|
विठोबाची आंगी
Author: विनय हर्डीकर
Publisher: देशमुख आणि कंपनी प्रकाशन
|
|
Price: $9.14 $7.31 20% OFF ( ~316 Pages, R300)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: ई-सकाळ रविवार २१ मे २००६ ज्ञानमार्गाची कास ( प्रशांत दीक्षित )
विनय हर्डीकर हे चिंतनशील पत्रकार म्हणून ओळखले जातात. घटनांमागचे विविध पैलू समजून घेणे आणि नेमक्या भाषेत ते वाचकांना उलगडून दाखविणे त्यांना आवडते. त्यांनी वेगवेगळ्या राजकीय व सामाजिक चळवळींत भाग घेतला असल्याने त्यांचे अनुभवविश्व हे ग्रंथांपुरते मर्यादित राहत नाही. "विठोबाची आंगी' या नव्या पुस्तकात गेल्या काही वर्षांतील त्यांचे लेख संग्रहित करण्यात आले आहेत. देश व राज्यातील मुख्य राजकीय प्रवाहांची माहिती या लेखांमधून जशी होते, त्याचप्रमाणे लेखकाची वैचारिक वाटचालही समजून घेता येते. "लोकशाहीकडून प्रजाप्रभुत्वाकडे' हा लेख जनता पक्ष संपण्याच्या काळातील आहे. जनता पक्ष आणि कॉंग्रेस यांच्या राजकीय कार्यशैलीबाबतची निरीक्षणे हर्डीकरांनी फार बारकाईने नोंदविली आहेत. चिकमगळूर निवडणुकीतील इंदिरा गांधी व जॉर्ज फर्नांडिस यांची व्यक्तिचित्रे उल्लेखनीय झाली आहेत. जनता पक्षातील विविध गटांमध्ये लवकरच रस्सीखेच सुरू झाली. समाजवादी आणि जनसंघ हे दोन मुख्य गट एकमेकांविरुद्ध उभे राहिले. त्या वेळचा वाद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व समाजवादी यांची परस्परविरुद्ध कार्यशैली आणि त्यामध्ये हर्डीकरांसारख्या व्यक्तीची होणारी घुसमट या लेखात उत्तम उतरली आहे. बुद्धिजिवींच्या विश्वातील तुंबलेपणही या लेखात मार्मिकपणे दाखवून दिले आहे. राष्ट्राचे व्यवस्थापक म्हणून राजकीय नेत्यांकडे पाहण्याची गरज आणि त्यांच्यावर प्रभाव पाडणार्या इतर क्षेत्रांतील समृद्ध नेतृत्वाची आवश्यकता याचा ऊहापोह लेखाच्या उत्तरार्धात करण्यात आला आहे.
"आमच्या देशाची स्थिती' या १९९३ मध्ये लिहिलेल्या लेखात हेच चिंतन वेगळ्या स्वरूपात पुढे नेलेले आढळते. बाबरी मशीद उद्धवस्त झाल्यानंतरचा हा लेख असल्यामुळे त्यामध्ये हिंदू-मुस्लिम संबंधांची चर्चा करण्यावर अधिक भर आहे. धर्मनिरपेक्षता येथे पूर्वीपासून अस्तित्वात आहे, या आग्रहावर हर्डीकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संत चळवळीच्या मर्यादा, टिळकांचा लखनौ करार, गांधींनी दिलेली कलाटणी, असे अनेक पैलू हर्डीकरांनी विचारात घेतले आहेत. मुस्लिम खरोखरच अल्पसंख्य आहेत का, या मुद्द्याचे केलेले विवेचन वेगळी वस्तुस्थिती समोर ठेवणारे आहे. "अस्ताव्यस्त, बहुकेंद्री, अंतर्गत विरोधांनी पछाडलेला हिंदू समाज आणि तुलनेने आत्मकेंद्री, बंदिस्त व संख्येने लक्षणीय असा मुस्लिम समाज यांचे सहअस्तित्व हे भारतीयांचे ऐतिहासिक संचित आहे आणि सहअस्तित्वात प्रगती हे प्रारब्ध आहे,' हे लक्षात घेऊन "निधार्मिक भारतीय प्रजासत्ताकाची उभारणी करताना काही भ्रमांचा वेळीच निरास होण्याची आवश्यकता,' पटवून देण्याचा प्रयत्न या लेखात करण्यात आला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने लिहिलेला "उपहास सरस्वतीचा, उपेक्षा लक्ष्मीची, उठाठेव शक्तीची' हा लेख संघाची व्यवस्थित चिरफाड करणारा आहे. संघाने शक्तीची उपासना केली; पण त्याचबरोबर "फक्त हिंदूंमध्येच काम केल्याने निरुद्देश सातत्य, परंपराशरणता, ऐहिक नाकर्तेपणावर आध्यात्मिक पांघरूण घालण्याची आणि या जगातील मानवनिर्मिती भेदाभेदांना अप्रस्तुत ठरविण्याची चापलुसी, मागच्या खांद्यावरून आलेले ओझे काय आहे ते न पाहता आपण घेऊन नंतर पुढच्या खांद्यावर देण्याचा मठ्ठपणा हे हिंदू मनोवृत्तीचे सर्व दोष संघात आले' हे हर्डीकरांचे निरीक्षण संघीयांना झोंबणारे असले, तरी वस्तुस्थितीशी सुसंगत आहे हे नाकारता येणार नाही. "देशभक्तीच्या शाळकरी व्याख्येतून बाहेर पडून' संघाने "आधुनिक जगाची दिशा अभ्यास करून समजून घ्यावी,' असा सल्लाही हर्डीकर यांनी दिला आहे. "फारसं काही कळत नव्हतं तोवर माझं ठीक चाललं होतं,' या लेखात स्वातंत्रोत्तर भारताच्या मानसिकतेची चिकित्सा हर्डीकरांनी केली आहे. "भारतीयांना व्यापार, भांडवल, प्रयोगशील उद्योजकता, वैज्ञानिक उत्पादनपद्धती यांचं मनापासून आकर्षण नाही, त्यांना वरकड उत्पन्न हवं असतं,' किंवा "निर्णायक क्षणी चुकीची वाट धरण्याची या समाजाची परंपरा आहे,' अशी काही निरीक्षणे या लेखात नोंदली आहेत. भारतीय समाजात मुरलेले अनेक गंड आणि या समाजाबाबत मनात बाळगलेले भ्रम यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न या लेखात केला असून, ऐहिक उत्कर्षाकडे लक्ष वेधण्याची धडपड आहे.
"सुमारांची सद्दी' या लेखात बौद्धिक दिवाळखोरीचा वेध घेतला आहे. टिळकांच्या निधनापर्यंत ज्ञानमार्गावर वाटचाल सुरू होती व पुढे डॉ. आंबेडकरांनी तो वारसा पुढे चालविला असला, तरी गांधीजींच्या उदयापासून ही प्रक्रिया खंडित झाली, असे हर्डीकरांचे म्हणणे आहे. गांधीवादाच्या उदयानंतर "व्रतस्थपणे ज्ञानसाधना करणार्यांना अपराधीपणाने पछाडलं,' असेही त्यांचे निरीक्षण आहे. गांधींजींप्रमाणेच हिंदुत्ववाद्यांनीही ज्ञानमार्ग तुच्छ मानला आणि सावरकरही खर्या अर्थाने ज्ञानमार्गी नव्हते. "न्या. रानडे, आगरकर, फुले यांनी नवसमाजासाठी आधीच काही निष्कर्ष निश्चित केले होते'; पण गांधी युगात ही प्रक्रिया मागे पडली. स्वातंत्र्यानंतर शाश्वत राजकीय सत्ता आणि नोकरीतील स्थैर्य एवढीच दोन मूल्ये जोपासणार्या पिढीने वैचारिक दारिद्यराचा पाया घातला व देशात सुमारांची फौज तयार झाली. "गुणवत्तेच्या विरोधात सुमारांची फौज खड्या सैन्याप्रमाणे उभी असते आणि प्रसंग पडताच एकत्र येण्याचा व नंतर पुन्हा विस्कळित होण्याचा लवचिकपणा ती दाखवू शकते,' हे हर्डीकरांचे निरीक्षण धारदार असले, तरी समाजाच्या अनेक क्षेत्रांत त्याची सध्या प्रचिती येत आहे.
"पूर्णता की खोज में' आणि "जग बदल घालूनी घाव' या दोन लेखांत लेखकाने आपला वैचारिक प्रवास आणि विविध अनुभव मांडले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून शेतकरी संघटनेपर्यंतच्या या प्रवासातील निरीक्षणे वरील लेखांशी जुळणारीच आहेत. शेतकरी संघटना मागे पडण्याची कारणमीमांसा ही पुन्हा भारतीय समाजाबाबत लेखकाच्या एकूण धारणेशी सुसंगत अशी आहे. याशिवाय "अचानक संपलेला महोत्सव' हा लेख श्रीपाद दाभोळकरांवर आहे. आनंद यादव यांनी घेतलेली लेखकाची विस्तृत मुलाखतही या पुस्तकात आहे. ज्ञानमार्गाची कास धरणारा सूक्ष्म धागा या सर्व लेखांमधून दिसतो. पुस्तकाचे तेच मुख्य वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
Loksatta Review
|
 |
 |
|