|
निराकार
Author: इंदिरा संत
Publisher: पॉपुलर प्रकाशन
|
|
Price: $6.39 $5.11 20% OFF ( ~300 Pages, R150)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: जेष्ठ प्रतिभावंत कवयित्री इंदिरा संत यांचा \x९१निराकार\x९२ या संग्रहाच्या प्रस्तावनेमधील काही भाग... कवयित्री इंदिरा संत यांचा \x९१निराकार\x९२ हा कवितासंग्रह गुढी पाडव्याच्या दिवशी, ५ एअप्रिल रोजी, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई ३४ यांच्या तर्फे प्रसिद्ध झाला. संग्रहाच्या मनोगतामध्ये इंदिरा संत म्हणतात, \x९१\x९१यापुढे माझ्या हातून कवितालेखन होईलसे वाटत नाही. हीच माझी शेवटची भेट समजावी, मानून घ्यावी, अशी रसिक वाचकांना विनंती.\x९२ ्x९१निराकार\x९२ हा इअंदिरा संत यांचा नवा, \x९१वंशकुसुम\x९२नंतरचा कवितासंग्रह. Review courtesy of Maharashtra Times: १०एप्रिल२००० निराकाराकडे जाताना... - वासंती मुझुमदार
ज्येष्ठ प्रतिभावंत कवयित्री इअंदिरा संत यांचा निराकार या संग्रहाच्या प्रस्तावनेमधील काही भाग...
कवयित्री इअंदिरा संत यांचा निराकार हा कवितासंग्रह गुढी पाडव्याच्या दिवशी, ५ एप्रिल रोजी, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई ३४ यांच्या तर्फे प्रसिद्ध झाला. संग्रहाच्या मनोगतामध्ये इअंदिरा संत म्हणतात, यापुढे माझ्या हातून कवितालेखन होईलसे वाटत नाही. हीच माझी शेवटची भेट समजावी, मानून घ्यावी, अशी रसिक वाचकांना विनंती.
निराकार हा इअंदिरा संत यांचा नवा, वंशकुसुमनंतरचा कवितासंग्रह.
या संग्रहाची जुळवाजुळव करण्याच्या निमित्ताने मी बेळगावला गेले होते. एका मोठया वहीत सगळया अप्रकाशित कविता इअंदिराबाईंनी व्यवस्थित उतरवून ठेवलेल्या होत्या. त्या कवितांचं वाचन पुन्हा सलगपणे करावं, असं आम्ही ठरवलं.
कविता वाचता वाचता मध्येच एखाद्या शब्दाच्या कारणाने, रचनाबंधाच्या संदर्भात, असं बोलणं सुरू व्हायचं आणि पुढल्या कवितेकडे जाणं थबकून राहायचं. अक्का बोलायला लागल्या की, असं शांत प्रवाहासारखं बोलतात. तरंगांमागून तरंग पाण्यावर उठावेत आणि हलके हलके विरत जावेत, तसं सुरुवातीला स्पष्ट वाटणारं आणि हळूहळू धूसर, संदिग्ध होत जाणारं असं त्यांचं बोलणं. त्यांच्या कवितेसारखंच. आशय मनात निवळपणानं उमटत तर जातो, पण ठोस शब्दांत अन्वयार्थ मात्र लावता येत नाही; असं काहीसं.
मनात कविता सांभाळताना अनुभवाचा ठाव घेऊन विविध तर्हांनी त्या अनुभवाचा परिसर अक्का भरत जातात आणि त्यातून एक भरीव, समृद्ध आकृती निर्माण करतात.
अशा बोलण्यामधून अक्कांचं कलात्मक भान प्रकट होत राहतं. शेलाच्या प्रस्तावनेत याचा प्रत्यय येतो. शेलामध्ये चाहूल देणारं, मेंदीमध्ये अधिक अवतरू लागलेलं हे भान मृगजळमध्ये परिपूर्णतेकडे जाताना दिसतं. एखादी भावजाणीव शब्दरूप धरीत असता ज्या प्रतिमा मी वेचल्या, त्यांचे नावीन्य, त्यांची विविधता आणि त्यांची भान शोषून घेण्याची शक्ती ही माझ्या या काव्यसंग्रहाचे वैशिष्टय म्हणून सांगता येईल. (एका पिढीचे आत्मकथन) असं अक्का रेखीवपणे लिहितात, त्यावरून त्यांना त्यांच्यातल्या कलात्मक भानाची जाणीव स्पष्ट झाली असणार, हे कळून येतं.
आतल्या आणि बाहेरच्या अनुभवविश्वाला सामोरं जाताना त्यांना या कलात्मक भानाची मदत झालेली आहे, असं वाटतं. त्यामुळे आत्ममग्न, आत्मनिष्ठ अशी कविता सातत्याने लिहीत असतानाही त्या अधूनमधून तटस्थ झालेल्या दिसतात. कसलासा खोल अलिप्तपणा त्यांच्या कवितांतून जाणवू लागतो. सर्व तर्हांची अनुभूती व्यक्त करत असताना सहजपणे केलेला स्त्रीत्वाचा स्वीकार आविष्काराला बळ देतो आणि कोमलपणाही देतो. भोवतालच्या जगातल्या स्त्रियांची व्यथा त्यांना अस्वस्थ करते आणि स्त्रीच्या तशा आयुष्याचा रोकडा अनुभवही त्या समर्थपणे मांडू शकतात. तीव्र जीवनेच्छा असूनही, निव्वळ वस्तूपणाच्या चोथ्याची जाणीव होते, तेव्हा गाभ्यातला अनुभवाचा कंद त्या अतिशय नाजूकपणे जपतात. या सगळया उलथापालथीमध्ये आशय - आविष्काराचा गहिरेपणा, सखोलता यांना कधी ढळ पोचल्याचं दिसत नाही. निसर्गजाणीवेचा अंत:प्रवाह तितक्याच निकटपणानं त्यात एकरूप झालेला आढळतो. हळूहळू पाण्यात मिसळलेले कण तळाशी बसावेत, तसं काहीसं वाटतं. अक्कांच्या कवितेत आणि व्यक्तिमत्त्वात निसर्ग मिसळून गेला आहे. सृष्टीतल्या चैतन्याची जाणीव तुमच्यामध्ये कधी जागी झाली, या प्रश्नाला अक्कांचं उत्तर असं आहे,
फर्ग्युसन कॉलेजच्या वसतिगृहात राहत असताना कॉलेजच्या नियतकालिकासाठी कविता मागण्याच्या निमित्तानं संत भेटायला येत. भेटी वाढल्या; तेव्हा एकदा प्रिन्सिपल महाजनी म्हणाले, रोज इथं उभे राहण्यापेक्षा तुम्ही फिरायला का जात नाही? म्हणजे आम्ही दोघंच काही उभं राहत नव्हतो. आणखी खूप जोडया असायच्या. पण महाजनींचं म्हणणं की पात्रं बदलली, तरी सीन तोच राहतो. तेव्हा आम्ही टेकडीवर जायला सुरुवात केली. हळूहळू लहानपणी पाहिलेला निसर्ग आणि हा भोवतालचा निसर्ग यांचं एक रसायन तयार झालं. आणि त्याला एक वेगळा अर्थ आला. निसर्ग आता निराळया तर्हेनं प्रतीत व्हायला लागला. डोंगर चढायला लागलो, तरी आता डोंगर आहे एवढंच राहिलं नाही; तर डोंगरावर आम्ही जात आहोत आणि डोंगर आमच्याकडे बघतो आहे किंवा आम्ही त्याच्या सान्निध्यात जात आहोत, असं वाटायला लागलं... निसर्गाच्या ज्या प्रतिमा, जी आच दिसते तुला माझ्या कवितेत, ती त्यांच्या (ना. मा. संतांच्या) संगतीतून निर्माण झाली. त्या फिरण्यामुळे निर्माण झाली. तंद्रीत हरवून जाऊन बोलावं तसं त्या पुढं म्हणाल्या आहेत,
प्रेम बसल्यावर फारशा कविता मी लिहिल्या नाहीत. दहा - बारा असतील. लग्नापूर्वी चार - पाच लिहिल्या. पण कविता जगलो म्हणायला हरकत नाही. आलंकारिक भाषेत बोलायचं, तर कविता लिहिण्यापेक्षा ती चाखावी, अनुभवावी असंच वाटायला लागलं. आमचा कोणताही अनुभव एकमेकांशिवाय पुराच होत नव्हता.
आणि दहा वर्षांनंतर सहवास संपला. त्यांची (संतांची) अनुपस्थिती मला सोसायची होती. कामं, जबाबदार्या सगळं होतंच. पण त्यांची अनुपस्थिती सतत जाणवायची आणि त्या वेळेला मला कवितेचा आधार मिळाला. पण दु:खाच्या आघातानंतर लगेचच मी काही लिहिलं नाही. नंतर हळूहळू लिहायला लागले.
आणि साध्या, घरगुती अनुभवांना असामान्य सौंदर्य देण्याची अक्कांची ताकद दिपवणारी ठरली. अक्कांचं व्यक्तिमत्त्व आणि अक्कांची कविता वेगळी काढता येत नाहीत. त्यांचं एकान्तप्रिय, आत्मरत, निसर्गाशी एकजीव झालेलं व्यक्तिमत्त्व प्रत्येक कवितेमागे, कवितेमधून उभं असतं. तरुण वयातच दु:ख उभे हे पहाडापरी असा भीषण अनुभव त्यांच्या वाटयाला आला. एकटेपणानं घेरून टाकलं. कारल्याच्या मांडवाखालून घडीघडी जावं लागलं. पण अक्कांनी कुठंही माघार घेतली नाही. समोर येणार्या प्रत्येक क्षणाशी जिद्दीने झुंज दिली. लढाई केली आणि ती जिंकली. लढाईतल्या विजयामुळे पुष्कळांच्या जवळ मनाचा एक विचित्र खरखरीतपणा जमा होतो. त्यांची संवेदना बोथट होण्याची शक्यता असते. परंतु अक्कांच्या बाबतीत हे कधी घडलं नाही. परिस्थितीशी युद्ध हे त्यांनी कधी युद्ध मानलं नाही. त्यामुळेच त्या लढाई जरी जिंकत गेल्या, तरी खरखरीतपणा, रूक्षपणा त्यांच्या आसपास कधी फिरकला नाही. उलट, दु:खातून आनंद निर्माण करण्याची अदभुत किमया स्वत:जवळ असल्याचा त्यांना शोध लागला. दु:खाचा अनंत मार्गांनी त्या शोध घेत गेल्या आणि त्यांची निर्मितीची शक्ती अधिकाधिक जोरकसपणे वाढत राहिली; उत्स्फूर्तता टिकून राहिली. आयुष्याकडे बघण्याची त्यांची दृष्टी त्यांच्याच एका विचारातून स्पष्ट होईल. त्यांना वाटतं, मानवाव्यतिरिक्त सर्व प्राणिमात्र आपल्या सहजप्रवृत्तींचे धर्म पाळतात. माणूस बुद्धिवंत म्हणून त्याला सहज प्रेरणेहूनही वेगळा धर्म पाळावा लागतो. मानवधर्म. आपल्या वागण्यात सतत दुसर्याची जाणीव ठेवण्याची शिकवण देणारा धर्म.
माणसानं आनंदात राहावं, हसत राहावं असं म्हणताना, दु:ख करायला मला सवडच नसते, असं छानसं सूत्र त्या सांगतात आणि म्हणतात, हसण्याची वावटळ शरीरात सुरू झाली की, सगळा साठवलेला पालापाचोळा उडून जाऊन मन कसं स्वच्छ, प्रसन्न होतं.
केवळ स्त्रीसंगाशी अक्कांची कविता नातं जोडते, असं नाही. आशयाला अनुरूप आविष्कार देण्यासाठी कधीतरी मर्ढेकरी वळणही तिला हवंसं वाटतं. कधी कधी वृत्त-जाती-छंदांना दूर ठेवून मुक्त शैली स्वीकारावीशी वाटते आणि साक्षात आशयाच्या संदर्भातही त्यांची कविता नव्या दिशेने चालत जाते. नोकरीच्या बाबतीत विचार करताना स्वत:चे अनुभव जसे सोबतीला असतात, तसे इतर नोकरदार स्त्रियांचेही अनुभव त्यांच्या मनात रुतून राहतात. नोकरी करून मिळवती झाली म्हणून स्त्री स्वतंत्र होत नाही किंवा न करून गुलामही राहत नाही. मी आश्रित आहे, ही कल्पना जोपर्यंत स्त्री नाकारत नाही, तोवर संसार केवळ पुरुषाचाच असणार, दोघांचा नाही. मी आश्रित आहे, या कल्पनेतून स्त्री प्रथम मुक्त झाली पाहिजे. तरच स्त्री मोकळेपणाने वागेल. पुरुषाची गुलाम न राहता त्याच्या बरोबरीने जगात वावरेल. वरिष्ठ-कनिष्ठांचं नातं त्यांच्यात न राहता मित्रत्वाचं, समानतेचं नातं त्यांच्यात निर्माण होईल. स्त्रीला जी मुक्तता हवी, ती अशीच तर नसेल? अक्कांचे स्त्रीविषयीचे हे विचार अनुभवातून तावून सुलाखून आलेले आहेत. त्यामुळेच कष्टकरी स्त्रीची अबोल दु:खं त्यांच्या अनेक विचारांतून परिणामकारकपणे व्यक्त होतात.
तृप्त, समाधानी स्त्रीचं चित्रणही अक्कांनी केलेलं आहे. चित्कळामध्ये मीच की या कवितेत त्या लिहितात, आणि मला? मीच की. अशा तर्हेने अल्पाक्षरांत खूप सुचवणारी अक्कांची कविता कधी कधी मात्र केवळ अलिप्ततेच्या अंगाने प्रकट होते. गुंजेएवढया घराची ओळख आवडेनाशी होते. क्षणात होऊन विश्ववेगळी, पाय टाकते मी डोहावर असं म्हणत पहिल्या अनुभवातून स्वत:ला सोडवून घेते. सगळया पाशांतून मोकळं होण्याचा विचार मनात घोळू लागतो. मांडलेलं घर मोडणं जरुरीचं आहे, जोडलेली नाती तोडणंही आवश्यक आहे, असं अक्कांना वाटायला लागतं. अस्तित्वाचं स्पंदन परकं वाटतं. स्वत:विषयीच दूरता निर्माण होते. त्या म्हणतात, पुढचें वळण असतें. नसतें, नसतें. असतें.
तीव्रसुंदर जीवनेच्छा लसलसत असूनही जीवनाच्या प्रवासासंबंधी निरपेक्ष स्वीकारशीलतेची भावना त्यांच्यामध्ये, त्यांच्या कवितेमध्ये स्रवत राहते. काळजीचा बुक्का आणि आनंदाचा गुलाल उधळत जात नि:संग होण्याची, हलकं हलकं होण्याची क्रिया सुरू होते.
अक्कांनी एकदा मला पत्रात लिहिलं आहे : आपलं आणि आपल्या भोवतीचं जीवन ही एक प्रवाही अनुभवमालिका असते. अनुभवातील चित्रमयता आणि भावोत्कटता ज्याला त्याला आपापल्या शक्तीनुसार अधिकाधिक चढउताराने जाणवते. हे जे जाणवतं, ते फक्त मनाला डसून जातं. हे डसणं केव्हाही स्मृतिरूप घेत नाही. शरीराची वेदना जशी स्मृतिरूप घेऊ शकत नाही; तसंच हे असावं. हे डसणं शब्दरूपातही नसतं. पण त्या त्या अनुभवातलं हे चित्रवाण भावोत्कट जीवनमर्म, प्रत्यक्ष जीवनानुभवांपासून, त्यांच्या संदर्भांतून एकदम अधान्तरी होतं...
व्यावहारिक जगाच्या रोखठोक अनुभवातून फसगतीची जाणीव होते. सगळं नको वाटू लागतं. अलिप्तपणा त्यातून येतो. कोंडमारा नको वाटतो. प्रतिकाराची शक्ती खालावलेली झाल्याने मग मृत्यूची ओढ लागते. सुटकेची ओढ लागते. मन सुटून चाललें, शरीराच्या मिठींतून विश्वापल्याडचें काही, काय गेलें त्या स्पर्शून इथं निराकाराची जाणीव होते आणि सतत संघर्ष करणार्या अक्का आजूबाजूच्या जगाकडे स्वत:विरहित पाहू शकतात. प्रारंभी हट्टाने वर्तमानाला नकार देऊन भूतकाळाचा स्वीकार करणार्या अक्का, पुढे वर्तमानाचा स्वीकार करतात. निरोपाची भाषा बोलू लागतात. कधीतरी काही मागे परतून येईल का, अशी हूरहूरही बोलून दाखवतात. जीवनातील गुंतागुंत, संघर्ष संपल्याची, मिटलेपणाची जाणीव प्रकट करतात आणि तटस्थ होतात. आयुष्य नितळ, संथ झाल्याचं अनुभवतात. मात्र, तरीही निसर्गाची ओढ क्षीण होत नाही. वेळू बनात जाताना उभा घाटीचा उतार आणि पावले भाजावी असा उन्हाचा कहर धूरधूसर मेघांचा असा तसा तोल जातो हवेमधे हे काहूर... पाय तेथेच खिळतो... मनाची अस्वस्थ अवस्था निराकारमधल्या या आणि अशा ओळींमधून जाणवत राहते. त्याचप्रमाणे, गार डोंगराची हवा हिवाळयात गोठलेले रेखलेल्या स्वप्नांचीही दीपमाळ विझलेली, खांब खडकाची झाली! मनाचं एकाकीपण अक्कांना इथं निसर्गात सामावलेलं दिसतं. मृगजळनंतर रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम, चित्कळा, वंशकुसुम असा अक्कांचा दीर्घ प्रवास झाला आणि आता त्या निराकाराकडे आल्या आहेत. प्रत्येक निर्मितीला सहज न जाणवणारं, असं असंवेद्य अवकाश असतं, असं त्यांना वाटतं.
त्या असंवेद्य अवकाशात हर्षखेद ते मावळले, हास्य निमाले, अश्रु पळाले, कंटकशल्ये बोथटली, मखमलीची लव वठली, असं काही अक्कांना प्रतीत होत असल्याचं निराकारमधल्या कविता वाचताना अनेकदा मनात येतं.
मन निवळलेलं आहे. अनेक अर्थ सुचविणार्या प्रतिमांकडून सरळ, थेट निवेदनाकडे अक्कांच्या कवितेची वाटचाल सुरू आहे. कदाचित उत्तरवयाच्या जाणिवेमुळेही मन तत्त्वचिंतन झालं असावं. निघताना... पाऊल उचलताना अडखळले. ज्यांनी आजवर मला घडवले सांभाळले, कौतुक केले, त्या माझ्या सांगातींचा पंचमहातत्त्वांचा निरोप! सगुणाकडून निर्गुणाकडे जाणारी ही वाट. निर्गुणाची अशी ओढ अक्कांना लागलेली असतानाच मूळ पिंडधर्माचा झोत अकस्मात झळकतो : वेगळा प्रवाह वेगळा शिकारा वेगळे डोल झोल आणि वेगळा किनारा. तरी, एक मोरपिसारा! जीवनेच्छेचा उदगार सर्वत्र भरून जातो. निवेदनाची वाट वेगळी होऊन अक्कांच्या प्रतिभेने पुन्हा प्रतिमांचं उद्यान फुलवलेलं असतं.
चांदण्याचे भिंतीवरचे कवडसे बघता बघता अक्कांच्या मनात येतं की, माझ्या मनोमनातील कवितांचे हे आत्मरूप की सूर्यकिरणांतून उतरलेली ही आठवणींची मूठभर देवफुले? की रसिक जगन्नियंत्याने इथे चिकटवलेले माझ्यावरील समन्स? अक्कांच्या निराकार संग्रहात अधिकाधिक गडद होत गेलेला असा खिन्न नकार माझ्या मनाला सोसवत नाही. मन दुखत राहतं. महावस्त्र या कवितेत अक्का म्हणतात, घनश्याम सावळासा उभा मागे भूतकाल ओलांडते वर्तमान एका क्षणाची चाहूल!
विणलेले महावस्त्र शेला त्याला पांघरते वर्तमानाचे संचित त्याच्या पायांशी ठेवते...
किंवा, जरा पहा ना एएन्यात या कवितेत अक्का लिहितात, माझी थकलेली काया उठताना उठवेना पुढे पाऊल पडेना मना सहन होईना... असं वाचल्यावर मनाला स्तब्धता येते. शब्दांचा इतका प्रसन्न दुरावा पूर्वी कधी अनुभवला नव्हता!
अक्कांच्या निराकार या संग्रहाच्या निमित्ताने काही लिहायचं होतं. तेव्हा मला वाटलं, अक्कांनी दीर्घ प्रस्तावना लिहायला हवी होती. ती त्यांच्याकडून लिहून झाली नाही. आजपर्यंतच्या त्यांच्याबरोबरच्या वाटचालीत मी जिज्ञासू वृत्तीनं त्यांच्यासमवेत राहिले आहे. या काळात त्यांच्याशी झालेल्या संवादांतून जे जे हाती आलं, त्यातले काही विचार इथं द्यावेत, म्हणजे त्यांच्या प्रस्तावनेचा अभाव तितकासा जाणवणार नाही. अक्कांच्या कवितेविषयी भरभरून लिहिलं गेलं आहे. आता पुन्हा कशाला लिहायचं, असं मनात आलं, तरी थोडंफार लिहावंसं वाटलं. कवितेचं हे कठोर व्रत अक्का आयुष्यभर जपत आल्या आहेत. भवतालचे सारे आकार अंधूक होत चालले आहेत. अदृश्य निराकाराचं संवेदन मनात उतरतं आहे. त्या स्वसंवेद्य आत्मरूपाचं, निर्गुण निराकाराचं हे अक्षररूप... म्हणजे अक्कांचा इअंदिरा संत यांचा नवा कवितासंग्रह निराकार. त्याचं स्वागत.
|
 |
 |
|