|
शरद पवार आणि मी
Author: ना. धों. महानोर
Publisher: साकेत प्रकाशन
|
|
Price: $3.83 $3.06 20% OFF ( ~160 Pages, R100)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: ई-सकाळ रविवार २९ जानेवारी २००६ निखळ स्नेहबंधाचे दर्शन ( मिलींद जोशी ) ना. धों. महानोर यांचे 'शरद पवार आणि मी' हे पुस्तक उभयतांतील मैत्रीच्या निव्वळ स्नेहबंधाचे दर्शन घडविणारे आहे. या पुस्तकातून महानोरांच्या आठवणींचा पट उलगडत जातो आणि अनेक कंगोर्यांनिशी शरद पवारांचे बहुपेढी व्यक्तिमत्त्व उभे राहते. ज्या वेळी महानोरांचा आणि पवारांचा विशेष परिचय नव्हता, त्या वेळी ही सामाजिक प्रश्नांची जाण असणारा एक राजकारणी, महाराष्ट्रातल्या साहित्य-संस्कृती आणि कलेच्या प्रांताविषयी आस्था असणारा एक नेता आणि समाजमनाची नस ओळखणारा एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून पवारांविषयीचे प्रेम महानोरांच्या मनात होते, तर दुसरीकडे एक प्रयोगशील शेतकरी, मातीचं गाणं गाणारा एक प्रतिभासंपन्न कवी म्हणून महानोरांविषयी पवारांना आपुलकी वाटत होती. प्रथम काहीशा अवघडलेल्या आणि संकोचलेल्या अवस्थेत उभयता एकमेकांना भेटले. नंतर औपचारिकतेची पुटं गळून पडली. मैत्रीत मोकळेपणा आला. पुढे ही मैत्री उभयतांच्या सुखदु:खात एकमेकांच्या पाठीशी उभी राहिली. त्या निरपेक्ष, निर्लेप आणि सच्च्या मैत्रीचे सुंदर दर्शन महानोर या पुस्तकात घडवितात.
शरद पवार आणि महानोर यांच्यातील मैत्रीचा धागा हे या पुस्तकाचे सूत्र असले तरी महाराष्ट्राच्या राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक घटनांचा वेध घेत घेत या पुस्तकाचा प्रवास होतो आणि त्यातून महाराष्ट्रातल्या काही दशकांचा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो. हा प्रवास घडवीत असताना महानोरांमधील लेखक त्रयस्थपणे आपली भूमिका मांडतो. त्यात आपल्या मित्राचे समर्थन करण्याचा कुठेही प्रयत्न होत नाही, त्यामुळे पुस्तक अधिक भावते. संयमी शरदराव, महाराष्ट्रातल्या खेडयापाडयातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला नावानिशी ओळखणारे शरदराव, राजकीय भूमिका बदलली तरी तत्त्वनिष्ठा न सोडणारे शरदराव, खांद्याला खांदा देणारे सहकारी सोडून गेल्यानंतर अस्वस्थ झालेले शरदराव, यशवंतरावांच्या निधनांनंतर गहिवरणारे शरदराव, न बोलताही भेटायला आलेल्या माणसांच्या मनातील भाव ओळखणारे शरदराव, राजकीय विरोधकांच्या मनातही आदराचे स्थान मिळविलेले शरदराव, निर्णयतत्पर शरदराव, महानोरांच्या सांसारिक अडचणीत आपलेपणाने त्यांच्या पाठीशी उभे राहणारे शरदराव, 'कवीला आमदार करणार्या तुमचे, माझ्याकडे कसे लक्ष नाही?' या फ. मुं. शिंदेंच्या प्रश्नावर मिस्कीलपणे उत्तर देणारे हजरजबाबी शरदराव, अशी पवारांची सामान्य माणसांना ज्ञात नसलेली विविध रूपं या पुस्तकातून उलगडत जातात आणि एक अनोखे व्यक्तिदर्शन वाचकांना घडते. असे असले तरी या छोटेखानी पुस्तकात सुसूत्रतेचा अभाव आहे. प्रसंगाच्या किंवा घटनांच्या गुंफणीमध्ये सलगता नाही. काही प्रसंगांचा उल्लेख अगदी त्रोटक आहे. त्यातून विशेष बोध होत नाही. तरीही मैत्रीची कहाणी वाचकांना गुंतवून ठेवणारी आहे. महानोरांमधील कवीबरोबरच त्यांच्यातल्या सिद्धहस्त ललित लेखकाचे दर्शन या पुस्तकातून घडते.
- मिलींद जोशी
Maharashtra Times Review
|
 |
 |
|