|
कथा वक्तृत्वाची
Author: शिवाजीराव भोसले
Publisher: अक्षरब्रह्म प्रकाशन
|
|
Price: $5.14 $4.11 20% OFF ( ~130 Pages, R150)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: वक्तृत्व हा माझ्यापुरता एक अनुभव विषय आहे. मी आजवर अनेकांची अनेक भाषणे ऐकली. तेवढीच भाषणे स्वत:ही केली. बोलणे माझ्या वाट्याला आले आणि मी बोलण्याच्या वाट्याला गेलो. आपण सतत बोलत राहावे आणि बोलता बोलता जीवन सार्थकी लागावे, असे मला लहानपणापासून वाटत असे. पण बोलायचे कोणाशी? बोलायचे कशासाठी? आणि कोणी आपले एकूनच घेतले नाही तर बोलायचे तरी कसे? माणसाने बोललेच पाहिजे का? कमीत कमी बोलणे करुन माणसे सुखाने जगू शकतात हे दिसत असताना आपण बोलण्याच्या फंदात का पडावयाचे? गरजेपुरते बोलणे हे स्वाभाविक आहे. त्याहून अधिक बोलणे ही गरज आहे का? थोड्या पाण्यात स्नान होऊ शकते हे खरे! पण नदीत पोहणे, पाण्यात डुंबणे किंवा दूरची खाडी पोहत पार करणे या प्रक्रियांचे अस्तित्व उरतेच ना? जीवनशक्तीचे प्रकटीकरण अनेक माध्यमांतून घडते. शब्दशक्ती हे जीवन शक्तीचे एक रूप नव्हे का? तिच्या अभिव्यक्तीला मर्यादा का पडाव्या? माझ्या मनात उद्भवणार्या माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे काम परिस्थिती करीत होती. ===== हे पुस्तक म्हणजे माझ्या काही लेखांचे संकलन होय. वक्तृत्वमीमांसा' ही संकल्पना मनापुढे ठेवून काही सभा-संभाषणे, काही वक्ते आणि भाषणे यांचे स्मरण करीत मी वैखरीच्या वाटेने केलेल्या प्रवासाचा हा धावता वृत्तांत वाचकांपुढे येत आहे. मी उदंड भाषणे ऐकली आणि अखंड व्याख्याने दिली. माझे जीवन ही वैखरीची वाट आहे. मी शिकलो, वाढलो तो स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात. तेव्हा मला मोठमोठाल्या सभा जवळून पहावयास मिळाल्या. सातारच्या गांधी मैदानावर नाना पाटील, आण्णासाहेब लट्टे, मामासाहेब देवगिरीकर, बॅ. मेहेता, ना. ग. गोरे, यांची जाहीर भाषणे मी त्या वयात ऐकली. वक्तृत्व या शक्तीचे दर्शन मला या सभांत घडले. नकळत मी या शक्तीचा उपासक झालो. वाढत्या वयाबरोबर वक्तृत्वाची अनेक रम्य आणि रौद्र, भव्य, दिव्य आणि आकर्पक रूपे मी पाहिली, अनुभवली. आचार्य भागवत यांच्या प्रखर आणि प्रज्ञासंपन्न भाषणांनी मी प्रभावित झालो. धगधगीत विचारांचे तेज मी जवळून पाहिले. माझे अंतर्याम आचार्यांच्या तेजस्वी वाणीने उजळून निघाले. बोलावे तर असे, असे वाटू लागले. पोरवयात मी वाचत होतो, ऐकत होतो. माझे परमभाग्य असे की मला बराच काळ पुण्यात रहावयास मिळाले. माझी खोली बादशाहीच्या मागे होती. टिळक स्मारक मंदिर, शिवाजी मंदिर, साहित्य परिषद आणि से.प. चे मैदान ही वक्तृत्वाची तेव्हाची तीर्थक्षेत्रे अगदी जवळ होती. पुणे शहरात मी स्वातंत्र्यवीर सावरकरांची व्याख्याने ऐकली. प्रा. फडके, प्रा. माटे, प्रा. सरदार यांची भाषणे अभ्यासली. ना. ग. गोरे, रावसाहेब आणि अच्युतराव पटवर्धन यांच्या तर्कशुद्ध प्रतिपादनाचा प्रभाव अनुभवला. या काळात बाळशास्त्री हरदास या नावाचा दिव्य धबधबा उसळत असताना मी त्यात न्हाऊन निघालो. डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांच्या विचारवेधक व्याख्यानमाला हे तेव्हा पुण्याचे वैभव होते. डॉ. रा. शं. वाळिंबे तर अखंड खळाळत होते. ऐकावे असे सतत काही तरी कानावर पडत होते. मनात निनादत होते. मी तत्त्वज्ञान या विषयाचा विद्यार्थी ! आमचे वर्ग काही काळ पुणे विद्यापीठाने चालविले. तेव्हा प्रगल्भ विवेचनशैलीचे काही पुरुषोत्तम जवळून पहावयास मिळाले. योग असा की उत्तम इंग्लिश भाषणे मला प्रथम पुण्यातचे ऐकावयास मिळाली. बॅ. जयकर, डॉ. राधाकृष्णन, श्यामाप्रसाद मुखर्जी, एम. एन. रॉय, नाथ पै, भाई डांगे यांचा इंग्लिश भाषणे हा एक मैफल असे. तिचा लाभ विनामूल्य घडे. या भाग्याचा उच्चांक म्हणजे जे कृष्णमूर्ती यांची सुमारे पंधरा दिवस चाललेली 'भापणे मी अगदी समोरून आणि जवळून ऐकली. कृष्णमूर्तीच्या विचारगंगेत वाहता वाहता मी विरून गेलो. जे ऐकत होतो त्या सगळ्याचा बोध होत होता असे नहे. पण अबोध मनाला त्याचा स्पर्श घडत होता. पुढे माझ्या पत्रिकेत बोलण्याचा 'राजयोग' आला. मी तर्कशास्त्र आणि तत्त्वज्ञान या विषयांचा प्राध्यापक झालो. माझ्या वर्गात मी उभा राहिलो. विषयात आणि विद्यार्थ्यांत रमलो. आपले अध्यापन उद्बोधक आणि आनंददायक व्हावे यासाठी मी मातृभाषेची मनोभावे आराधना केली. मराठी माध्यमाची महत्ता अनुभवली. १९६३ साल उजाडले. देशभर स्वामी विवेकानंद जन्मशताब्दी साजरी झाली. माझी विवेकानंदभक्ती फळास आली. थोड्याच दिवसात कन्याकुमारीच्या विवेकानंद स्मारकाचे काम उभे राहिले. मी या कार्यात सहभागी झालो. भेमागून सभा घेतल्या. १९७२ हे वर्ष श्री अरविंदांच्या जन्मशतादीचे वर्ष होते. माझ्या अभ्यासाचा आणखी एक विषय महाराष्ट्राच्या व्यासपीठावर आला. कन्याकुमारी आणि पअॅंडेचरी ही तर माझी तीर्थक्षेत्रे झाली. माझ्या भाषणात लोक रमले. महाविद्यालयांची स्नेहसंमेलने माझ्यासाठी मागे-पुढे होउ लागली. मुलांना अभिनेत्यांचा विसर पडला. युवा श्रोता माझ्या भापणांत रमला, रंगला. तीन तपांचा काळ असा वाहून गेला. आता मला वेध लागला आहे तो उगवत्या पिढीच्या उत्कर्षाचा. मनात आणल्यास आजची मुले प्रभावी वक्तृत्व करू शकतील. भाषणांच्या अपेक्षेने काळ तसा थोडा प्रतिकूल आहे. शहरे विस्तारली. सभास्थाने दुरावली. येणे जाणे अवघड झाले. वक्ता आणि श्रोता यांची ताटातूट घडू लागली. घरात टी.व्ही. आणि टी.व्ही. वर चित्रपट किंवा क्रिकेट अशी आकर्षण वाढली. तरीही काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मराठी वक्तृत्वाचा अभिमान बाळगून शब्दशक्तीला बहुमान मिळवून देत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. या मुलामुलींनी असेच आणि आनंदाने बोलत रहावे असे मला वाटते. या मुलांना मी काही सांगावे असा अनेकांचा प्रेमाचा आग्रह होता. युवा स्नेहात रमणारा 'सकाळ' यात सहभागी झाला. वेळ मिळेल व जेव्हा जे स्फुरेल ते तसेच सकाळच्या रकान्यातून सादर केले. त्याचे संकलन घडले व हे पुस्तक आकारास आले. अशी ही कथा वक्तृत्वाची ! -- प्राचार्य शिवाजीराव भोसले
|
 |
 |
|