|
फिनिक्सच्या राखेतून उठला मोर
Author: जयंत पवार
Publisher: लोकवाङमय गृह
|
|
Price: $7.61 $6.08 20% OFF ( ~200 Pages, R250)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: लोकप्रभा २४ डिसेंबर २०१० 'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' आणि जयंत पवार या दोन गोष्टी एकत्र आल्यावर या पुस्तकामध्ये काय असणार याचा अंदाज नक्कीच बांधता येतो. पण हा कथासंग्रह हातात घेतल्यावर त्यातल्या सगळ्याच कथा गिरणी आणि त्या भोवतालच्या वातावरणाशी बांधलेल्या नाहीत हे लक्षात येतं. या कथा विविध दिवाळी नियतकालिकांमधून पूर्वी प्रसिद्ध झालेल्या आहेत, त्या कदाचित वाचलेल्याही असतील, पण सगळ्या कथा एकामागून एक वाचणं हा अनुभव काही वेगळाच आहे. या कथा सलग वाचण्यातून एक वेगळं विश्व साकारतं आणि ते विश्व केवळ कथा संपली म्हणून स्वत:चं अस्तित्व गुंडाळून घेत नाहीसं होत नाही. ते डोळ्यांसमोर रेंगाळत राहतं आणि त्याचे धागेदोरे इतर कथांशी जोडले जातात का, याचा सुप्त मन शोध घेत राहतं. त्यामुळे या कथा पूर्वी वाचलेल्या असतील तरी पुन्हा सलग वाचण्यामध्ये एक वेगळा आनंद नक्की घेता येऊ शकतो. -- क्षिप्रा वेलणकर
Review courtesy of Maharashtra Times: म. टा. १ एप्रिल २०१२ तुकड्या तुकड्यात विखुरलेलं आजचं वास्तव -- नीरजा 'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' हा नाटककार जयंत पवार यांचा पहिला कथासंग्रह. या संग्रहात एकूण सात कथा आहेत. त्यातल्या बहुतेक कथांना पार्श्वभूमी आहे ती या मुंबईची, तिथल्या गिरणगावाची, कामगारवस्तींची, चाळसंस्कृतीची, तिथल्या सामान्य माणसाची आणि त्याच्या छोट्या मोठ्या आनंदाची, दु:खाची, शल्यांची, ताणांची आणि माणसाच्या कोतेपणाची, त्याच्याच लपलेल्या अहंपणाची. पवारांच्या या कथा व्यक्तिकेंदी नाहीत तर समूहकेंदी आहेत. अगदी 'टेंगशेच्या स्वप्नातील ट्रेन' या कथेतही टेंगशे या व्यक्तीभोवती ही कथा फिरत असली तरी ती ट्रेनमधील प्रवासी, त्यांची मानसिकता, बलात्कारासारख्या घटनेकडे पहाण्याचा त्यांचा दृष्टिकोन यावर फोकस करते. 'साशे भात्तर रुपयांचा सवाल अर्थात युद्ध आमुचे सुरू' आणि 'एका रोमहर्षक लढ्याचा गाळीव इतिहास' या कथा तर चाळसंस्कृती, तिथं रहाणार्या विविध जातीय आणि वगीर्य स्तरातील लोकांची मानसिकता याविषयीच बोलते. कामगारवस्तीत रहाणार्या, चाळसंस्कृतीचा अनुभव असलेल्या पवारांनी तिथल्या लोकांचे स्वभावविशेष, त्यांचे गंड, त्यांच्या वागणूकीतले सूक्ष्म भेद अगदी बारकाईनं टिपले आहेत. फ्लॅटमध्ये रहाणारे भाऊ आवळस्कर हे कनिष्ठ वर्गासमोर आपल्या मध्यमवगीर्य गंडाचा माज दाखवणार्या लोकांचं प्रतिनिधित्व करताना दिसतात. आपले पैसे बुडवणार्या आवळस्करांना कसं नामोहरम करायचं या विचारानं अस्वस्थ असलेल्या जिजाबाईनगरमध्ये रहाणार्या बळी जंगमला जेव्हा आपल्या मुलानं आवळस्करांच्या मुलीशी लग्न केल्याचं कळतं तेव्हा काव्यात्म न्याय मिळाल्याचं समाधान त्याला मिळतं. आपल्याला तुच्छ लेखणार्या आवळस्करांच्या मुलीच्या पोटात आता खालच्या वर्गातील मुलाच्या वंशाचा दिवा वाढणार या कल्पनेनं खूश झालेला बळी जंगम आवळस्करांच्या खिडकीवर सणसणीत दगड भिरकावून व्यवस्थेवर मिळवलेला आपला विजय साजरा करतो. उच्चवर्ग आणि कनिष्ठ वर्गातला वर्गसंघर्ष सर्व परिचित आहेच. पण स्वत:ला सहिष्णू म्हणवणारा, सावरकर, साने गुरुजी यांच्यावर प्रेम करणारा पांढरपेशा वर्ग मानभावीपणे आपण सर्व पातळ्यां-वरच्या समानतेसाठी आग्रही आहोत असं भासवत असला तरी आजही जातीय-वगीर्य विषमत: मनात बाळगून आहे. त्याच्या ह्या ढोंगी, मानभावी मानसिकतेवर 'साशे भात्तर रुपयांचा सवाल...' ही कथा नेमकं बोट ठेवते. ' एका रोमहर्षक लढ्याचा गाळीव इतिहास'. ही कथा ही अशीच वगीर्य संघर्षाची कथा आहे. 'साशे भात्तर रुपयांचा सवाल...' या कथेत केवळ आथिर्क बळावर सत्तास्थानी आलेल्या आवळस्करां-सारख्या उच्च वर्गाला नामोहरम करण्याची संधी बळी जंगमच्या निमित्तानं जिजाबाईनगरमधील प्रत्येक माणूस घेतो, तशीच संधी या कथेत खातमकर चाळीतील रहिवासी घेतात. खवणेकरांच्या संडासाचं कुलूप तोडून तो वापरण्याचा आनंद घेणारे रहिवासी मालकाला नमवून गिरण्यांना पडलेली टाळी फोडून निघालेल्या गिरणी कामगाराच्या आवेशात जल्लोष साजरा करतात, तेव्हा कथेतला निवेदक म्हणतो, 'इतिहासात मुंबईच्या गिरणी कामगारांच्या ८२च्या प्रदीर्घ संपाची नोंद नक्कीच होईल. पण हा लढा अनेक छोट्या लढ्यांच्या खांद्यावर उभा आहे. ह्या लढ्याची शिदोरी एक महिना चाळकर्यांना पुरली आणि मोडून पडायला आलेली माणसं एक महिना ताठ उभी राहिली.' या संपाची पार्श्वभूमी असलेली आणखी एक कथा म्हणजे 'फिनिक्सच्या राखेतून उठलेला मोर' ही कथासंग्रहाचं नाव असलेली कथा. ती आठवण करून देते ती संपात उद्धवस्त झालेल्या कामगारांच्या हतबल जगण्याचा प्रवास दाखवणार्या 'अधांतर' या नाटकाची. हजारो कामगारांच्या पोटापाण्याची सोय करणार्या फिनिक्स मिलचं मॉलमध्ये झालेलं रूपांतर म्हणजेच शोषितांच्या कबरीवर बांधलेला चकाकत्या दुनियेचा चंदेरी महालच. ८२च्या संपानं देशोधडीला लावलेल्या कामगारांच्या हातात आपण दिलेल्या अयशस्वी लढ्याच्या आठवणीशिवाय काहीच उरले नाही. आता तीस वर्ष पूर्ण झाल्यानंतरही त्यातून न सावरलेल्या कामगारांच्या कहाण्या आजही अस्वस्थ करतात. अनेक कामगारांच्या बायकांनी हातात लाटणंपोलपाट घेतलं, नैराश्यानं घेरलेली अनेक तरुण मुलं मारामार्या, दंगे करून आपला संताप व्यक्त करायला लागली. त्यांचा उपयोग मग गुन्हेगारी विश्वातील लोकांनी करून घेतलाच, पण वेळ आली तर लाठ्या काठ्या हातात घेणारी मुलं राजकीय पक्षांनीही जवळ केली. जी इथं वळली नाहीत त्यांना या कथेतील शामसारखी वणवण करावी लागली. इंटरव्ह्यूला जाण्यासाठी चांगला शर्ट नसलेला शाम या मॉलमध्ये शिरतो तेव्हा खरं तर तो जिच्या अंगाखांद्यावर खेळला त्या गिरणीच्याच दारात जातो. फक्त आता तिचं एका प्रचंड मोठा जबडा असलेल्या मॉलमध्ये रूपांतर झालं आहे. हजारोनं पैसा कमवणार्या लोकांच्या दृष्टीनं शामचं तिथं येणं म्हणजे त्याच्या चारित्र्यावर डाग पडल्यासारखं वाटणं होय. अशा मुलानं कोणत्याही वस्तूला हात लावला तर संशयानं पहाणारी आपली व्यवस्था शामचा बळी घेते. ज्या व्यवस्थेनं एके काळी कामगारांचा बळी घेतला होता ती व्यवस्थाच पुन्हा एकदा त्या वर्गातील तग धरून जगण्याचा प्रयत्न करणार्या या लोकांचा बळी घ्यायला उत्सुक आहे. जगणार्यांच्या यादीत वळवळत जगणारी आणि मरणार्यांच्या यादीतून निसटलेली ही अशी अनेक नावं संवेदनशील माणसांना अस्वस्थ करत असतात. हा लेखक त्याला अपवाद असणं शक्य नाही हे या कथा वाचल्यावर लक्षात येतं. ' छटाकभर रात्र तुकडा तुकडा चंद' या कथेतही हा वर्गसंघर्ष आहेच. पण त्याचबरोबर लिंगाधिष्ठित शोषणाविषयीही ही कथा बोलते. या कथेतला निवेदक लेखक आहे आणि तोही रहस्याकथांचा. त्यामुळे ही कथा रहस्यकथेचाच फॉर्म घेऊन येते. पण ही केवळ शबनमच्या अनेक नावाचं आणि तिच्या मृत्यूचं रहस्य उलगडत नाही तर या व्यवस्थेत जगणार्या कवींची, लेखकांची दुभंगलेली व्यक्तिमत्त्वही आपल्यापुढे उलगडते. राजापुरे, मन्या, अरुण आणि भुजंग ही पात्र आपल्याला आठवण करून देतात ती मनस्वी कविता लिहिणार्या आणि आज हयात नसलेल्या विवेक मोहन राजापुरे, मनोहर ओक, अरुण काळे आणि भुजंग मेश्राम या कवींची. हे वेगवेगळ्या काळातले आणि वेगवेगळ्या अवकाशातले, वेगळी अभिव्यक्ती असलेले कवी या कथेत एकाच काळात वावरतात. विराट ढोलकिया या उच्चवणीर्य माणसाच्या हातात गेलेली बाई असो की व्यवस्था असो तिचा उपभोग घेण्याची इच्छा असूनही आथिर्कदृष्ट्या दुर्बल असलेल्या वर्गाला तो घेता येत नाही. ती व्यवस्था वाचवण्याची त्याची धडपड आहे. आपल्या हाताला न लागणारी शबनम असो की अर्थव्यवस्थेनं शोषण केलेला माणूस असो त्यांना जगण्याचा अधिकार ढोलकियासारखे उच्चभ्रू नाकारतात आणि चिरंतन वेदना देतात तेव्हा कवीला प्रश्न पडतो, दु:ख मोठं की अस्तित्व. सर्जनशील माणसाला पडलेले अस्तित्वाविषयीचे, चिरंतन दु:खाविषयीचे, शोषितच करू पहाणार्या शोषणाविषयीचे प्रश्न या कथेच्या निमित्तानं लेखकानं चचेर्ला घेतले आहेत. गुंतागुंतीची परिस्थिती आणि पात्र निर्माण करून लेखकानं रहस्यकथेचा बाज सांभाळत पुन्हा व्यवस्थेवरच भाष्य केलंय. हेही कथा वाचल्यावर जाणवतं. अनेक इंटर-प्रीटेशन्स करता येतील अशी ही जबरदस्त कथा आहे. ' जन्म एक व्याधी' ही देखील अशीच लेखकाच्या धूसर आठवणींतून साकार होणारी कथा. पुन्हा चाळीतील वातावरण आणि जगण्याची धडपड करता करता मृत्यूला सामोरा जाणारा दादा. आणि त्याचं कुटुंब, त्यांच्या अस्वस्थ जगण्याचं डॉक्युमेंटेशन व्हावं म्हणून त्यावर सिनेमा काढण्याचा विचार करणारा निवेदक जगण्यातली अगतिकता आपल्यासमोर आणतात. अशा प्रकारची, जगणंच जड झालेली माणसं आपल्याला जवळजवळ प्रत्येक कथेत भेटत रहातात. ' चंदूच्या लग्नाची गोष्ट अर्थात सड्डम मे टड्डम' ही कथा जरी आदर्शनगर कॉलनीच्या पार्श्वभूमीवर असली आणि तिथलं वातावरण चाळसंस्कृतीत असतं तसंच असलं तरी ते वेगळ्या तर्हेनं येतं. तिथं रहाणार्या वयात आलेल्या तरुण मुलांची मानसिकता अगदी हलक्याफुलक्या पण नेमक्या पद्धतीनं लेखकानं मांडली आहे. कडक शिक्षक कोचरेकर आणि त्याच्या दृष्टीनं त्याचा भरकटलेला मुलगा चंदू यांची ही कथा. खरं तर या वयात प्रत्येक अनुभवातील तीव्रता भोगणार्या या मुलाची, चंदूची ही कथा. केवळ उत्सुकतेनं वयात आलेल्या चंदूनं मित्रांसोबत राजोसरी या वेश्येकडे जाणं. तिच्याकडून मिळालेल्या अनुभवानं भारावून तिच्या प्रेमात पडणं आणि मग त्या प्रेमासाठी तिच्याशी लग्न करायचा विचार करणं जितक्या सहजतेनं येतं तितक्याच सहजतेनं लग्नानंतर आलेली स्वामित्व हक्काची भावना, संशय आणि त्यातून दोघांचाही झालेला भ्रमनिरासही येतो. ही कथा वाचताना भाऊ पाध्यांच्या वासूनाकाची आठवण येते. जयंत पवारांनी या कथांत निवेदनाचे वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. त्यांच्या कथेतला निवेदक अनेकदा तृतीय पुरुषी असला तरी तो अनेक पातळ्यांवर येत रहातो. कधी तो त्रयस्थपणे सार्या घटनांकडे पहातो तर कधी त्यांच्यातलाच एक होऊन जातो. तो एकाच वेळी अनेक पात्रांविषयी, त्यांच्या जगण्याविषयी बोलतो. तो एखादा कॅमेरामन बनून अनेक पात्रांकडे वेगवेगळ्या अॅंगलनी पहातो. तर त्याच वेळी त्यांच्या सोबत वावरत त्यांच्यातलंच एक पात्र बनून जातो. 'प्रिय रसिक' या पॉप्युलर प्रकाशनाच्या हाऊस जर्नलमध्ये 'चाहूल नव्या दशकाची' या सदरात स्वत: जयंत पवारांनी म्हटलं आहे की आजच्या काळात एकरेषीय आणि सलग गोष्ट सांगणं मला जमू शकेल की नाही माहीत नाही. गोष्टी सुट्या सुट्या सांगता येतात, पण याचा अर्थ असा नाही की त्या सुट्या असतात. त्यांच्यात अनेक गोष्टींची शरीरं अधीर्मुधीर अडकलेली असतात, त्या समजून घेऊ म्हटलं की लक्षात येतं, काहीच सोपं आणि सरळ उरलेलं नाही. 'टेंगशेच्या स्वप्नातील ट्रेन' किंवा 'छटाकभर रात्र तुकडा तुकडा चंद' या कथेत अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींची शरीरं अडकल्याचा अनुभव हा कथाकार आपल्याला देतो. गेल्या काही वर्षांत लिहिल्या गेलेल्या कथेमध्ये ग्रामीण वास्तव जेवढ्या ठळकपणे येतं होतं तेवढ्या ठळकपणे महानगरातील जगणं येत नव्हतं. अशा काळात जयंत पवार महानगराच्या, विशेषत: कामगार वस्तीतल्या, चाळसंस्कृतीच्या, तिथं रहाणार्या माणसांच्या जगण्याचा समर्थपणे वेध घेतात. पहिल्याच संग्रहानं लक्ष वेधून घेणार्या या लेखकाकडून सहाजिकच अपेक्षा वाढलेल्या आहेत.
Lokprabha Review
|
 |
 |
|