Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


नादब्रह्म स्वरयोगी संगीतभूषण पं. राम मराठे
Author: सुनील परांजपे
Publisher: परममित्र पब्लिकेशन्स
Add to Shopping Cart
Price: $21.32 $17.05 20% OFF ( ~580 Pages, R700)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
माणूस, गोपाळकृष्ण, जागिरदार असे चित्रपट, मंदारमाला, जय जय गौरीशंकर, संगीत सौभद्र, संगीत स्वयंवर अशा नाटकांतून आपल्या अभिनय आणि गायकीचा ठसा उमटवलेले संगीतभूषण पं. राम मराठे यांचे हे सांगीतिक चरित्र. राम मराठे यांच्या मुलाखती, त्यांच्यावर लिहिलेले लेख, स्वत: मराठे यांच्या लेखांचा या चरित्रात समावेश आहे. त्यामुळे मराठी संगीत रंगभूमीवरील एका महत्त्वाच्या कलाकाराची वाटचाल या समग्र ग्रंथातून उलगडते. हा ग्रंथ तीन भागांमध्ये विभागला गेला आहे. पहिल्या भागात रामभाऊंचा सांगीतिक जीवनपट, दुसर्‍या भागात रामभाऊंनी विविध वृत्तपत्रांतून केलेले वैचारिक लेखन आणि तिसर्‍या भागात रामभाऊंवर मान्यवरांनी लिहिलेले ७५ लेख समाविष्ट करण्यात आले आहेत.
त्यांच्या कारकीर्दीतील महत्त्वाचे नाटक संगीत जय जय गौरीशंकरच्या घडणीचा पं. राम मराठे यांनी स्वत:च उलगडून दाखवलेला प्रवास. त्यातील संपादित अंश..
एकूणच नाटकलेचं दैवत म्हणजे नटराज अर्थात नटेश्वर भगवान शंकर. शंकराचं गुणगान करूनच संगीत नाटकाची सुरुवात होते. डमरूच्या निनादातूनच आद्य संगीताची निर्मिती झाली, असं मानलं जातं. अण्णा गोखल्यांनी त्यांच्या सर्वच नाटकांत शंकराचं गुणगान करणारी अनेक नाटपदं लिहिली होती. परंतु संपूर्ण नाटकच भगवान शंकर आणि पार्वती अशा कथानकावर लिहिण्याचे अण्णांच्या मनात घोळत होते. मात्र, सर्व कलांचा अधिष्ठाता नटेश्वर अर्थात नाटक सूत्रधार अशा महेश्वरांनीच प्रेरणा देऊन अण्णा गोखल्यांकडून नाटक लिहून घेतलं. त्या वेळचे फायनान्शियल एक्स्प्रेसचे संपादक आणि संगीत नाटकांचे रसिक गो. मं. लाड यांच्या प्रोत्साहनामुळे हे नाटक सत्यात उतरले आणि ललितकलादर्शच्या भालचंद्र पेंढारकरांनी या नाटकाचं यथासांग वाचन खुद्द मंगेशीच्या देवळातच आयोजित केलं. हे नाटक शिवलीलामृतातील १४ व्या अध्यायाच्या आधारे लिहिलं आहे. विशेष गोष्ट म्हणजे, शाकुंतल, सौभद्र ही नाटकं रंगभूमीवर येण्यापूर्वी म्हणजे १८८० साली अक्ष विपाक अर्थात द्यूत विनोद हे नाटक पां. गो. गुरव यवतेश्वरकर यांनी लिहिलं होतं. १९०९-११ या कालावधीत केशवराव भोसलेंना घेऊन हे नाटक ललितकलादर्शच करत असे.
कैलासाचा रम्य परिसर आणि गोमंतकीय निसर्गसौंदर्य अशा पाश्र्वभूमीवर हे नाटक घडत जातं. किंबहुना भगवान शंकराच्या आणि पार्वती अर्थात गौरीच्या गोमंतकीय वास्तव्यामुळे मंगेशी आणि शांतादुर्गा ही जागृत देवस्थानं गोमंतकात स्थापन झाली, त्याचंच हे कथानक.
या नाटकासाठी भव्यदिव्य वास्तववादी नेपथ्य, त्या काळातील नंदी, शृंगी, भगवान शंकर, पार्वती यांची अत्यंत अभ्यासपूर्ण वेशभूषा, रंगभूषा, निसर्गातील संगीताचा चपखल वापर केला गेला. तसेच या नाटकासाठी आगळंवेगळं संगीत देणारा संगीतकार, कुशल नृत्यदिग्दर्शक आणि यातील सात व्यक्तिरेखा निवडणे हे सर्वच शिवधनुष्य पेलण्यासारखे होते.
भालचंद्र पेंढारकर यांनी नाटकाचं वाचन सुरू असतानाच मनामध्ये मुख्य पात्रांची निश्चिती केली होती. त्यामध्ये भगवान शंकराच्या मुख्य भूमिकेसाठी फक्त रामभाऊंनाच निश्चित केलं होतं.
साहित्य संघातील मंदारमाला, स्वयंवर, सौभद्र अशा विविध नाटकांचे रामभाऊंचे प्रयोग अण्णा पेंढारकर कित्येकदा विंगेमधून अत्यंत बारकाईने आणि तन्मयतेनं पाहात असत. विविध सांगीतिक कार्यक्रमांतून रामभाऊ आणि पेंढारकरांचे स्नेहसंबंध अत्यंत दृढ होते. रामभाऊंना घेऊन एखादं वैशिष्टपूर्ण संगीत नाटक करावं, असं पेंढारकरांच्या मनात वारंवार येत होतं. आणि गोखले अण्णांच्या गौरीशंकर नाटकाद्वारे त्याची पूर्तता झाली. दोन्ही अण्णा मनोमन सुखावले. कारण गौरीशंकरमधील अभिनय आणि तितक्याच ताकदीची कैलासपती भगवान शंकरांची भूमिका म्हणजे सर्वोत्तम शिखर होतं. आणि त्यासाठी प्रत्यक्ष नटेश्वराच्या भूमिकेसाठी रामभाऊ लाभल्यामुळे संगीतकार वसंत देसाईही अतिशय खूश झाले.
गौरीशंकरच्या तालमी सुरू झाल्या. ललितकलादर्शचे वाचिक आणि आंगिक अभिनयात अतिशय मातब्बर असे नटवर्य मामा पेंडसे यांच्याकडे दिग्दर्शनाची जबाबदारी होती. मुळात पौराणिक नाटक आणि अण्णा गोखल्यांची संस्कृतप्रचुर ओघवती भाषा असल्यामुळे नाटकाच्या वाचनाला मामांनी महत्त्व दिले होते. भगवान शंकर, देवी पार्वती, कलहनाटपटू नारद, पार्वतीची सखी विजया, नंदी, शृंगी आणि शिवगण अशा सात व्यक्तिरेखा अर्थात पात्रे या नाटकात होती. गौरीशंकरचे सप्तसूरच जणू!
संगीत नाटक असूनदेखील या नाटकातली मुख्य नायिका अर्थात पार्वती ही गाणारी नाही, तर ती भिल्लिणीच्या वेशात बहारदार नृत्य करते आणि शंकराला पुनश्च वश करून कैलासावर परत आणते. अशा भूमिकेसाठी अतिशय रूपवान आणि नृत्यनिपुण अभिनेत्रीची आवश्यकता होती. वसंत देसाईंच्या परिचयातून लिलावती गडकर यांचं नाव पार्वतीसाठी समोर आलं. मामा पेंडसे यांनी त्यांच्याकडून वाचन करून घेतलं. तसंच त्यांची देहबोली, नृत्य, आत्मविश्वास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रूपवान आणि करारी व्यक्तिमत्त्वामुळे पार्वतीच्या भूमिकेसाठी त्यांची निश्चिती झाली. शृंगीच्या नटखट भूमिकेसाठी प्रसाद सावकार एकदम योग्य होते. पार्वती गाणारी नसल्यामुळे तिची सखी आणि शृंगीची प्रेयसी विजया या भूमिकेसाठी कुमारी फैयाज यांना विचारण्यात आलं. परंतु त्यांच्या व्यग्रतेमुळे योग आला नाही.
आ. दे. पाटील, सुकुमार, तुकाराम बापू इत्यादी नटमंडळी दामोदर हॉल, नाटकलोपासक, सोशल सव्र्हिस लीग अशा परळ येथील संस्थांमधून लहान-मोठा भूमिका करीत असत. ललितकलादर्शमध्येदेखील ही नटमंडळी कार्यरत होती. या मंडळींच्या ओळखीतूनच कामगार वस्तीतील अतिशय गुणवान, सुरेल आवाजाची गायिका अभिनेत्री जयश्री शेजवाडकर यांचा ललितकलादर्शमध्ये गौरीशंकरद्वारे प्रवेश झाला. अशा प्रकारे विजया- जयश्री शेजवाडकर, नंदी- सुकुमार नागोठकर, शिवगण- आ. दे. पाटील अशी पात्रयोजना झाली. या नाटकातली शंकर, पार्वती आणि नारद ही महत्त्वाची तीन पात्रं! ललितकलादर्शचे सर्वेसर्वा, निर्माते, सूत्रधार आणि पं. रामकृष्णबुवा वझे व बापूराव पेंढारकर यांची गायकी व वारसा समर्थपणे चालवणारे भालचंद्र पेंढारकर हे देवर्षी नारदाच्या भूमिकेत होते. तत्कालीन सौभद्र, कृष्णार्जुन युद्ध, गोकुळचा चोर अशा पौराणिक नाटकांमध्ये मा. दामले (नूतन पेंढारकर), सुरेश हळदणकर (महाराष्ट्र गंधर्व), भालचंद्र पेंढारकर इत्यादी कलाकार नारदाची भूमिका करत होते. गौरीशंकरचे निर्माते या नात्याने अण्णा पेंढारकरांनी ही भूमिका करणे योग्य आणि साजेसं होतं.
रामभाऊंचा आणि वसंतरावांचा परिचय व स्नेह फार जुना होता, अगदी प्रभात फिल्म कंपनीपासूनचा. राम मराठे एक बालनट म्हणून प्रभातच्या गोपालकृष्ण, माणूस या चित्रपटांत काम करत होते, त्याच वेळी वसंत देसाई प्रभातमध्ये होते. तेथे केशवराव भोळे आणि मास्तर कृष्णराव यांच्याकडे ते संगीत विभागात साहाय्यक म्हणून होते. कोणतेही नवे वाद्य वाजवण्याचा प्रश्न आला, की वसंतराव आपणहून पुढे यायचे आणि त्या वाद्याला बोलते करायचे. अडल्याप्रसंगी लहान-मोठी भूमिका आणि पाश्र्वगायनही करत. प्रभातच्या संत ज्ञानेश्वर चित्रपटातील आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे हे बैलगाडी हाकणार्‍या गाडीवाल्याचे गीत आणि भूमिका वसंतरावांनी केली आहे. तसंच कुंकू चित्रपटातील मन सुद्ध तुझं, गोष्ट हाये पृथ्वी मोलाची या गीतात चित्रित झालेला हार्मोनियमवादक वसंत देसाईच. त्यानंतर राजकमलमध्ये वसंत देसाई माझ्या आवाजाची, गायकीची निकड असेल तेव्हा हक्काने बोलावत असत. माझ्या गायकीचा बाज, शैली त्यांना माहीत होती.
गौरीशंकरपूर्वी वसंत देसाईंनी पंडितराज जगन्नाथचे अप्रतिम संगीत केले होते. जय गंगे भागीरथीसाठी कलावती बसंत रागाचा सुंदर वापर केला होता. गायकाची नाडी ओळखून चाली देण्यात ते वाक्बगार होते. जय जय गौरी शंकरच्या सप्तसूर झंकारित बोले.. ही नांदी तिलक कामोद रागावर आधारित त्रिताल व एकताल अशा दोन तालांत स्वरबद्ध केली आहे. त्रितालमधून एकतालमध्ये एका तानपल्यामधून होणारा या नांदीचा प्रवास आणि पुन्हा एकतालमधून त्रितालमध्ये एका तिहाईसह होणारा प्रवास अतिशय सहज आणि लाजवाब असाच आहे. नांदीसाठी असा प्रकार यापूर्वी कोणीही केला नव्हता. रेकॉर्डब्रेक खपाच्या या नांदीने स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. (सप्तसूर ही नांदी मी स्वत:, भालचंद्र पेंढारकर आणि प्रसाद सावकार या तिघांच्या विभिन्न गायकीतून ऐकतानाही एकसंध वाटते. हीच याची खासियत! जेवढी चाल उत्तम तेवढीच अण्णा गोखल्यांची रसाळ पद्यरचना.)
शंकराचे रंगभूमीवर आगमन होते तेच मुळी कैलासावर ध्यानस्थ अवस्थेत बसून निराकार ओमकार हे पद साकारताना. या पदाची चाल करण्यापूर्वी वसंतरावांनी माझ्याकडून विविध रागरागिण्या, ध्रुपदे गाऊन घेतली. त्यातून कुकुब बिलावल अर्थात काहीसा सावनी बिहागडा अंगाने जाणार्‍या सुरावटीवर चाल निश्चित केली. झपतालमधील ही चाल सरळ अंगाची होती. मात्र त्यामध्ये निराकार या शब्दामधील रा या अक्षरावर धैवतावर सम घेऊन वसंतरावांना मी गाऊन दाखवली. त्यांना ती विलक्षण पसंत पडली. त्यामुळे पद आणि झपतालचा डौल विलक्षण साधला गेला. संगीताचा उद्गाता असलेल्या भगवान शंकराच्या तोंडी हे पद असल्यामुळे अगदी पूर्णत: गायकी अंगांनी हे पद मनसोक्त खुलवण्याची मुभा संगीतकार या नात्याने वसंतरावांनी मला दिली होती. नोम तोम्युक्त गायकीने लयकारी करत हे पद मी गात असे. अर्थात प्रत्येक पद किती वेळ गावे याचा दंडक दिग्दर्शक आणि निर्माता ठरवून देत असत. मग तो समोरचा कितीही ज्येष्ठ गायक असो. ही शिस्त त्या काळी होती. आणि त्याचे पालनही गायक नटमंडळी करत होती. निराकार ओंकार ही पूर्णत: बंदिशसदृश रचना, तर ती सुंदरा गिरिजा खमाज रागातील पारंपरिक चाल व सूर गंगा मंगला ही गंधर्व-मास्तर कृष्णराव शैलीचा सुंदर आविष्कार. वर्षां ऋतूला, अर्थात मेघांना आमंत्रण देणारी दोन पदं यामध्ये आहेत. द्रुत त्रितालात परज रागावर आधारित पवन चपल वितरीत मंदगंध आणि झंपा तालातील मल्हार रागावर आधारित येई रे जलधरा अशा माझ्या गायकीला तसेच शंकराच्या व्यक्तिरेखेला अनुसरून चपखल चाली दिल्या. कशी नाचे छमाछम हे उडत्या चालीचे पद प्रसंगाला समयोचित असेच होते. याच प्रकारे जयश्री शेजवाडकरसाठी प्रियकरा नसे हा छंद भला ही फार गोड चाल वसंतरावांनी बांधली होती. सावकारांच्या मधुर आवाजात नारायणा रमा रमणा आणि भरे मनात सुंदरा शोभून दिसत असत. अण्णा पेंढारकरांच्या गायकीचा बाज वझेबुवा शैलीचा होता, म्हणून त्यांच्यासाठी लयीचे छोटे छोटे तुकडे केलेल्या चाली या नाटकासाठी होत्या. रमा रमण श्रीरंग या भक्तिपूर्ण अशा नारदाच्या पदासाठी ठेका होता- धिंक त्रक धिना/ तिं त्रक धिना. अर्थात वसंत देसाई ठेका! पेंढारकर हे गाणं खूप रंगून गात असत. या सर्व मुख्य चालींबरोबरच पार्वतीच्या नृत्य बाजासाठी सावज माझं गवसलं आणि वसंत गीत अर्थात आला हो, आला हो, वसंत रण झुंजार अशी सुंदर गीतं जयश्री शेजवाडकर आणि वाणी जयराम यांच्याकडून पाश्र्वसंगीतात गाऊन घेतली होती.
कैलासाचा रम्य परिसर आणि गोमंतकीय निसर्गसौंदर्य अशी पाश्र्वभूमी या नाटकासाठी आणि एकूणच नेपथ्यात होती. वसंतरावांनी निसर्गसंगीतासाठी घंटानाद, शंखनाद, पखवाज, घुंगुरांचे आवाज, डमरू, पाण्याचा खळखळाट, ढगांचा कडकडाट, विजांचा आवाज, इत्यादी वैशिष्टपूर्ण ध्वनी-परिणाम अर्थात साऊंड इफेक्ट खुबीने वापरले होते. वसंतरावांच्या चित्रपट संगीताच्या अनुभवांचा एकूणच गौरीशंकर नाटकासाठी खूप फायदा झाला.
संगीतकार वसंत देसाई यांच्या संगीत दिग्दर्शनाबद्दल रामभाऊ पुढे म्हणतात, प्रसंगानुरूप संगीताचे कंपोझिशन (रचना) करणे हे वसंतरावांचे खास वैशिष्ट. गळाच्या धर्माप्रमाणे गाण्यात वेगळेपणा कसा आणता येईल याकडे त्यांचा प्रयत्न असे. गायक नटाच्या गळ्याला अनुरूप चाली शोधून त्या नाटकातील प्रसंगाला अनुकूल आहेत की नाहीत, याचा विचार करून मगच त्या चाली ते नक्की करीत. चाली नक्की झाल्या की ते गायकाला सांगायचे, तुम्ही आता गा! गायकाला त्यामुळे एक प्रकारचा आत्मविश्वास यायचा.
ते पदाची आऊटलाइन बसवून घ्यायचे आणि गायक कलावंताला खूलवून गाणं कसं गाऊन घ्यावं, हे त्यांना चांगलं जमत असे. त्यांनी माझ्या गाण्याच्या मैफली केल्या आहेत. हा कलावंत रसिकतेने दाद देणारा होता. फार कष्टी माणूस. आठ-आठ तास मेंडोलिनवर रियाज करायचे आणि म्हणूनच जय जय गौरी शंकर या नाटकासाठी वसंतरावांनी दिलेले संगीत अत्यंत प्रतिभाशाली, वैविध्यपूर्ण ठरले आणि खर्‍या अर्थाने हे गौरीशंकर शिखर झाले.
रामभाऊंसारख्या विचारवंत गायक, संगीतकाराकडून वसंतरावांविषयीचे गौरवोद्गार यातच वसंतराव देसाईंच्या गौरीशंकरच्या चालींचे सामर्थ्य दिसून येते.
नाटकाच्या उभ्याने तालमी सुरू झाल्या. सर्व कलाकारांची नक्कल-पाठांतर मुखोद्गत होऊ लागले. मामा पेंडसे तालमीमध्ये शब्दाचा जोर, नजरेतून व्यक्त होणारा भाव, इत्यादी समजावून सांगत असत. एकीकडे नृत्यं बसवली जात होती. वसंत देसाईंच्या संबंधांमुळेच ज्येष्ठ नृत्यगुरू पार्वती कुमार या नाटकासाठी नृत्य-दिग्दर्शक म्हणून लाभले होते. त्यांचाही नाटकाच्या बांधणीमध्ये महत्त्वाचा सहभाग होता. पडद्याला वा नेपथ्याला टाळी मिळणारे नेपथ्यकार पु. श्री. काळे (साहित्यिक व. पु. काळे यांचे वडील) यांच्याकडे जबाबदारी होती. कैलासाची पर्वतशिखरे व त्याच्या पर्वतरांगा, तेथील निसर्ग हुबेहूब असा पडद्यावर साकारला होता. समोरून पाहताना पडद्यावरील डोंगरदर्‍यांची एकूणच भव्यता आणि खोली जाणवत असे. जाळीच्या पडद्याआड भगवान शंकर ध्यानस्थ बसले आहेत आणि प्रकाशयोजनेद्वारे दोन्ही विंगमधून प्रकाशाचा असा वापर केला जायचा, की रसिकांना खरोखरच अर्धनारीनटेश्वराचं दर्शन व्हायचं! मीना पेठे यांनी प्रकाशयोजना केली होती.
रंगभूषा आणि वेशभूषा यासाठी बाबा वर्दम आणि शांताराम विचारे हे होते. शिवकालीन वैशिष्टपूर्ण वेशभूषा आणि साक्षात मंगेशीचं रूप दाखवणारी शंकराची रंगभूषा, खासकरून शंकराचा विग टोप, केशभूषा, दाढी, मिश्या अगदी हुबेहूब वठलं होतं. या नाटकामध्ये मंगेशीच्या रूपामध्ये भगवान शंकर असल्याने अर्थातच जटाजूटधारी आहे.
ललितकलादर्शच्या इतर साहाय्यक मंडळींमध्ये अनंत साखरे, वामनराव पटवर्धन, वझे, भार्गवराम पांगे, इत्यादी विविध व्यवस्थापन सांभाळायचे. साथसंगीतासाठी गोविंदराव पटवर्धन- ऑर्गन, दामूअण्णा पार्सेकर- तबला, मधुकर बर्वे- व्हायोलिन अशी वादकमंडळी होती. असे दिग्गज कलाकार. सर्वाची अथक मेहनत. दोन-अडीच महिन्यांच्या तालमीमधून ही नाटकृती उभी राहत होती. आजच्यासारखा विविध प्रसारमाध्यमांचा वापर त्या काळी नसतानाही रसिकांमध्ये या नाटकाचा प्रचंड बोलबाला झाला होता. आणि अखेर १४ ऑगस्ट १९६६ रोजी बिर्ला मातोश्री सभागृहामध्ये शुभारंभाचे सकाळ, दुपार, रात्र असे तीन प्रयोग दणक्यात हाऊसफुल्ल सादर झाले.
सप्तसूर झंकारीत बोले.. या नांदीच्या स्वरांनी पूर्ण प्रेक्षागृह भारून गेले. नांदीच्या उत्तुंग स्वरांनीच गौरीशंकर शिखर गाठले होते. शंकर डमरू डम बोले.. या अंतर्‍यात रामभाऊंनी तानांची बरसात केली. त्याच क्षणी नाटकाने रसिकांची पकड घेतली होती. नाटकातील संवाद, पद्यरचना, नेपथ्य, प्रकाशयोजना आणि सर्वच पदांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. परंतु या दिग्गज कलाकारांबरोबरच एका गुणी गायिकेने बाजी मारली. प्रियकरा नसे हा छंद भला या पदाला जयश्री शेजवाडकरांनी वन्समोअर घेतला. अर्थात, त्या गाण्याची उडती चाल, केहरव्याचा मस्त ठेका व लग्या आणि जयश्रीबाईंच्या सहजसुंदर हरकती, ताना व गोविंदरावांची अप्रतिम पूरकसाथ यांमुळे या पदाला वन्समोअर ठरलेलाच असे. वसंतरावांच्या विविधांगी चालींमुळे या नाटकातील पदं एकसुरी आणि साचेबद्ध वाटत नसत. त्या दिवशीचा प्रत्येक प्रयोग चार तासांहून अधिक काळ रंगला.
मुंबईमध्ये सर्वच नाटगृहांमध्ये गौरीशंकरचे प्रयोग जोरदार चालू होते. त्या काळी कोणतंही नवीन संगीत नाटक आलं, की त्याच्या ध्वनिमुद्रिका एच.एम.व्ही.तर्फे काढल्या जात. आणि त्या काळचं प्रसार करण्याचं माध्यम म्हणजे आकाशवाणी! महिन्याभरातच या नाटकातील सर्व पदं घराघरांत पोहोचली. आकाशवाणीच्या मंगल प्रभात, कामगार सभा, आपली आवड अशा कार्यक्रमांतून गौरीशंकरच्या सर्वच नाटपदांना प्रचंड मागणी असे. विशेष करून दर सोमवारी लागणार्‍या मंदारमाला नाटकातील जय शंकरा या पदाप्रमाणेच निराकार ओंकार, सप्तसूर झंकारीत बोले अशा शंकराच्या वर्णनपर गौरीशंकरमधील नाटपदं हमखास लावण्यात येत.

Loksatta Article
Other Links:

Write your review for this book


Similar books:
  चरित्र
   राजा शिवछत्रपति
   कहाणी लंडनच्या आजीबाईंची
   जवाहरलाल नेहरू
   मोगरा फुलला
   कान्होजी आंग्रे
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.