|
समिधा
Author: साधना आमटे
Publisher: पॉप्युलर प्रकाशन
|
|
Price: $7.61 $6.08 20% OFF ( ~181 Pages, R250)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: आजन्म एका वादळाची साथसंगत करण्याचे धाडस एखादी असामान्य, विलक्षण तेजस्वी व्यक्तीच करु शकते. दंडसंन्याशाच्या वेषातील बाबांच्या प्रथम दर्शनाने साधनाताईंच्या हृदयात निर्माण झालेली अनामिक ओढ ही त्यांच्या भविष्यातील वैवाहिक आयुष्याची व लोकाविलक्षण कार्याची रुजवात होती. या समर्पित सहजीवनाची यात्रा 'समिधा' या आत्म-कथनपर पुस्तकात शब्दबद्ध केली आहे.
Review courtesy of Loksatta: लोकसत्ता रविवार, १२ जानेवारी २००३ समर्पिततेचं आत्मकथन
आजन्म एका वादळाची साथसंगत करण्याचे धाडस एखादी असामान्य, विलक्षण तेजस्वी व्यक्तीच करु शकते. दंडसंन्याशाच्या वेषातील बाबांच्या प्रथम दर्शनाने साधनाताईंच्या हृदयात निर्माण झालेली अनामिक ओढ ही त्यांच्या भविष्यातील वैवाहिक आयुष्याची व लोकाविलक्षण कार्याची रुजवात होती. या समर्पित सहजीवनाची यात्रा 'समिधा' या आत्म-कथनपर पुस्तकात शब्दबद्ध केली आहे.
पिढीजात वैभवावर नि:संगपणे पाणी सोडून बाबांनी स्वयंस्फूर्तीने पत्करलेल्या फाकिरीला साधनाताईंनी साथसोबत केली. प्रियकर,कार्यकर्ता, पती... प्रत्येक रुपातील भूमिकेशी तादात्म्य पावून नवनवी आव्हाने त्या पेलत राहिल्या. कुष्ठरोग्यांसारख्या कैक अगतिक, पीडित, उपेक्षितांसाठी बाहू उभारुन त्यांच्या मनात जगण्याची नवी उमेद निर्माण करता करता 'आनंदवन'ची निर्मिती झाली. या नव्या वाटेवर मग नागेपल्ली, भामरागड, हेमलकसा, अशोकवन अशा नव्या जगाची निर्मिती होत गेली. बाबांच्या लोकाविलक्षण यात्रेत पहाडासारखी संकटे, दुर्धर प्रसंग, संघर्ष, साहसे यांच्या असंख्य आठवणी आहेत. दांपत्यजीवन, सुख, आनंद याबद्दलच्या या दोघांच्याही कल्पना लैकिकापेक्षा वेगळ्या असल्याने अगतिकांच्या जीवनात आनंद फुलविण्यातील, त्यांच्या मनात जगण्याची नवी उमेद रुजविण्यातील दुर्मिळ आनंदाचे ते धनी होतात. त्यांच्या या प्रवासातील अनुभव, भोगलेल्या आपत्ती, घटना म्हणजे विस्तवावरची अखंड वाटचाल आहे, याचा प्रत्यय पुस्तक वाचताना येत राहतो.
या आत्मकथनात बालपणीच्या आठवणी आहेत. वंशपरंपरागत कर्म-कांडाची साक्ष देणारे स्तोत्रपठनाचे सूर आहेत. सनातनी परंपरेचे खोलवर रुजलेले संस्कार आहेत. त्यातून केवळ त्यांच्या व्यक्तिगत जीवनावरच नव्हे, तर तत्कालीन कुटुंबव्यवस्थेवरही प्रकाश पडतो. त्यांच्या शालेय जीवनातील स्मृती आहेत, तसेच त्या काळातील 'चले जाव' चळवळीच्या कालखंडातील आंदोलने, प्रभातफेर्या हे राजकीय संदर्भही यात आहेत.
ताईंच्या बाबांबरोबरच्या वाटचालीत बाबांच्या स्वभावाचे अनेक पैलू उलगडत गेले. कित्येक वेळा उभयतांच्या स्वभावातील विरोधाभास, मूलभूत अंतर प्रकर्षाने जाणवले. या सार्याला सामोरे जाताना 'हे सुंदर प्रेमाचे रोप रोज लावतात, पण ते रोप वाढत असताना त्याच्या सभोवताल येणारे गैरसमजुतीचे तण ते काढून टाकण्याचा प्रयत्न करीत नाहीत,' असे म्हणून स्वीकारतात. ताईंच्या मते मनाला न पटणार्या अनेक गोष्टी मनुष्याला पचवता आल्या पाहिजेत व सतत अभ्यासानेच त्या साध्य होतात आणि हे सर्व विशुद्ध प्रेमापोटीच घडू शकले. म्हणूनच जात, पात, धर्म, पंथ यातील निरर्थकतेची, सर्व मानव एक मानण्याची बाबांची मते त्यांना पटत जातात.
'आनंदवना'च्या निर्मितीच्या प्रारंभीचे भयंकर अनुभव वाचताना अंगावर सरसरुन काटा येतो. जंगली रस्ता, उजाड माळरान, रानडुकरे-कोल्ह्यांशी झुंज, झाडाखाली खाल्लेली शिदोरी, साप, विंचू, इंगळ्या, अजगर, लांडगे अशा भयंकर जीवजंतूंशी दिलेला लढा आणि मग त्यांच्याशी झालेली मैत्री हे सारे दिव्य एका वेड्या ध्यासापायी दोघांनी मिळून केले होते. पेशंटची वैयक्तिक सेवा बाबाच करीत. अगदी बेडपॅन देणे, जखमेतील अळ्या काढणे, त्यांचे डरेसिंग करणे इत्यादी. त्याचबरोबर ताईंना स्वयंपाकात, भांडी घासण्यास मदत करीत. पण त्यांच्या या प्रयत्नास समाजाचा पाठिंबा न मिळाल्याने प्रारंभी त्याही समस्येला कसे सामोरे जावे लागले, ते ताई सांगतात. आनंदवनातील दूध, भाजीपाला वरोरा गावातील लोक कुष्ठरोगाच्या भीतीनेघेण्यास कचरत असत. पण गावातील सुशिक्षितांनी हे धाडस दाखवले. हळूहळू मालाची मागणी वाढू लागली. आनंदवनात्त्तील निसर्गाचे रम्य वर्णन यात आहे, तसेच भयानक वादळाचेही वर्णन आहे. हेमलकशाच्या प्रकल्पाचेही दाहक अनुभव आहेत. जंगलातील मधमाश्यांनी बाबांच्या मुलाला व इतर कार्यकर्त्यांना चावून अक्षरश: फोडून काढले होते. अशी जीवघेणी संकटे अंगावर घेत बाबांची मुले, सुना,कार्यकर्ते यांनी नेटाने अनेक प्रकल्प तडीस नेले. अशा नैसर्गिक आपत्तींप्रमाणे नाजूक तब्येती, अपघात, आजारपणे या सार्याला जिद्दीने तोंड दिले. त्यातूनच अनेक प्रकल्प उभे राहिले. १९६० साली त्यांच्या या महान कार्याची दखल घेतली गेली, खाजगी-सरकारी मदतही मिळत गेली. लोकांचा दृष्टिकोन बदलत गेला.
ताईंनी आपले मनोगत हृद्य शब्दांत व्यक्त केले आहे. ' आमचे जीवन कष्टायन आहे. बाबांच्या समर्पित जीवनयज्ञातील एक लहानशी समिधा हेच माझे स्थान आहे.' खर्या अर्थाने एकरुप झालेले दोन ध्येयवेडे, अलैकिक आनंदमार्गाचे यात्रिक ठरतात.
या अनुभवांनी सुजाण, संवेदनशील मन हेलावून जाते, उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या दर्शनाने नतमस्तक होते. त्यांच्या या वाटचालीत कटू, दुर्धर प्रसंगांच्या स्मृतींप्रमाणे हृद्य आठवणीही आहेत. पु.ल. देशपांडे, सुनिताबाई, डॉ. अनिल अवचट, मोहन धारिया, चंद्रकांत शहा, जॉर्ज फर्नांडिस, स्मिता पाटील, राष्ट्र्संत तुकडोजी महाराज, शंकरराव देव, इंदिरा गांधी ते विनोबाजींपर्यंत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी बाबांच्या कार्यास केलेल्या मदतीबद्दलचे उल्लेख म्हणजे त्रशृणनिर्देश व त्यांच्या त्रशृजुत्वाचे दर्शन वाचकांना होते.
माधुरी महाशब्दे लेखांकनः सीताकांत प्रभू
Other Links:
|
 |
 |
|