Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


अपूर्ण क्रांती
Author: रा. भा. पाटणकर
Publisher: मौज प्रकाशन
Add to Shopping Cart
Price: $6.29 $5.03 20% OFF ( ~295 Pages, R200)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
अठराव्या-एकोणिसाव्या शतकांतील महाराष्ट्रात काही स्थित्यंतरे घडली. या स्थित्यंतरांचा व्यापक अपूर्ण क्रांती मध्ये आला आहे. मात्र हे पारंपारिक ऐतिहासिक आहे. इथे आलेले इंग्रजी साम्राज्य पूर्वी नांदून गेलेल्या भारतीय राज्यांपेक्षा आर्थिक दृष्टया खूपच सामर्थ्यवान होते. आर्थिक शोषण हाच त्याचा हेतू होता. ते सुलभ व्हावे म्हणून त्यांनी इथे काही राजकीय, वैधानिक, प्रशासकीय बदल केले. सर्व जमीन-महसूल एका मध्यवर्ती केंद्राकडे जाऊ लागला. सर्व आर्थिक, लष्करी, राजकीय धोरणे या केंद्रामार्फतच ठरू लागली. या घडामोडी नीट कळाव्या म्हणून, ईस्ट इंडिया कंपनी, खुद्द इंग्लंड, इंग्रजपूर्व व इंग्रजांच्या वर्चस्वाखालील भारत यांतील प्रमुख आर्थिक घडामोडींचा परिचय करून घेणे आवश्यक ठरते. तसेच या काळात घडलेल्या काही सांस्कृतिक-उदाहरणार्थ व साहित्यिक स्थित्यंतरांकडे लक्ष वेधणे जरुरीचे ठरते. इंग्रजी शिक्षणात शेक्सपियर-मिल्टनपेक्षा आधुनिक निसर्गविज्ञान आणि सामाजिक विज्ञाने यांना अधिक महत्त्व होते. हे त्याचे सामर्थ्य दादाभाई नवरोजींपासून डॉ. आंबेडकरांपर्यंतच्या सर्व भारतीय धुरीणांनी हेरेले होते, म्हणूनच त्याच्या प्रसारात त्यांनी इतका रस घेतला. नव्या शिक्षणाची सतराव्या-अठराव्या शतकांतील शिक्षणाशी तुलना करणे अगत्याचे ठरते. मुख्यत: इंग्रजी शिक्षणामार्फत एकूण पाश्चात्य साहित्य इथे आले आणि आधीच्या साहित्याला पूरक ठरले. वरील तीन क्षेत्रांत १८५०नंतर स्थित्यंतरे घडू लागली. पहिली काही वर्षें लक्षणीय प्रगतीही झाली. नंतर मात्र चित्र पालटले. या सर्व स्थित्यंतरांची चिकित्सा इथे सखोलपणे झालेली आढळेल.

Review courtesy of Maharashtra Times:
२०ऑगस्ट२०००
महाराष्ट्रातील अपूर्ण क्रांतीचे कारण काय?
- गोविंद तळवलकर

महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकात काही स्थित्यंतरे झाली असली, तरी ती अपुरी राहिली. त्यांचा वेग बदलला आणि म्हणून आर्थिक, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रांत क्रांती अपुरीच राहिली. या गंभीर आणि महत्त्वाच्या विषयाचे विवेचन प्रा. रा. भा. पाटणकर यांनी ‘अपूर्ण क्रांती’ या पुस्तकात केले आहे.

ते करताना त्यांनी काहीसे वेगळे वाटेल, असे तंत्र वापरले आहे. वर्गात प्राध्यापकाने पाठ घ्यावा, तशी विवेचनाची पद्धती पाटणकर यांनी अवलंबलेली आहे. पण अनेक प्राध्यापकांप्रमाणे केवळ तांत्रिक आणि जडजंबाल शब्दांचा मारा करून वाचकांचा गोंधळ उडवून दिलेला नाही. त्यांनी काढलेले निष्कर्ष काही प्रचलित समजुतींना धक्का देतील. तथापि तसा तो देण्याच्या हेतूने किंवा वादळ उठवण्याच्या हेतूने विषय हाताळलेला नसून विषय समजून यावा आणि द्यावा, हा उद्देश स्पष्ट दिसतो.

पाटणकर यांनी प्रामुख्याने महाराष्ट्राचा विचार केला असला, तरी एकंदर देशाची वाटचाल कशी झाली आणि ती तशी का झाली, हे लक्षात घेतल्याशिवाय महाराष्ट्राच्या स्थितीचा अन्वय व अर्थ समजणार नाही, याची जाणीव ठेवून पाटणकर यांनी इंग्रजी राज्य इथे का स्थिरावले, त्या राज्याचे फायदेतोटे काय झाले आणि त्या राज्यामुळे जे परिवर्तन झाले त्याचे स्वरूप काय, याचा ऊहापोह केला आहे.

पुस्तकाच्या प्रारंभीच पाटणकर यांनी एक सावधगिरीची सूचना केली आहे. ती अशी की, दोन समाजांचा विचार करताना सर्व समाज हा एकसंध असतो आणि तो एकाच विचाराने प्रेरित झालेला असतो असे मानणे बरोबर नाही. इंग्रजी राज्यकर्त्यांत भिन्न वृत्तीचे लोक होते. क्लाइव्ह आणि एलफिन्स्टन यांच्यात साम्य नाही. ते तसे आहे असे गृहीत धरून सत्यसंशोधन होऊ शकत नाही, असे पाटणकर यांनी बजावले आहे आणि ते बरोबर आहे.
मोगलांच्या स्वार्‍या आणि नंतर त्यांनी स्थापन केलेले साम्राज्य आणि इंग्रजांचा हिंदुस्थानातील प्रवेश व नंतर स्थापन झालेले त्यांचे साम्राज्य यांत मूलभूत फरक होता. मोगलांकडे अधिक प्रभावी शस्त्रबळ होते; तर इंग्रजांच्या मागे इंग्लंडमध्ये निर्माण झालेली नवी अर्थशक्ती होती. तिथे झालेल्या औद्योगिक क्रांतीतून ही शक्ती निर्माण झाली होती. वाफेची इंजिने, वीज, वाहतुकीची नवी साधने, तारायंत्राचा शोध अशा साधनांमुळे ही शक्ती निर्माण झाली. इथे शेती आणि लहान व मध्यम उद्योग होते, तरी त्यात गुंतलेल्यांनी आपल्या संघटना स्थापन कराव्या आणि उद्योगात नव्या यंत्राचा उपयोग करावा, या दृष्टीने हालचाल केली नाही. मलमल वगैरे तयार करणारे कारागीर हे स्वतंत्र नव्हते. कापड कोणाला विकायचे हे राजा वा जहागीरदार ठरवत होते. व्यापार चांगल्यापैकी होत असला, तरी मोठया वखारी काढाव्या आणि ज्यास घाऊक मोठा व्यापार म्हणतात तो करावा, असे प्रयत्न झाले नाहीत. अशा व्यापारासाठी बॅन्का काढण्याची कल्पनाही नव्हती. हिंदुस्थानात ही स्थिती असताना तिच्या बरोबर उलट इंग्लंड आणि युरोपात होती. इंग्रजांची संस्कृती यंत्राधिष्ठित होती आणि तिच्यापुढे येथल्या हस्तोद्योगप्रधान समाजाचा निभाव लागणे शक्य नव्हते. इंग्लंडमधील औद्योगिक क्रांती ही भारतातील संपत्तीचा ओघ तिकडे गेल्यामुळे झाली, ही प्रचारात्मक भाषा झाली. पाटणकर यांनी ती कशी चुकीची आहे, हे आकडेवारीसह दाखवून दिले आहे. त्या क्रांतीची लाट अठराव्या शतकात आली आणि त्यामुळे इथल्या संपत्तीच्या ओघामुळे औद्योगिक क्रांती झाली, याला वस्तुस्थितीचा आधार सापडणार नाही. एका इतिहासकाराने ब्रिटिश आणि रशियन साम्राज्यविस्ताराबद्दल असे म्हटले आहे की, इंग्रजांपाशी परदेशांत गुंतवण्यासाठी अतिरिक्त भांडवल मोठया प्रमाणात होते; तर भांडवल नसल्यामुळे झारशाहीत मुलुखगिरी करण्यात आली.

क्लाइव्ह इत्यादींनी जी काही संपत्ती नेली होती, तिचा उपयोग त्यांनी जमीनजुमला खरेदी करण्यासाठी केला. सुधारलेल्या शेतीतून माणसे मोकळी होऊ लागली आणि कारागिरी वाढली. या कारागिरीमुळे उत्पादन अधिक आणि अधिक किफायतशीरपणे करण्यास चालना मिळाली आणि भांडवलशाहीचा जन्म झाला. पाटणकर यांनी हे दाखवून दिले आहे की, जेव्हा खुद्द उत्पादनात स्थिर भांडवलाची वाढ होते व त्याला मध्यवर्ती स्थान मिळू लागते, तेव्हा औद्योगिक क्रांतीची सुरुवात होते. तशी ती इंग्लंडमध्ये झाली, तेव्हा केवळ भांडवलसंचयच झाला नाही; तर यंत्रांचे उत्पादन वाढत गेले होते. इकडे आलेल्या इंग्रजांच्या मागे ही आर्थिक शक्ती होती. त्यांनी प्रथम व्यापारासाठी प्रवेश मिळवला आणि व्यापाराच्या संरक्षणासाठी मुलुखही घेता येतो हे पाहिल्यावर तो घेण्यास सुरुवात झाली. त्यासाठी इथली राजकीय आणि सामाजिक परिस्थिती अनुकूल होती.

इंग्रजांचे आर्थिक धोरण, भारताचे शोषण इत्यादीसंबंधात नवी माहिती उपलब्ध झाली आहे आणि त्यामुळे पूर्वी मांडलेली काही मते अवास्तव ठरत आहेत. पाटणकर यांनी प्रा. दातवाला यांचे एक विधान यासंबंधात दिले आहे. मॅन्चेस्टरच्या कापडगिरण्यांना कापूस मिळावा या हेतूने शेतीविषयक सुधारणा इंग्रजांनी केल्या असे म्हटले आहे. पाटणकर यांनी म्हटले आहे की, ईस्ट इंडिया कंपनीने कापसाची मिरासदारी निर्माण केली असे दिसत नाही. तसे असते तर इथे निघालेल्या कापडगिरण्यांना कापूस मिळाला नसता. पाटणकर यांच्या विधानास पूरक म्हणून असेही विचारता येईल की, कंपनीच्या काळात शेतीसुधारणा किती झाल्या आणि त्यासाठी अवसर तरी किती होता? मॅन्चेस्टरला अमेरिकेतून सर्वात अधिक कापूस मिळत होता. तिथल्या यादवी युद्धाच्या काळात तिकडची आयात बंद झाली, तेव्हा इथल्या कापसाचे भाव गगनाला भिडले. शिवाय तलम कापडासाठी इजिप्तचा लांब धाग्याचा कापूस होता. इथे लांब धाग्याचा कापूस काढण्याच्याही बाबतीत प्रगती झाली नव्हती.

भारतातून इंग्लंडकडे खंडणीच्या रूपाने किती संपत्ती जात होती, यासंबंधी बरीच आकडेवारी यापूर्वी दिली गेली आहे. यासंबंधात भारतीय अर्थशास्त्रज्ञांतही एकवाक्यता नाही. परंतु एक मात्र खरे की, येथील सरकारी अधिकारी, लष्करी अधिकारी इत्यादींचा पगार आणि पेन्शन यांच्या रूपाने बरीच रक्कम नियमितपणे जात होती. तसेच इंग्रजी साम्राज्याच्या हितासाठी वायव्य अफगाणिस्तान, ब्रम्हदेश इत्यादी देशांवर स्वार्‍या केल्या होत्या. तो खर्च हिंदुस्थानच्या डोक्यावर बसला होता. इतकेच नव्हे तर सुदान इत्यादी देशांतील स्वार्‍यांचा खर्च हिंदुस्थानला करावा लागला होता. रेल्वेसाठी इंग्लंडमध्ये भांडवल उभारले जात होते. कारण इंग्रज सरकारचे म्हणणे असे होते की, इथे भांडवलसंचय होत नाही आणि लोक रेल्वेसारख्या उद्योगांत पैसे गुंतवत नाहीत. अगदी प्रारंभीच्या काळात हे खरेही असेल; पण नंतर ते सर्वार्थाने खरे नव्हते. यासंबंधात पाटणकर यांना दिनशा वाच्छा यांच्या विवेचनाचा उपयोग करता आला असता. त्यांनी म्हटले होते की, टाटा यांच्या पोलाद कारखान्यास इथे भांडवल मिळालेच, पण काही नगरपालिकांनी काढलेल्या सार्वजनिक बांधकामांसाठी लोकांनी गुंतवणूक केली होती. कारण त्यांना चार ते साडेचार टक्के दराने व्याज मिळण्याची हमी दिलेली होती. खाजगी कंपन्या आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांना भांडवल मिळते, तर ते सरकारला रेल्वेसाठी का मिळू नये? रेल्वे की पाटबंधारे असा एक वाद तेव्हा निर्माण झाला होता. या दोन्हींची गरज होती. या वादाबद्दलही पाटणकर यांनी रास्त भूमिका घेतली आहे.

भारतात जेव्हा आधुनिक कारखानदारी निर्माण झाली नव्हती, तेव्हा शेती हाच मुख्य उद्योग होता. खालच्या पातळीवरील शेतकरी त्याच्यापुरते धान्यउत्पादन करत होता आणि विणकर त्याला कापड देत होता. ही समानता म्हणायची असेल, तर पोटापुरता निर्वाह करणार्‍या व्यवस्थेवर आधारित अशी ती समानता होती, हे पाटणकर यांचे मत इंग्रज आणि त्यांची कारखानदारी येण्यापूर्वी इथे समानता आणि स्वास्थ्य होते असा युक्तिवाद करणारांना पटले नाही, तरी ते वास्तवाला धरून आहे. पाटणकर यांनी हेही दाखवून दिले आहे की, महाराष्ट्रात आर्थिक विचार बराच झाला होता आणि नव्या अर्थव्यवस्थेमुळे व्यक्तिवादही आला. असे असले तरी महाराष्ट्रीय लोकांनी कारखानदारी आणि व्यापार यांची वाढ करण्यात लक्ष घातले नाही. नुसते अर्थशास्त्रज्ञ निर्माण झाल्यामुळे अर्थव्यवहाराचे नियंत्रण आपल्या हाती राहत नाही. त्याचप्रमाणे मुंबईत कारखानदारी वाढली तरी महाराष्ट्राच्या इतर भागांत तिचा म्हणावा तसा प्रसार झाला नाही. बागायती आणि साखर कारखाने यांमुळे महाराष्ट्राच्या काही भागांत बदल झाला आहे. परंतु हे क्षेत्र मर्यादित आहे.

इंग्रजांनी इथे व्यापारासाठी प्रवेश मिळवून आर्थिक फायदा मिळवला आणि राजकीय फायदा मिळू शकतो हे पाहिल्यावर तोही मिळवला. तथापि त्याचबरोबर त्यांनी इथे दुसर्‍याही काही गोष्टी केल्या. त्यांनी पाश्चात्य शिक्षणपद्धती आणली. यासंबंधातील पाटणकर यांचे विवेचन अनेक रुढ समजुतींना धक्का देणारे ठरेल. या संदर्भात त्यांनी एडवर्ड सैद यांच्या ओरिएन्टॅलिझम या ग्रंथासंबंधी विवेचन केले आहे. सैद हा कैरोत जन्मलेला; पण त्याचे शिक्षण पाश्चात्य पद्धतीचे. त्याचे वास्तव्य अमेरिकेत असते. सैद याने त्याचे पुस्तक लिहिताना इजिप्त आणि पॅलेस्तिनी जगातील अनुभवासच प्राध्यान्य दिले आहे. पश्चिम आशिया वा अरब जग यांच्या बाबतीत इंग्रज आणि पाश्चात्य जग यांचे जे वर्तन झाले व होत असते, त्याची तुलना इंग्रज आणि भारत यांच्या संबंधांशी होऊ शकत नाही. स्वत: सैद यालाही हे मान्य आहे.

असे असले, तरी पाटणकर यांनी दाखवून दिल्याप्रमाणे काही विचारवंतांनी सैदच्या मताचा आधार घेण्याचे तंत्र अवलंबले आहे. अगदी अव्वल इंग्रजीत इंग्रजांचे सर्वच चांगले आणि सर्व इंग्रजही चांगले असे मानले जात होते. परंतु दादाभाई, रानडे इत्यादींनी इंग्रजांच्या काही गोष्टी चांगल्या आहेत आणि काही इंग्रज चांगले आहेत, अशी भूमिका घेतली. ती रास्त होती. पुढील काळात गांधीवादी, प्रखर राष्ट्रवादी आणि अतिरेकी डावे यांनी इंग्रजांनी काहीच चांगले केले नाही, त्यांचे राज्य, त्यांचे शिक्षण इत्यादी सर्वच त्याज्य असे हे प्रतिपादत असतात. पाटणकर गांधीवादी श्रीमती धर्माकुमार यांचे उदाहरण देतात. पण भा. ज. प.च्या स्वदेशीवादाची भाषा समाजवादी आणि कम्युनिस्टही करत असतात.

इंग्रज येण्यापूर्वी इथे सर्व चांगले होते असेही ते म्हणत असतात. पाटणकर लिहितात, ‘‘गेल्या १०-१२ वर्षांत हे (शेवटचे) मत विशेष लोकप्रिय झालेले दिसते. आश्चर्याची गोष्ट अशी की, हे मत बर्‍याच इंग्रजीच्या प्राध्यापकांनी मांडले आहे. शिक्षणासाठी परदेशी जाऊन आलेले, चर्चासत्रांसाठी तिकडे वारंवार जाणारे इतर विषयांचे प्राध्यापकही याच वर्गात मोडतात. या सर्वांवर आजकालच्या पाश्चात्य विचारसरणीचा प्रभाव पडला असल्यास नवल नाही. पाश्चात्य देशांत शिकलेल्या या लोकांनी इंग्रज व इतर पाश्चात्य लोक, संस्था, विचारप्रणाली इत्यादींच्या विरोधी एक आघाडीच उघडली आहे.’’ आपल्याकडे जसे पंचतारांकित डावे आहेत त्यांचेच हे भाऊबंद आहेत असे म्हटले पाहिजे. स्पष्ट बोलायचे तर हा बौद्धिक अप्रामाणिकपणा आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की यांची ही भूमिका हीसुद्धा त्यांची स्वत:ची नाही. तीही पाश्चात्य देशांत शिकलेल्या व शिकवणार्‍यांकडून उसनी घेतली आहे. सैद स्वत: अमेरिका सोडून कैरोत जाण्यास तयार नाहीत. त्यांना ते विश्व परके वाटते, असे त्यांनीच लिहिले आहे.

पाटणकर यांनी आपला मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी गौरी विश्वनाथन, स्वाती जोशी आणि गणेश देवी या तिघांच्या पुस्तकांचा आधार घेऊन त्यांतील युक्तिवाद खोडून काढला आहे. तो मुळातूनच वाचणे योग्य. विशेषत: गणेश देवी यांच्या अज्ञानाचे जे नमुने पाटणकर यांनी दिले आहेत, ते पाहिल्यावर अशांना विद्यापीठात कसे स्थान मिळते, त्यांची बाष्कळ पुस्तके इंग्रजीत कशी प्रसिद्ध होतात, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

व्यक्तिवादातून महाराष्ट्रात काही चळवळी सुरू झाल्या. भांडवलशाहीमुळे हे मूल्य निर्माण झाले, तसेच पोपशी झालेल्या संघर्षातून जो प्रॉटेस्टंट पंथ तयार झाला, त्यानेही यास चालना दिली. आपल्याकडे याचा उदय इंग्रजी राजवटीत झाला असला तरी भांडवलशाही नसताना किंवा प्रॉटेस्टटिझम नसताना हा व्यक्तिवाद इथे कसा आला, हे कोडे उलगडत नाही हे पाटणकर यांचे विधान मान्य होईल. या प्रश्नाची अनेक उत्तरे संभवतात. त्यांपैकी म्हणजे इथे एक पोथीवादी धर्म नाही. षडदर्शने आहेत आणि जो धर्म आहे तो संघटित (ऑर्गनाइज्ड) नाही हे असू शकेल. हिंदुत्वनिष्ठ संघटित धर्माच्या प्रेरणा व त्याची मूल्ये रुजवू पाहतात आणि फसतात.

इंग्रजांनी त्यांची विद्या इथे आणली खरी; पण तिचे स्वागत करण्यास इथला पुढारलेला वर्ग तयार होता. राजा राममोहन राय यांनी संस्कृत पाठशाळा सरकारने काढू नयेत, असे सांगणारा अर्ज सरकारकडे केला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, संस्कृत भाषेच्या व्याकरणातील सूक्ष्म भेदांचे अध्ययन करण्यात तरुणांची बारा वर्षे गमवण्यापासून कोणत्याही प्रकारची सुधारणा होणे शक्य नाही. लोकांची सुधारणा व्हावी असा सरकारचा हेतू आहे; तर उदार व सुधारलेल्या शिक्षणपद्धतीचा आश्रय त्याने घेतला पाहिजे. यात गणित, भौतिक विद्या, रसायनशास्त्र, शरीरशास्त्र व इतर उपयुक्त शास्त्रे यांचा समावेश असावा. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनाही इंग्रजी ही वाघिणीचे दूध आहे, असे वाटत होते. रमाबाई रानडे यांनी त्यांच्या आठवणींच्या पुस्तकात प्रसिद्ध गणिती छत्रे हे स्त्रियांच्या वर्गात गणित, भूगोल, खगोलशास्त्र इत्यादी विषय कसे शिकवत याची माहिती दिली आहे. यावरून आपल्या पहिल्या पिढीच्या लोकांना इंग्रजी विद्या म्हणजे काय अभिप्रेत होते, हे स्पष्ट होते. पाटणकरांनी हा मुद्दा अनेक उदाहरणे देऊन मांडला आहे.

यातून पाटणकर प्रा. भालचंद्र नेमाडे यांच्या देशीवादाकडे वळतात. नेमाडे यांच्या भूमिकेचा त्यांनी गोषवारा दिला आहे आणि त्यांच्या विचारसरणीतील त्रुटी व विसंगती स्पष्ट केल्या आहेत. परकी मूल्यांचे, विचारांचे व संस्कृतीचे आक्रमण होते तेव्हा मानवी समूह देशीवादी होतात असे प्रतिपादन करून नेमाडे यांनी त्यांच्या विचारांचे स्पष्टीकरण केले आहे; तर त्यातील विसंगतीवर पाटणकर यांनी बोट ठेवले आहे. बाहेरून काहीच घेऊ नये असे नेमाडे सांगत नसले, तरी जे घ्यायचे त्यासंबंधीची प्रमाणके आपली असली पाहिजेत. आपली म्हणजे कोणाची याचे स्पष्टीकरण नेमाडे यांनी केले नसल्याचे पाटणकर सांगतात. नेमाडे यांनी असेही म्हटले आहे की, कादंबरीवाङ्मय हे जगभर समाजचिंतनाचे मोठे वाहक ठरले आहे आणि व्यक्ती व समाज यांच्या संदर्भात अनेक प्रश्न असतात त्याबाबत निश्चित भूमिका घेऊन कादंबरीकाराने कृती केलेली असते.
पाटणकर यांनी सार्त्र याच्या लिखाणातील उतारा देऊन वाङ्मयाची कृतिशीलता, भाषिक कृती इत्यादी नेमाडे यांच्या संकल्पनांची खाण कोठे आहे हे दाखवून दिले आहे.

आपल्यावर गेल्या दीडशे-दोनशे वर्षांचे काही संस्कार आहेत. लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य इत्यादी कल्पनांपासून अनेकविध शास्त्रांचे अध्ययन इथे नव्यानेच सुरू झाले. राजकीय आणि आर्थिक परिवर्तनातून विशिष्ट प्रकारचा समाज तयार झाला. एकोणिसाव्या शतकातील आपले पुढारी इंग्रजी विद्या व संस्कृती यामुळे काही काळ स्तिमित झाले; पण भांबावले नाहीत. इतिहासाचार्य राजवाडे यांनी एकप्रकारे देशीवादाचा पुरस्कार केला, पण त्यांचा देशीवाद युयुत्सु होता. जगाच्या साहित्याशी स्पर्धा करण्यास उभे राहायचे, तर संरक्षक भिंती उभ्या करता येणार नाहीत, असे राजवाडे सांगत होते. जे आहे तेच श्रेष्ठ म्हणा आणि उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन त्याची प्रशंसा करून तेच जगाच्या साहित्याच्या बरोबरीचे ठरवा, ही भूमिका पाटणकर यांना मान्य नाही.
मराठीच्या उपेक्षेसंबंधी बोलताना काहीजण अनेक गोष्टींचे भान विसरून उगाच हळवे होतात वा काही तसे झाल्याचे भासवतात. पाटणकर यांनी यासंबंधात जे म्हटले आहे, ते मराठीच्या विकासाच्या व भवितव्याच्या दृष्टीने अधिक उपयुक्त आहे. त्यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत मराठी ही ज्ञानवाहक भाषा आहे तोपर्यंत तिला दुयम स्थानच मिळणार. जेव्हा ती ज्ञानोत्पादक भाषा होईल, तेव्हा हे चित्र पूर्णत: बदलेल.
अशा रीतीने आर्थिक, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रांत एकोणिसाव्या शतकात स्थित्यंतराची प्रक्रिया सुरू कशी झाली आणि ती अपुरी राहिल्यामुळे येथील क्रांती कशी अपुरी राहिली, हा विषय पाटणकर यांनी समर्थपणे हाताळला आहे.

Write your review for this book

Other works of रा. भा. पाटणकर
   सौंदर्यमीमांसा
   कमल देसाई यांचे कथाविश्व
   मुक्तिबोधांचे साहित्य
   साहित्यविचार आणि सौंदर्यशास्त्र
   कथाकार शांताराम

Similar books:
  समीक्षा
   सर्व सुर्वे
   दुनिया तुला विसरेल!
   धार आणि काठ
   साहित्यगंगेच्या काठी
   कुमार गंधर्व: मुक्काम वाशी
   More ...  
  वैचारिक
   भारतीय संस्कृती
   तुमच्या माझ्यासाठी
   मराठी रियासत - खंड १ ते ८
   यमुनापर्यटन
   सूर्य पाहिलेली माणसं
   More ...  
  वैचारिक
   काळाची पाऊले
   सार्थ ज्ञानेश्वरी प्रस्तावना
   मंजिल दूरच राहिली
   फलज्योतिष: शास्त्र की अंधश्रद्धा
   मी माझा
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.