|
माझ्या कथा - माझी निवड
Author: आशा बगे
Publisher: ज्ञानेश प्रकाशन
|
|
Price: $4.22 $3.37 20% OFF ( ~176 Pages, R125)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: "संगीत ही माझी भूमी आहे. या भूमीतील अनुभव मला नित्यनूतनच वाटत असतो. या भूमीने मला कितीतरी अनुभव दिले. 'रंग' सारख्या काही कथांचं पोतच संगीताच होतं तर 'अत्तर' सारख्या कथांतील माणसंच संगीतानं दिलेली. 'मारवा' कथेला तर आमच्या घरातल्या संगीततृष्णेचेच पाणी चढलेले. अनुभवही अगदी स्वत:चाच वैयक्तिक असा. पण स्वत:च्या संदर्भापलिकडे या कथेने मला नेले. मला ही कथा माझ्या सर्व कथात आवडते. अजूनही मारवा राग, त्यातला जीवघेणा कोमल रिषभ, ती सायंकालीन वेळा - नदीच्या पाण्यावर त्याचा पडलेला केशरी प्रकाश अजूनही मला ते ताजे प्रवाही वाटते. त्या अनुभवाशी असलेले माणसाचे सनातनी नाते - तो अनुभव कुणीही माझ्यापेक्षा अधिक समर्हपणे व्यक्त करू शकला असता. पण मला तो अनुभव दिला तो मात्र माझ्यात झिरपलेल्या अभिजात संगीतानीच. हे मला ऋण वाटते. 'मल्हार' ही अलिकडली एक छोटीशी कथाही मला आवडते. संगीत याही कथेत आले आहे. पण अनुभव संगीताचा माही. माझ्या लेखनाच्या प्रत्येक टप्प्यावर मुलींना, सुशिक्षित मुलीना लग्नाच्या बाजारात उभे रहावे लागते, या अनुभवावर लिहिले गेले. तरीही मला ते अपुरेच वाटते. समाजात वावरताना याच अनुभवाची अनेक अंग जाणवली."
Review courtesy of Maharashtra Times: संयमित शैलीतील उत्कट भावानुभव
आजच्या आघाडीच्या कथालेखिका आशा बगे यांनी स्वत:ला आवडलेल्या आठ कथा माझ्या कथा-माझी निवड या संग्रहातून सादर केल्या आहेत. त्यातल्या काही वाचकांकडून दुर्लक्षित राहिलेल्या आहेत. इतरही कथा कलाकृती म्हणून निर्दोष वाटत नसल्या, तरी त्यातील उणिवांसकट त्या लेखिकेला आवडलेल्या आहेत.
नव्या युगामध्ये भारतीय स्त्रियांपुढे नवी आव्हानं आली. एकीकडे कर्तबगारीची नवी नवी दालने खुली होत असतानाच जुनी मूल्यं, परंपरा यांचे बंधही त्यांना जाणवत राहिले. या स्थितीचे वर्णन करताना काही लेखिकांनी बंधमुक्त, स्व-तंत्र, मनस्वी अशा स्त्रियांचे चित्रण केले. परंतु आशा बगे यांच्या कथांमधील मध्यमवर्गीय स्त्रिया संस्कारांनी बांधलेल्या असतात. त्या उच्चशिक्षित, मिळवत्या असल्या तरी कौटुंबिक व सामाजिक जबाबदार्या मनापासून पार पाडणार्या आहेत. एका पावसाळी संध्याकाळीमधली सुमित्रा, नाळमधली आई, नवसमधली रेवती, या दुबळया नाहीत, अतिशय संवेदनशील आहेत. पारंपरिक चाकोरीत राहूनच त्या आपले स्वत्व जपतात. इतकेच नाही, तर आपल्या स्वच्छ व ठाम भूमिकांमुळे इतरांना भावनिक आधारही देतात. भारतीय स्त्रीची परंपरा व तिचे स्वस्थ रूप किती ताजे व नव्या रूपात संपन्न होऊ शकते, याचे उदाहरण म्हणजे आशा बगे यांची कथा, असे मत श्री. चंद्रकांत बांदिवडेकर यांनी मांडले आहे. या रुढ प्रतिमेचा एक परिणाम असा दिसतो की, आशा बगे यांच्या कथांमध्ये शरीरसंबंधांचे चित्रण आढळत नाही. शुद्ध ही एका बलात्काराची शिकार झालेल्या नवविवाहितेची कहाणी. परंतु येथेही, नुकत्याच ओळखीच्या झालेल्या त्या नव्या नव्हाळीच्या झुळझुळ अनुभवात एका गटारपाण्याचा वाकडातिकडा जबरदस्त ओहोळ आला, अशा संयमित भाषेत त्या अनुभवाचे वर्णन आहे. रावणाचा स्पर्श झालेल्या सीतेपर्यंत ज्या आकांताने राम पोचला, तो कल्लोळ आणि तिचा तिरस्कार वाटू लागलेला तिचा नवरा यांच्यामधला विरोध, हाच या कथेचा गाभा आहे. विवाह बंधनांमधले ताण जाणवत असूनही आशा बगे यांच्या कथांमध्ये घटस्फोटित स्त्रिया दिसत नाहीत.
परंपरांचे आकर्षण हे फक्त स्त्रीपात्रांपुरते मर्यादित नाही. मारवामधील उमरी गावचे आबा देशपांडे व त्यांचा इंजिनिअर मुलगा रघुनाथ हेही कुळाचार जपणारे आहेत. नवसमधले मामा जुनी रीत, मोठेपणाचा आब, सांभाळून आहेत.
अतिशय समर्थपणे नात्यांमधील गुंतागुंत लेखिका उलगडत नेते. एका पावसाळी संध्याकाळीमध्ये असे अनेक पदरी अनुभव विशेष जाणवतात. सामान्य असल्यामुळे गुणवंताकडून नाकारली गेलेली सुमित्रा, गुणवंत-निरुपमा यांचं व्यावहारिक यश, त्या यशातली जयच्या रूपातरी खोट आणि केवळ प्रेम, सहानुभूती आणि निष्ठा यांच्या जोरावर सामान्य सुमित्रेने मिळवलेला विजय यांची ही कहाणी. नाळमधील संथ, खोल, गंभीर डोहासारखं प्रेम करणारी आई आणि त्याचे विश्लेषण करणे न जमताही केवळ सामर्थ्य जाणणारा मुलगा, मल्हारमधल्या दोन मित्रांच्या प्रेमाची, असूयेची कथा, हे सर्व माणसा-माणसांतील संबंधांचे शोध आहेत.
या कथांमध्ये चित्रदर्शी, भावदर्शी वर्णनं आहेत. अंधार अजूनही उजेडाला एका पदरानं धरून ठेवत होता. लहान मुलानं विश्वासानं आईचा पदर धरावा, तसा. (शुद्ध). काही ठिकाणी ते वातावरण, तो निसर्ग जणू कथेतलं एक पात्रच बनून येतो. पाहुणा ही कोळशाच्या मिलच्या परिसरात घडणारी कथा आहे. आग पेटल्यासारखं ऊन आणि कोळशाची काही धूळ जणू काळपट तपकिरी नागाच्या अंगावरच्या सुंदर पिवळया खवल्यांची विस्तीर्ण आवृत्ती बनते. काळया-पिवळया रंगांची या कथेत सतत जाणीव होत राहते. मुसळधारमधला पाऊस आणि पूर तर खरोखरच गिरिधरच्या मार्गातले शत्रू बनतात. संपूर्ण कथा जणू पाऊसमय झालेली आहे. तुडुंब भरलेल्या आभाळाकडे बघून गिरिधरला गर्भवती लेकीची आठवण येते. बरसून-बरसून थकलेल्या ढगासारखा तो घरी परत येतो. त्याची पत्नी मंदावत चाललेल्या पावसाच्या सरीसारखी शांतपणे बोलते- भरून आलेला, कोसळणारा, मंद होत आलेला, ठिबकणारा- पावसाची सर्व रूपं येथे मानवी भावनांना समांतर झालेली आहेत.
मुसळधार आणि पाहुणा या कथांना जर वाचकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसेल, तर त्याचे कारण म्हणजे त्यांचा वेगळया तर्हेचा अवकाश व अनुभव असावा, असे वाटते. पाहुणा ही तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांची कथा. त्यापैकी एक काळाभोर नरसय्या; तर दुसरा पिवळे खवले असलेला साप. एका वेगळया उन्मादाची, वेगळया पातळीवर घडणारी ही कथा आहे. मुसळधारमध्ये कोसळणार्या पावसाच्या पार्श्वभूमीवर माणसाच्या अतीव उत्कट इच्छांची गूढ पूर्तता आहे.
मल्हार-मारवा या संगीताचे पोत असलेल्या कथा आहेत. संगीत ही माझी भूमी आहे. या भूमीतील अनुभव मला नित्यनूतनच वाटत असतात, असे लेखिकेने म्हटलेले आहे, त्याचा प्रत्यय येथे येतो. काही ठिकाणी मात्र विशिष्ट रागांचा, स्वरांचा संदर्भ अनभिज्ञ वाचकांच्या लक्षात येणार नाही, असे वाटते.
संयमित शैली आणि परिचित, पारंपरिक विश्वाच्या परीघातूनही अतिशय संपन्न, उत्कट असा भावानुभव देणार्या आशा बगे यांच्या या कथा आहेत.
- उषा तांबे
|
 |
 |
|