|
अध्यात्म संवाद - ३
Author: के. वि. (बाबा) बेलसरे
Publisher: त्रिदल प्रकाशन
|
|
Price: $10.66 $8.52 20% OFF ( ~310 Pages, R350)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: पू. बाबा बेलसरे यांचे साधकांबरोबर झालेले अध्यात्म संवाद संकलन व संपादनः म.वि. केळकर
Review courtesy of Maharashtra Times: ३मार्च२००० अध्यात्ममार्गावरील आनंद - भार्गव कौशिक
प्रा. के. वि. बेलसरे यांच्या लेखनाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. भारतीय अध्यात्म किंवा तत्त्वज्ञान अगदी सोप्या भाषेमध्ये सांगण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याकडे होती. सामान्य माणसाला सहजपणे भावेल अशा शब्दांमध्ये मोठा आशय सांगण्याची कला होती. महत्त्वाचं म्हणजे प्रासादिक शैली होती. त्यामुळेच त्यांचं लेखन हे समाजाच्या सर्व थरांमध्ये विनासायास पोचलं. अर्थात हे त्यांना साध्य झालं होतं, ते त्यांच्या साधनेमधून. व्यासंगामधून. चिंतनशीलतेमधून. ही चिंतनशीलता आणि व्यासंग, मोठा विचार सोप्या भाषेमध्ये मांडण्याची हातोटी आणि प्रासादिकता यांचं पुरेपूर दर्शन अध्यात्म संवाद या तीन भागांमधून आपल्याला घडतं. त्यांच्याकडे जे साधक किंवा या विषयामध्ये कुतूहल असलेले लोक जात, त्यांच्याशी वेळोवेळी झालेल्या चर्चा श्री. म. वि. केळकर यांनी टिपून ठेवल्या. त्यांचं नेटकं संपादन केलं. पुस्तकरूपानं आणताना पुनर्लेखन केलं आणि हे संवाद तीन भागांमध्ये प्रसिद्ध केले. बेलसरे यांना चर्चा आवडत असे. तथापि निव्वळ बौद्धिक कसरतीचा त्यांना तिटकारा होता. चर्चेतून साधकाच्या अध्यात्मविषयक संकल्पना स्पष्ट व्हाव्या आणि साधनेत त्याची प्रगती व्हावी, असे त्यांना वाटत असे. हे करताना त्यांची त्यामागची तळमळ दिसत असे. अनेकवेळा चर्चेसाठी वेगवेगळे संदर्भ काढून ठेवून ते आमची उत्सुकतेने वाट पहात असत. माहीत असूनही समोरच्या माणसाच्या दोषांचा त्यांनी कधी उच्चार केला नाही आणि त्याला त्या दोषांतून मुक्त करण्याची खटपट केली, असे श्री. केळकर यांनी प्रस्तावनेमध्ये म्हटले आहे. बेलसरे यांचे हे सारे विशेषसुद्धा या तीनही भागांमधून आपल्याला दिसतात. एका चर्चेच्या वेळी त्यांनी प्रश्न विचारला, आपण स्वत:कडे साक्षीभावाने पाहणे चांगले आणि सोपे की परमात्मा साक्षीभावाने आपणाकडे पाहतो आहे, असा भाव ठेवणे चांगले आणि सोपे? तुम्हांला काय वाटते? यावर तिघांनी वेगवेगळी उत्तरे दिल्यावर बेलसरे म्हणाले, आपण द्वैतात राहतो. साक्षी म्हणून पाहण्याचा ज्ञानमार्ग आपल्याला कठीण वाटतो. त्यापेक्षा परमात्मा साक्षी आहे, तो माझ्या प्रत्येक कृतीकडे पाहतो, असा भाव धारण करता आला, तर हळूहळू सगळीकडे परमात्मातत्त्व ओतप्रोत भरलेले दिसू लागेल. प्रत्येक घटना ही नवी घटना, प्रत्येक दिवस हा नवा दिवस, इतकेच नव्हे तर प्रत्येक नाम हे नवे कोरे नाम आणि प्रत्येक दिवसाची झोप ही नवी झोप वाटू लागून आनंदाचा प्रत्यय येईल. आज स्वत:कडे कर्तेपण घेऊन आपण आपले जीवन सुखदु:खमिश्रित आणि नीरस केले आहे. नामस्मरण करताना परमात्म्याची-सदगुरूअंची एकसारखी आठवण ठेवली, तर प्रत्येक नाम हे नव्याने उसळून येऊ लागेल आणि तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे वाचा अनावर होईल. हयासाठी न कंटाळता उत्साहाने अभ्यास केला पाहिजे. या संवादांमध्ये प्रत्येकवेळी प्रश्नेत्तरंच आहेत, असे नाही. काही ठिकाणी बेलसरे यांनी एखाद्या अभंगावर सुरुवातीस निरुपण केले आहे आणि नंतर त्यावर चर्चा केली आहे. या चर्चांमधून अनेक विषय हाताळले आहेत. अभिमान आणि अहंकार यांतील भेद जसा त्यांनी मांडला आहे, तसेच व्यवहारातील अडचणी व्यवहाराच्या मार्गानेच सोडवल्या पाहिजेत. तथापि, परमार्थात योग्य व्हॅल्युएशन करून साधना करताना व्यवहारातील मार्ग साधनाच्या आड येता कामा नयेत, असेही सांगितले आहे. चुकीची गोष्ट करू या भीतीने काहीच न करणे, चुकीचे बोलू या भीतीने काहीच न बोलणे, खाण्यात गोडी येईल या भीतीने उपवास करणे, हे काही खरे स्वातंत्र्य अथवा मुक्ती नव्हे. हे केवळ या क्रियांच्या व्यक्त रूपावर बंधन घालणे आहे, यासारखे मार्गदर्शनही केले आहे. तुकाराम महाराज, रामदास स्वामी, जे. कृष्णमूर्ती यांचे दाखले जागोजागी देऊन त्यांवरसुद्धा जमलेल्या मंडळींमध्ये चर्चा घडवून आणली आहे. ही चर्चा करताना जमलेल्या माणसांना स्वत:ला योग्य दिशेने विचार करण्याची सवयच बेलसरे लावीत असत. त्यांच्यावर सखोल विचारांचा संस्कार करत असत. उपस्थितांनी मांडलेल्या मतांवर बेलसरे यांनी दिलेली उत्तरे म्हणजे अखंड साधना आणि चिंतन करणार्या निर्मळ मनाच्या साधकाची सखोल भाष्ये आहेत. त्या चर्चांना ज्यांना जाता आले नाही, त्यांच्यासाठी पुस्तकरूपामधील हे संवाद म्हणजे मोठी पर्वणी आहे. कोणावरही अवलंबून न रहाता माणसानं आपला मार्ग आपणच शोधायचा असतो, आणि हा मार्ग अखंड साधनेनं मिळू शकतो, याचं भान आणून देणारी ही पुस्तकं आवर्जून वाचावी, अशी आहेत.
Review courtesy of Loksatta: लोकसत्ता २ जुलै २०००
अध्यात्म सुस्पष्ट होण्यासाठी
एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व व संत परंपरेतील श्रेष्ठ निरूपणकार प्रा. के. वि. (पू. बाबा) तेलसरे हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यामुळे तत्त्वज्ञानाचा अभ्यास करताना त्यांनी प्राचीन मध्यमयुगीन व अर्वाचीन अशा भारतीय व अभारतीय संतांच्या ग्रंथांचे सांगोपांग अध्ययन केलेले होते. समग्र जीवनाचा अर्थ सांगणारे एक तत्त्वज्ञान संतांना सांगावयाचे असते. संतांच्या ग्रंथांचा अभ्यासपूर्ण अर्थ लावण्याची एक निराळी दृष्टी पू. बाबांना प्राप्त झाल्याचे त्यांच्या साहित्यातून व प्रवचनातून प्रकर्षाने जाणवते. संतांनी आपल्या वाणीतून तत्त्वज्ञानाबरोबर स्वत:बद्दल व स्वत:ला आलेल्या अतींद्रिय अनुभवांबद्दल बरेच काही सांगून ठेवले आहे. त्यावरून आपल्याला आपल्या आध्यात्मिक अनुभवांचा पडताळा येतो. प्रा. के. वि. बेलसरे हे स्वत: कटाक्षाने प्रसिद्धी माध्यमापासून दूर राहत असत. सत्कार, पुरस्कार त्यांनी कधीही स्वीकारले नाहीत. त्यांच्या कार्याचा गौरव करणारे लिखाण जर कोणी लिहू लागले तर त्याला त्यापासून ते नेहमीच परावृत्त करीत. त्यांच्या निर्वाणाला नुकतीच दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांचा असा एक चाहता वाचकवर्ग भारतातच नव्हे तर भारताबाहेरही फार मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. दरवर्षी प. पू. गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचे एक पुस्तक प्रसिद्ध करण्याचा परिपाठ त्यांचे भक्त कै. बापू टिळक यांनी ठेवला होता. अतिशय माफक किमतीत त्यांनी सातत्याने ही पुस्तके प्रकाशित केली त्यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर त्यांच्या सुविद्य पत्नी स्नेहलताई टिळक यांनीसुद्धा तोच प्रयत्न चालू ठेवला आहे. प्रा. के. वि. (पू. बाबा) बेलसरे यांचे साधकांबरोबर झालेले "अध्यात्म संवाद भाग १ ते ३ त्रिदल प्रकाशनच्या स्नेहलता टिळक यांनी दोन वर्षांत प्रसिद्ध केले आहेत. पू. बाबा हयात असताना दर रविवारी सकाळी मालाडला मठात त्यांच्या अमोल रसाळ वाणीतील ज्ञानेश्वरीवरील प्रवचने एएकण्यास उच्चभ्रू मध्यमवर्गीयांपासून ते समाजातील तळागाळातील लोकांपर्यंतची मंडळी येत असत. प्रवचनानंतर शंकासमाधानाचा कार्यक्रमही न चुकता होत असे. त्यांच्या काहींनी कॅसेटशी काढलेल्या आहेत. परंतु त्याचवेळी ज्या मंडळींना रविवारी येणे जमत नसे, अशी काही खास मंडळी पू. बाबांच्या घरी दर शुक्रवारी संध्याकाळी चर्चा करण्यास येत असत. त्याच चर्चेतून अनेकविध शंकांचे निरसन आपोआप होत असे. प्रस्तुत तिन्ही भागात या प्रकारच्या साधकांशी पू. बाबांनी साधलेला सुसंवाद दिलेला आहे. चर्चेत सहभागी झालेल्या साधकांच्या नावांेएवजी साधक अ, प, ग, ख इत्यादी संकेत अक्षरांचा उपयोग केला आहे. अध्यात्म विषय सुस्पष्ट होण्यासाठी या संवादांचा निश्चितच उपयोग होणार आहे. आतापर्यंतच्या पू. बाबांच्या प्रसिद्ध साहित्यातील नेमके सारच यातून मिळत जाते. प्रत्येक साधकाच्या मनातील शंकाअडचणी या आपल्याच मनातील शंका व येणार्या अडचणी आहेत, असे हे वाचत असताना जाणवते आणि वाचून मनाला अतिशय समाधान लाभत जाते. १३ फेब्रुवारी १९८७ ते २९ डिसेंबर १९८९ हा चर्चेचा कालखंड भाग १ मध्ये आहे. भाग दुसरामध्ये ५ जानेवारी १९९० ते ३१ डिसेंबर १९९१ हा कालखंड समाविष्ट आहे. भाग तिसरामध्ये ३ जानेवारी १९९२ ते १७ सप्टेंबर १९९३ पर्यंत झालेली चर्चा दिलेली आहे. या सर्व चर्चेतील उपदेश, सार परिस्थितीने गांजलेल्या सर्वसामान्य वाचकांपासून ते अध्यात्मिक साधना करणार्या साधकांपर्यंत सर्वांनाच मार्गदर्शन करणारे असे आहे. निरनिराळ्या संदर्भांच्या स्वरूपात पू. बाबांनी जे. कृष्णमूर्ती, फ्रान्समध्ये जन्मलेल्या पॉंडेचरीच्या मदर, योगी कृष्णप्रेम, ब्रदर लॉरेन्स, स्वामी रामदास, श्री. अरविंद यांचे उतारे व दिलेले नेमके संदर्भित विचार अंत:करणाला भीडणारे आहेत. सर्वच संतांचा अनुभव म्हणजे चिन्मयाचे स्फुरण असते. म्हणून संतांच्या एकेक वचनामध्ये वेदान्ताचे मर्म सापडते. संतवाणी सदैव ताजी सतेज असते. याची पुन्हा प्रचिती व खात्री हे सर्व वाचून येते. पू. बाबा शंकाचे निरसन करताना जे निरूपण करतात ते वाचत असताना जणू काही आपल्यासमोर बसून अतिशय प्रेमळ आवाजात आपल्या रसाळ वाणीतून आपल्याशीच बोलत आहेत, असे वाटत राहते. प्रस्तुत पुस्तकात पू. बाबांच्या सुविद्य पत्नी इंदिरा (ईसाहेब) बेलसरे यांनी व्यक्त केलेल्या भावनाआशीर्वाद रूपाने दिलेल्या आहेत. त्याही अतिशय बोलक्या आहेत. या पुस्तकाचे संकलन व संपादन प्रा. म. वि. ऊर्फ नाना केळकर यांनी केले आहे. पुस्तकाच्या द्वितीय व तृतीय भागात उल्लेख असलेल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी संक्षिप्त दिलेली माहिती देखील फार महत्त्वाची वाटते. -- रमेश खटावकर
Synopsis: http://www.loksatta.com/daily/20000702/lokpup.htm
Other Links:
|
 |
 |
|