Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


मन्वंतर
Author: दीनानाथ मनोहर
Publisher: राजहंस प्रकाशन
Add to Shopping Cart
Price: $12.18 $9.74 20% OFF ( ~402 Pages, R400)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
शनिवारवाड्यावरील जरीपटका ब्रिटिशांनी खाली उतरवला आणि भारतात एक नवी व्यवस्था आकारास यायला सुरुवात झाली. या संक्रमणकाळातील घडामोडीत आपल्या समाजापासून पोरका झालेला, नेटिवांचं भलं कशात आहे, जिंकण्यात की हरण्यात? या प्रश्नांशी झगडत स्वातंत्र्ययुद्धात सहभागी झालेला नर्मद.
आणि एकविसाव्या शतकाच्या सीमारेषेवर सर्व मानवी विश्वच प्रचंड गतीने बदलत असताना सामान्य माणसाच्या बाजूने चळवळीत लढणारा, तरीही अंतिम परिणामाबद्दल संभ्रमित असलेला गौतम.
स्थळकाळाचे संदर्भ वेगळे ... पण हे दोघेही आपापल्या वर्तमानात शोध घेताहेत माणसा-माणसातील नात्याचा, त्याच्या भविष्याचा. संक्रमणकाळातील माणूस आणि समाज यांचा शोध घेणारी कादंबरी.

Review courtesy of Loksatta:
लोकसत्ता रविवार ३० जुलै २०००
अन्वन्तर : संक्रमणकाळातील माणूस व समाज यांचा स्तुत्य शोध

दीनानाथ मनोहर यांच्या "रोबो", "सीमांत" आणि "आंदोलन" या तीन कादंबर्‍यांनंतर "राजहंस" प्रकाशनानं प्रकाशित केलेली "मन्वंतर" ही त्यांची चौथी कादंबरी! या कादंबरीला दोन भिन्न कालीन व्यक्तिमत्त्वांच्या दुपेडी विणीचं कथानक लाभलं आहे. शिवाय ही कादंबरी जेवढी एएतिहासिक आहे तेवढीच सामाजिकही आहे. या कादंबरीचे दोन कथानायक आहेत. १८६० च्या सुमारास मरण पावलेला नर्मदाशंकर आणि विसाव्या शतकातल्या पाचव्या दशकात जन्मलेला गौतम या दोन नायकांची कथा प्रारंभापासून एकत्रितपणेच सुरू होते. विणकामात "एक टाका उलट एक टाका सुलट" अशी एक वीण असते. तसंच काहीसं इथं झालंय. गौतमला वरचेवर स्वप्नमाध्यमातून नर्मदाशंकर भेटतो. त्याचा कालखंड दिसतो. इतकंच नव्हे तर नर्मदाशंकर म्हणजेच आजचा गौतम असं त्याला जाणवतच राहतं. त्यामुळे एक प्रकरण एएतिहासिक काळातलं "नर्मद"चं आणि त्याला जोडून दुसरं प्रकरण वर्तमानातलं म्हणजे गौतमचं. असा कथेचा दुहेरी गोफ विणला जातो. त्यामुळे पहिली २५/३० पानं उलटून गेल्यानंतर वाचकांना या गोफाच्या खेळाचे धागेदोरे लक्षात येऊन मग कथा विलक्षण ताकदीनं वाचकमनाची पकड घेऊ लागते.

या कथेतल्या आधुनिक नायकाच्या गौतमच्या मनात सतत एक तटस्थ किंवा त्रयस्थ दडलेला दिसतो. तो आपल्या भूतकालीन स्वरूपाचं आणि सद्य:स्वरूपाचंही परखडपणे विश्लेषण करीत असतो. इथं "विश्राम बेडेकरां"च्या "एक झाड दोन पक्षी" या आत्मचरित्राची सहजच आठवण येते. गौतमला पडणारी स्वप्नं त्याला वारंवार छळतात तेव्हा त्याला वाटतं "एखाद्या फांदीला उलटं लटकणार्‍या पक्ष्याने सुटण्याकरता पंख जोरजोरात फडफडावेत, तडफडावे, मात्र फांदीवरील पायांची पकड सोडू नये, तसंच आपलं होत आहे."

दोन कथानायकांचे कालिक संदर्भ वेगळे असले तरी उभयतांत एक स्वभावसाधर्म्य कायम आहे. भटके, कलंदर अशा वृत्तीचे! आपापल्या काळातल्या प्रश्नांवर लक्ष ठेवून असणारे, त्या प्रश्नांशी कळत नकळत भिडू पाहणारे आणि गुंतत जात असताना अचानक विरक्तीची ओढ असणारे किंवा त्या समस्याचक्रात अडकणं फोल आहे असे वाटून निपटू पाहणारे. दोघेही घरदार, प्रपंच, विशिष्ट गाव, विशिष्ट जातीशी बांधील नसलेले. तल्लख बुद्धीचे. सतत डोंगर दर्‍यांतून, कडेकपारीतून, भिन्न भिन्न प्रदेशांतून भटकंती करत राहणारे, भोवतालचा परिसर न्याहाळीत तिथला प्रादेशिक आणि भावी काळातील समस्यांचं उग्र रूप जाणवून तगमग पावणारे असे हे दोन चरित्रनायक जसे गुरफटून कुठेही अडकत नाहीत तसेच स्त्रियांच्या बाबतीतही. तात्पुरते स्नेहबंधनात बद्ध वाटले तरी ते पाशही त्यांना फार काळ बांधू शकत नाहीत. अशा या कलंदरांच्या चरित्राकडे पाहिल्यानंतर मर्ढेकरांच्या काव्यपंक्तींशी त्यांचे नाते जुळते असे वाटते.

"भटकत फिरलो भणंग आणिक मिळेल तेथे पाणी प्यालो
जुळेल तेथे खूण जुळवली आणि तरीही तसाचि उरलो..."

ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्ताकाळात ब्रिटिशांनी भारतात एक नवी व्यवस्था स्थापन करून आपली पाळंमुळं अगदी खोलवर आणि दूरवर रुजवण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला होता त्या सुमाराचा काळ नर्मदच्या वाट्यास आलेला आहे आणि एकविसाव्या शतकाच्या सीमेवर सर्व मानवी विश्वच प्रचंड बदलत असतानाचा कालखंड गौतमच्या वाटणीस आला आहे. हे दोन्ही कालखंड प्रचंड उलथापालथीचे असल्याने संपूर्ण देशच संक्रमणशील अवस्थेतून जात असल्याचे या कादंबरीत प्रकर्षाने स्पष्ट होत जाते. एवढ्या विस्तीर्ण कालावधीच्या पटाचा आवाका घेतल्यानंतर तत्कालीन बंडांचे, उठावाचे, क्रांतीचे, चळवळीचे, स्वयंसेवी संघटनांचे अनेक सामाजिक संदर्भांचे विचारमंथनही कादंबरीत स्वाभाविकपणेच येत राहतात. या सर्व एएतिहासिक परिप्रेक्ष्यासोबतच भौगोलिक भोवताल टिपत, नायकांच्या मनोवृत्तींची उकल करीत कथानक पुढे नेणं ही अत्यंत अवघड क्रिया होती. दीनानाथ मनोहरांनी हे अत्यंत सफाईदारपणे पेलून कादंबरीतून ते मूर्तिमंत साकारण्यात निश्चितच यश मिळवलं आहे.

लेखक स्वत:च आदिवासी चळवळीत सक्रिय सहभागी असल्याने "काल आणि आपल्या भोवतालचा अवकाश" यावर तो आपली चांगली पकड बसवू शकला आहे. "प्रत्येक डोंगरामागे एक कथा, प्रत्येक मंदिराची एक कहाणी, प्रत्येक शेंदूर फासलेल्या खडकाचा इतिहास" जसा नर्मदने नीट जाणला आहे, तसाच ढोलांच्या, झांजांच्या, बासर्‍यांच्या आवाजातून ताल लयीचं सौंदर्य जाणणारा, ताल समजून घेण्यासाठी "तुम्हाला कुठल्याही घोळक्याच्या जवळ जावं लागतं, कुठल्यातरी घोळक्याला आपलंसं करावं लागतं" हे मर्म जाणणारा गौतम आदिवासी लोकनृत्यात मनापासून रमतानाही दिसून येतो.

ब्रिटिशांनी राजकीय सत्तेचे साधन वापरून जेव्हा येथील सामाजिक, आर्थिक पायातच बदल करावयास सुरुवात केली तेव्हा लेखकाच्या मते "येथील सत्ताधारींनी किंवा सत्ताधारी जातींनी याला विरोध केला नाही. उलटपक्षी समाजाच्या परिघावरील जाती जमातींनी बंडखोर पवित्रा घेतला. भील, कोळी, रामोशी समाजातील बंडखोरांशी ब्रिटिश साम्राज्यवादी सत्तेला सामना द्यावा लागला होता" हे सर्व वातावरण कादंबरीत जिवंत झालंय.

दोघा चरित्र नायकांना एक खंत जाणवते की "आपल्या बालपणाच्या आठवणी कुणा वास्तूशी जोडलेल्या नाहीत. काही जागांशी संबंधित नाहीत आपल्याला असं गाव नाही." आदिवासी माता आणि मराठा बापाच्या पोटी जन्मलेल्या आणि लगेच अनाथ झालेल्या नर्मदची ही खंत आहे तर वयाच्या नवव्या वर्षीच कडक शिस्तीच्या वडिलांनी देवळाली येथे शिक्षणासाठी ठेवलेल्या, पुढे पाचगणी, नासिक ते कॅलिफोर्निया आणि परत भारत असा प्रवास करणार्‍या, काहीसं अस्थिर आयुष्यच जगत आलेल्या कॉम्प्युटर इंजिनीयर गौतमची पण हीच खंत आहे.

कदाचित म्हणूनच हे दोघे पतंगासारखे भिरभिरत राहतात. त्या दोघांना नव्हतं कुटुंब, नव्हतं गाव! माणूस असून संदर्भ नसलेले!

हे दोघे चरित्रनायक आपापल्या वर्तमानात शोध घेताहेत माणसामाणसांतील नात्याचा. त्याच्या भविष्याचा!

भिलटे, पावरे, कोळी, कोष्टी, चांभार, कुंभार, बलुतेदार, कुणबी, सुतार अशा अठरापगड जातींचं जिणं, टोपीकरांची जंगलतोड आणि जंगलसंपत्तीवर कब्जा, सातपुड्यातील बांड, भिल, पलटण, पॅंथर नेटिवांना गोर्‍यांबद्दल वाटणारी भीती, मुलींच्या शाळेला समाजाने केलेला विरोध, ब्राह्मण, परभू, शेणवी अशा तत्कालीन प्रश्नांचा ऊहापोह या कादंबरीत आहे. त्याचप्रमाणे सशस्त्र क्रांतीवर विश्वास ठेवणार्‍या, लढणार्‍या, कॉम्रेड म्हणवणार्‍या गौतमला संघटनेतील पोकळ भाषणांचे वैय्यर्थ जाणवून त्याने केलेला पक्षत्याग आणि पुढे वडाळी गावच्या जमिनींच्या प्रश्नांतून गुरफटत गेलेला, काही काळ तिथे तद्रूप पावलेला आणि पुन्हा तिथेही सत्ता स्पर्धेच्या नाटकाचा उबग येऊन बाहेर पडणार्‍या गौतमचे वर्तमानकाळातील समस्यांशी प्रातिनिधिक स्वरूपाचे नाते दर्शविले गेले आहे. गौतमला संभ्रम आहे की, "माझ्या मनातील तटस्थ, त्रयस्थ त्याचा मला का त्रास व्हावा? तो तर माझ्या मनात मानव जातीचं प्रतिनिधित्व करतोय. तो तर माझा भूतकाळ की भविष्यकाळ? त्याचं नाव का नर्मद?""

४०२ पृष्ठे व्यापलेल्या प्रस्तुत कादंबरीत संक्रमण काळातील माणूस आणि समाज याचा शोध घ्यायचा स्तुत्य प्रयत्न आहे. प्रचलित एएतिहासिक कादंबरी स्वरूपाला छेद देण्याचा एक नवा आणि चांगला उपक्रम इथं साधला गेला आहे. भूतकाळ आणि वर्तमानकाळाला जोडणारा एक सेतूच इथं तयार झालेला आहे हे निश्चित!
-- शुभा चिटणीस


Write your review for this book

Other works of दीनानाथ मनोहर
   ऐल ते पैल
   कबीरा खडा बाजार में
   फत्ते तोरणमाळ
   प्रदेश साकल्याचा

Similar books:
  कादंबरी
   मृत्युंजय
   श्रीमान योगी
   स्वामी
   पार्टनर
   राधेय
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.