|
ब्राह्मणी स्वयंपाक
Author: वसुधा गवांदे
Publisher: पॉप्युलर प्रकाशन
|
|
Price: $8.37 $6.69 20% OFF ( ~210 Pages, R275)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: 'ब्राह्मणम भोजनम प्रियेत' असे गमतीने म्हटले जात असले तरी ते खरेच आहे. मध्यंतरी व्हॉअॅटसअअॅपवरपण एका ब्राह्मण सुगरणीचे मनोगत अशी पोस्ट आली होती. वाचून गंमत वाटली. त्यात ब्राह्मणांच्या भोजनात काय काय पदार्थ असतात, त्यांचा चौरस आणि पूरक आहार, त्याची विशिष्ट प्रकारे, पण विचारपूर्वक केलेली मांडणी अशी माहिती होती. यानंतर ब्राह्मणी स्वयंपाक हे वसुधा गवांदे यांचे पुस्तक वाचनात आले. सुरुवातीला वाटले खाद्य संस्कृतीला जागतिकीकरण अंगवळणी पडले असताना, घरोघरी सर्रास पिझ्झा, बर्गर, हक्का नूडल्स यांचे स्थान असताना हे ब्राह्मणी भोजनाचे पुस्तक का बरे काढले असावे? रोजची भाजी पोळी दोन वेळा जेवताना खाणे हेच सध्या कालबाह्य ठरत आहे. न्याहारी, दुपारचे जेवण, मधल्यावेळचे खाणे आणि पुन्हा रात्रीचे जेवण अशा प्रकारे आपण दिवसभरात अन्नग्रहण करत असतो. प्रत्येक वेळी आपल्याला जिभेचे चोचले पुरवणारे नवनवे पदार्थ हवे असतात. या गरजेतून पाककृतींची असंख्य पुस्तके निर्माण झाली आहेत. तरीही हे पुस्तक नक्की काय सांगत आहे या उत्सुकतेने ते वाचायला सुरुवात केली. प्रस्तावनेतील प्रख्यात शेफ संजीव कपूर यांचे खाद्यसंस्कृतीबाबतचे विचार वाचल्यावर या पुस्तकाचे महत्त्व जाणवले.
मुळातच आपण खात असलेले अन्न आणि आपले राहणीमान, जीवनशैली, भोवतालचे हवामान, वैचारिकता या सार्याचा परस्परसंबंध आहे. आपण जे अन्न ग्रहण करतो त्यातून मिळणार्या पोषक मूल्यांमुळे आपली शारीरिक स्थिती तंदुरुस्त राहण्यात साहाय्य होते. याच जाणिवेतून आपल्या भारतात प्रादेशिकतेनुसार खाण्यापिण्याच्या काही सवयी, पद्धती निर्माण झाल्या आहेत. कोणता पदार्थ कधी आणि किती प्रमाणात खावा, कधी खाऊ नये इथपासून ते खाताना शरीर आणि मनाची स्थिती कशी असावी इतके नियम आपल्याकडे आहेत. एकच पदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी तिथल्या वातावरणानुसार, लोकांच्या राहणीमानानुसार वेगळ्या पद्धतीने बनवुन खाल्ला जातो. खाद्य संस्कृती ही आपल्या सांस्कृतिक वैविध्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे ब्राह्मणी स्वयंपाक म्हटल्यावर एक विशिष्ट प्रकारची पारंपरिक जीवनशैली आपल्या डोळ्यासमोर येते. यातील पाककृती या देखील अशा पारंपरिक पद्धतीने केल्या जाणार्या आहेत. सात्विक पण पौष्टिक आहार, मसाल्यांचा, कांदा-लसूण तसेच तेल-तूप याचा मर्यादित वापर हे यातील पाककृतींचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे यातील पदार्थ साध्या, सोप्या पद्धतीने केले जातात. कडधान्य, भाज्या यांची पोषणमूल्ये लक्षात घेऊन, सगळे पदार्थ एका विशिष्ट साच्यात न करता वेगवेगळ्या पद्धतीने कसे केले जातात ते यातून जाणवते. अगदी भाताचे विविध प्रकार असो वा भाज्यांचे किंवा आमटीचे विविध प्रकार असो त्यातल्या फोडणी देण्याच्या प्रकारातली विविधताही या पुस्तकात अतिशय चांगल्या पद्धतीने मांडली आहे.
या पुस्तकाचे आणखीन एक वैशिष्ट्य असे आहे की यात तूप करणे, दह्याचे विरजण लावणे, साखरेचा एकतारी/गोळीबंद पाक तयार करणे, स्वयंपाकापूर्वीची तयारी, फोडणी देण्याची पद्धत, मसाले तयार करण्याची पद्धत, पान वाढण्याची विशिष्ट पद्धत या सार्याची माहिती दिली आहे. आपल्याला फारशा परिचित नसणार्या भाज्याही यात आहेत. त्या कशा ओळखाव्यात, कराव्यात यांची माहिती सांगितली आहे. जसे कोरोळ्याच्या भाजीची पानं आपट्याच्या पानासारखी दिसतात वा भारंगीची भाजी घेताना त्याची कोवळी पाने घ्यावीत असे सांगितले आहे. मात्र या सोबतच या दुर्मिळ भाज्यांचे फोटो दिले असते तर ते अधिक उपयुक्त ठरले असते असे वाटते.
ब्राह्मणी जीवनपद्धतीत सणवार, धार्मिक कृत्ये हे अधिक प्रमाणात असून ते आजही पाळले जातात. त्यानुसार सणासुदीच्या स्वयंपाकाची तयारी कशी करावी? वेगवेगळ्या प्रकारची लोणची, चटण्या, वाळवणाचे प्रकार, वेगवेगळ्या प्रकारच्या भाजण्या, पिठं ही कशी तयार करावीत? त्यांची साठवणूक कशी करावी? अशी उपयुक्त माहिती दिली आहे. उदाहरणार्थ पुरणपोळीसाठीचे पुरण आदल्या दिवशी शिजवावे. उकडीचे मोदक करताना पारी फुटू नये म्हणून काय करावे अशा स्वयंपाकघरातल्या अनेक निरनिराळ्या सहज सोप्या क्लृप्त्या या पुस्तकात सांगितल्या आहेत. उपवासाचे पदार्थही यात सांगितले आहेत.
आमटीमध्ये फोडणी करताना लोखंडी कढईच का वापरावी? तसेच आटवणी म्हणजे काय? भात किंवा पुलाव यासाठी तांदूळ कसा निवडावा? कुठली भाजी कोणत्या ऋतूत चांगली मिळते? प्रवासात नेण्यासाठी पदार्थ करायचा झाल्यास काय काळजी घ्यावी? यासारख्या माहितीमुळे नव्याने पाककृती करणार्या व्यक्तीला या पुस्तकाचा फायदा निश्चितच होईल. पदार्थ कृतीच्या सुटसुटीतपणाने आपल्या धावपळीच्या काळातही आपली खाद्य संस्कृतीमधली विविधता सहजगत्या जपणे हे यातून शक्य होणार आहे. यातील पौष्टिक मूल्ये पाहता आजच्या आहार नियमन करण्याच्या काळात ते फारच उपयुक्त ठरणारे आहे. बदलत्या काळाप्रमाणे मायक्रोवेव्हचा, हॅन्ड मिक्सरचा वापर कसा करता येईल तेही सांगितले आहे. एकंदरीत आधुनिकता आणि परंपरा यांची सांगड घालणारे ब्राह्मणी स्वयंपाक हे पुस्तक रसना तृप्ती करणारे आहे तसेच अन्न हे पूर्ण ब्रह्म याची प्रचिती देणारे आहे. -तृप्ती कुलकर्णी
Other Links:
|
 |
 |
|