Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


गानयोगी पं. द. वि. पलुस्कर
Author: अंजली कीर्तने
Publisher: नवचैतन्य प्रकाशन
Add to Shopping Cart
Price: $19.8 $15.84 20% OFF ( ~500 Pages, R650)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
अभिजात हिंदुस्थानी संगीतातील थोर गायक म्हणजे पं. दत्तात्रय (बापू) विष्णू पलुस्कर, हे त्यांचं चरित्र. त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश ... पलुस्करांच्या जडणघडणीच्या काळातला ...
गांधीजी १९३७-३८च्या सुमारास पुण्यात आले. शनिवारवाडासमोर त्यांचं भाषण झालं. व्यासपीठाकडे जाणा-या गांधीजींच्या मार्गावर राष्ट्रसेवादलाचे ३०-४० स्वयंसेवक त्यांना मानवंदना देण्यासाठी उभे होते. त्यात काही मॉडर्नचे विद्यार्थी होते. झपझप पावलं टाकत, तरातरा चालणारा हा महापुरुष इतक्या जवळून पाहणं, हा अनुभव स्फूर्ती देणारा होता. गांधीजींचा आवाज, त्यांचे शब्द, त्यात ओथंबलेली देशप्रीती अनेक मुलांना प्रेरणा देऊन गेली. ही सारी साने गुरुजीची मुलं होती. ध्येयाकांक्षी, उत्सुक, मूल्यांचा शोध घेणार्‍या, धडपडणार्‍या मुलांची ही पिढी होती. ग. प्र. प्रधान हे या पिढीचेच प्रतिनिधी. तेही मॉडर्नचेच विद्यार्थी. बापूराव पलुस्करांच्या आगेमागे होते.
पुस्तकांत बुडून जाणारा हा मुलगा चळवळींतही आघाडीवर असे. तो समवयस्क मुलांच्या सभा घ्यायचा. त्यात भाषणं द्यायचा. शाळेतील शिक्षक उघडपणे जरी त्याची पाठ थोपटू शकत नसले तरी, त्यांचा छुपा पाठिंबा होता. या बंडखोर मुलाचा शाळेला अभिमान होता. वेळप्रसंगी शाळा त्याला पाठीशी घालायची. तो पोलिसांच्या तावडीत सापडणार नाही, याची काळजी घ्यायची. समाजवाद, साम्यवाद, गांधीवाद या विचारप्रणालींचे संस्कार या पिढीवर भोवतालच्या वातावरणातून सहजपणे होत होते. या विचारप्रणालींची बाळरूपं या मुलांच्या लेखनात उमटलेली दिसतात. काय केलं म्हणजे स्वातंत्र्य मिळेल, या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना या पिढीनं त्याग, निस्वार्थ बुद्धी, शिस्त, समभाव, सेवाभाव, परोपकार, देशासाठी आयुष्य झोकून टाकणं यासारख्या समाजवादी मूल्यांचं तत्त्वज्ञान घडवलं.
मॉडर्नचा छोटा माधव वैद्य पुढे शिक्षणक्षेत्रात गेला. याच प्राचार्य मा. य. वैद्य यांनी पुढे आत्मकथा लिहिली. बालवयात त्यांनी अनुभवलेल्या १९४२च्या क्रांतीचं आणि त्यातील शाळकरी मुलांच्या सहभागाचं दर्शन तळे उन्हातले या त्यांच्या आत्मकथेत घडतं. ऑगस्ट १९४२ मध्ये कअॅंग्रेसचे मुंबईत अधिवेशन झाले. गांधीजींनी क्विट इंडिया (भारत सोडा) असे बजावले. इंग्रज दाद देत नाहीत हे पाहून गांधीजींनी लोकांना करा किंवा मरा असा आदेश दिला. समाजवादी पुढार्‍यांनी आम जनतेची चळवळ सुरू करायचा निर्णय घेतला. दुस-या दिवशी विद्यार्थ्यांचा प्रचंड मोर्चा निघाला. आमच्या शाळेच्या मोर्च्याला मार्गदर्शन करणा-यांत बाळू पोतदार, पटवर्धन व मी होतो. मोच्र्यात संपूर्ण शाळा सहभागी झाली होती. जंगली महाराज रोडने आमचा मोर्चा लकडी पुलापर्यंत गेला. तेथे फर्गसन कॉलेज आणि एमईएसची भावे स्कूल यांचे मोर्चे आले. एक प्रचंड समुदाय इन्किलाब झिंदाबाद आणि नहीं रखना, नहीं रखना, ए जालिम सरकार नहीं रखना या गगनभेदी घोषणा देत लकडी पुलावरून टिळक रोडने पुढे सरकू लागला. तिथं गावातील शाळांचे मोर्चे या महासागराला येऊन मिळाले. महात्मा गांधी की जय, पंडित नेहरू झिंदाबाद अशा घोषणा देत हा महामोर्चा सर परशुरामभाऊ कॉलेजजवळ पोहोचला. तेथे पोलिसांनी मोर्चा अडवला. विद्यार्थ्यांच्या जमावातून दुप्पट जोमाने घोषणा सुरू झाल्या. पोलिसांनी विद्यार्थ्यांना बजावले, येथून गुपचूप आपापल्या घरी जा. जमाव उलट अनावर झाला. पोलिसांना लाठीचार्ज करण्याचा हुकूम झाला. माझ्यापुढे पाच सहा फुटांवर पोलिस लाठीचे हात करत होते. एवढात पोलिसांवर दगडफेक सुरू झाली. पोलिस अधिकार्‍यांनी घाबरून गोळीबार सुरू केला. संतप्त तरुणांचे असे उद्रेक जागोजागी होत होते. मॉडर्नच्याच पटवर्धन नामक मुलानं जिमखाना पोस्टात पेटते बोळे फेकले आणि तो पकडला गेला.
बापूराव पलुस्करांच्या वर्गातील हरी लिमये यांनी तर बालवयात धाडसाचा कळस गाठला. पुण्याला त्यांची भेट झाली. त्या हरवलेल्या दिवसांविषयी ते म्हणाले, १९४२ च्या चळवळीनंतर मला तीन वर्षं तुरुंगात जावं लागलं. मी १९४६ साली सुटलो. कॅपिटल बॉम्ब खटल्यात मी अडकलो होतो. खडकीला बॉम्बची फॅक्टरी होती. तेथून आम्ही हॅंडग्रेनेडस पळवले. ते अतिशय स्फोटक होते. मोठा धोका होता. पण त्यापेक्षाही मोठा होता ब्रिटिश सत्तेविरुद्धचा आमचा संताप. मी सर्वात लहान, म्हणजे १५ वर्षाचा होतो. खटल्यात सापडलो तेव्हा कॉलेजात पहिल्या वर्षाला, विज्ञानशाखेत शिकत होतो. २३ जानेवारी १९४३ रोजी रात्री, शेवटच्या खेळाच्या वेळी, कॅपिटल सिनेमागृहात मी, माझे थोरले बंधू नीळकंठराव व इतर मित्रांनी मिळून हा स्फोट घडवून आणला. माझे बंधू चळवळीत चांगलेच गुंतले होते. त्यांना कॅम्पातील तुरुंगात ठेवलं होतं. पण तेथून ते पळाले. नंतर परत त्यांना पकडलं. ते वातावरणच असं काही होतं की स्वातंत्र्यापुढे मरणाचंही भय वाटायचं नाही.विद्यार्थ्यांच्या हस्तलिखितांतून ज्या भावनांचा शाब्दिक उद्रेक झाला होता, त्याचा वास्तवातील उद्रेक म्हणजे अशा घटना हा बापूराव पलुस्करांचा काळ. याच काळात ते लहानाचे मोठे झाले. वर्गात जेव्हा महायुद्धावर चर्चा रंगत, तेव्हा बापूही त्यात हिरिरीनं भाग घेई. हिटलर आता पुढे कोणती चाल खेळेल, कोणता देश पादाक्रांत करेल, याविषयी तो अंदाज बांधे. बापूरावांचे आणखी दोन शाळूसोबती मला संशोधन करत असताना सापडले. वसंत खानवेलकर आणि गोपाळ जोशी. त्यांच्यात आठवणीतून हे धागेदोरे गवसले. बापूचं विश्व वेगळं होत. तो गायनाचार्य विष्णू दिगंबरांचा पुत्र होता आणि गायक म्हणून त्याची जडणघडण होत होती. त्याचा बराचसा वेळ विनायकबुवा पटवर्धनांच्या गांधर्व महाविद्यालयात जायचा. तरीही बापू इतर मुलांसारखाच होता. देशप्रेमाची ज्योत त्याच्याही मनात तेवत होती.
मॉडर्नची नियतकालिकं प्रसिद्ध होऊ लागली. हस्तलिखितातील मजकुराला त्यात स्थान मिळू लागलं, तेव्हा बापू शाळा बदलून नानावाडातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दाखल झाला. तो मॉडर्नमध्ये असता तरी त्यानं हस्तलिखितासाठी लेखन केलं असतं, असंही नाही. शाळेतील प्रत्येक मुलगा आपल्या भावना शब्दबद्ध करत होता, असं नव्हे. मात्र याचा अर्थ असा नव्हे की त्याच्या मनात भावोर्मी उठतच नव्हता. देशप्रीतीच्या लाटेनं सारेच भिजले होते. ती संपूर्ण देशाची समूह भावना होती.
देशभक्तीचं बाळकडू तर बापूला त्याच्या घरातच मिळालं होतं. त्याचे वडील विष्णू दिगंबर हे जाज्वल्य देशभक्त होते. कअॅंग्रेसच्या अधिवेशनात राष्ट्रगीत गाण्यासाठी त्यांना आवर्जून बोलावलं जाई. सर्वच राष्ट्रीय नेत्यांना विष्णू दिगंबरांबद्दल अत्यादर होता. पं. मदनमोहन मालवीय, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी, स्वामी श्रद्धानंद, लोकमान्य टिळक यांसारख्या पुढा-यांशी त्यांचे स्नेहसंबंध होते. एकदा इंग्लंडचा युवराज मुंबईत आला होता. रस्त्यावरून मिरवणूक चालली होती.
दाराखिडक्यांतून गर्दी करून सारे ती मिरवणूक पाहत होते. विष्णू दिगंबर मात्र शांतपणे आपलं काम करत बसले होते. कोणी तरी त्यांना विचारलं, पंडितजी राजाला बघावंसं नाही वाटत तुम्हाला? त्या वेळी टिळक मंडालेच्या तुरुंगात होते. भावनावेगानं पंडितजी म्हणाले, माझा राजा मंडालेच्या तुरुंगात आहे. संगीतसभांची, महोत्सवांची सांगता वंदे मातरमने करण्याची प्रथा विष्णू दिगंबरांनीच पाडली. हे सारं बापूनं घरातील मंडळींकडून ऐकलं होतं. त्याचे खोल ठसे त्याच्या मनावर उमटले होते.
बापूरावांना १९४१ साली मॅट्रिकच्या परीक्षेत अपयश आलं.१९४२ची चळवळ धगधगत असताना, अस्वस्थ मनानं बापू परत मॅट्रिकला बसला. दंगेधोपे, जाळपोळ, हुतात्म्यांचं बलिदान, गोळीबार यांच्या बातम्यांनी वृत्तपत्रांचे रकाने ओसंडत होते. या काळात बापूच्या वैयक्तिक जीवनातही भावनांची खळबळ माजली होती. मॅट्रिकचं अपयश, गरिबी, भविष्याची चिंता, गांधर्व महाविद्यालयात शिगेला पोहोचलेला गुरुशिष्य संघर्ष यामुळे तो बेचैन होता. आपलं आयुष्य कधी रांगेला लागणार? स्वत:च्या पायावर उभं राहून आईला कधी सुख देणार? पित्यासारखा उत्तम गायक कधी बनणार? जिथे पावलोपावली अवमान, अवहेलना वाटाला येते, तेथून दूर जावं का? पण मग तेथील नोकरी सुटेल. परत आर्थिक अस्थैर्य वाटाला येईल? मनाच्या आत आणि बाहेर, घरात आणि भोवतालच्या परिसरात सर्वत्र संघर्ष पेटला होता. बापू भोवंडून गेला होता.
बापूरावांच्या जीवनातील हा अत्यंत ताणतणावाचा, मानसिक द्वंद्वांचा काळ होता. ते सर्वार्थानं असुरक्षित व एकाकी होते. बाहेरच्या वातावरणातील ज्वाळाप्रमाणेच, वैयक्तिक जीवनातील भावनिक ज्वाळांनीही त्यांना लपेटलं होतं. आणि त्यात हे गाणारं फूल होरपळत होतं.

Maharashtra Times Review

Write your review for this book

Other works of अंजली कीर्तने
   डॉ.आनंदीबाई जोशी: काळ आणि कर्तुत्व
   पाऊलखुणा लघुपटाच्या
   माझ्या मनाची रोजनिशी
   मनस्विनी प्रवासिनी (ब्रिटिश पर्व)
   बहुरूपिणी दुर्गा भागवत : चरित्र आणि चित्र

Similar books:
  चरित्र
   राजा शिवछत्रपति
   जवाहरलाल नेहरू
   कहाणी लंडनच्या आजीबाईंची
   कान्होजी आंग्रे
   मोगरा फुलला
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.