|
रातवा
Author: चंद्रकुमार नलगे
Publisher: अजब प्रकाशन
|
|
Price: $12.15 $9.72 20% OFF ( ~570 Pages, R400)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: ई-सकाळ रविवार १५ एप्रिल २००७ गच्च काळोखातून उगवतीकडे... ( प्राचार्य रा. रं. बोराडे ) प्रा. चंद्रकुमार नलगे हे नाव मराठी साहित्याच्या वाचकांना अपरिचित नाही. "रातवा' हे त्यांचं आत्मकथन नुकतंच प्रकाशित झालं आहे. "रातवा' म्हणजे काळ्याकुट्ट अशा रात्रीची मनावर दडपण आणणारी आकाश-पोकळीपर्यंतची भरून राहिलेली एकांत घु.स.स.सी... अशा आवाजात विलक्षण गूढगंभीर बनलेली घनकाळोखी काळस्थिती. असा "रातवा'चा अर्थ त्यांनीच आपल्या या आत्मचरित्रात नमूद केला आहे. "रातवा' हे आत्मचरित्र म्हणजे या काळस्थितीकडून उगवतीकडे प्रा.नलगे यांनी केलेली आपल्या आयुष्याची वाटचाल. डोळ्यांत गच्च भरणारा काळोख. पायाखालची वाट ना रुळलेली आहे ना मळलेली. मागचा पाय उचलून पुढे टाकावा तर हा पाय काट्याकुट्यांवर पडतो, खाचाखळग्यांत पडतो की काळसर्पाच्या मस्तकावर पडतो, याचा भरवसा नाही. प्रा. नलगे यांचा प्रवास हा असा. मन सुन्न, बधिर करणारा. पराकोटीचं दारिद्यर कसं असतं, पराकोटीचे काबाडकष्ट म्हणजे काय असतं, दु-खाच्या डबक्यातलं गढूळ पाणी नाकातोंडात गेल्यानंतर माणूस कसा कासावीस होतो, याचा प्रत्यय "रातवा' वाचताना येतो. "रातवा'ची सुरवातच मुळी अंधारापासून होते. "गुडूप अंधाराचं घर कसं असतं, हे पाहायचं असलं तर आमचं घर बघावं' इथून या आत्मचरित्राची सुरवात होते. तेहतीस कोटी देवांनी अठरा विश्वे दारिद्यर या घराण्याच्या पदरी बांधलेलं. घराच्या अंधाराच्या सोबतीला दारिद्यराला ठेवून घेतलेलं. या घराण्यातला कुणी तरी शिवाजी महाराजांच्या काळात सैन्यात होता. गड सांभाळता सांभाळता तो मरण पावला होता म्हणून सरकारनं त्या घराण्याला डरा (शेताचं नाव) इनाम म्हणून दिलेलं; पण त्यासाठी चावडीवरची सनद्याची कामं करावी लागायची. शाळेत जाण्यास नामदेवाच्या (प्रा. चंद्रकुमारचं लहानपणीचं नाव) बापाचा सक्त विरोध, तर नामाला शाळेत जाण्याची अनिवार ओढ. मुलांना शाळेत घातलं नाही तर त्या काळात सरकारी दंड भरावा लागायचा. दंड भरण्यासाठी नामदेवाच्या वडिलाकडं पैसे नसल्यामुळं केवळ नामाला शाळेचं तोंड बघता आलं; पण शाळेत जाणं केवळ नावापुरतं. तेवढ्या लहान वयातही नामाला न पेलणारी कामं करावी लागायची. नामाच्या वडिलांच्या हाताला फक्त दोनच कामं माहीत होती - सतत कष्ट करणं आणि सांगितलेलं काम नामानं केलं नाही तर त्याला मारझोड करणं. त्याही वयात नामाला चावडीवरची सनद्याची कामं करावी लागायची.नामावर सोपविलेलं एक काम तर असं होतं की, त्यामुळं वाचकांच्या मनाचा थरकाप होतो. अनैतिक संबंधातून जन्माला आलेलं मूल एका खोल अंधार्या आडात टाकलेलं, कुजलेलं, सडलेलं. पोलिस पंचनाम्याला आलेले. चावडीवरची सनदी कामं नामदेवावर. म्हणून ठरलं ते असं की एका पाटीत नामदेवाला बसवून आडात सोडायचं त्यानं तो सडलेला, कुजलेला जीव हातावर घेऊन त्याच पाटीतून वर यायचं. नामदेव भयानक हादरला. एका अडगळीच्या अंधार्या जागेत तो काही तास जीव मुठीत धरून लपून राहिला. नसता नुसत्या कल्पनेनंच नामा पुढे कित्येक दिवस थरथरत होता.
बिकट, खडतर परिस्थितीतून मार्ग काढीत नामा मॅट्रिक होतो हे खरं; पण इच्छा असूनही महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची ऐपत नसल्यामुळे तो कोकणातल्या एका आडवळणाच्या गावी शिक्षकाची नोकरी पत्करतो. एवढ्या अल्पवयात तो नोकरी पत्करतो की तो शाळामास्तर आहे यावर विश्वास ठेवायला गावकरी तयार होत नाहीत. तिथं शैक्षणिक वातावरण नसतानाही नामा विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावतो. शाळेचे एक एक वर्ग वाढवीत राहतो. त्याच गावच्या कुंभार मास्तरांचं निवृत्तीचं वय जवळ आलेलं. शिवाय प्रकृती ठीक नसते. काही घरगुती समस्यांमुळे ते त्रस्त असतात. त्यांची इथं बदली झाली तर आपले या शाळेचे मुख्याध्यापकपद जाईल. तालुका मास्तरचे आपले अधिकारही जातील, हे लक्षात येऊनही नामदेव केवळ कुंभार मास्तरांच्या सोयीसाठी त्यांची आपल्या शाळेवर बदली करून घेतो. पण रुजू झाल्यानंतर हाच कुंभार मास्तर नामदेवावर उलटतो.
इतकंच नव्हे, तर केवळ गैरसमजापोटी नामदेवावर कोसळलेल्या एका अरिष्टाचे खापर नामदेवावर फोडतो. या आणि या अनुषंगाने घडलेल्या घटनांवर आधारित "जाळ' या नावाची कथा नामदेव लिहितो. ती प्रकाशित होते. इथं "रातवा'चा हा भाग संपतो.
|
 |
 |
|