|
मी माझं मला
Author: शिरीष कणेकर
Publisher: दिलीप प्रकाशन
|
|
Price: $15.23 $12.18 20% OFF ( ~550 Pages, R500) Was recently Out of Print.*
Was recently Out of Print. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books.
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: प्रसिध्द लेखक शिरीष कणेकर यांचं "यात सगळं खरं लिहिलेलं नसेलही पण लिहिलेलं खरं आहे" अशी ग्वाही देऊन लिहिलेलं सत्य, परखड, वाचनीय, चटका लावणारं व हातातून सोडवणार नाही असं सिद्धहस्त लेखणीतून उतरलेलं भन्नाट, बोचरं, हळवं आत्मचरित्र
Review courtesy of Maharashtra Times: म. टा. १६ जून २०१३ ... आता मागे काहीही राहिलं नव्हतं! -- शिरीष कणेकर प्रसिध्द लेखक शिरीष कणेकर यांचं ' मी माझं मला ' हे आत्मचरित्र लवकरच ' दिलीप प्रकाशन ' तर्फे प्रकाशित होत आहे. त्यातील एका हृद्य प्रकरणाचा वेचक भाग... आपल्याला आई नाही हे मला खूप लहानपणीच कळलं . कोणी न सांगताच आपसूक कळलं . आई नाही हे माहीत नसलेला मी स्वत:ला आठवत नाही . म्हणजे कळायला लागलं म्हणतात ते हेच प्रथम कळलं असावं . पण कोणी न सांगताच ! ' माझी आई कुठाय ?' हा प्रश्न मी कधी विचारला नाही . कारण तो मला कधी पडलाच नाही . एवढं विदारक सत्य इतक्या लहान वयात मी कसं काय पचवलं असेल , याचं मलाही राहूनराहून नवल वाटतं . ज्यानं तीन वर्षांच्या मुलाच्या आईला उचलून आभाळात नेलं , त्यानंच ही शक्ती दिली असावी . कुठल्याही वेदनेनं कधी ' अगं आई गं ' असं कळवळल्याचं मला स्मरत नाही . वेदनेची ही नाळ जणू वेदनारहित शस्त्रक्रियेनं होत्याची नव्हती करून टाकली होती . मी शिशुविहारमध्ये बालवाडीत जायचो तेव्हा मुलं एकमेकांना सांगायची , ' याला आई नाही .' मधल्या सुट्टीत त्यांच्या आया डबे घेऊन यायच्या , तेव्हा ती माझ्याकडे बोट दाखवून कानात कुजबुजत . मग त्या आयांच्या नजरा गढूळ होत . एखादी कनवाळू बाई मुलाला सांगे , ' यालाही बिचार्याला देत जा तुझ्या डब्यातलं . कोण बघतं रे घरी तुझ्याकडे ?' '' आजी .'' '' आईची आई की वडिलांची आई ?'' '' आईची आई .'' मला हे अटेंशन आवडे . सहानुभूतीचा हा ओघ मला सुखावीत असे . आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत याचा मला अभिमान वाटे . हा वेगळेपणा चांगला नाही वा त्यात अभिमान बाळगण्यासारखं तर काहीच नाही , हे उमगायला आणखी काही काळ जावा लागला . मी त्रास देऊन भंडावून सोडलं की माझी आजी - आम्ही तिला मामी म्हणायचो - संतापून दातओठ खात म्हणायची . '' आईला गिळलंन आता आम्हांला गिळायला राहिलाय .'' दिवसातून एकदा तरी हे ऐकावं लागायचं . मला त्याचं काहीच वाटायचं नाही . पुढे आजीचं हे पालुपद कमीकमी होत बंद झालं . माझा त्रासही कमीकमी होत बंद झाला असावा . कोपर्यावरचा बांगड नावाचा वाणीही तिला हसून विचारायचा . '' काय आजी , नातू छळतो का अजून ?'' मी वरमून खाली पाहायचो . छळणारा नातू आणि सगळं सोसून त्याचं करणारी आजी , अशी आमची दुक्कल गल्लीत प्रसिध्द होती . मोठा झाल्यावर मी एकदा मामीला म्हटलं , '' माझ्या आईविषयी कोणीच बोलत नाही . बाकी बोलण्यासारखं तरी काय असणार ! अशी कितीशी वर्षं तिनं जगात काढली ? शिवाय बोलणार कोण ? अण्णा बोलू शकले असते . पण त्यांनी पुन्हा खेळ मांडला . त्यात त्यांना कदाचित अलाउड नसेल . तू तरी सांग . कशी होती माझी आई ? कशी दिसायची ? कशी बोलायची ? काय आवडायचं तिला ?'' मामी दात घट्ट आवळून नि:शब्द बसून राहिली . मनाला यातना झाल्या की ती नेहमी अशीच बसायची . फक्त तिच्या भुवया थरथरत राहायच्या . अधू झालेले पांढुरके डोळे सैरभैर व्हायचे . चाचपडत तिने माझा हात पकडला , पण तोंडातून शब्दही काढला नाही . मग मीही विषय सोडून दिला . आपण विशेष प्रयत्न करीत नाहीयोत , आता एवढया वर्षांनंतर आपल्याला काय पडलीय . ' इट्स ऑल ओव्हर नाऊ ' अशी मनाची समजूत करून देत मी माझ्या आईविषयीची माहिती प्रयत्नपूर्वक कणाकणाने गोळा करीत होतो . ती मराठी घेऊन बी . ए . झाली होती . आय सी ! नाटकात फार सुरेख काम करायची . रिअली ? सिनेमाची ऑफर आली होती . इंटरेस्टिंग . '' लग्नाआधी केलंही असतं सिनेमात काम . आता एक मुलगा आहे , संसार आहे , आता नाही .'' असं सांगून तिनं म्हणे नकार दिला . क्लिअर थिंकिंग . पण करायचं होतं दोन - चार चित्रपटांत काम . मला मग तिच्यावर ' यादों की बारात ' लिहिता आली असती . हा हा हा .स.स.स . गायचीदेखील छान . एच . एम . व्ही . ने तिच्या भावगीतांच्या दोन रेकॉर्ड्सही काढल्या होत्या . डोंट टेल मी . मी एच . एम . व्ही . मध्ये चौकशी केली . तिथं कशाचाच काही थांगपत्ता नव्हता . जी . एन . जोशींच्या घरी गेलो . त्यांना एक्केचाळीस सालचं त्या गाण्याचं रेकॉर्डिंग चक्क आठवत होतं . पण त्या रेकॉर्ड्स एच . एम . व्ही . कडे असणार नाहीत , हेही ठाऊक होतं . माझे सर्व मार्ग खुंटले होते . तोच त्या रेकॉर्ड्स माझ्या एका मावशीच्या इंदूताईच्या घरी असल्याचं मला कळलं . वर्षानुवर्षं ट्रंकेच्या तळाशी त्या पडलेल्या होत्या . मी इंदूताईला पत्र लिहलं , '' माझी आई कधी काळी जिवंत होती , याचा कसलाही पुरावा माझ्या वडिलांच्या घरात मला मिळाला नाही . तो तुझ्याकडे आहे , असं कळतं . त्या रेकॉर्ड्स मला दिल्यास , तर तुझे अनंत उपकार होतील ....'' रेकॉर्ड्स आल्या . त्या वाजण्याच्या अवस्थेत दिसत नव्हत्या . दोन गाण्यांना दत्ता डावजेकरांचं संगीत होतं . दुसर्या रेकॉर्डवरचं संगीतकाराचं नावही वाचता येत नव्हतं . मी एका मित्राकडून खास सोल्युशन आणून रेकॉर्ड्स साफ केल्या . त्यावरची मातीची पुटं पुसून काढली आणि प्लेअर असलेल्या एका माणसाकडे रेकॉर्ड्स वाजवायला घेऊन गेलो . माझी आई गायला लागली आणि सहजगत्या बोलल्यागत मी म्हणालो , '' ही न्यू थिएटर्सची गाण्याची स्टाइल दिसते . काननबाला वगैरे याच शैलीत गायच्या .'' माझी आई पुढे गात होती . अलिप्ततेचा मुखवटा कायम ठेवणं मला अशक्य झालं . आईचे दोन - तीन फोटो सोडून माझ्याकडे काही नव्हतं . कसल्याही आंबटगोड आठवणी नव्हत्या . तिचा आवाज माझ्या कानात नव्हता . मी पूर्णपणे रिता होतो . आता ती गात होती आणि मी ऐकत होतो . ती समोर बसून गात होती आणि मी समोर बसून ऐकत होतो . माझ्या आईचा आवाज . डोळे मिटले असते , तर जणू ती तिथंच हाताच्या अंतरावर बसली होती . कोण म्हणतं मी आईला गिळलं ? ती काय गात होती . मला गलबलून आलं . रेकॉर्ड्स टिकण्याची शाश्वती नव्हती म्हणून मी ती चार गाणी कॅसेटवर टेप करून ठेवली व कॅसेटवर लिहिलं , '' माझ्या आईची गाणी .'' नंतर एकदा मी मामीला विचारलं , ' माझी आई कशानं गेली . काय झालं होतं तिला ?'' '' काही कळलंच नाही बघ . कोणालाच कळलं नाही . रात्री अगदी उत्तम होती अन सकाळी ...'' '' नखात रोग नसलेली माझी आई सव्विसाव्या वर्षी एका सकाळी जगातून निघून जाते आणि कशामुळे गेली हेदेखील कोणालाच कळत नाही ? नवरा डॉक्टर , अख्खं हॉस्पिटल दिमतीला आणि कोणी काहीही करू शकत नाही ? तुम्ही कारण शोधण्याचा प्रयत्नही केला नाहीत ?'' मामी दात घट्ट आवळून नि:शब्द बसून राहिली . तिच्या फक्त भुवया थरथरत होत्या . आता जवळजवळ दृष्टिहीन झालेले तिचे पांढुरके डोळे जास्त सैरभैर झाले . '' कदाचित माझ्याच पायगुणामुळे ती गेली असेल , होय ना ?'' मी हिंस्रपणे म्हणालो . '' तू लहानपणी म्हणायचीस ना की मी आईला गिळलंय म्हणून .'' एकाएकी माझ्या आजीचा बांध फुटला . जर्जर झालेला तिचा कृश देह थरथरायला लागला . लहान मुलीसारखे हमके देत ती म्हणाली , '' माझी पोरगी गेली रे ... मी कैदाशीण आहे ... मीच गिळलं सगळयांना ... माझा दहा वर्षांचा एकुलता एक मुलगा गेला ... तुला माझ्या फाटक्या पदरात टाकून तुझी आई गेली .... आता तुझे वडीलही गेले ... मी खरी चांडाळीण आहे ... अजून जगतेच आहे ...'' मी तोंडातून शब्द काढला नाही . बोललो असतो , तर आवाजाने दगा दिला असता . माझ्या डोळ्यांना धार लागली होती . पण मामीच्या डोळ्यांना ते दिसत नव्हतं . मी बसलोबसलो आणि उठून बाहेर पडलो . माझे डोळे परतपरत भरून येत होते , ते सर्वस्व गमावून बसलेल्या व तरीही जगण्याचा शाप मिळालेल्या माझ्या मामीसाठी की जिचा चेहरादेखील आठवत नाही , त्या माझ्या मेलेल्या अनोळखी आईसाठी याचं भान मला नव्हतं . त्यानंतर वर्षभरात मामी लेकीकडे निघून गेली . शेवटचा पाश तुटला . मला एकट्याला खाली ठेवून माझं सगळं कुटुंब वर जमा झालं होतं . आता मागे काही म्हणजे काही राहिलं नव्हतं .
|
 |
 |
|