|
डांगोरा एका नगरीचा
Author: त्र. वि. सरदेशमुख
Publisher: मौज प्रकाशन
|
|
Price: $10.83 $8.66 20% OFF ( ~508 Pages, R375)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: Sअहित्य अकादेमी पारितोषिक २००३ "कालाच्या ओघात काय नाही वाहून जात? साईखेडच्या राजवंश नामशेष झाला आहे. रयतही बहुतेक कालवश झाली आहे. कधीपासून ती विखरून-विस्कटून गेली होती. तीस सालच्या आसपासचे सगळे लोकचित्र जवळजवळ पुसून गेले आहे. जाऊन जाऊन ते जाईल कुठे? अकस्मात वाटावे असे ते पुन्हा उगवते, वेगळ्या रूपरंगानी. साईखेडच्याच नव्हे तर कुठल्याही जनवस्तीच्या बाबतीत हे खरे असावे. साठ वर्षाखाली साईखेडात घडून गेले ते सांगितले तर वाचकांना फार मनभावन होईल, ते विस्मयजनक वाटेल असाही कहाणी लिहायला घेतांना माझा समज होता. पुढे लक्षात आले, की तिच्यात तर आज सर्वत्र अनुभवाला येतोय त्या अनाचाराचा व कुटिलपणाचा एक लहानसा कंद आहे. विस्मयाचे, भयावहाचे आणि हिंसेचे धक्केखोर बीज, या शतकाच्या पूर्वार्धातच, जगभर पेरले गेले आहे. दिसामाजी ते फोफावत आहे. सामान्य सुजनांचा जीव तापल्या तव्यावर भाजून निघत आहे. खळांची वक्रता आणि त्यांच्या अधर्मकरणीचे दुरित ही अनादि आणि अविनाशी आहेत की काय? त्यांनी मानवी जीवनांना ग्रासू नये म्हणून सत्पुरुषांनी केलेल्या प्रार्थना आणि धावे आकाशात कुठवर पोचत असतील? कुणाच्या अंत:करणात करुणेचा रिघाव होत असेल? ज्याने त्याने स्वत:लाच कौल लावावा अशी ही निरंतरची व्यथा आहे. -- (मनोगता मधून)
Review courtesy of Maharashtra Times: १९नोव्हेंबर२००० निरंतरची व्यथा - आ. श्री. केतकर
स्वातंत्र्यपूर्व कालातील साधारण सात-आठ दशकांपूर्वीची तत्कालीन साईखेड या छोटया संस्थानाची ही कहाणी. तो राजवंश तर आता नामशेष झाला आहे, आणि कधीपासूनच विखरून विस्कटून गेलेली रयत बहुतेक कालवश झाली आहे. काळाच्या ओघात काय वाहून जात नाही? पण जाऊन जाऊन ते जाईल कुठे? अकस्मात वाटावे असे ते पुन्हा उगवते. वेगवेगळया रूपरंगांनी. साईखेडच्याच नव्हे, तर कुठल्याही जनवस्तीच्या बाबतीत हे खरे आहे. डांगोरा एका नगरीचा या लेखक त्र्यं. वि. सरदेशमुख यांचे कादंबरीच्या मनोगतातील हे विचार. त्यांनी पुढे म्हटले आहे, अनेक वर्षांपूर्वी घडून गेलेली ही कहाणी असली, तरी ती लिहायला घेतल्यावर लक्षात आले की, हिच्यात तर आज सर्वत्र अनुभवाला येतोय त्या अनाचाराचा व कुटीलपणाचा एक लहानसा कंद आहे. विस्मयाचे, भयावहतेचे धक्केखोर बीज, या शतकाच्या पूर्वार्धातच जगभर पेरले गेले आहे. ते फोफावतच आहे. सामान्यजनांचा जीव तापल्या तव्यावर भाजून निघत आहे. खळांची वक्रता आणि त्यांच्या अधर्मकरणीचे दुरित ही अनादी आणि अविनाशी आहेत की काय? त्यांनी मानवी जीवनाला ग्रासू नये म्हणून सत्पुरुषांनी केलेल्या प्रार्थना आणि धावे आकाशात कुठवर पोहोचत असतील? ज्यानेत्याने स्वत:लाच कौल लावावा अशी ही निरंतरची व्यथा आहे.
ही कादंबरी लेखकाने कादंबरीत्रयीचा दुसरा भाग म्हणून योजली होती. पण बखर एका राजाची, नंतर प्रसिद्ध झाली उच्छाद. त्यानंतर दीर्घकाळाने हा मधला भाग प्रसिद्ध झाला, याचे भान ठेवून लेखकाने शंभर पानांत बखर... ची कथा सांगून कादंबरीचे कथानक सुरू केले आहे.
सुरुवातीसच या ओळी आहेत. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा नगरात कोणी उपाशी ? तापाशी? उपाशी नाही, तापाशी नाही... माळयाचा मळा पिकला आहे, विहिरीला पाणी लागलं आहे! सूर्यनारायण जेवायास बैसले पहिल्या घासाला केस लागला! अग अग, कोण्या पापिणीचा हा केस? पापिणी नाही: स्वामिनी नाही राज्याच्या राणीला दळिंदर आलं आहे.. न्हाली नाही, ल्याली नाही अंधारकोन्यात बैसली आहे!
कादंबरीत पुढे काय घडणार आहे, हे लेखकाने यांतून सांगून, वाचकांच्या मनाची तयारीच करून घेतली आहे. साईखेडच्या मनस्वी राजाच्या आत्म-हत्येनंतर राणीला नजरबंद करून काही मुजोर, सत्तांध अधिकारी संस्थानावर वरवंटा फिरवतात. त्यात सज्जन, सन्मार्गी, सात्विक प्रजाजनांना कसे भरडून टाकतात, याची ही कहाणी. राजाने प्रोत्साहन, आधार दिलेले, संस्थानात चांगल्या गोष्टींना सुरुवात करणारे देसाई या मंडळींना नकोसे होतात. त्यांच्यावर बालंट आणून त्यांचा काटा काढण्यात येतो, तरी त्यांची वासलात लावण्यात या कारस्थानी लोकांना यश येत नाही; हे सांगताना लेखकाने कादंबरीचा पट प्रचंड केल्याने तिला आगळाच डौल लाभतो. शेकडो पात्रे असूनही कोणी अप्रस्तुत वाटत नाही. प्रत्येक पात्र त्याचा इतिहास घेऊन येते, तरीही कादंबरी पाल्हाळ होत नाही. कारण व्यक्तिंच्या बाह्य रूपावर भर न देता, लेखकाने मनोव्यापाराच्या चित्रणावर भर दिला आहे. अनेक ठिकाणी तो मोलाचे विचार सहज सांगतो. त्या काळातील संस्थानातील जातीय हेवेदावे, राज-कारणाने व्यापून गेलेली मने आणि त्यांमुळे वेगळया पद्धतीने चालणारे मनोव्यापार यांचे चित्रणही परिणाम-कारक आहे.
देशातील महत्त्वाच्या घडामोडी सहज शिडकाव्यासारख्या येतात. त्यांचे पात्रांच्या मनात प्रतिबिंब कसे पडते, हे लेखकाने सांगितले आहे. वर्तमान, भूत, भविष्याचे झोके असले, तरी एकसंध-पणा कायम राहतो. अनेकदा त्याचा धागा वर्तमानाशी जुळतो. म्हणजे गावात जागोजाग पहारे, हत्यारी शिपाई, टेहळये, टपालावरील नजर, अशा वर्णनांतून आणीबाणीची आठवण होतेच.
एका सन्मार्गी नेक अधिकार्याला आपल्या वाटेतला अडथळा समजून दूर करण्यासाठी, सत्ताधुंद सर्वेसर्वा पोलिस अधिकारी व त्याला साथ देणारे दुर्जन राजाच्या पश्चात अपत्यहीन राणीला पुरते आपल्या कह्यात ठेवतात. ती असून नसल्या-सारखी होते. मग हे दुर्जन जो अनाचार, विकारी भावनांचे पाशवी प्रदर्शन, लाचखोरी आणि दंडुकेशाहीने दहशत कशी निर्माण करतात, ते कथानकात गुंफले आहे. याविरुद्ध दाद मागणारे आणि जिवावरचा धोका पत्करून त्यांना मदत करणार्यांचेही दर्शन होते.
ज्यांना आपण कावेबाज आणि आपमतलबी म्हणून हिणवतो ती माणसं एकांगी चतुर असतात. सत्त्वशील माणसं एखाद्या परिस्थितीत कशी वागतील याचा अंदाज त्यांना असतो, असं लेखक लिहितो.
अनपेक्षिताला उत्तर द्यायला एक धाडस लागतं... तरुण मनाला हौस असते. अदृष्टाचं भय नसतं... राजकारणात पडद्याआड अनेक पडदे असतात... माणूस मुळात दुष्ट असतं असं नाही, पण माझं, माझंच्या भोवर्यात एकदा का गरगरू लागला की, त्याचे इतरांशी सांधे तुटत जातात. त्यानं येणारं दुबळेपण स्वत:त रिचवून घेण्यापलीकडे काही करता येत नाही. यातून त्या मीला एक सर्वभक्षक फुगवटा येतो. त्यात प्रथम तो स्वत: गुदमरतो. मग इतरांना जीव नकोसा करीत आपला जीव वाचवल्याचं समाधान त्याला शोधावं लागतं... किंवा पुढं काय वाढून ठेवलं आहे, ते माणसाला कळत नाही, हे त्याचं सुदैवच! अशी वाक्य मनात घर करतात.
खलव्यक्तींच्या पाशात जखडल्या गेलेल्या राणीची स्थिती लेखक, सत्तेचा बेतालपणा, क्रूरपणा आणि अन्याय साईखेडला अक्षरश: नासवत होता. त्याचं किटाळ राणीच्या नावावर जमा होत होतं. अशी सांगतो.
अशा मानवी व्यक्तिरेखा सतत आढळतात. काळ बदलला तरी माणसं बदलत नाहीत. नावं, स्थळं फारतर वेगळी असतात. त्यामुळंच ही कादंबरी सर्वव्यापक, सार्वत्रिक आणि कालातीत बनली आहे. चटकन साम्य पाहायचं, तर आजच्या अनेक बडया उद्योगांकडे पाहावं. अशा कंपन्या म्हणजे नवी संस्थानंच आहेत आणि संस्थानांतील भलेबुरेपणा जशाच्या तसा त्यांत आढळतो. फरक असला, तर बदललेल्या परिस्थितीमुळे बदललेल्या मार्गांत. बाकी सत्ताधारी, त्यांचे पित्ते, कान फुंकणारे, सचोटीने वागणारे, त्यांच्या या गुणासाठी त्यांचा द्वेष करून त्यांना हटविण्यासाठी प्रयत्न करणारे अशा सार्या प्रकारचे लोक या कंपन्यांमध्येही आढळतात. त्यामुळेच अशा कंपन्यांच्या चालकांना उपयुक्त वाटावं असं एक वाक्य आहे- इमान आणि प्रेम मागून मिळत नाही आणि विकत घेता येत नाही. ते तर अंतरात्म्याचे गुण. सत्ता भोगावी आणि घबाड मिळवावं इतक्याच हेतूंनी इथं आलेल्या उपर्यांशी इमान आणि प्रेम कुठून असायला? *** ची थुंकी झेलावी आणि कान फुंकावे यात त्यांचं भाग्य.
त्यामुळेच कंपन्यांतील राजकारणही संस्थानांच्या पद्धतीनंच खेळलं जातं. कुणाला जाणं भाग पाडायचं, कुणाची वर्णी लावायची, कुणा गुणवंताला संधी दिली, तर आपलं पितळ उघडं पडेल म्हणून कसं बाजूस ठेवायचं... गरज म्हणून एकाला जवळ करून दुसर्याला कसं दूर करायचं, हे सारं पद्धतशीरपणे चाललेलं आढळतं, ते त्यामुळंच. केवळ आपले हितसंबंध जपण्यासाठी एखाद्याला अधिकार दिले की, त्याला खरोखरच आपण त्याला पात्र असल्यासारखे वाटू लागते. कधी तो डोईजडही होतो आणि मग त्याचाही काटा कसा काढला जातो, अशा गोष्टींतील बारकावे कादंबरीकाराने प्रत्ययकारीपणे दाखविले आहेत.
तसे साईखेड संस्थान हेच या कादंबरीच्या केंद्रस्थानी असल्याने नायक नायिका यात नाहीत. प्रमुख पात्रे आहेत. राजे रघुवीर सिंह यांच्या मर्जीतले माधवराव देसाई, त्यामुळेच राजांच्या निधनानंतर अनेकांचा त्यांच्यावर असलेला रोष प्रकट होतो. राणी दमयंती, दुर्दैवी खरीच, पण त्यालाही बहुतांशी तिची मनोवृत्तीच जबाबदार आहे, बाजीराव घोरपडयां-सारख्या दुष्टजनांच्या तावडीतून राणीची सुटका होण्यासाठी प्रयत्न करणारे सरळमार्गी सज्जन, ज्योतिप्रकाशचे संपादक शंभूराव जाधव- ज्यांना साईखेड राष्ट्र म्हणून ओळखते, देसाईंवरील खटल्यात त्यांची बाजू मांडण्यासाठी आलेले चाणाक्ष बॅ. सुभेदार आणि देसाईंना मदत होईल म्हणूनसाठी आलेली त्यांची मदतनीस आणि एकेकाळी रघुवीर सिंगांचे प्रेम लाभलेली, त्यामुळे साईखेड सोडून जावे लागलेली राजस. न्यायाधीशाचा मुलगा अरविंद अशा व्यक्तिरेखा कशा अविस्मरणीय आहेत, हे कादंबरी वाचल्यावरच कळेल.
बक्षिसे अनेक असतात. ती अनेक पुस्तकांना मिळतात. पण योग्य पुस्तकाचा योग्य गौरव झाला, तर होणारं समाधान वेगळंच असतं. या कादंबरीला राज्य सरकारनं पहिलं पारितोषक देऊन गौरवलं, हे रास्तच झालं, पण याहीपेक्षा राष्ट्रीय पातळीवर तिचा गौरव व्हावा अशा दर्जाची ती आहे. ते घडेल का?
Reader Comments: sanjay writes on Tue Mar 23 13:03:32 1999: This book is very good.
|
 |
 |
|