बदल होत जातात. एखादी पुराणकथा जेव्हा नाटककाराला नव्याने अर्थपूर्ण वाटलेली असते तेव्हा ती पुराणकथा तो स्वीकारीत असतो व तिला नाट्यरूप देत असतो. मराठी नाटककारांनीही पौराणिक नाट्यनिर्मिती करताना ज्या पुराणकथांना समोर ठेवले त्यांच्या व त्यातून ध्वनित होणार्‍या पारंपरिक अर्थात नाट्यहेतूनुरूप बदल केले आणि त्या अर्थाला काळानुरूप काही नवे संदर्भ प्राप्त करून दिले. पुराणकथांना प्राप्त होणार्‍या या नव्या अर्थांचा, नव्या संदर्भाचा मराठीमध्ये आजवर विचार झालेला दिसत नाही. आणि नाटककाराने पुराणकथेला प्राप्त करवून दिलेल्या अर्थांच्या विचाराशिवाय पौराणिक नाटकांच्या कलात्मकतेचा विचार पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून पौराणिक नाटकांतून पुराणकथेला प्राप्त झालेल्या नव्या अर्थाची चिकित्सा करणे महत्त्वाचे आहे. याचमुळे आजपर्यंत विचारात न घेतलेल्या विषयाचा अभ्यास इथे विचारार्थ ठेवला आहे.
या अभ्यासाची पूर्वसीमा इ. स. १८४३ अशी आखून घेतली आहे. कारण, मराठीतील आद्य नाटककार विष्णुदास भावे यांचे 'सीतास्वयंवर' हे पहिले मराठी नाटक या साली रंगभूमीवर आले. हे पहिले नाटक पौराणिक होते. भाव्यांच्या नाटकांचे संवाद लिहिलेले नसल्याने आज ते उपलब्ध नाहीत. पण ज्या कवितेच्या आधारे नट उत्स्फूर्तपणे आपले संवाद म्हणत ती नाट्यकविता मात्र आज उपलब्ध आहे. या नाट्यकवितेत पुराणकथांना भक्ति-नीतीचा अर्थ दिला गेला आहे हे सहज लक्षात येते. या भक्ति-नीतीच्या अर्थाला सूचित करणार्‍या पौराणिक नाटकांची परंपरा पुढे सुमारे शतकभर आढळते. म्हणजे पुराणकथांना भक्ति-नीतीचे अर्थ देण्याचा प्रवाह विष्णुदास भाव्यांपासूनच सुरू होतो. याचा अर्थ असा, की पौराणिक नाट्यवाङ्मयातील एका प्रदीर्घ व समर्थ प्रवाहाची सुरुवात विष्णुदास भाव्यांपासून झालेली आहे. म्हणून पौराणिक नाटकातील पुराणकथांना प्राप्त होणार्‍या अर्थांचा विचार त्यांच्यापासून म्हणजे इ.स. १८४३ पासून करावा लागतो.
या विषयाच्या अभ्यासाची अंतिम सीमा इ. स. १९४३ अशी आखून घेतली आहे. कारण, इ. स. १९३३ पासून मराठी नाट्यवाङ्मयात मोठे परिवर्तन होऊ लागल्याचे दिसते. 'नाट्यमन्वंतर'च्या स्थापनेपासून (इ. स. १९३३) मराठी नाट्यसृष्टीवर इब्सेनी वास्तववादाचा प्रभाव पडू लागला. त्यामुळे मराठी नाटक बदलू लागले. कोल्हटकर, खाडिलकर, गडकरी यांचे युग संपून अत्रे, रांगणेकर, वरेरकर यांची इब्सेनी प्रभावातील वास्तववादी नाटके रंगभूमीवर आली. इब्सेनी प्रभावामुळे सामाजिक नाटकांना अधिक बहर आला. तुलनेने पौराणिक नाटक मागे पडले, पौराणिक नाटक वास्तववादी बनवणे अवघड होते, ही गोष्ट याला कारण असावी. विश्राम बेडेकरांचे 'सं. ब्रह्मकुमारी' (१९३३) व नरहर गणेश कमतनूरकरांचे' स्त्री-पुरुष' (१९३३) ही दोन नाटके वास्तववादी पद्धतीने जरी या काळात लिहिली गेलेली असली तरी पुराणकथेत अद्भुत, असंभाव्य व अतिमानवी गोष्टींचा समावेश होत असल्याने पुराणकथा इब्सेनी वास्तववादाच्या पातळीवरून स्वीकारता येत नाही. म्हणून नाट्यवाङ्मयात वास्तववादाचा उदय झाल्यावर हळूहळू पौराणिक नाटक लिहिले जाईनासे झाले. विसाव्या शतकात निर्माण झालेल्या प्रवाहात लिहिल्या गेलेल्या पौराणिक नाटकांपैकी उपलब्ध होणारे शेवटचे पौराणिक नाटक के. सी. ठाकरे यांचे 'टाकलेले पोर' (१९३९) हे होय. शतकपूर्तीसाठी इ. स. १९४३ ही या कालखंडाची अंतिम सीमा मानली आहे.
इ. स. १९४३ नंतर खाडिलकरांच्या प्रभावातून वि. वा. शिरवाडकरांनी 'कौतेय' (१९५३), 'ययाती-देवयानी' (१९६६) ही नाटके लिहिलेली आढळून येतात. परंतु या नाटकांवर खाडिलकरांचा प्रभाव असूनही ती सर्वार्थाने खाडिलकरी परंपरेतील नाहीत. पुराणकथांना व्यापक, मानवतावादी अर्थ देण्याचा तेथे प्रयत्न आहे. याशिवाय विद्याधर पुंडालिक यांचे 'माता द्रौपदी' (१९७२), पु. शि. रेगे यांचे 'कालयवन व रंगपांचालिक' (१९५८) अशी काही पौराणिक नाटके आढळून येतात. पण या नाटकांची जात व प्रस्तुत कालखंडातील पौराणिक नाटकांची जात वेगळी आहे. मानवी मनातील द्वंद्र, मानवी जीवनातील सनातन प्रश्न यांचा वेध घेण्याच्या प्रेरणेतन या नाटकांची निर्मिती झालेली आहे. या प्रेरणेतून इ. स. १९४३ पूर्वी अपवादानेच पौराणिक नाटक लिहिले गेले. यामुळेही इ.स. १९४३ ही अंतिम सीमा आखून घेतली आहे.
पौराणिक नाटकांच्या या प्रथम शतकात उपलब्ध झालेल्या अधिकाधिक नाटकांच्या आधारे, पण काही मोजक्या, वैशिष्ट्यपूर्ण, विशिष्ट प्रवृत्तिसूचक प्रातिनिधिक नाटकांच्या आधारे पुराणकथांना प्राप्त करवून दिलेल्या अर्थाचे स्वरूप निखळ वाङ्मयीन दृष्टिकोणातून इथे अभ्यासले आहे. तसेच, असे अर्थ प्राप्त करवून देण्यामागील प्रवृत्तींचा अभ्यास करीत असताना मराठी पौराणिक नाटक कितपत कलात्मक बनले, कितपत समृद्ध बनले याचा देखील इथे विचार झाला आहे.
ब. पां. किर्लोस्करांचे 'रामराज्य-वियोग' (१८८४), रा. ग. गडकरी यांचे 'गर्वनिर्वाण' (१९०८-१९०९) अशी अपूर्ण असलेली पौराणिक नाटके इथे विचारात घेतलेली नाहीत. कारण, अशा अपूर्ण नाटकातून पुराणकथेला प्राप्त झालेला अर्थ पूर्णपणे व्यक्त होऊ शकत नाही. ब. पां. किर्लोस्करांच्या 'सं. शाकुंतल' (१८८२) सारखी अनुवादित व भाषांतरित नाटके इथे विचारात घेतलेली नाहीत, कारण, एक तर भाषांतरित नाटक हे मुळात भिन्न काळातील असल्याने त्या नाटकातील पुराणकथेला निर्मितिकाळाच्या संदर्भात विशिष्ट अर्थ प्राप्त झालेला असतो व त्या अर्थाचा भाषांतराच्या काळाशी प्रत्यक्ष संबंध नसतो. दुसरे असे, की अशा नाटकात पुराणकथेला प्राप्त झालेला अर्थ हा भिन्न भाषिक संस्कृतीत प्राप्त झालेला असतो. ते नाटक ज्या दुसर्‍या भाषेत भाषांतरित होते त्या भाषेच्या संस्कृतीशी त्या नाटकातील अर्थाचा प्रत्यक्ष संबंध नसतो. म्हणून अशा नाटकांचा विचार स्वीकारलेल्या चौकटीत बसत नाही, ह. ना. आपटे यांचे 'संत सखू' (१९११), मो. गो. कार्लेकर यांचे' मच्छिंद्राख्यान आणि सं. पद्मीण कचेरी' (१८१८), न. चिं. केळकर यांचे संत भानुदास' (१९१९), वि. दा. सावरकर यांचे बुद्धचरित्रावर आधारलेले 'संन्यस्त खड्ग' (१९३१) अशी संतचरित्रपर आणि सत्पुरुषचरित्रपर नाटकेही इथे विचारात घेतलेली नाहीत. कारण, यातील घटना व व्यक्ती ऐतिहासिक आहेत. रामायण, महाभारत व भारतीय परंपरा ज्यांना पुराणे मानते अशा पुराणांवर आधारित असलेल्या नाटकांचाच इथे विचार केला आहे.
पहिल्या शतकातील पौराणिक नाटकांनी पुराणकथांना कोणकोणते नवे अर्थ प्राप्त करवन दिले व त्यांचे स्वरूप कोणते. हा अभ्यासविषय असल्याने पुराणकथेच्या निर्मितिप्रक्रियेचा इथे विस्ताराने विचार केलेला नाही. पुराणकथा का, कधी व कशी जन्मते हा इथे अभ्यासाचा विषय नाही. 'पुराणकथा म्हणजे काय ? कोणत्या लक्षणांनी वा वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या कथेला आपण पुराणकथा म्हणू शकू?' याचा विचार इथे करायचा आहे. 'पुराणकथा' या शब्दाने कोणत्या रूपवैशिष्ट्यांनी युक्त असलेली कथा इथे अभिप्रेत आहे, हे लक्षात घेण्याच्या दृष्टीने पुराणकथेच्या स्वरूपाचा, तसेच पुराणकथेत काळानुरूप परिवर्तने कशी घडतात याचा मात्र सविस्तर विचार पहिल्या प्रकरणात केला आहे.
कोणताही लेखक जेव्हा वाङ्मयनिर्मिती करीत असतो, तेव्हा त्याच्या काळातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व वाङ्मयीन घडामोडींचा आणि ताणतणावांचा परिणाम त्याच्या मनावर आणि जीवनावर होणे स्वाभाविक असते. लेखकाच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीतही याचा वाटा असू शकतो. पुराणकथेला कालानुरूप व हेतूनुरूप नवीन अर्थ प्राप्त करवून देण्यात व नाटकाला विवक्षित रूप प्राप्त होण्यात या सर्व घटकांचा वाटा मोठा असतो. किंबहुना असेही म्हणता येईल, की या घटकांचा विचार केल्याशिवाय त्या पौराणिक नाट्यकृतीचे आकलन नीटसे होऊ शकणार नाही; तसेच त्या पौराणिक नाट्यकृतीने पुराणकथेला विशिष्ट स्वरूपाचा नवा अर्थ प्राप्त करवून देण्याचा प्रयत्न का केला याचा अभ्यास करणे अवघड आहे. उदा., राधा-कृष्णसंबंधांना नवा अर्थ देण्याचा प्रयत्न जो विसाव्या शतकात झाला तो समजून घेण्यासाठी तत्पूर्वीच्या ख्रिस्ती धर्माच्या हिंदू धर्मावरील प्रचारआक्रमणाचा, या दोन्ही धर्माच्या चळवळींचा, लो. टिळकांच्या राष्ट्रवादी चळवळीचा विचार करणे अत्यावश्यक ठरते. म्हणून पुढील प्रकरणांमधून लेखककालीन उपरोक्त घटकांची पार्श्वभूमी आधी विशद केली आहे. ही पार्श्वभूमी व ती नाट्यकृती आणि त्या नाट्यकृतीतून ध्वनित होणारा नवा कालसापेक्ष संदर्भ यांचे नाते शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
काही प्रतिभावंतांच्या ठिकाणी अशी कालसापेक्षता नसते. भावनांमधील ताणांमधून व संघर्षांमधून जे अनन्यसाधारण जीवन माणसाच्या वाट्याला येत असते त्याचा वेध व शोध घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अशा कालनिरपेक्ष अनन्यसाधारण जीवनाकृती मग या प्रतिभावानांना कालातीत अशा पुराणकथांत दिसू लागतात. त्यात त्यांना नवी अर्थपूर्ण संगती जाणवू लागते. म्हणून मग त्या पुराणकथांना, त्यातील भावसंबंधांना, भावनिक ताणांना, भावसंघर्षांना व भावजीवनाला ते नव्या रूपात, नव्या संदर्भात, नव्या प्रकाशात संजीवित करतात. यातूनच मग कलात्मक पौराणिक नाटक जन्माला येण्याची शक्यता असते. अशा प्रयत्नांचा विचार म्हणूनच शेवटच्या प्रकरणात केला आहे.
प्रस्तुत ग्रंथातील विषयाच्या अभ्यासामागील भूमिका व अभ्यासाची दिशा थोडक्यात अशी आहे.
पौराणिक नाटकां'चा नव्या दृष्टीने केलेला विचार ग्रंथरूपात यावा अशी माझी फार इच्छा होती. हे चिंतन ग्रंथरूपाने अभ्यासकांसमोर यावे म्हणून गुरुवर्य डॉ. रसाळसरांनी मला अनेकदा लिहिते केले. बर्‍याच मौलिक सूचनाही केल्या. त्यांचा मला फायदा झाला. गेल्या सत्तावीस वर्षांचा त्यांच्याशी ऋणानुबंध आहे. प्रबंधलेखनाचे मार्गदर्शन तर त्यांनी केले होतेच, पण वाङ्मयीन प्रश्नांचा विचार करताना नेहमीच त्यांचे मार्गदर्शन लाभत आले आहे. त्यातून वाङ्मयाकडे बघण्याची एक भूमिका तयार होऊ शकली. त्यांचे ऋण कसे फिटणार? त्यांच्या ऋणात राहण्यातच आनंद आहे. वैदिक वाङ्मयाचे अभ्यासक व मला पितृतुल्य असलेले वैजापूरचे श्री. प्रभाकरराव देशपांडे वकील यांनी त्यांच्याकडील विविध ग्रंथ उपलब्ध करून दिले. मार्गदर्शनही केले. त्यांचा मी ऋणी आहे. प्रा. पुष्पा भावे यांचाही जुना ऋणानुबंध आहे. कामाच्या व्यग्रतेतून सवड काढून त्यांनी मर्भग्राही व चिंतनपूर्ण प्रस्तावना लिहून दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. उदगीरचे संस्कृत पंडित श्री. बळवंतशास्त्री यांनी माझ्याशी चर्चा करण्यास बराच वेळ दिला. त्यांचा मी आभारी आहे. आदरणीय गो. म. कुलकर्णीसर यांनी ग्रंथलेखनातील विचार अधिक स्पष्ट व्हावेत म्हणून मौलिक सूचना केल्या होत्या. त्यांची मी आभारी आहे. ग्रंथ लवकर प्रकाशित व्हावा म्हणून माझा सतत पाठपुरावा केला तो परमस्नेही डॉ. बाळकृष्ण कवठेकर यांनी. त्यांच्यामुळे हा योग लवकर आला आहे हे निश्चित. औपचारिक शब्दात आभार मानणे त्यांना कितपत रुचेल, शंका आहे. मित्रवर्य डॉ. द. दि. पुंडे यांच्याशी केलेल्या चर्चातून ग्रंथनामनिश्चिती झाली. ग्रंथ लवकर प्रकाशित व्हावा म्हणून ते सतत माझ्या मागे होते, त्यामुळे हा योग आला आहे. त्यांचा मी आभारी आहे. परममित्र डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांनी विद्यापीठ अनदान मंडळाचे अनदान सदर ग्रंथासाठी मिळवन देऊन ग्रंथ प्रकाशनास मदत केली होती; पण त्याचा लाभ घेण्याचा योग नव्हता. मी त्यांचा आभारी आहे.
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या प्राचार्य साखरेसरांनी दिलेल्या सवलतींचा उपयोग निवांतपणे लेखनास होऊ शकला. त्यांचा मी आभारी आहे. महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री. बुक्कापाटील तसेच श्री. नेमीचंद जैन व ग्रंथालयाचे सर्व कर्मचारी यांच्या वेळोवेळी मिळणार्‍या सहकार्याबद्दल मी आभारी आहे. ____ या ग्रंथप्रकाशनासाठी काही सुहृदांना मला वेळोवेळी त्रास द्यावा लागला आहे व आनंदाने त्यांनी तो करूनही घेतला आहे! श्री. शांताराम व सौ. शलाका पानसे, श्री. देवदत्त व सौ. लता कुलकर्णी, श्री. दिलीपराव व सौ. कुंदा उंडे यांचे मी म्हणूनच मन:पूर्वक आभार मानतो. माझी पत्नी सौ. उषा हिची मला सूची बनवताना व एकूणच मोठी मदत झाली. पण तिचे आभार कसे मानणार?
प्रतिमा प्रकाशनचे संचालक व स्नेही श्री. अरुण पारगावकर यांनी ग्रंथप्रकाशनाची जबाबदारी आनंदाने स्वीकारली आणि अत्यंत कमी अवधीत ती यशस्वीपणे पारही पाडली! त्यांच्या सुनियोजित वेळापत्रकामुळे काम वेळेत पूर्ण करण्याचे माझ्यावरच दडपण येऊन हा ग्रंथ वेळेत सिद्ध करणे मला भाग पडले. त्यांचा मी अत्यंत आभारी आहे. ग्रंथाची संगणकावर सुबक व सुंदर अक्षरजुळणी करणारे टाइपो-आर्टस्चे श्री. पुरोहित, देखणे मुखपृष्ठ तयार करणारे श्री. अभय पुरंदरे तसेच लताली मुद्रणालयातील दर्जेदार छपाई करणारे संचालक व सर्व कर्मचारी आणि मुद्रितशोधन करणारे श्री. ब. रा. कुलकर्णी यांचाही मी आभारी आहे.
-अरुण प्रभुणे

Write your review for this book

Other works of डॉ. अरूण प्रभुणे
   नॉर्थ अमेरिकन इंडिअयन्सच्या अस्वललोककथा
   उत्तर धृवाजवळील अलास्कन लोककथा

Similar books:
  संशोधन
   मराठी रियासत - खंड १ ते ८
   युगांत
   धार आणि काठ
   भाषणरंग: व्यासपीठ आणि रंगपीठ
   नथुरामायण
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.