|
रागमाला चित्रातील संगीताविष्कार
Author: स्नेहल अभ्यंकर
Publisher: प्रतीक ऑफसेट प्रिंटर्स
|
|
Price: $5.14 $4.11 20% OFF ( ~140 Pages, R150)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: हे पुस्तक लेखिकेने स्वत: "अजिंक्य, सारंग सोसायटी, गारखेड रस्ता, औरंगाबाद" येथून प्रकाशित केले आहे. सर्वसाधारणत: पंधराव्या शतकापासून ते एकोणिसाव्या शतकापर्यंत विविध राजवटीखाली, विविध राज्यांमध्ये रागमाला चित्रे ही रेखाटली गेली. यातून वेगवेगळ्या चित्रशैली व परंपरा उदयास आल्या. चित्रकारांनी चितारलेली चित्रे ही कधी स्वत:च्या संकल्पनेनुसार, तर कधी राजाज्ञेनुसार चितारली गेली. ही सुंदर चित्रे भारतात व भारताबाहेरही मोठ्या प्रयत्नाने जतन केली आहेत.
Review courtesy of Loksatta: लोकसत्ता रविवार, १८ एप्रिल २००४
रागमालेद्वारे चित्रकला व संगीताचा वेध
'रागमाला चित्रातील संगीताविष्कार' हे पुस्तक नुकतेच वाचण्यात आले. डॉ. स्नेहल अभ्यंकर यांचे हे पुस्तक अनेक दृष्टिकोनातून उल्लेखनीय आहे. दोन ललित कलांच्या केवळ साहचर्याचेच नव्हे तर स्थूल अर्थाने एकात्रित अभिव्यक्तीचे सूचनच त्या शीर्षकातूनही सहज होते. संगीत क्षेत्राशी मानसशास्त्र, सौंदर्यशास्त्र, अध्यात्म, रससिद्धान्त अशा अनेक संगीतेतर शास्त्रांची सांगड, आजकाल, व्यासंगी मंडळी घालताना दिसतात. एका अर्थाने हे सर्व मूळ संगीतकलेला विविध परिमाणे देणारे विधायक कार्यच आहे. किंबहुना वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास, असेही म्हणता येईल की, मूळ 'संगीत' कला आणि तिचा परिघ आणि उंची इतकी आहे की, असे अनेक सिद्धान्त वा प्रणाली त्या संदर्भात अभ्यासाअंती वापरता येतील.
याचप्रमाणे विविध ललित कलांचा परस्परसंबंध, त्यांच्यामधील साधर्म्ये हाही अभ्यासाचा विषय होऊ शकतो. प्रस्तुत पुस्तकात 'रागमाला चित्रे' आणि संगीताविष्कार यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. चित्रकला आणि संगीत या कलांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून, रागमाला चित्रांच्या संदर्भातील ऊहापोह याठिकाणी लेखिकेने केला आहे. प्राचीन भारतीय संगीतशास्त्रातील काही सिद्धान्त दाखले यांचे संदर्भ या ठिकाणी येणे अपरिहार्यच होते. त्याप्रमाणे योग्य त्या ठिकाणी ते देण्यात आले आहेत. संगीताचे अध्ययन आणि अध्यापन यामुळे संगीतशास्त्राचा त्यांचा परिचय असणे स्वाभाविकच होते. बबनराव हळदणकरांचा अभिप्राय पुस्तकाला लाभला आहे.
पुराणवस्तुसंग्रहालयामध्ये रागरागिण्यांवर आधारित चित्रे बघितल्यानंतर प्रस्तुत विषयाचे संशोधन लेखिकेने केले आहे. चित्रकला व रागाविष्कार यांचा परस्पर संबंध शोधण्यासाठी जी. एन. जोशी यांनी पूर्वी एच.एम.व्ही. कंपनीच्या स्टुडिओमध्ये प्रयोग केल्याचा संदर्भ संबंधितांना या ठिकाणी आठवेल. परंतु ठोसपणे अभ्यास करुन निष्कर्षाप्रत येणे तसे कठीणच म्हणावे लागेल. कारण मुळातच संगीत ही अमूर्त कला आहे. चित्रकला ही दृक-कला आहे. निर्गुण रुपाला सगुण साकार करणे हे भक्त आणि ईश्वराच्या संदर्भात घडत असते. तेही सापेक्षच असते. तसेच 'राग' कल्पनेची सचित्र कल्पना करणे हेही आपल्या पूर्वसुरींनी केले आहे. चित्रकारांनी आपल्या कल्पनेनुसार, तर कधी राजाज्ञेवरुन, त्याच्या आवडीप्रमाणेही चित्रांचे स्वरुप ठरविले असावे, अशी एक शकयता लेखिकेने वर्तविली आहे. या संदर्भात या ठिकाणी रसिकाग्रणी, व्यासंगी लेखक गोविंदराव टेंबे यांच्या 'कल्पना संगीत' या ग्रंथाचे उदाहरण उदधृत करावेसे वाटते. रागध्यान आणि राग स्वरुप यासंबंधीचे त्यांचे विवेचन व 'रागाची' किंबहुना विवक्षित राग संकल्पनेची 'कल्पनारम्य' सगुण मूर्ती त्यांनी शब्दातून रेखाटली आहे. एखाद्या चित्रकाराला त्यावरुन 'रागचित्र' रेखाटणे शकय व्हावे. प्रस्तुत पुस्तकात सात प्रकरणे असून, रागवर्गीकरण व रागमाला चित्रे ही प्रकरणे संगीतविषयक आहेत. रागांशी संबंधित विषय- यावर त्यात भर दिला आहे. प्रकरण दोन व तीनमधील सांगीतिक विवेचनानंतर प्रकरण चारमधील 'रागमाला चित्रे' आणि त्यांच्या विविध शैली यातून लेखिकेने त्यातील चित्रकला, रंगसंगती व इतर तपशील दिला आहे. त्यामध्ये चित्रकलेतील सौंदर्य वैशिष्ट्ये प्रादेशिक आणि विविध शैलींमधील तपशील यांचे विस्तृत दाखले दिले आहेत. चित्रकलेच्या दृष्टीने असलेली नेमकी विविधता आणि सूक्ष्म बारकावे यावर भर दिला आहे. चित्रांच्या माध्यमातून घडणारे रागदर्शन व त्याला रागवर्णनात्मक काव्याची जोड अशी रागमाला चित्रांची व्याख्या लेखिकेने स्वीकारली आहे. अकराव्या ते पंधराव्या शतकाच्या दरम्यान जैन धर्माच्या सचित्र पोथ्या निर्माण झाल्या. त्यातील 'कल्पसूत्र' पोथीमधील रागदेवता व त्यांचे सांगीतिक संदर्भ व त्यानंतर पंधराव्या शतकापासून ते एकोणिसाव्या शतकापर्यंतच्या लघुचित्र मालिकेमधील शैली व प्रदेशानुसार घडलेले विविध आविष्कार यांचा त्यांनी निरीक्षणातून अभ्यास केला आहे, असे लक्षात येते. त्यातील बारकावे, संगीतकला व चित्रकला यांच्या संदर्भातून त्यांनी टिपले आहेत. राजस्थानी, मुघल, पहाडी व दख्खनी अशा चार शैलींमधील, चित्रांमधील तपशील जाणून घेतल्यावर 'राग' या सांगीतिक कल्पनेशी निगडीत प्राणी, निसर्ग, मनोवस्था, ऋतू यानुसार काही निष्कर्ष लेखिकेने काढले आहेत. ते आपल्या पारंपरिक सांगीतिक संकेतांशी आणि कल्पनांशी जुळणारे आहेत. पाऊस, सूर्यप्रकाश, ऋतू, मोर, कोकीळ, हरीण, वीरयोद्धा, दास-दासी त्यांच्या हातांमधील वाद्ये यातून काही रागांचे सूचन लक्षणीय वाटते. त्याच वेळी त्यातील व्यक्तिसापेक्षता, चित्रकारांच्या संदर्भातील शैलीनुसार असलेली, कधी कधी एकाच रागातील चित्रीकरणातील फरक राग 'तोडी'च्या उदाहरणावरुन त्यांनी स्पष्ट केला आहे. त्याबरोबरच प्राचीन राग-संकल्पना व प्रचलित रागस्वरुप यातील वेगळेपणा त्यांनी 'हिंडोल' रागाच्या उदाहरणावरुन निदर्शनास आणला आहे. हे सांगीतिक निष्कर्षही महत्त्वाचे ठरतात. प्रस्तुत पुस्तकाचा आशयाच्या दृष्टीने असलेला वेगळेपणा आणि नावीन्य लक्षवेधी आहे. अभिव्यक्तीच्या दृष्टीनेही पुस्तक वाचनीय ठरले आहे. लेखिकेची भाषा साधी, प्रवाही व प्रासादिक आहे. नेमके मुद्देसूद निवेदन व एकूण विवेचनातील आटोपशीरपणा यामुळे विषय आकलनसुलभ होतो. आकर्षक चित्रांचा अंतर्भाव केल्यामुळे पुस्तकाचे बाह्य देखणेपणही द्विगुणित झाले आहे. ललित कलांचे विविधांगी आणि स्वतंत्रपणे व एकात्रित असेही अध्ययन हे सतत चालूच राहिले पाहिजे. त्यातून पुढच्या संशोधनाचा धागाही सापडू शकतो.
सुलभा पंडित
|
 |
 |
|