|
इस्तंबूल ते कैरो
Author: निळू दामले
Publisher: मौज प्रकाशन
|
|
Price: $5.03 $4.02 20% OFF ( ~210 Pages, R150)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: पॅलेस्टाईन, इंडोनेशिया, अफगाणिस्तान यांसारख्या मुस्लिम धर्माचं प्राबल्य असणार्या देशांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील अमानुषत्वाचं कमी-अधिक उग्र वास्तव तटस्थपणे परंतु विलक्षण प्रभावी रीत्या शब्दांकित करणारे निळू दामले... या संवेदनशील लेखकाला पुन्हा एकदा ओढ वाटली ती इस्लामिक इस्तंबूल-कैरोचीच. पॅलेस्टाईनमधला हिंसक इस्लाम, इंडोनेशियातील हिंदू संस्कृतीच्या प्रभावखालचा इस्लाम, तर अफगानिस्तानातील अरेरावी इस्लाम... इस्लाम हा एक धर्म; परंतु या एकाच इस्लामचे ठिकठिकाणी अर्थ मात्र वेगळे! निळू दामल्यांसारखा लेखकाच्या दृष्टीला कुठलाही देश जाणवतो तो माणसांच्या रूपात. तो देश त्यांना समजून घ्यायचा असतो म्हणजे समजून घ्यायची असतात त्या देशातील माणसांची मनं, त्यांचे प्रश्न, त्यांच्या व्यथा-या सगळ्यांतून सामोर्या येणार्या धर्माच्या संकल्पनांच्या अर्थ-जाणिवा. इस्तंबूल ते कैरोमधीलं हे इस्लामिक वास्तवदर्शन अफगाणिस्तानाइतकं दारुण नाही, तरीही इस्लाम म्हणजे शांतता या इस्लामच्या व्याख्येइतकं साधं-सरळही नाही. समाजाची धर्माच्या नावाखाली दुरवस्था होत चाललेली अनुभवताना होणार्या दबक्या, मूक दु:खांच्या वेदना-त्यांच्या छाया-यात जशा आहेत, तसं लोकशाही पद्धतीनं समाजाचा कारभार करता येऊ शकतो याचं भानही आहे; नि दुसरीकडे माणसांवरील धर्माच्या अतिरिक्ते वर्चस्वानं त्यांची स्वत:चीच होणारी कोंडीही आहे. ही अस्वस्थता अफगाणिस्तानाइतकी गुंतागुंतीची नसेलही; पण तरी ती एक अस्वस्थता आहेच. फिरस्ती पत्रकारितेच्या माध्यमातून घेतलेला हा शोध आहे- सजीव, प्रत्ययकारी आणि अंतर्मुखतेचा व्यापक अर्थ सांगणारा.
Review courtesy of Loksatta: रविवार १४ ऑगस्ट २००५ दोन रुपे इस्लामची! आपल्याकडे इस्लाम या विषयावर लेखन करणारे लोक फारसे नाहीत. जे आहेत, त्यांचा इस्लामविषयक अभ्यास इंग्रजी ग्रंथांवरुन झालेला असतो. म्हणजेच इंग्रजी लेखकांनी त्यांच्या ग्रहा-पूर्वग्रहांवरुन इस्लामबद्दल केलेल्या नोंदींचे, मतांचे ते एक प्रकारे संकलन असते. सेतूमाधवराव पगडी, श्रीपाद जोशी यांच्यासारखे उर्दू-फारसी भाषांचे ज्ञान असणारे नि त्या भाषांमधले मूळ ग्रंथ किंवा कागदपत्र वाचून इस्लामविषयक लेखन, अभ्यास मांडणारे लेखक नव्या पिढीत कुणीच दिसत नाहीत. इस्लामी समाजात, इस्लामी देशात प्रत्यक्ष हिंडून, मिसळून, तिथल्या परिस्थितीचे स्वत: अवलोकन करुन मग लेखन करणारा कुणी लेखक मराठीत कधी नव्हताच. कारण एवढा खटाटोप करण्यासाठी लागणारा उत्साह आणि तो उत्साह वाढावा यासाठी लागणारा पैसा मराठी लेखन-प्रकाशन व्यवसायात कधी नव्हताच, आजही फारसा आहे असे म्हणवत नाही. निळू दामले हे प्रवासी पत्रकार-लेखक आहेत. समोर दहा वृत्तपत्रे- मासिके- पुस्तके ठेवायची नि त्यातून एक झकासपैकी 'ओरिजिनल' लेख पाडायचा, असली 'डेस्कटॉप' पत्रकारिता त्यांना मानवत नाही. ते भरपूर वाचन करण्याबरोबरच भरपूर फिरतात. ज्या विषयावर लिखाण करायचेय, त्या विषयाशी संबंधित सतरा लोकांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतात. त्यांना बोलके करतात. विषयाच्या वेगवेगळया पैलूंचा शकय तितका खोल विचार करतात नि मगच लेखणी उचलतात साहजिकच त्यांच्या शब्दांना मग एक वेगळेच वजन येते. पॅलेस्टाइन अतिरेकयांचा दहशतवाद, अफगाणिस्तानातली तालिबान चळवळ याबद्दल मराठीत कमी लेखन झालेय असे नाही. पण हे लेखन म्हणजे इंग्रजी वृत्तपत्रांमधील त्या-त्या विषयांचे संकलन असते. आपल्याकडची इंग्रजी वृत्तपत्रेदेखील ते लेख मुळातल्या 'टाइम', 'न्यूजविक', 'इकनॉमिस्ट' अशा तालेवार परकीय मासिकांमधून संकलितच करीत असतात. तुर्कस्तान किंवा इजिप्त यांच्याबद्दल मराठीत फारसे लेखन येत नाही. कारण मुळात इंग्रजीतच ते फारसे येत नाही. अशा स्थितीत, निळू दामले स्वत: इस्रायल आणि अफगाणिस्तानात जून आले. भाषेचा प्रश्न होताच; पण तरीही ते शकय तितके तिथल्या सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळले. या प्रत्यक्ष अनुभवातून त्यांनी जी पुस्तके लिहिली, ती साहजिकच आगळी-वेगळी ठरली. प्रस्तुत 'इस्तंबूल ते कैरो' हे त्यांचे ताजे पुस्तक म्हणजे तुर्कस्तान आणि इजिप्तच्या प्रत्यक्ष भटकंतीची अनुभवकथा आहे. इस्लामचा जन्म अरबस्तान म्हणजे सौदी अरेबियात झाला, पण नंतर खलिफा म्हणजे इस्लामचा जागतिक प्रमुख, त्याचे मुख्य केंद्र तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल हे झाले. परंतु त्याच तुर्कस्तानात पहिल्या महायुद्धानंतर सुधारणा आल्या नि केमाल पाशाने खिलाफतच रद्दबातल करुन टाकली. आज तुर्कस्तान हा स्वत:ला इस्लामी देश म्हणवण्यापेक्षा अत्याधुनिक युरोपीय राष्टर म्हणवून घेतो. तुर्कस्तानातल्या इस्लामचा कट्टरवादापासून आधुनिकतेपर्यंतचा हा प्रवास कसकसा झाला ? आज तिथल्या सर्वसामान्य माणसांना, बुद्धिमंतांना, राजकारण्यांना, पत्रकारांना याबद्दल काय वाटते ? हे दामले यांनी त्या-त्या माणसांशी झालेल्या संवादांसह मांडले आहे. इस्लामी जगात फिरताना लेखकाला असे जाणवले होते की, इस्लामी कट्टरवादाचा उगम कैरोच्या 'अल अझर' विद्यापीठातून मोठया प्रमाणावर होतो. मुस्लिम ब्रदर्स किंवा मुस्लिम ब्रदरहूड ही संघटना या विद्यापीठातून काम करते. मग दामले कैरोत दाखल झाले. त्यांना हजारो वर्षांपूर्वीची मेलेली माणसे नि त्यांची अवाढव्य थडगी यात रस नव्हता. त्यांना इजिप्तमधला आजचा माणूस कसा जगतो ? कसा विचार करतो ? हे जाणून घेण्यात रस होता. इथेही ते इजिप्शियन समाजातल्या नानाविध स्तरांमधल्या माणसांशी बोलले. यात राजदूत, त्याची पत्नी, अल अहराम या सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्राचे संपादक, विद्यार्थी, टॅकसीवाले, व्यापारी अशी सर्व मंडळी होती. शेवटी तर त्यांनी अल अझर विद्यापीठात जून मुस्लिम ब्रदरहूडच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला. अशा प्रत्यक्ष अनुभवांतून केलेले हे लेखन अत्यंत वाचनीय, रसरशीत बनले आहे. तुर्कस्तान आणि इजिप्त दोन्ही ठिकाणची स्थिती पॅलेस्टाइन किंवा अफगाणिस्तानप्रमाणे रक्तमय, अग्निमय, युद्धमय नाही. पण तिथे एक अस्वस्थता आहे. दहा-पंधरा दिवसांच्या प्रवासात आणि भाषा येत नसताना एखाद्या देशाचा, एखाद्या समाजाचा सम्यक वेध घेणे शकयच नसते. तरीही दामल्यांनी घेतलेला हा वेध वाचकाला तिथल्या समाजाच्या बर्याच अंतरंगापर्यंत नेतो. हा प्रवास, तिथल्या माणसांशी झालेल्या क्रिया-प्रतिक्रिया आणि त्या देशांचा लिखित इतिहास आपल्यासमोर मांडल्यावर, दामले इस्लामबद्दल किंबहुना एकंदरीतच धार्मिक वर्चस्वाबद्दल जे स्वत:चे भाष्य करतात ते पुन:पुन्हा वाचावे आणि चिंतन करावे असे उतरले आहे. पुस्तकाची निर्मिती अव्वल दर्जाची आहे. मुखपृष्ठावरील लेखकाने स्वत:च घेतलेले एका मुस्लिम महिलेचे 'आता थांबवा हे सारे' अशा भावमुद्रेतील छायाचित्र वेगवेगळया अर्थच्छटा सूचित करते. मल्हार कृष्ण गोखले
|
 |
 |
|