|
पुरुषोत्तमाय नम:
Author: मंगला गोडबोले
Publisher: राजहंस प्रकाशन
|
|
Price: $4.28 $3.42 20% OFF ( ~63 Pages, R125) Was recently Out of Print.*
Was recently Out of Print. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books.
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Review courtesy of Loksatta: लोकसत्ता रविवार २३ जुलै २००० |ऽ पु. ल. अनंत, पु. ल. कथा अनंता |ऽ
"हरी अनंत हरीकथा अनंता" तुलसीदासाच्या या वचनाचाच प्रत्यय पु.ल. आणि त्यांच्या बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्वात येत राहिला आहे. पु.लं.विषयी आपल्याला माहीत असलेला तपशील, पुलकथा इतरांना सांगायच्या आणि त्या इतरांनीही त्या आधीपासून माहीत असल्या तरी त्यांचं पुन:पुन्हा श्रवण करण्यातला आनंद नव्याने उपभोगायचा पु.लं.च्या चाहत्यांचा हा छंद गेली कित्येक वर्षे आनंदवर्षा करीत आला आहे. पु.लं.ना रसिकांचं सामान्य आणि असामान्य रसिकांचं उदंड प्रेम लाभलं, ते त्यांच्यातल्या सहजसुंदरतेमुळे. प्रिय व्यक्तीच्या निधनानंतर तिच्यावरच्या आपल्या गाढ प्रेमाचा प्रत्यय आपल्यालाच प्रगाढतेनं येत राहतो. पु.लं.च्या निधनानंतर त्यांच्या लाखो चाहत्यांची अशी अवस्था झाली. आधीच अनेक पारायणं केलेल्या त्यांच्या पुस्तकांची, कॅसेट्सची पुन्हा पुन्हा नव्यानं पारायणं झाली. लेखकांनी, समीक्षकांनी, साहित्यिकांनी, वाचकांनी त्यांना भावलेले पु.ल. शब्दात उतरवू पाहिले. १२ जूनला पु.लं.चं निधन झाल्यानंतर १४ जून ते २१ जून २००० या काळात आकाशवाणीच्या पुणे केंद्राच्या आग्रहावरून मंगला गोडबोले यांनी पु.लं.वर सादर केलेली आठ छोटेखानी भाषणे हाही असाच एक रसिक प्रयत्न. रसज्ञ पु.लं.च्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू, त्यांच्यातील कलावंताच्या अंगच्या नाना कळा उलगडून दाखवण्याचा प्रयत्न. याच भाषणांचा संग्रह राजहंस प्रकाशनने तात्काळ "पुरुषोत्तमाय नम: या नावाने प्रसिद्ध केला आहे.
पु.लं.च्या निधनामुळे हळहळणार्या अशा हजारोलाखो माणसांपैकी मी एक. ना त्यांची आप्तेष्ट, ना स्नेही, ना रोजच्या घरोब्यातली, ना कोणत्याही अर्थाने त्यांची जवळीक मिरवू शकणारी. फक्त एक चाहती. जसे हजारो चाहते आज भारतात आणि जगात आहेत तशीच अशा अगदी सच्च्या विनम्र भावाने मंगला गोडबोले यांनी पु.लं.संबंधातली आपली भूमिका या संग्रहातील शेवटच्या लेखात "समग्रांकडून स्वल्पाकडे प्रवास करताना या लेखात व्यक्त केली आहे. तीत स्वत: लेखिकेच्या नितळ रसिकतेचे, संवेदनशीलतेचे मनोज्ञ दर्शन घडल्याशिवाय राहत नाही.
लेखक, गायक, वादक, संगीतकार, दिग्दर्शक, अभिनेता, सामाजिक बांधिलकी मानणारे समाजमनस्क, विनोदाच्या अंगाने जाता जाता पाहता पाहता कल्याणकारी करुणेला स्पर्श करणारे, हसवता हसवता अंतर्मुख करणारे पु.ल. अशी पु.लं.ची अनेक रूपे. या सर्व रूपांचा वेध इतक्या छोट्या लेखांच्या मर्यादेत घेणे, ही लेखिकेची कसोटीच होती लेखिकेला पु.ल. कसे समजले आहेत, याचीच कसोटी होती ती. पु.लं.च्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मंगला गोडबोले यांना स. ह. देशपांडे यांच्या संगतीने "अमृतसिद्धी: पु.ल. समग्रदर्शन हा द्विखंडात्मक ग्रंथ सिद्ध करण्याची संधी लाभली होती. पु.लं.वरचा त्यांचा व्यासंग, अभ्यास यानिमित्ताने अधिक समग्रतेने, सापेक्षतेने झाला. या अभ्यासाच्या आधारेच त्यांनी आकाशवाणीसाठी ही छोटी पण अतिशय नेटकी व नेमकी भाषणे तयार केली. या नेटकेपणातून व नेमकेपणातून त्यांना पु.लं. कसे समजले आहेत, याचा प्रत्यय येतो. सामान्य माणसांच्या जगण्याला संवेदनशीलतेने भिडण्याचा आणि तितक्याच संवेदनाक्षम शैलीत ते टिपण्याचा गुण गोडबोले यांच्या स्वत:च्या लेखनातही आहे. विनोद हाही त्यांचा लाडका प्रांत. तेव्हा पु.लं.च्या अभ्यासात त्या रंगून गेल्याचे या पुस्तिकेतल्या लेखांतूनही जाणवते. वर्ण्य विषयच मुळात रसीला असला की त्याच्या साध्यासुध्या वर्णनातही बहार येते, याचीही जाण मंगला गोडबोले यांना आहे. यामुळे या लेखांची साधी, सहज शैलीदेखील आपसूक लालित्याची वळणे घेताना दिसते आणि त्या लालित्यातले सच्चेपण आरपार जाणवत राहते.
असे घडले पु.ल., विनोदकार पु.ल., साहित्यिक पु.ल., पु.ल. एक खेळिया, सिनेमानाटकातले पु.ल., पु.लं.ची भाषाशैली, संगीतातले पु.ल., समाजमनस्क पु.ल. अशा आठ भाषणांखेरीज या भाषणमालिकेपाठची, ती पुस्तिकारूपात प्रसिद्ध करण्यापाठची भूमिका समग्राकडून स्वल्पाकडे प्रवास करताना असे नऊ लेख व शेवटी पु.लं.चा जीवनपट असे या ६३ पानी पुस्तकाचे स्वरूप आहे.
पु.ल. वाचले नाहीत असा मराठी वाचक सापडणे कठीण. (आता नव्याने पु.ल. साहित्याची विक्री धडाक्याने होते आहेच आणि नवतरुण पिढीच्या उड्या या साहित्यावर पडलेल्या आहेत ही ताजी बातमी आहे!) अशा सार्याच वाचकांना या पुस्तिकेतील संदर्भ पुन:प्रत्ययाचा आनंद दिल्याशिवाय राहणार नाहीत. पुन:प्रत्ययाचा आनंद घेणार्या मोठ्यांबरोबरच नव्या अंकुरणार्या मराठी वाचकांसाठी शाळांच्या ग्रंथालयांनीही या छोटुल्या पुस्तकाची नोंद घेणे फायद्याचे ठरावे.
रंगमंचावरील जरतारी, झिरमिळ्यांच्या मखमली पडद्याच्या पार्श्वभूमीवर सुपरइम्पोज केलेले प्रसन्नवदन पु.लं.चे छायाचित्र असा मुखपृष्ठाचा बाज आहे. -- रेखा देशपांडे
|
 |
 |
|