Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


हम ना तुम्हे भुलायेंगे
Author: केतकी साळकर
Publisher: ------------------------
Add to Shopping Cart
Price: $5.99 $4.79 20% OFF ( ~130 Pages, R175) Was recently Out of Print.*
Was recently Out of Print. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books.

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
'सी. रामचंद्र' एक अवलिया होते. 'अवलिया' कोणी ठरवून किंवा शिकवून होत नाही. तो विलक्षण प्रतिभा घेऊनच जन्माला यावा लागतो. भारतीय चित्रपटांचा सुवर्ण काळ म्हणजे १९४५ ते १९७०. या काळात, आपल्या असामान्य संगीताच्या गोडीने सगळ्यांना वेड लावणारे आणि 'काळाच्या पुढचं संगीत देणारे' संगीतकार म्हणजे सी. रामचंद्र.
सी. रामचंद्र म्हणजे 'अण्णा' शेवटच्या १०-१२ वर्षात माझ्या वडिलांचे (श्री. पद्माकर जोशी - 'दादा') खूप जवळचे मित्र होते. लहानपणी मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे. मनाच्या एका कोपर्‍यात त्यांना भेटल्याच्या काही थोड्याच पण आनंदी आठवणी आहेत. एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात क्षणभरासाठी डोकावते आणि जीवनभराची छाप मनावर पाडून जाते. तसे अण्णा हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या अल्प काळ आमच्या आयुष्यात आले आणि उगाचच आम्ही कोणी तरी खास आहोत असं वाटायला लागलं.
१९८२ सालच्या जानेवारीत अण्णा गेले. त्याला आता ३५हुन अधिक वर्ष झाली, पण त्यांच्या आणि दादांच्या मैत्रीची साद आज इतक्या वर्षांनंतरही त्यांच्याच गाण्यातून ऐकू येते असं वाटतं. अण्णा गेले तेव्हा मी फक्त दहा वर्षांची होते. त्यामुळे माझ्या आठवणीतले अण्णा काहीसे धूसर आहेत. खरं तर त्या वयात, ते किती मोठे संगीतकार आहेत आणि त्याच्या मागे चंदेरी दुनियेतली किती वलयं आहेत हे कळत नव्हतं पण ते कोणीतरी खास आहेत हे जाणवत असावं. नक्की आठवतंय ते त्यांचं व्यक्तिमत्व. अतिशय देखणे, देवाने अगदी मन लावून तयार केलेला चेहेरा आणि सहा फुटांच्या वर उंची. हे त्यांचं व्यक्तित्व जन्मभराची छाप पाडण्यासाठी पुरेसं होतं.त्या लहान वयातही मला त्यांचं वलयांकित वेगळेपण जाणवत असावं.ते आमच्या घरी यायचे,कधी आम्ही त्यांच्या घरी जायचो.एवढ्या मोठ्या झगमगत्या चंदेरी दुनियेतला हा वलयांकित तारा आमच्या घरी आला की आमचं छोटंसं घरही खास होऊन जायचं आणि दादाही अचानक हिरो झालेत असं वाटायचं.
आज विचार केला तर, सी. रामचंद्रांची माझ्या दादांशी असलेली मैत्री एक आश्चर्यच होतं. हिंदी चित्रपटाच्या सुवर्णयुगात संगीतकार म्हणून खूप नावाजलेली, गौरवलेली अशी एक अद्भुत व्यक्ती आणि आर. टी. ओ. इन्स्पेक्टर असलेले माझे वडील यांची एकमेकांशी साधी ओळखही असण्याची शक्यता कमी. पण ओळखही झाली आणि मैत्रीही झाली. एकदा मैत्री झाल्यावर त्यांच्यातल्या असामान्य संगीतकाराने आपल्या या सामान्य मित्रावर खूप मनापासून माया केली.
काही आठवणी
तेव्हा मुंबईच्या आर. टी. ओ. मध्ये दादांची बदली झाली होती. सहा वर्ष ते मुंबईत होते. वीकएंडला घरी यायचे. दादा पुण्यात असले की हमखास आण्णा आमच्या घरी यायचे नाही तर दादा त्यांच्या घरी जायचे. आमच्याकडे आले की त्यांचीच गाणी ऐकायचे. त्यावेळचे किस्से सांगायचे. कधी कधी ते आमच्याकडे जेऊनच जायचे. दादांच्या आणि अण्णांच्या मैत्रीचे धागे इतके घट्ट जुळलेले होते की एकदा मुंबईहून आल्याआल्या दादा अण्णांच्या घरी गेले. इकडे अण्णा दादांना भेटायला आमच्या दारात हजर. आईने दारातच त्यांना सांगितले, "अहो ते तुमच्याच घरी गेले आहेत. अरेच्चा!" म्हणून अण्णा तसेच परत घरी गेले. घरात दादांना बघून खुश झाले आणि म्हणाले, अरे! जोशीसाहेब, मी तुम्हाला भेटायला तुमच्याच घरी गेलो होतो." आता विचार करताना या आगळ्या मैत्रीचं, टेलीपॅथीचं अप्रूप वाटल्याशिवाय रहात नाही. ___अण्णांना चुरमुर्‍याची भडंग खूप आवडायचे. त्यांच्या घरीही टेबलवर नेहमी एक भडंगाची बरणी ठेवलेली असे. माझ्या आईने बनवलेली भडंग अण्णांना आवडायची. कधी घरी आले की, वहिनी भडंग आहे का?" असं हमखास विचारायचे. खरं तर क्षुल्लक गोष्ट पण यातलं मोठेपण हे की चंदेरी दुनियेतील एवढे महान संगीतकार पण आमच्या घरी अगदी साधेपणाने वागायचे, सगळ्यांची प्रेमाने विचारपूस करायचे. हसणं, बोलणं अगदी मार्दवतेचं. कधी मोठेपणाचा आव नाही कि बडेजाव नाही. आमच्या घरची साधी भाजी-भाकरी नाही तर पिठलं भात अगदी मनापासन खायचे.
त्यांना बरीच वर्ष डायबेटिसचा त्रास होता. रोज रात्री औषधाच्या गोळ्या घेऊनच जेवायचे. एकदा असेच आमच्या घरी अण्णा आणि दादा गाणी ऐकत बसलेले. आईने जेवायची तयारी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की औषधं आणायची राहिली. मग आईला म्हणाले, वहिनी, डबा भरून द्या, घरी जाऊन औषधं घेतो आणि मग जेवतो." या सगळ्या छोट्या-छोट्या आठवणीतून त्यांचं अस्सल मराठमोळं, लखलखीत बावनकशी व्यक्तित्व स्पष्टपणे समोर येतं.
एकदा आम्ही आमच्या छोट्याश्या फियाट गाडीने मुंबईला निघालो होतो आणि अण्णा आमच्याबरोबर होते. ते दादांबरोबर पुढे, मी आणि माझी धाकटी बहीण 'दमयंती' आईबरोबर मागे बसलो होतो. पोर्टेबल टेपरेकॉर्डरवर अण्णांचीच गाणी ऐकत प्रवास चालू होता. मी जन्मल्यापासून अण्णांचीच गाणी ऐकत असल्यामुळे मला बरीच गाणी अगदी लहान वयापासून तोंडपाठ होती. त्यामुळे मी ही त्या गाण्यांबरोबर जोरजोरात गात होते. एकदा दोनदा आईने समजावलं. शेवटी तिने दटावलं, समोर कोण बसलंय माहितीय ना? जरा गप्प बस." ते अण्णांनी ऐकलं ते आईला म्हणाले, "अहो गाउदे वहिनी तिला. चांगली गातेय." मला म्हणाले, अशीच गात रहा, पण स्वत:च्या पट्टीत गा, तिच्या पट्टीत गाऊ नकोस." हा माझ्यासाठी आयुष्यभर पुरेल एवढा मोठा आशिर्वाद होता.
अण्णांच्या दोन्ही मुलांचे, यशवंत आणि रेश्मा यांचे वाढदिवस ११ डिसेंबरला असतात. दमयंतीचा वाढदिवसही ११ डिसेंबरला असतो हे समजल्यावर दरवर्षी न विसरता तिच्या वाढदिवसाला अण्णा भेट पाठवायचे. ती चित्र छान काढते म्हणून त्यासाठी कधी रंगांच्या पेट्या कधी ड्रॉईंगबुक्स अशी भेट असायची. अशी उपयुक्त भेट निवडून ती आठवणीने पाठवण्याची सोय त्यांच्या सौभाग्यवती म्हणजे 'शांताबाई' च पहात असाव्यात. कारण हल्लीच जन्म-शताब्दी निमित्याने दादा त्यांना भेटायला गेले तेव्हा, दमयंती अजून चित्र काढते का?" असं त्या विचारत होत्या.
आभार
त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांची मी निस्सीम चाहती आहे. त्यांची अवीट गोडीची नितांत सुंदर गाणी रात्रीच्या निरवतेत श्रांतमनाला शांत करून जातात असा माझा विश्वास आहे. १२ जानेवारी, २०१७, पासून अण्णांचं जन्मशताब्दी वर्ष सुरु होत होतं आणि मला त्यानिमित्याने काही तरी करायची इच्छा होती. त्यांच्या गाण्यांच्या रूपाने या आठवणी जाग्या कराव्या असा विचार आला. रविवार पुरवणीमध्ये त्यांच्या बद्दल माहिती
संजय ढवळीकरां पुढे ठेवला, तो त्यांनी लगेच मान्य केला. त्याबद्दल त्यांचे आणि 'गोवनवार्ता'चे खूप आभार. वर्षभर 'गोवनवार्ता' या दैनिकाच्या रविवार पुरवणीत प्रत्येक दुसर्‍या रविवारी हे लेख प्रकाशित झाले. काही वाचकांनी आवर्जून फोनकरून, एसेमेस वरून, लेख आवडल्याचं कळवलं. कोणी काही सूचनाही केल्या. त्या सर्वांचे आभार.
लेख लिहिण्यासाठी माहितीची जमवाजमव सुरू केली. त्यांची गाणी तोंडपाठ असली तरी त्या गाण्यांमागची कहाणी, अधिक काही माहिती शोधायच्या मागे लागले. सी. रामचंद्रांबद्दल त्यांच्या 'माझ्या जीवनाची सरगम' या आत्मचरित्राशिवाय फारशी लिखित-छापील माहिती मिळत नव्हती. दादांकडे सी. रामचंद्रांवर, त्यांच्या चाहत्यांनी लिहिलेले बरेच लेख होते, काही पुस्तकं होती. अनेक इंटरनेट वेबसाईट्सवर खूप माहिती उपलब्ध होती. त्यांची जंत्री पुस्तकाच्या शेवटी दिलेली आहे. इंटरनेट हे खूप प्रभावी माहिती घर आहे. तिथे अनेक ब्लॉग्स लिहिले जातात. त्यात "अतुल्स बॉलीवूड सअॅंग अ डे आणि सअॅंग्स ऑफ दी यॉर" या दोन ब्लॉग्सवर माहितीचा प्रचंड खजिना आहे त्यांचा मला खूपच उपयोग झाला. त्या सर्व वेब-साईट्सचे आणि त्यांच्यावर लेख लिहिलेल्या त्यांच्या असंख्य चाहत्यांचे शतश: आभार.
आई-दादा, मनीष (माझा नवरा), यश-नील (माझी मुलं) आणि विशेष उल्लेख करावा अशा माझ्या 'आनंदयात्री' मैत्रिणी यांच्या प्रोत्साहनामुळे हे २८ लेख मी पूर्ण करू शकले. प्रत्येक लेखाच्या शेवटी त्या लेखात उल्लेखलेल्या चित्रपटाची/गाण्यांची युट्यूब लिंक देण्याची कल्पना मनीषची आणि ते लेख पुस्तक रूपाने प्रकाशित करावे हे ही त्यानेच सुचवलं. दादांच्या पंचाहत्तरीला २७ ऑक्टोबर २०१८ला या पुस्तकाचं प्रकाशन करायचं ठरलं. त्यामुळे हा पुस्तक प्रपंच झाला.
पुस्तकात छापण्यासाठी अण्णांचे काही वेगळे फोटो मिळतील का या विचारातून मी अण्णांचे चिरंजीव श्री. यशवंत चितळकर यांच्याशी फेसबुकच्या माध्यमातून संपर्क साधला. त्यांना काही लेखही वाचण्यासाठी पाठवले. त्यांनी लगेच फोटो शोधून ठेवतो सांगून काही दिवसातच खूपसे फोटो पाठवले. ते फोटो त्यांच्या सर्व चाहत्यांसाठीही नेटवर उपलब्ध करावे अशी ही परवानगी दिली. त्यांचेही मन:पूर्वक आभार.
श्रीमती सुलभ तेरणीकर यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे माझ्या लेखांना पुस्तक रूप मिळालं. त्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता प्रस्तावना लिहायचं मान्य केलं. स्वत:ची तब्बेत बरी नसताना, त्यांनी आपल्या व्यस्ततेतून वेळ काढून मला प्रत्येक वळणावर मार्गदर्शन केलं. लेखांमधल्या काही चुका, त्रुटी त्यांनी निदर्शनास आणून दुरुस्त केल्या त्यामुळे अचूकता जपता आली. त्यांना अनेक धन्यवाद.
पुस्तक छपाई आणि त्यासाठी काय करावं लागतं याबाबत मी पूर्णपणे अनभिज्ञ होते. संगीता अभ्यंकर या माझ्या मैत्रिणीने लगेच 'रीया ग्राफिक्स' चं नाव सुचवलं. त्यांनी लेख पुन्हा टंकलिखित करून त्यांचं अचूकतेसाठी वाचन करण्यापर्यंत सर्व भार वाहिला. त्यांच्या सहकार्यामुळे आणि वेळोवेळच्या सूचनांमुळे आज हे पुस्तक तयार झालंय, त्यांचेही मन:पूर्वक धन्यवाद.
शेवटी, माझ्या या पुस्तकाला माझ्या धाकट्या बहिणीचा म्हणजे दमयंतीचा हात लागल्याशिवाय त्याचं मोल वाढलं नसतं पण ती कॅनडाला रहात असल्याने प्रकाशनासाठी येणं शक्य नव्हतं. मग या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ तिच्याकडून करून घेतलं. आता हे पुस्तक आमच्या दोघींचं आहे. कुठल्याही प्रकारच्या छपाई, संदर्भ, कथा यात चूका होऊ नयेत असा प्रयत्न केला आहे. तरिही काही चुकिची माहिती, संदर्भ या पुस्तकात राहिले असतील तर क्षमस्व.
-- केतकी साळकर
पणजी-गोवा सप्टेंबर २०१८

Write your review for this book


Similar books:
  कला
   अस्ताई
   घरंदाज गायकी
   माझे संगीत - रचना आणि दिग्दर्शन
   अतरसुगंध
   अनूपरागविलास भाग १
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.