Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


निवडक मराठी समीक्षा
Author: गो. मा. पवार
Publisher: साहित्य अकादमी
Add to Shopping Cart
Price: $6.71 $5.36 20% OFF ( ~315 Pages, R160)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
संपादनः गो. मा. पवार आणि म. द. हातकणंगलेकर
मराठीतील समीक्षेची निकोप वाढ मुख्यत: वाङ्मयीन नियतकालिकांमुळे झाली. व्याख्यानमाला, संमेलने यांचाही समीक्षेतील नवे दृष्टिकोन मांडण्यासाठी काही वेळा उपयोग झाला. लेखक, समीक्षक, वाचक यांचे हे आदानप्रदान फारच सीमित वर्तुळात होत राहिले, तरी त्याची दखल मुख्य प्रवाहातील साहित्याला इच्छापूर्वक अथवा अनिच्छेने घ्यावीच लागली. \x९१निवडक मराठी समीक्षा\x९२ म्हणजे मराठी साहित्यजीवनाची कालप्रवाहात बदलत राहिलेली जिवंत स्पंदने आहेत. या संग्रहातल्या त्रुटी मान्य करूनही प्रत्येक साहित्यप्रेमीच्या संग्रही असायलाच हवा असा हा लेखसंग्रह आहे.
- दीपक घारे

Review courtesy of Maharashtra Times:
१६एप्रिल२०००
मराठी साहित्यजीवनाची जिवंत स्पंदने
- दीपक घारे

मराठीतील समीक्षाविचार इतर भारतीय भाषांच्या तुलनेत बराच समृद्ध आहे आणि आधुनिक मराठी साहित्याच्या जन्मापासून त्यावरची समीक्षाही होत आलेली आहे. साहित्याचा आस्वाद, विश्लेषण आणि मूल्यमापन ही समीक्षेची प्रमुख उद्दिष्टे असली, तरी तिला सहायभूत होणारी सौंदर्यचर्चा, समाज अथवा मानसशास्त्रीय सिद्धांत हेदेखील महत्त्वाचे असतात.

मराठीत साहित्यकृतींची समीक्षा करण्याच्या निमित्ताने अनेक पातळयांवर अशी वैचारिक देवाणघेवाण होत राहिली. मराठी अभिरूची घडवण्यात आणि अप्रत्यक्षपणे साहित्य समृद्ध करण्यात समीक्षेचा मोठा वाटा आहे. ‘निवडक मराठी समीक्षा’ या साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या ग्रंथात असे प्रातिनिधिक समीक्षालेख एकत्र केलेले आहेत. गो. मा. पवार आणि म. द. हातकणंगलेकर यांनी त्याचे संपादन केले असून प्रस्तावनाही लिहिली आहे.

व्याप्ती आणि खोली

या संग्रहात ‘नावल म्हणजे काय?’ या का. बा. मराठेंच्या लेखापासून भालचंद्र नेमाडेंच्या मराठी कादंबरीवरील लेखापर्यंत एकंदर एकोणतीस लेख आहेत. त्यात हरी नारायण आपटे, फडके-खांडेकरांसारखे लेखक आहेत. रा. श्री. जोग, वा. ल. कुलकर्णी यांच्यासारखे समीक्षक आहेत. वि. का. राजवाडे, द. ग. गोडसे असे अन्य ज्ञानशाखांचे अभ्यासक आहेत. रा. भा. पाटणकरांसारखे सौंदर्यशास्त्रातील जाणकार आहेत. एकूण समीक्षाव्यवहाराची व्याप्ती आणि खोली त्यातून स्पष्ट व्हावी.

मराठी समीक्षेमध्ये काही प्रश्नांची सातत्याने चर्चा होत आलेली आहे. साहित्याचे प्रयोजन काय? साहित्य अथवा कलेपासून मिळणारा आनंद कोणत्या प्रकारचा असतो? साहित्याचे मूल्यमापन करण्यासाठी कसोटया कोणत्या वापरायच्या? कथा, कादंबरी, काव्य इत्यादि साहित्यप्रकारांचे घाट आणि आशय यांचा संबंध आणि स्वरूप कसे असते? साहित्यातली आधुनिकता किंवा नवता कशी ठरवायची? या प्रश्नांची उत्तरे शोधताना समीक्षेची परिभाषा तयार होत गेली.

एका बाजूला घाट आणि कला यांचाच विचार करणारी, आकृतिबंधाला महत्त्व देणारी अॅकेडेमिक समीक्षा विकसित झाली; तर त्याच वेळेस सामाजिक, मानसशास्त्रीय, भाषाविषयक दृष्टिकोणातून केलेल्या समीक्षेचे नवे प्रवाह त्यात येत गेले. दुसर्‍या बाजूला आस्वादक समीक्षेचा वेगळा प्रवाह निर्माण झाला. प्रस्तावनेत या सार्‍याचा आढावा घेताना संपादकांनी न. चिं. केळकर, मर्ढेकर आणि मुक्तिबोध-बेडेकर यांच्या भूमिकांबद्दल चर्चा केली आहे. मराठी समीक्षेवर सुरुवातीच्या काळातला रसचर्चा आणि अॅरिस्टॉटलच्या निकषांचा प्रभाव आणि राजवाडे-केतकरांनी शोधलेले परंपरेचे सत्व यांचाही निर्देश केला आहे. पण काही समीक्षाप्रवाहांचा या संग्रहात लेखरूपाने समावेश तर नाहीच; पण प्रस्तावनेत त्यांचा उल्लेखही नाही, याचे आश्चर्य वाटते. उदा. प्रभाकर पाध्ये, गंगाधर पाटील. पाध्यांच्या ‘सौंदर्यानुभवा’तील भूमिकेशिवाय आणि गंगाधर पाटलांच्या आदिबंधात्मक समीक्षेविना मराठी समीक्षेचा प्रातिनिधिक लेखसंग्रह पूर्ण होऊ शकत नाही. शैलीविज्ञान, चिन्हशास्त्र यांसारख्या नव्या वाटांनी झालेल्या प्रयत्नांचा निदान निर्देश तरी प्रस्तावनेत हवा होता. माधव आचवलांचा जी. ए. कुलकर्णी यांच्या कथेवरील लेख या संग्रहात आहे. पण त्या व्यतिरिक्त आस्वादक समीक्षेच्या इष्टानिष्टतेबद्दल प्रस्तावनेत फारशी चर्चा नाही! संग्रहातल्या या उणिवा निवडीमधील सापेक्षता आणि मतभेद मान्य करूनही शिल्लक राहतातच.

विश्लेषणपद्धतीचे विशेष

‘नावल म्हणजे काय?’ हा काशीनाथ बाळकृष्ण मराठे यांचा अगदी सुरूवातीच्या काळातला गाजलेला निबंध. दुसरा नेहेमी चर्चिला जाणारा निबंध म्हणजे वि. का. राजवाडेंचा ‘कादंबरी’ हा लेख; १९०२ मधला. त्यानंतर चर्चेचा विषय झालेला लेख म्हणजे भालचंद्र नेमाडेंचा ‘१९५० ते १९७५ या कालखंडातील मराठी कादंबरी’चा आढावा. हे तीनही लेख या संग्रहात एकत्रितपणे वाचताना कादंबरीचे स्वरूप आणि त्याची विश्लेषणपद्धती यांचे काही विशेष नजरेत भरतात. हे तीनही लेखक समीक्षेची परिभाषा वापरीत नाहीत. मराठेंच्या बाबतीत ती तेव्हा अस्तित्वातच नव्हती. त्यामुळे अॅरिस्टॉटलच्या आधाराने त्यांनी कादंबरीचे वेगळेपण मांडले. नावल म्हणजे चमत्कारिक गोष्ट, असे सांगत असतानाच थोर पुरुषांची चरित्रे प्रीतीने वाचतील असे रूप देण्यास चिंता नाही, असे त्यांनी सांगितले. राजवाडयांचा दृष्टिकोन मुळातच कलावादी समीक्षकाचा नव्हता; तर व्यापक संस्कृतिशोध घेणार्‍या इतिहास अभ्यासकाचा होता. पण साहित्याचे स्वरूप आणि त्याचे श्रेष्ठत्व यांचे मर्म त्यांना उमजले असल्यामुळे त्यांनी तत्कालिन कादंबरीचे परखड आणि अचूक मूल्यमापन केले. नेमाडेंच्या विश्लेषणातही हे नेमकेपण आढळते. पण ते साहित्याचे अभ्यासक असल्यामुळे आणि आपल्या तिरकस शैलीचे भान त्यांच्यात जागे असल्यामुळे ते रुढ परिभाषा वापरत नाहीत. पण नवी परिभाषा घडवितात.

राजवाडेंच्या लेखात नंतरच्या समीक्षेतील मतप्रवाहांच्या खुणा दिसतात. अदभुत व वास्तविक यांचे कादंबरीतील परस्परसंबंध सांगताना राजवाडे सांगतात की झोला, टॉलस्टॉय साक्षात संसाराच्या व समाजाच्या सुखदु:खाची वर्णने अदभुत शब्दाने करतात, म्हणून त्यांना वास्तविक ही संद्न्या लावली जाते. त्यांच्यापुढे इतर खर्डेघाशे होत! ‘हया देशातील दारिद्रयाने गांजलेल्या, रोगाने पीडिलेल्या व विद्येने मागासलेल्या सामान्य जनसमूहाचा कैवार सहृदयतेचे मूर्तिमंत पुतळे जे कादंबरीकार, त्यांनी घेतला नाही, तर दुसरा कोण घेईल?’ पुढील काळात समाजाभिमुख साहित्याचा हा मुद्दा मार्क्सवादी समीक्षकांनी मांडला आणि दलितांनी निव्वळ कलावादी साहित्याच्या विरोधात तो अधिक आक्रमकपणे उचलून धरला. नेमाडेंनी आपल्या लेखात रीतिप्रधान कादंबर्‍यांवर टीका करून कादंबरीकाराला ‘सांस्कृतिक मूल्यांचे रक्षण, संवर्धन आणि प्रसाद करण्याची सांस्कृतिक भूमिका’ पार पाडायची असते, याची पुन्हा एकदा आठवण दिली आहे. बाबुराव बागुल यांनी ‘दलित साहित्याची भूमिका’ मांडताना ते सूडवाद्यांचे साहित्य नाही, ‘माणसाच्या महत्तेचा आणि मुक्तीचा प्रथम पुरस्कार’ करणारे ते साहित्य आहे, असे म्हटले आहे.

मराठीतील कलावादी समीक्षकांची भूमिका मात्र याच्या विरोधी आहे. गंगाधर गाडगीळांना ‘ध्येयवाद, आशावाद, सौंदर्य’ ही आगांतुक मूल्यं वाटतात आणि ना. सी. फडक्यांना ललितकथेचे मर्म हे मांडणीतील चतुराई, संग्राम आणि चित्तरंजन यात आहे असे वाटते. पु. शि. रेगे यांचा आग्रह असा आहे की, साहित्याचा आणि एकंदर सर्व कलांचा स्वतंत्रपणे विचार व्हावयास हवा. कलेचे वेगळेपण, निरंकुशत्व, स्वतंत्रता आपणाला मान्य करायला हवी.
कादंबरीतील साहित्यमूल्यांबरोबरच काव्यचर्चा हादेखील मराठी समीक्षेचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. मराठी कवितेने छंदोबद्ध काव्यापासून मुक्तछंदात्मक नवकाव्यापर्यंत प्रवास केला. या प्रवासात संस्कृत काव्यशास्त्रापासून पाश्चात्य समीक्षापद्धतींचा आधार घेत केलेल्या आधुनिक समीक्षेपर्यंत मराठी समीक्षेचीदेखील स्थित्यंतरे झाली. परंपरागत काव्य आणि नवकविता यांच्या संक्रमणकाळातला रा. श्री. जोगांचा गाजलेला लेख या संग्रहात आहे, ‘मुख्यार्थाची कैफियत.’ या लेखाचा रोख मुख्यत: दुर्बोधतेचे तत्त्वज्ञान बनवणार्‍यांवर आहे. चमत्कृतीपेक्षा कविता रसपूर्ण करण्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे त्यांचे प्रतिपादन आहे. ‘आज यजमानांच्या घरी पाहुण्यांनीच धुडगूस घालावा, त्याप्रमाणे मुख्यार्थाच्या घरी प्रतिमानांनीच धमाल उडवून दिली आहे,’ अशी त्यांची तक्रार आहे. शरच्चंद्र मुक्तिबोधांनी ‘नवकवितेचे विशेष’ सांगताना ‘आता अनुभवाच्या जागी प्रतिमासृष्टीच तेवढी उभी असते,’ असे सांगितले आहे. पण जोगांप्रमाणे त्यात तक्रारीचा सूर नाही. मात्र कवितेला प्रतीकरूप येण्यासाठी दार्शनिकाच्या पातळीवर कवीची अनुभूती असली पाहिजे, असे ते सांगतात. विंदा करंदीकरांनी आपल्या लेखात म्हटले आहे, ‘सामाजिक वास्तवाशी सहकंप होण्याची शक्ती ज्याच्या प्रतिभेत असेल, त्याच कवीच्या हातून उत्कृष्ट सामाजिक जाणिवेची कविता निर्माण होण्याची शक्यता आहे.’ दिलीप चित्र्यांनी आपल्या लेखात सारा कलाव्यवहार अतिशय मूलभूत पातळीवर तपासला आहे आणि त्यामागचे गोड गैरसमजही तितक्याच परखडपणे दूर केले आहेत. वस्तुमान आणि आत्मभान यांचा संघर्ष आणि संवाद अस्तित्वसापेक्ष असतो. त्यासाठी भाषा ही विनिमयाचे साधन बनते. याचे भान चित्रे, कोल्टकरांसारख्या कवींना असल्यामुळे शब्दांचा उपयोग ते चलनी पदार्थांप्रमाणे करतात! चित्रे म्हणतात की, काव्यानुभवाचे ज्ञानशास्त्र मांडणे शक्य असले, तरी प्रत्यक्ष काव्यशास्त्र कधीच समाधानकारकपणे मांडता येत नाही. सुरुवातीलाच ‘माझे लेखन समजून घ्यायला’ या विचारांची तीळमात्र मदत होणार नाही, हे त्यांनी सांगून टाकले आहे!

राहता राहिला साहित्य आणि कलानुभव यांच्या स्वरूपाविषयीचा मूलभूत विचार. पण तिकडे वळण्यापूर्वी संग्रहातील दोन लेखांचा मुद्दाम उल्लेख केला पाहिजे. समीक्षा ही साधारणपणे उच्चभ्रू साहित्यप्रकारांची होते. पण लोकसाहित्य आणि लोककलांमध्येही समीक्षेला आव्हान देण्याचे सामर्थ्य असू शकते, अशी शोधक दृष्टी ‘मर्‍हाठी लावणी’ या म. वा. धोंडांच्या लेखात आहे आणि द. ग. गोडसेंच्या लोकगीताच्या आकलनात तर तिने एक वेगळीच उअंची गाठली आहे.

केळकरांच्या लेखाचे महत्त्व

‘वाङ्मयापासून आनंद का होतो?’ या प्रश्नाचे सोपपत्तिक उत्तर देताना न. चिं. केळकरांनी सविकल्प समाधीची कल्पना मांडली. कलेच्या स्वरूपासंबंधीची काहीशा शास्त्रीय स्वरूपाने मांडलेली स्वतंत्र कल्पना म्हणून केळकरांच्या या लेखाला वेगळे महत्त्व आहे. पुढे मर्ढेकरांच्या सौंदर्यतत्त्वांनी सौंदर्यशास्त्राचे एक नवे दालन मराठीला खुले झाले. प्रस्तावनेत त्याचा उल्लेख आहे. रा. भा. पाटणकरांच्या ‘काव्याच्या व्याख्येतील अडचणी’ हा लेख व्याख्यांमधील तार्किक गुंता उलगडण्यासाठी लिहिलेला लेख आहे. काव्य आणि कला यांबद्दलच्या प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोनच मुळात चुकतो आहे, अशी पाटणकरांना शंका आहे. पाटणकरांचा लेख म्हणजे ‘वाक्यं रसात्मकं काव्यं’सारख्या साध्या व्याख्येपासून अनेक शक्यता सामावणार्‍या विटगेन्स्टाईनच्या ‘कुलसाम्या’पर्यंत झालेला मराठी समीक्षेचा प्रवास म्हणायला हरकत नाही.

मराठीतील समीक्षेची निकोप वाढ मुख्यत: वाङ्मयीन नियतकालिकांमुळे झाली. व्याख्यानमाला, संमेलने यांचाही समीक्षेतील नवे दृष्टिकोन मांडण्यासाठी काही वेळा उपयोग झाला. लेखक, समीक्षक, वाचक यांचे हे आदानप्रदान फारच सीमित वर्तुळात होत राहिले, तरी त्याची दखल मुख्य प्रवाहातील साहित्याला इच्छापूर्वक अथवा अनिच्छेने घ्यावीच लागली. ‘निवडक मराठी समीक्षा’ म्हणजे मराठी साहित्यजीवनाची कालप्रवाहात बदलत राहिलेली जिवंत स्पंदने आहेत. या संग्रहातल्या त्रुटी मान्य करूनही प्रत्येक साहित्यप्रेमीच्या संग्रही असायलाच हवा असा हा लेखसंग्रह आहे.

Write your review for this book

Other works of गो. मा. पवार
   मराठी विनोद : विविध आविष्कार रुपे
   विनोद - तत्व आणि स्वरूप
   भारतीय साहित्याचे निर्माते - विठ्ठल रामजी शिंदे
   साहित्यमूल्य आणि अभिरूची
   महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य

Similar books:
  लेख
   दाद
   गजाआडील दिवस
   गणगोत
   पुरचुंडी
   हसवणूक
   More ...  
  समीक्षा
   सर्व सुर्वे
   दुनिया तुला विसरेल!
   धार आणि काठ
   साहित्यगंगेच्या काठी
   कुमार गंधर्व: मुक्काम वाशी
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.