|
एक शून्य मी
Author: पु. ल. देशपांडे
Publisher: मौज प्रकाशन
|
|
Price: $6.85 $5.48 20% OFF ( ~194 Pages, R200)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: ... मानवी इतिहासात हे सदैव असेच चालत आले आहे का? आत्मवंचना करत जगत राहण्याखेरीज काही इलाज नाही का? बालवयात, तरुण वयात, मनाच्या तुलनेने अधिक अपिरपक्व अवस्थेत ज्याला आपण संस्कृती संस्कृती समजत आलो तशी कधी संस्कृती होती का? गायन, वादन, नर्तन वगैरे कला देवळांच्या परिसरात वाढल्या म्हणतात. कला आपोआप थोड्याच वाढतात? त्या वाढवणारी हाडामांसाची माणसे असतात. त्या गायिका, त्या गायिका, नर्तिका ह्मांना न गाण्याचे किंवा न नाचण्याचे स्वातंत्र्य होते का? एखाद्या गणिकेच्या कन्येला गावातल्या देवदर्शनाला येणार्या स्रिसारखे आपल्या नवर्याशेजारी बसून त्या देवाची पूजा करण्याचे भाग्य लाभावे असे वाटले तर तिचे कुणी सालंकृत कन्यादान केल्याचा कुठे इतिहास आहे का? की कुत्र्याच्या जन्मकाळा पासून त्याला हाडकावरच वाढल्यामुळे, पुरणपोळी ही आपल्या खाण्याची वस्तूच नव्हे असे त्याला वाटावे, तसे त्या नर्तकींना लग्न ही आपल्या कामाचीच गोष्ट नव्हे असे आपण वाटायला लावले? अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ उठते. आणि कुठलेही मोहोळ उठले, की अंगावर फक्त डंख उठवणार्या माशांशी मुकाबला करुन प्रत्येक जण त्याचा तो राहतो, तशी काहीशी माझी अवस्था झाली आहे. डोक्याला ही प्रश्नांची सवय लागलीच मुळी कशासाठी? डोळयांवर आघात करणार्या गोष्टी टाळायच्या असतील तर डोळे त्या गोष्टींकडून दुसरीकडे फिरवता यायला हवेत! स्वत:च्या अपूर्णतेची जाणीव होत असताना अपूर्णाची पूर्णावस्था शून्याच्याकडेच स्वत:ला नेताना दिसते.
परवाचीच गोष्ट. किराणाभुसार दुकानात काड्याची पेटी घ्यायला गेलो होतो. गोड्यातेलासाठी भलीमोठी रांग होती. माणसे मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती. दुकानदार डोळयांत तेल घालून थेंबाथेंबाचा दाम दसपटीने वसूल करत होता. तेवढ्यांत त्या रांगेतल्या एका फाटक्या परकरपोलक्यांतल्या पोरीचा नंबर लागला. तिने दुकानदाराकडे मातीची पणती ठेवली. दुकानदार "तेलाचं भांडं कुठाय?" म्हणून खेकसला.
ती म्हणाली, "येवढं पणतीभर द्या."
"अग, दिवाळीला अवकाश आहे! पणत्या कसल्या लावतेस?" पोरगी गांगरली.
पण दारिद्रय धिटाई शिकवते. लगेच सावरुन म्हणाली,
"दिवाळी कसली? खायला त्याल द्या..."
"ह्मा पणतीत?" दुकानदार म्हणाला.मुलीने हातातले दहा पैशाचे नाणे टेबलावर ठेवले."यवड्या पैशात किती बसतं ते द्या"
"अग, दहा पैशाचं तेल द्यायला माप कुठलं आणू?"
"पण आमच्याकडे धाच पैशे हाइत."पोरीने स्वत:चा 'आमच्याकडे' असा बहुवचनी उल्लेख केलेला पाहून त्या परिस्थितितही मला मजा वाटली.
"अहो, कमीत कमी किती पैशाचं तेल देऊ शकाल तुम्ही?"
"अॅंटलीस्ट फिफ्टीन!" दुकानदार.
त्याला ते सांगताना लाज वाटली असावी. नाहीतर तो इंग्लिश बोलला नसता. आपल्याकडे युटेरस, पाइल्स, सेक्शुअल इंटरकोर्स वगैरे शब्द आपण असेच लाज लपवायला इंग्लिशमधून वापरतो. त्याची आणखी पाच पैशांची सोय केली. पोरीची पणती तरीही पुरती भरली नव्हती. तिच्या घरी पणतीहून अधिक मापाचे 'खायाचे तेल' परवडत नाही. आता पणतीचे आणि माझे नाते दिवाळीच्या रोषणाईशी होते ते तुटून गेले आहे. पणत्यांची आरास पाहिली, की 'आमच्याकडं धाच पैसे हाइत' म्हणणारी ती मुलगी- नव्हे, एक प्रचंड आक्रोश मला ऐकू येतो. दिवाळीसारख्याच अनेक गोष्टींची नाती तुटत तुटत मी शून्य होत जातो. तरीही जगतो. ह्मा शून्याच्या मागे नकळत एखादा आकडा येऊन उभा राहतो. मला मी कधी दहा झालो आहे, कधी वीस, कधी तीस, असेही वाटायला लागते. कुणीतरी सांगत येतो, की अमक्या अमक्याच्या बायकोने रुग्णशय्येच्या उशाखाली एक चिठ्ठी ठेवली होती. तिच्यावर लिहिले होते, की माझ्या मृत्यूनंतर माझे प्रेत ससून हॉस्पिटलमधल्या विद्यार्थ्यांना शवविच्छेदनाला द्या. त्यांना उपयोग होइल. ह्मा बातमीने मग माझ्या शून्यामागे एक फार मोठा आकडा उभा राहून मला शून्याची किंमत दाखवून जातो. त्या बाईची आणि आपली ओळख असायला हवी होती असे वाटते. आता जगणे म्हणजे नुसता श्वासोच्छ्वास राहत नाही. त्या किराणा-भुसार दुकानदाराच्या दारातल्या पोरीने माझे मातीच्या पणतीचे दिवाळीशी जडवलेले नाते तोडले एवढेच मला वाटले होते : पण त्या पोरीशी माझे नाते कां जडावे ते कळत नाही. ती कुठे राहते? तिच्या हक्काची झोपडी तरी असेल का?
झाले ! म्हणजे प्रश्नातून सुटका नाही. माझीच नव्हे, कुणाचीच नाही! मग जगणे म्हणजे नुसते श्वासोच्छ्वास घेणे की लक्ष लक्ष प्रश्नांच्या उत्तरांमागून धावणे? शेवटी प्रश्न म्हणजे तरी काय आणि उत्तर म्हणजे तरी काय? हादेखील एक प्रश्नच. मी त्या प्रश्नचिन्हाकडेच निरखून पाहतो. आणि युरेका! त्या प्रश्नचिन्हातच माझे उत्तर कसल्याशा सांकेतिक भाषेत दडवले आहे हे मला ठाऊक नव्हते. प्रश्नचिन्हाच्या त्या आकड्याखालीच शून्य हे त्याचे उत्तरही असते. विरामिचन्हे इतकी विचारपूर्वक बनवली असतील याची मला कल्पना नव्हती!
Review courtesy of Loksatta: संवेदनशील मनाने घेतलेला समाजमनाचा वेध
आपल्या वाणी आणि लेखणीने रसिकमनावर गारुड करणारं लाडकं व्यक्तिमत्त्व म्हणून पु. लं.ची प्रतिमा जनमानसात आहे. नाटक, प्रवासवर्णन, व्यक्तिचित्रण, विनोदी लेख इ. वाङ्मयप्रकारात पु.लं.च्या लेखणीने लीलया संचार केला आणि मराठी वाङ्मयक्षेत्रावर आपला प्रभावी ठसा उमटवला. रसिकहो, मित्रहो, श्रोतेहो इ. त्यांचे भाषणांचे संग्रहही मराठी वाचक आणि समीक्षक यांना मनापासून भावले.
एक शून्य मी हे पु. ल. देशपांडे यांचं वेगळ्या धर्तीचं पुस्तक. प्रतिभाशाली असणारा हा सव्यसाची लेखक तितकाच प्रज्ञावंत आहे याची प्रचीती आणून देणारं... पु.लं.च्या नवनवोन्मेषशालिनी लेखणीचा वेगळा आविष्कार घडविणारं... त्यांनी निरनिराळ्या दैनिकांतून, दिवाळी अंकांतून लिहिलेल्या वैचारिक लेखांचे हे संकलन.
एकूण वीस लेखांच्या या संग्रहात अत्रे: ते हशे आणि त्या टाळ्या, पितृतुल्य लोकमान्य सेवा संघ आणि एक होती प्रभातनगरीसारख्या लेखांचा अपवाद वगळता इतर लेखांची बैठक वैचारिक स्वरूपाची आहे. लेखकाच्या चिंतनशीलतेतून हे लेखन झालं आहे. शूरा मी वंदिले हे प्रवासवर्णन आणि छान पिकत जाणारे म्हातारपण हा ललितनिबंधाशी जवळीक साधणारा लेख यांचंही स्वरूप विशुद्ध वैचारिक नाही, तरीही अनुषंगाने त्यांत चिंतनमनन येतंच. इ.स. १९६२ ते इ.स. १९९९ या कालावधीतील हे लेखन आहे.
हे चिंतनपर लेखन विविधस्पर्शी आहे. शिक्षण, समाजकारण, राजकारण, अध्यात्म, वाङ्मय अशा अनेक अंगांवर ते परखड भाष्य करते. संस्कार आणि मोत्या शीक रे अ आ ई हे लेख शैक्षणिक विश्वाचं विदारक दर्शन घडवतात. संस्कार म्हणजे शुभं करोति कल्याणं, मुंज, देवाची प्रार्थना अशी सर्वसाधारण समाजाची धारणा असते. हिंदूंचे सोळा संस्कार पाळण्यात तथाकथित सुशिक्षित धन्यता मानतात. संस्कारच्या संदर्भात समाजात रूजलेली ही भावना चुकीची असून, जे जबाबदार नागरिक म्हणून जगायची शिकवण देतात ते संस्कार असा संस्काराचा नवा कालोचित अर्थ सांगून मातापित्यांनी आपल्या पाल्याला प्रत्यक्ष आचारणाने आणि योग्य ते अनुभव देऊन त्याच्यात सामाजिक हिताची जाणीव निर्माण करावी असं पु. ल. सांगतात. मोत्या शिकरेमध्ये एके काळच्या चारित्र्यसंपन्न शिक्षकाचं मानसचित्र रंगवून आजच्या पोटार्थी शिक्षणाचे वाभाडे काढले आहेत. राजकीय पुढार्यांच्या तालावर नाचणारा शिक्षक, शिक्षणाविषयी अनास्था असलेला पालकवर्ग, शैक्षणिक दृष्टी नसलेलं शासन, कामगार संघटनांच्या पावलावर पाऊल टाकून चालणार्या शिक्षक संघटना, त्याच चालीने जाणार्या विद्यार्थीसंघटना इ. सर्वच घटक कमीअधिक प्रमाणात शिक्षणातील पावित्र्य नष्ट करण्यास जबाबदार आहेत ही लेखकाच्या मनातील व्यथा आहे.
गांधीयुग व गांधीयुगान्त आणि सत्तेच्या साठमारीत नोकरशाहीचा बळी हे लेख म्हणजे आजच्या स्वार्थी, मतलबी, अर्थकेंद्री, सत्तापिपासू आणि भ्रष्ट राजनीतीचा जाहीर पंचनामा आहे. गांधींच्या विचारांची त्यांच्या अनुयायांनी पायमल्ली केलीच, पण जयप्रकाशजींच्या पाठिराख्यांनी तरी वेगळं काय केलं ? सत्तेच्या साठमारीत चरणसिंगमोरारजीभाईंसारखे भले भले सामील झाले आणि जनतेच्या आशाआकांक्षा त्यांनी धुळीस मिळविल्या हे सांगताना पु. लं.च्या लेखणीला येथे समशेरीचं तेज येतं. प्रेमाच्या निशाणापेक्षा द्वेषाच्या झेंडयखाली माणसे पटकन जमतात या वाक्यातून वाचकांसमोर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचं दळभद्री राजकारण उभं राहातं.
गांधीजी आणि त्यांचे घडयळ या लेखात गांधीजींना वाटणारं वेळेचं महत्त्व या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या महत्त्वाच्या घटकावर लेखकाने टाकलेला प्रकाश वेळेची जाणीव (टाइम सेन्स) नसणार्यांना निश्चितच नवी दिशा देईल. दूरचे विनोबामध्ये विनोबालिखित मधुकर या पुस्तकाच्या निमित्ताने घडविलेलं विनोबाजींचं अंतरग दर्शन हृद्य तसंच मननीय आहे.
अर्धा एकर पाणी, एक विलक्षण कल्पना हा लेख म्हणजे पाणी पंचायतीचे जनक विलासराव साळुंखे या झपाटलेल्या कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख होय. साळुंखे यांच्या पाणीपंचायत या कल्पनेची पु. लं.नी केलेली प्रसंशा म्हणजे त्यांच्या विधायक कार्याकडे बघण्याच्या गुणग्राहक दृष्टीची साक्षच आहे.
नाटकासारखी दृश्यकाव्य कला असो वा मराठी माणसांना असणारं नाटकाचं वेड असो, पु. ल. कोणत्याही गोष्टीकडे साक्षेपी दृष्टिकोनातून बघतात. त्यांच्या खास शैलीत ते संस्कृतीच्या विविध अंगांचा परिचय करून देतात आणि त्यांच्या लेखणीच्या परिसस्पर्शाने त्या विषयाचं सोनं होऊन जातं. मराठी दृष्टिकोनातून मराठी माणूस या अफ्लातून लेखात मराठी माणसाच्या गुणदोषांचं, समजगौरसमजांचं अंतर्भेदी चित्रण मराठी माणसाला निश्तिच अंतर्मुख करील असं आहे.
एक शून्य मीमधील लेख वेळोवेळी लिहिले असले तरी त्यामागे नेमकं असं अंत:सूत्र आहे. एका सुशिक्षित, सुसंस्कृत आणि संवेदनशील मनाने घेतलेला समाजमनाचा मर्मभेदी वेध हे लेखन घेतं याचा प्रत्यय कोणताही लेख वाचताना यावा. धर्म, अंधश्रद्धा आणि तुम्ही आम्ही, नामस्मरणाचा रोग आणि एक शून्य मी हे त्यातील विशेष उल्लेखनीय लेख. संस्कृतीच्या सर्व क्षेत्रातील नीतिमूल्यांची घसरण आणि माणसातील माणूस हरवत चालल्याची जाणीव ही लेखकाच्या काळजातील भळभळती जखम. फुले, आंबेडकर, टिळक, गांधी, साने गुरुजी यांनी आमच्या मनाचे कोपरे उजळण्याचा प्रयत्न केला, पण आज आम्ही अंधाराचीच पूजा बांधत आहोत हा लेखकाच्या अंतराचा प्रतिध्वनी त्यांचा केवळ एकटयचा नाही, तो प्रातिनिधिक आहे. विद्यमान जगतातील सारेच सुज्ञ आणि संवेदनाशील अश्वत्थाम्याचं जखमी मन घेऊन वावरणारे. एक शून्य मी हा लेख पु.लं.च्या या संकलनातील सर्वच लेखनाचा अर्क. लेखकमनाला सुन्न करून सोडणार्या आणि मनात प्रश्नोपनिषद निर्माण करणार्या भयावह वास्तवाचं दर्शन घडविणारा हा लेख मुळातूनच वाचायला हवा. पु.लं.च्या लेखणीच्या कीर्तीला साजेसा असा हा संग्रह सर्वांनाच भावेल हे निश्चित.
नेताजी पाटील
Other Links:
|
 |
 |
|