|
चकवाचांदण : एक वनोपनिषद
Author: मारुती चितमपल्ली
Publisher: मौज प्रकाशन
|
|
Price: $22.85 $18.28 20% OFF ( ~700 Pages, R750) Was recently Out of Print.*
Was recently Out of Print. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books.
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: निसर्ग-अभ्यासक आणि जीवसृष्टीचा वेध घेऊन नैसर्गिक गुपितांचे संदर्भ उलगडणारे लेखक म्हणून प्रसिद्ध असणारे मारुती चितमपल्ली यांनी बरीच वर्षं वनअधिकारी पदावर काम केलं. आणि या वाटचालीत जमवलेल्या माहितीचा खजिना त्यांनी वेळोवेळी लेखन करून मराठी वाचकांपुढे ठेवला. काही वर्षांपूर्वी त्यांनी लिहिलेलं आणि मौज प्रकाशन गृहाने प्रकाशित केलेलं चकवाचांदण हे आत्मचरित्र श्री. चितमपल्लींच्या वन-अनुभवांचं मनोज्ञ दर्शन घडवतं. जंगलासारख्या नित्यजागृत आणि विविधरंगरेखांनी परिपूर्ण अशा घरात राहिलेले चितमपल्ली या पुस्काच्या पानापानावर भेटतात. वनोपनिषदाचा अभ्यास आणि रानावनांमध्ये दडलेले संस्कृतीचे धुमारे त्यांनी शोधले आणि त्यापूर्वी ते ओळखले. म्हणूनच तर ते तिथलं इतकं सुंदर जीवन मनापासून जाणू शकले. मनात एक ध्यास घेऊनच ते जंगलाला सामोरं गेले. जंगलाने त्यांना रानभूल कशी घातली, त्यांचा वनवास सुखाचा कसा केला हे पुस्तक वाचताना उलगडत जातं. सहजशैलीत आणि अरण्याच्या कुशीत शिरून लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे खरोखरीचंच वनोपनिषद आहे. सारं अरण्यच एक प्राणमय जीव आहे, असं म्हणणारे चितमपल्ली अरण्यांचाच एक श्वास होऊन हे वनोपनिषद सांगताना वनर्षी बनून गेले आहेत.
Review courtesy of Maharashtra Times: महाराष्ट्र टाईम्स रविवार २९ जानेवारी २००६ हिरव्या अक्षरांचं आरण्यक
मारुती चितमपल्ली आज सोलापुरात माणसांच्या जंगलात असतील. पण त्यांचा उभा जन्म गेलाय तो खर्याखुर्या जंगलात. त्यांना माणसांपेक्षा पशुपक्ष्यांचा सहवास अधिक मिळालाय. माणसांच्या भाषेपेक्षाही अरण्यातली हिरवी अक्षरं त्यांना अधिक चांगली कळत असणार. या जिवंत, रसरशीत हिरव्या अक्षरांची काळ्या शाईतली प्रतिबिंबं म्हणजे चितमपल्लींचं लेखन. गेल्या तीन दशकांत त्यांनी ते विपुल केलं आहे. या सार्या लेखनाचा कळस शोभावा, असं त्यांचं आत्मचरित्र अलीकडेच प्रसिद्ध झालं. त्याचं नाव चकवाचांदण.
या नावाचा खुलासा स्वत: चितमपल्ली यांनीच केला आहे. पारध्यांच्या भाषेत चकवाचांदण म्हणजे घुबड. आपल्या परंपरेत अभद मानल्या गेलेल्या या पक्ष्याचं इतकं सुंदर नाव असावं, याचं चितमपल्ली यांना नवल वाटलं. पण घुबड सांजवेळी अ३रडू लागलं की रानात फिरणार्यांना रानभूल पडते. मग थोड्या वेळाने शुक्राची चांदणी उगवली की तो दिशाभूल करणारा चकवा निघून जातो. म्हणून चकवाचांदण. चितमपल्लींना हा शब्द म्हणजे संधिप्रकाश आणि गूढता यांचं प्रतीक वाटला. 'आयुष्याची सुंदर वाट सापडली. अरण्यावरच्या आकाशात उगवलेल्या शुक्राच्या चांदणीचं सौंदर्य अगदी आगळवेगळं.' असंही त्यांनी म्हटलं आहे.
त्यांच्या या विस्तृत आत्मचरित्रात आयुष्याच्या या सुंदर वाटेचं वर्णन तर आहेच; पण त्यातून दिसणारा, त्यांच्या जिवाभावाचा होऊन शब्दात उतरणारा निसर्ग फार निराळा आहे. मराठी साहित्याने बराच काळ खोटा निसर्ग पाहिला. विशेषत: भावकवितेने तर अंगणी फुललेला गुलमोहर, खेड्यातले कौलारू घर, पाण्यातलं चांदणं, रिमझिम रेशीमधारा या पलीकडचा अस्सल, बहुरंगी निसर्ग कधी पाहिलाच नाही. हे उथळ, संवेदनांचा परीघ कोता करणारं चित्रण एकीकडे तर दुसरीकडे 'एण्ड अ२फ इनोसन्स'च्या युगात जगभर माणसांनी निसर्गाला आपल्या राजकारणात खेचून आणलेलं. अनेक अर्थांनी. 'लंगूर्स अ२फ अबू'सारख्या पुस्तकांनी वानरांच्या समूहजीवनातलं राजकारण दाखवलं. व्यंकटेश माडगूळकरांनी 'सत्तांतर'च्या रूपाने तीच वाट चोखाळली.
चितमपल्लींची निसर्ग समजावून घेण्याची आणि देण्याची वाट पूर्णपणे वेगळी आहे. ती त्यांच्या या आत्मचरित्रात ठायी ठायी उमटली आहे. ही वाट परंपरेच्या मार्गाने जाणारी, निसर्गाच्या सहवासात राहणार्या माणसांच्या श्रद्धा, समजुती आणि ज्ञनाचा आधार घेत पुढे जाणारी, आधुनिक मानवी संवेदना आणि राजकारण जंगलावर न लादणारी अशी आहे. उलट ही वाट निसर्गाकडूनच सतत घेत राहते. त्यांच्या या वाटेमुळे हा शोध गूढरम्य होत जातो. तो लोकश्रद्धा आणि लोकज्ञन यांच्यात डूब देऊन प्रवास करत राहतो. (या लोकश्रद्धा आधुनिकांना अंधश्रद्धा वाटत असतील कदाचित!) पुस्तकाच्या नावापासूनच ही सुरुवात होते. चितमपल्लींच्या या वाटेचं वेगळेपण असं की त्यात 'रस्टिक इनोसन्स' आहे. मानवी नात्यांचा अजस्त्र कोलाहल चालू असताना काळजाच्या कंदाला होणारा वन्यजीवनाचा इनोसण्ट पण सखोल स्पर्श ही चितमपल्लींच्या लेखनाची खरी खुमारी आहे. व्यंकटेश माडगूळकरांनी त्यांना सांगितलं होतंः तुमच्या लेखनात वन्यजीवन आहेच; त्याला आता मानवी संवेदनांची जोड द्या. म्हणजे ते ललित लेखन होईल. चितमपल्लींनी तशी जोड नक्कीच दिली. पण ती माणसाच्या बाजूने निसर्गाकडे जाणारी नव्हती; तर निसर्गाच्या बाजूने माणसाकडे येणारी होती.
ती कशी? रानकुत्र्यांच्या संशोधनाचा प्रकल्प त्यांनी पुरा केला. या प्रकल्पात मदत करणार्या टांगसूबद्दल चितमपल्ली लिहितात: पालकाप्य मुनीने हत्तींचा, अजमुनीने रानबकर्यांचा, जाबालाने रानमेंढ्यांचा, शातकणीर ऋषीने कांचनमृगांचा अभ्यास करावा, तसा टांगसूने रानकुत्र्यांचा अभ्यास केला होता. रानकुत्र्यांच्या कळपांनी टांगसूला स्वीकारलं होतं. म्हणूनच त्याला त्यांच्याविषयी इतकं बारीकसारीक निरीक्षण करता आलं. त्याच्यापुरतं म्हणायचं झालं तर नागझिरा उमरझरी हा त्याचा गंथ होता. रानकुत्री त्या ग्रंथातील अक्षरं होती अन तो ग्रंथ त्याला एखाद्या ज्ञनी मुनिवत पाठ होता.
अशी अनेक माणसं या वाटेवर आहेत. त्यातले एक पवनीचे माधवराव पाटील. जंगली प्राण्यांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण फिरायला लागू नये म्हणून उतारवयात कातळ फोडणारे. झरा लागल्यावर पाणवठा बांधून घेणारे. त्यासाठी अंजन-उंबराचं झाड आहे म्हणजे खाली पाणी असणाराच असा आडाखा बांधणारे. जन्मभर शिकार करून जगलेला पण आता चिमुकला ससा पाळून पैशाला स्पर्शही न करता जगणारा पांडुरंग. गोळी लागून जखमी झालेल्या मादीला खांद्यावर टाकून पळणारं अस्वल पाहिल्याने डोळ्यात पाणी येणारा सुका.
ही वाट भिनल्यानेच चितमपल्ली नोकरीचे अनुभव लिहिताना किंचितही कटू होत नाहीत. अन्यायाचे प्रसंग सांगतानाही त्यांचे शब्द आदळआपट करत नाहीत. छत्तीस वर्षांची वन खात्यातली नोकरी त्यांना वरदानासारखी वाटते. या काळात त्यांनी रानकुत्र्यांचा जगभर गाजलेला शोध जसा घेतला तसा तणमोरांचाही घेतला. कोणत्या तरी अनामिक प्रेरणेने ते संस्कृत शिकू लागले. या अभ्यासाने तर गुहाच उघडली. पुढे मराठीतला मैलाचा दगड ठरावा असा पक्षिकोश त्यातून जन्माला आला. ही सारी वाटचाल चितमपल्ली अतिशय निरलसपणे सांगत राहतात. त्यात स्वत:कडे मोठेपणा घेण्याचा किंचितही सोस दिसत नाही. सतत दिसत राहते ते त्यांचे अरण्यप्रेम. हे प्रेम इतके टोकाचे की पनवेलच्या भातखंडे शास्त्र्यांनी शिकवलेली एकेक आसने ते पहाटे करतात तेव्हा भुजंगासन, शलभासन, मयूरासन, सिंहमुदा, क्रौंचासन, गोमुखासन करताना त्यांना पतंजलीचं वाक्य आठवतंः 'वन्यप्राणी हे खरोखरीचे योगी आहेत.' अशी कितीतरी वाक्यं काढून दाखवता येतील...
चितमपल्ली यांच्यामुळे मराठीच्या साहित्यविश्वाचे एक नवं दालन समृद्ध झालं. साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळाल्याने त्याची योग्य ती पावतीही त्यांना मिळाली. श्रद्धा, अखंड परिश्रम, निष्ठा आणि निरलस ध्यास यांच्या सोबतीने एखादा माणूस कुठवर झेप घेऊ शकतो, याचा हे आत्मचरित्र म्हणजे प्रसन्न आरसा आहे. ते वाचून वाटू लागते की चितमपल्ली यांनी आणखी खूप लिहावे. त्यांचे सारे लेखनसंकल्प पुरे व्हावेत आणि त्यांनी अमर्याद प्रेम केलेली हिरवी दुनिया वाचकांना अखंड भेटत राहावी!
- सारंग दर्शने
Other Links:
|
 |
 |
|