Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


विदेश-दर्शन
Author: यशवंतराव चव्हाण
Publisher: सुरेश एजन्सी
Add to Shopping Cart
Price: $10.66 $8.52 20% OFF ( ~325 Pages, R350)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
प्रस्तावना

यशवंतराव चव्हाण यांचे, दीर्घकाल विश्वासात असलेले मित्र व चरित्रकार रामभाऊ जोशी यांच्या हाती 'विदेश-दर्शन' हा पत्रसंग्रह यशवंतरावांनी देऊन ठेवला होता. भारताच्या केंद्रसरकारचे संरक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री व विदेशमंत्री या अनेक प्रकारच्या नात्यांनी ज्या विदेश-यात्रा यशवंतरावांच्या घडल्या, त्या यात्रांमधील विदेशांतून पाठविलेल्या पत्रांचा हा संग्रह आहे.
ही पत्रे त्यांनी त्यांच्या पत्नी सौ. वेणूताई यांना लिहिलेली आहेत. वेणूताईंची प्रकृती नेहमीच अस्वस्थ होती. यशवंतराव हे केंद्रीयमंत्री म्हणून प्रवासाला निघाले असताना, वेणूताईंनी त्यांच्यासह प्रवासाला निघणे क्रमप्राप्त व उचित झाले असते; परंतु यशवंतरावांच्या कार्यक्षमतेला ताण पडू नये म्हणून यशवंतरावांची त्यांना बरोबर घेण्याची उत्कट इच्छा असूनही वेणूताईंनी प्रवास नाकारला.
ही स्थिती यशवंतरावांना अस्वस्थ करणारी होती; परंतु नाइलाज होता. वेणूताई आपल्या प्रवासात सहभागी नसल्या, तरी त्यांना पत्रद्वारे विदेश-दर्शन व्हावे अशी त्यांची उत्कट इच्छा या पत्रलेखनाच्या रूपाने सफल झाली. रसिक वाचकही वेणूताईंप्रमाणेच हा पत्रसंग्रह वाचत असताना विदेश-दर्शनात रमतो. भारताचा एक अग्रगण्य, दूरदर्शी, बहुश्रुत, प्रज्ञावंत मुत्सद्दी या रूपात या 'विदेश-दर्शन' पुस्तकात यशवंतरावांचेही दर्शन घडते.
नोव्हेंबर १९६३ ते जानेवारी १९७७ एवढया दीर्घ कालखंडात विस्तारलेला हा पत्रसंग्रह आहे. प्रवासवर्णन म्हणून जो ललित साहित्याचा सुप्रसिध्द आकृतिबंध आहे, तो आकृतिबंध या पत्रव्यवहारालाही सहज रीतीने प्राप्त झालेला आहे.
आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका आणि अन्य अनेक द्वीपे या पत्रव्यवहाराने व्यापली आहेत. ही एक तर्‍हेची पृथ्वीप्रदक्षिणाच आहे. बहुतेक प्रवास विमानातून केलेला आहे. त्याबद्दल ते म्हणतात, ''विमानातून प्रवास करताना सबंध मुलुख डोळयांखालून जातो आणि मग त्याचे वैभव मनावर ठसते.''
ते जेथे-जेथे जातात, तेथील विशिष्ट समाजजीवन, प्रदेशाचा निसर्ग आणि त्या प्रदेशाचा इतिहास, त्यांच्या मन:चक्षूंपुढे उभा राहतो. त्या त्या प्रदेशाची नैसर्गिक व ऐतिहासिक सगळी महत्त्वाची वैशिष्टये ते या पत्रव्यवहारात बिनचूक रीतीने टिपत जातात. राजकारण आणि अर्थकारण या दृष्टींनी त्या त्या प्रदेशाचा ते सखोल वेध घेतात, कारण विदेशगमनाचे ते मुख्य प्रयोजन असते.
ते जेथे-जेथे जातात, तेथील विशिष्ट समाजजीवन, प्रदेशाचा निसर्ग आणि त्या प्रदेशाचा इतिहास, त्यांच्या मन:चक्षूंपुढे उभा राहतो. त्या त्या प्रदेशाची नैसर्गिक व ऐतिहासिक सगळी महत्त्वाची वैशिष्टये ते या पत्रव्यवहारात बिनचूक रीतीने टिपत जातात. राजकारण आणि अर्थकारण या दृष्टींनी त्या त्या प्रदेशाचा ते सखोल वेध घेतात, कारण विदेशगमनाचे ते मुख्य प्रयोजन असते.
यशवंतराव स्वत: मोठे रसिक, कलाप्रेमी असल्यामुळे वस्तुसंग्रहालया- बरोबरच रंगमंदिरालाही भेट देतात. त्या त्या प्रदेशांतील नृत्य आणि नाटय या कलांमध्ये ते पूर्ण रंगून जातात. केवळ इंग्लिश भाषिक खेळच ते पाहतात असे नाही. रशियात, मॉस्कोला गेले असताना रशियन रंगभूमीवर चाललेले खेळ पाहण्यात ते दंग होतात. ताश्कंदला गेले असताना तेथे रात्री एक ऑपेरा पाहून आले. त्यासंबंधी ते म्हणतात, ''उझबेकी भाषेतील ऐतिहासिक प्रेमकथेवर आधारलेले हे नाटय भव्य होते. संगीत उत्तम होते. परंतु एक गायिका इतकी जाडजूड होती, की तिला सुंदर कसे म्हणावे हेच समजत नव्हते.'' मीही अनेक वेळा रशियात गेलो आहे. माझा असा ग्रह झाला की, रशियन तरूणांच्या डोळयांना सडपातळ आणि जाडजूड या फरकाचे काही महत्त्व वाटत नाही. तारुण्य व लावण्य असले की खूप खूष होतात.
ज्या ज्या शहरात ते महत्त्वाच्या कामगिरीकरिता जातात, तेथे वेळ नसला तरी वेळात वेळ काढून काही वेळ रंगभूमीवर रंगतातच. ते सांगतात- ''लंडनची रंगभूमी हे माझे सर्वांत मोठे आकर्षण आहे. दोन नाटके पाहिली. अगदी वेगवेगळया स्वरूपाची, पण रंगतदार होती. अभिनयातील सहजता, आधुनिक तंत्रामुळे आलेली वास्तवता, कथेतील स्वाभाविकता-नाटकाचे अंक दोन; दोन अंकांत सर्व मिळून चार प्रवेश. दोन-अडीच तासांत सर्व काही संपते. एक नवा आनंद घेऊन प्रेक्षक बाहेर पडतो. कित्येक नाटके दोन दोन वर्षे सतत चालली आहेत. या रंगभूमीला पल्लेदार इतिहास आहे. काळाने आलेली परिपक्वता आहे. कलाकारांची जाणीव आणि व्यासंग या सर्व गोष्टींनी नाटयकला येथे सदा बहरलेली असते.'' लंडनहून वॉशिंग्टनला आल्यावर त्यांनी हे पत्र लिहिले आहे.
न्यूयॉर्क येथे विदेशमंत्र्यांची परिषद होती. यूनो. मध्ये आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर मुक्त चर्चा होती. रात्री Sअमे तिमे नेw येअर हे नाटक पाहिले. त्यासंबंधी म्हणतात : ''केवलसिंग, जयपाल पतिपत्नी आणि शरद काळे असे गेलो होतो. हे एक नमुनेदार अमेरिकन नाटक आहे. पात्रे फक्त दोन; उत्कृष्ट कामे केली. दोन-अडीच तास फक्त दोन पात्रांनी नाटक असे रंगविले की सांगता सोय नाही. नाटकाचा विषय, मांडणी, कलाकारांनी जीव ओतून केलेला अभिनय, यांमुळे नाटक फारच परिणामकारक होते. विनोद भरपूर आहे. पण सर्व विनोद मूलत: जीवनातील गंभीर अनुभूतीतून निर्माण होतो.
एका जोडप्याची विवाहबाह्य मैत्री अकस्मात आपापल्या गावापासून दूरच्या शहरी होते. दरवर्षी याच महिन्यात एका वीकएन्डला ते सतत पंचवीस वर्षे भेटत राहिले. सहा दृश्ये आहेत. दर पाच वर्षांनी होणारी भेट प्रत्येक प्रवेशामध्ये दाखविली आहे. पंचवीस वर्षांतले, परिस्थितीत, वयात, स्वभावात, मनात झालेले फरक दाखविले आहेत. पण मैत्री अतूट आहे. शेवटी त्यांतले गृहस्थ वृध्दपणी लग्नाची इच्छा व्यक्त करतात आणि स्त्री म्हणते, ''ई cअन्नोत''. कुटुंबाविषयीचा जिव्हाळा, नवर्‍याबद्दल आदर ही कारणे सांगते आणि ती खरी असतात. तो रागावतो व निघून जातो पण लगेचच परततो आणि मैत्री संथपणे पुन्हा सुरू राहते. म्हटले तर मजा, म्हटले तर एका गंभीर प्रश्नाचे चित्रण होते.'' (न्यूयॉर्क, १२ ऑक्टोबर १९७५).
यशवंतराव आपल्या विशिष्ट मंत्रिपदाच्या गरजांप्रमाणे विदेशांतील उच्चपदस्थ, प्रथितयश व्यक्तींशी संधान बांधणे, हे पहिले कर्तव्य समजतात. भारताच्या हितसंबंधाशी उदासीन कोण, विरोधी कोण, सहानुभूतीचे कोण आणि प्रत्यक्ष मदत करण्यास तयार कोण, याची ते बारकाईने तपासणी करतात. बहुतेक सगळा परिचय आणि संवाद, सुसंस्कृत शिष्टाचाराच्या पातळीवर चालत असल्याने त्यातील औपचारिक भाग वगळून तथ्य कशात आहे आणि वैय्यर्थ कशात आहे, याची ते विलक्षण तटस्थतेने समीक्षा करीत असतात आणि ही समीक्षा त्यांच्या विदेशदर्शनात सुरेख रीतीने नोंदवली आहे. उदा., जागतिक बॅंकेचे व अमेरिकेचे एकवेळचे अर्थसचिव मॅक्नामारा यांच्याशी त्यांनी परिचय करून घेतला. वारंवार भेटी होऊन त्याचे मैत्रीत रूपांतर झाले. हीच गोष्ट अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे पट्टीचे मुत्सद्दी किसिंजर यांच्या संबंधात लक्षात येते.
आशिया, आफ्रिका, विकसनशील देश व विकसित देश यांचे मौलिक प्रश्न सुटण्यासारखे कोणते आणि न सुटण्यासारखे कोणते, याच्या चिकित्सेत यशवंतराव गढून जातात, आणि त्याचे सखोल विवेचन करतात. निकोशियाच्या कॉमनवेल्थ अर्थमंत्र्यांच्या परिषदेसंबंधी यशवंतरावांनी जे विवेचन केले आहे ते या संदर्भात अत्यंत वाचनीय झाले आहे.
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या स्थलांचे दर्शन यशवंतराव घेतात तेव्हा समोर जे त्यांना दिसत असते, त्यापेक्षा भूतकाळात जे घडलेले असते, ते उठावदारपणे त्यांच्या मन:चक्षूंपुढे त्याच वेळी उभे राहते. उदा., त्यांनी भेट दिलेली, आठव्या हेन्रीचा राजवाडा आणि पॅरिसजवळील व्हर्सायचा राजमहाल ही प्रवाशांची अत्यंत महत्त्वाची आकर्षणे होत.
हेन्रीच्या राजवाडयासंबंधी यशवंतराव लिहितात, ''पंधराव्या शतकातील आठवे हेन्री म्हणजे एक विलक्षण प्रकरण होते. अनेक लग्ने केली, अनेकांच्या मिळकती हडपल्या, हॅम्पटन कोर्ट त्यांपैकीच. या राजाची लहर लागली की जो मनुष्य मर्जीतून उतरे, त्याची वास्तू आपलीशी करीत असे. मोठमोठी आणि पाठोपाठ अशी तीन प्रांगणे. एक कलापूर्ण दिवाणखाना, जुनी पाचशे वर्षांपूर्वीची अजूनही रेखीवपणे राखलेली सुंदर बाग, जुन्या चित्रकारांनी काढलेल्या कलाकृती व जुन्या शस्त्रांनी सजवलेल्या राजवाडयाच्या भिंती, ही सर्व मला वैशिष्टयपूर्ण वाटली.''
ज्या विदेशातील नगरीशी भारतीय संस्कृतीचा इतिहास निगडित झालेला असतो, त्या नगरीबद्दल त्यांचे विवेचन वास्तववादी असले तरी अत्यंत भावपूर्ण असे असते. याची अनेक उदाहरणे या पत्रसंग्रहात मिळतात. इंडोनेशिया आणि काबूल यांची माहिती भावनांनी भरलेली आणि इतिहासाने परिणामकारक व उठावदार बनली आहे.
काबूलबद्दल त्यांची भावना अधिक गंभीर आणि उत्कट बनते. ते लिहितात - ''दहा लाख वस्तीचे हे शहर विस्तृत पसरलेले आहे. नवे विभाग आधुनिक बनत आहेत. जुने काबूल तसेच जुने आहे. संध्याकाळी इंटरकॉन्टिनेन्टलच्या खैबर सूटमधून काबूल शहर पाहिले. एक विलक्षण शांत, सुंदर, मनोहारी दृश्य दिसते.
''भारतीय क्लासिकल संगीत येथे लोकप्रिय आहे. आपल्यासारख्या बैठकी येथे रंगतात. अफगाण गायक श्री. सारंग याचे गायन मी आलो त्या रात्रीच्या जेवणानंतर विदेश-मंत्रालयाने ठेवले होते. बडे गुलाम अलीची आठवण झाली. सुरावट तीच. आरोह-अवरोहाचे नखरे तेच, देहयष्टीही तशीच.''
''आज सकाळी सरकारी छोटया विमानाने 'बामीयान'ला गेलो होतो. तेथे पंधराशे ते सोळाशे वर्षांपूर्वीचे भगवान बुध्दाचे दोन भव्य पुतळे डोंगरकपारीत कोरलेले आहेत. कुशाण राजवंशाने बुध्द धर्माचा येथे प्रसार केला. तेव्हाचे हे सांस्कृतिक लेणे आहे. दोन मूर्ती आहेत. एक १५० ते १६० फूट उंचीची व दुसरी असेल शंभर फूट उंचीची. त्या डोंगरकपारीत असंख्य लेणी आहेत. अजिंठा-वेरूळची आठवण येते. भारत-अफगाण-सरकारांच्या साहाय्याने हे अवशेष सुरक्षित राहिले पाहिजेत म्हणून गेली काही वर्षे तज्ज्ञांमार्फत प्रयत्न चालू आहेत. मोगल साम्राज्याचे संस्थापक बाबर यांची कबर येथे आहे. तीच मी पाहणार आहे. अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील विभागात राहणार्‍या एका जमातीचे लोक उत्तम घोडेस्वार आहेत. ते अनेक धाडसी प्रयोग करतात. त्यांची येथे स्पर्धा आहे, तीही पाहणार आहे.''
''बामीयानच्या खोर्‍यात चेंगीझखानाच्या क्रौर्यांचे काही अवशेष पाहिले. बुध्दमूर्तीच्या खालच्या बाजूला एका उंच टेकडीवर एक शहर होते. चेंगीझखानाने त्या शहराचा संपूर्ण विध्वंस केला. स्त्री, पुरुष, मुले या सर्वांचा संहार केला. आताही हे शहर उद्धवस्त स्वरूपात अमानुष क्रौर्याची साक्ष देत उभे आहे.
करूणेची मूर्ती भगवान बुध्दही उभे आहेत आणि चेंगीझखानाचे क्रौर्यही शेजारीच उभे आहे. इतिहासात क्रौर्य आणि करुणा यांची जणूकाही स्पर्धाच चालू आहे. कुणाचा विजय होत आहे? करूणेचा की क्रौर्याचा? मन कधीकधी साशंक होते. आजच्या जगाकडे पाहिले की हा प्रश्न भेडसावू लागतो. मानवाची प्रगती होत आहे, असा आमचा दावा आहे. हा खरा असेल तर करूणेचाच विजय होतो आहे असे मानावे लागेल. पण अण्वस्त्रांच्या रूपाने आधुनिक चेंगीझखानाचे क्रौर्य उभे आहे. याची जाणीव झाली की पुन्हा मन अस्वस्थ होते आणि साशंक बनते. अर्थात पुरुषार्थ करणारांनी करुणेचा मार्ग पत्करला पाहिजे. याच श्रध्देने मी आज बामीयानहून परतलो'' (काबूल, ३१ ऑक्टोबर, १९७५ - हॉटेल इन्टरकॉन्टिनेन्टल).
इंडोनेशियातील बाली बेटाला यशवंतरावांनी भेट दिली होती. या बेटावर पंधराशे वर्षांपूर्वी हिंदू संस्कृती अवतरली. ती संस्कृती आजही आपल्यापरी परंपरेचे सामर्थ्य सांभाळून तेथे नांदत आहे.
यशवंतराव लिहितात - ''वर्षांनुवर्षें ज्यासंबंधी वाचले. ऐकले ते बाली बेट आज पाहिले. दुपारी सव्वाअकराला जकार्ताहून निघालो. दुपारचे जेवण विमानातच घेतले. दीड तासात येथे पोचलो. विदेशमंत्री- डॉ. आदम मलीक, आज त्यांचा वाढदिवस असतानाही या ट्रीपवर आमच्या बरोबर आलेले आहेत. मी बाली बेटावर हिंदू संस्कृती पहावी, असा त्यांचा आग्रह गेल्या वर्षांपासून होता. विमानतळावर उतरताना अगदी बाली-हिंदू पध्दतीप्रमाणे स्वागत झाले.
दोन तरुण, महाभारतकालीन हिंदूंचा पेहराव असावा, तसा अंगावर धारण करून आगतस्वागत करण्यासाठी हातात छत्रचामरे घेऊन आले. त्याचप्रमाणे दोन प्रौढ तरूणी पुष्पमाला हाती धरून सामोर्‍या आल्या. कपाळावर कुंकू, गौरवर्णाकडे झुकणारी कांती, हिंदू विनम्रता-क्षणभर सर्व काही अगदी महाभारतकालीन वातावरण असल्यासारखे वाटले. या बाली स्टाइल स्वागतानंतर बाली बीच हॉटेलात आलो. सुरेख बीच आहे.
माझ्या खोलीच्या गच्चीत गेल्यावर पूर्व दिशेला पसरलेला जावा समुद्र दिसला. क्षितिजावर अंधुकसे एक बेट व त्याच्यावरचे डोंगररांगांचे आकार दिसत होते. सुमद्राचे पाणी शांत व स्वच्छ दिसले. उद्या सकाळी सूर्योंदयाचे आत या समुद्रकाठच्या चौपाटीवर अनवाणी चालण्याचा विचार आहे. बाली बेटावरची समुद्राची रेती उघडया पायतळाला लागावी, अशी इच्छा आहे. या भूमीवर नम्रतापूर्वक असेच चालले पाहिजे. हा हिंदूंचा मुलुख आहे. मी हे हिंदुत्ववादाच्या भावनेने नाही म्हणत-पण अजूनही येथे लाखो हिंदू, परंपरागत कथांच्या आधारे चालत आलेली हिंदू संस्कृती जपत आहेत हे पाहिले. चारच्या सुमारास बाहेर पडून एका हिंदू कुटुंबाचे, कुटुंबाने चालवलेले हॅण्डिक्राफ्ट्सचे कार्य पाहिले. त्याने घराची आखणी दाखवली. ही परंपरागत आहे. घराला दरवाजा आहे. आत जाताच मोकळे अंगण. ईशान्येच्या बाजूला मंदिर. सामान्यत: सुखवस्तु हिंदू तसेच आहेत. हिंदू संस्कृती जातपातीचा वारसा येथेही घेऊन आली.
''पण बेट फार सुंदर आहे. केरळ कोकणासारखी गर्द झाडी. जमीन उत्तम म्हणून शेती उत्तम. हे लोक अतिशय उद्योगी आहेत. नटलेला निसर्ग इतका विपुल की, नृत्य, नाटय, चित्रकला या कला शतकानुशतके पोसल्या गेल्या त्यात काय आश्चर्य!'' (बाली. इंडोनेशिया, २२ जुलै १९७६.)
''सकाळी बालीहून निघण्यापूर्वी एक कलाकेंद्र पाहिले. नानाविध लाकडांच्या कोरलेल्या मूर्ती होत्या. पारंपरिक व आधुनिक यांचे मिश्रण या संग्रहात आहे. उभ्या नाचणार्‍या श्रीगणेशाची मूर्ती ही मला नवीन वाटली. मूर्ती आकर्षक होती. आणखी एक नवेपण या मूर्तीत पाहिले. शंकराच्या गळयात जसा सर्प असतो तसा सर्प या गणेशाच्या कमरेला वेटाळून होता.
बाली हिंदूंमध्ये त्याच कथा- रामायणातल्या व महाभारतातील- काहीशा फरकाने सांगतात. कर्मसिध्दांत व गीतेवर फार विश्वास. बालीतील हिंदू कर्मयोगाचे तत्त्व आचरणात आणतो, असे एक वरिष्ठ हिंदू अधिकारी सांगत होता. लोक उद्योगी व आनंदी आहेत त्याचे रहस्य त्यात आहे, असे त्याचे मत. गाईचे स्थान येथील हिंदूंच्यात, विचार-आचारात काय आहे, हे मी मुद्दाम समजून घेण्यासाठी विचारले. त्या गृहस्थाने सांगितले की आम्ही गायी पाळतो, पण ते त्यांच्या दुभत्यासाठी आणि बैलांसाठी. ब्राह्मण सोडून बाकी सर्व हिंदू गोमांसभक्षक आहेत व त्यात काही गैर वा अधार्मिक आहे, असे ते मानत नाहीत.''
''दुपारी साडेअकराला जोगी आकार्ता या शहरात पोचलो. दोन नंतर येथून ३० मैलांवर बोरोबुदुर हे विश्वविख्यात बुध्दमंदिर आहे, ते पाहण्यासाठी गेलो. हे मंदिर जगातील सर्वात मोठे बुध्दमंदिर आहे. नवव्या शतकात, म्हणजे एक सहस्त्र वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले. मंदिराची रचना शिल्प म्हणून व बुध्दतत्त्वज्ञानाचे प्रतीक म्हणूनसुध्दा अपूर्व आहे. एकशेवीस गज लांब, रूंद व तितकेच उंच ही लांबीरुंदी पायाशी आहे. पण पुढे ती निमुळती होत जाते. शिखराचे जागी मोठे गोल स्तूप आहेत.
पूर्वेकडील प्रवेशद्वार प्रमुख आहे. त्यातून प्रवेश करावयाचा. जसजसे आपण वर जातो, तसे प्रदक्षिणा घालता येईल अशी व्यवस्था वेगवेगळया उंचीच्या स्तरांवर केलेली आहे, असे आढळून येते. जसजशी मंदिराची उंची चढत जाते, तसतशी आध्यात्मिक अनुभवाचीही उंची वाढते, असे दिग्दर्शित केले आहे. हे व्यक्त करण्यासाठी भगवान बुध्दाच्या मूर्तीच्या मुद्रांचा उपयोग केला आहे. अशा तर्‍हेने बुध्दाच्या पाचशेसाठ मूर्ती सर्व मंदिरावर प्रतिष्ठित केल्या आहेत. मूर्तीच्या ओठांवरील नित्य ओळखीचे ते सौम्य हास्य व ज्ञानी पुरूषाचे शालीन डोळे आजही तसेच दिसतात. मनाला कसल्यातरी तृप्तीचा आनंद होतो.
आज दिवसभर या मंदिराने भारून गेलो आहे. आशियाखंडातील पुरातन संस्कृतीचे हे अवशेष पाहिले म्हणजे माणूस भारून गेला नाही, तरच आश्चर्य! वेरूळ-अजिंठयाची आठवण झाली. तेथील रूपसंपन्न चित्रकला, शिल्प व विविध भव्य भाव दाखविणारी बुध्दाची अविस्मरणीय मूर्ती यांच्या संगतीला बोरोबुदुरची जोड मिळाली.'' (जोगी अकार्ता- २३ जुलै १९७६.)
संयुक्त राष्ट्रे या जागतिक संस्थेशी यशवंतरावांचे वारंवार संबंध आले. या संस्थेत जगातील शेकडो राष्ट्रांच्या प्रतिनिधींसमोर त्यांची सगळीच भाषणे मुद्देसूद व आंतराराष्ट्रीय राजकारणामध्ये सामंजस्य स्थापन करण्याच्या उदात्त उद्देशाने प्रेरित अशी झाली.
भारताच्या तटस्थतेचे सूत्र अधिक अर्थपूर्ण रीतीने विशद करून त्यांनी या जागतिक संस्थेमध्ये मांडले. महत्त्वाच्या व्यक्तींच्यावर प्रभाव पाडणे, त्यांच्या विरोधाची धार कमी करणे, त्यांचे मतपरिवर्तन करण्याकरता मोठया ध्येयवादी दृष्टीने झटत राहणे, असा यशवंतरावांचा प्रयत्न सतत चालू राहिला.
राष्ट्राची मते बदलणे किंवा राष्ट्राच्या मतावर प्रभाव पाडणे ही गोष्ट पुष्कळ वेळा अशक्य असते; परंतु राष्ट्राच्या प्रतिनिधीभूत व्यक्तीच्या मतांमध्ये बदल करणे ही पुष्कळ वेळा शक्य कोटीतील गोष्ट असते, हे तत्त्व लक्षात घेऊन यशवंतराव प्रयत्नशील असत. या संदर्भांत ब्रिटनचे मजूरपक्षाचे नेते आणि प्रधानमंत्री याबद्दल यशवंतराव मार्मिकपणे म्हणतात: ''एकोणीसशे ४५-४६ मध्ये अॅटली नसते, तर इतिहासाची पावले कदाचित वेगळी पडली असती, असे वाटू लागते. व्यक्तीव्यक्तीचा फरक इतिहासाच्या दिशा बदलू शकतो, हे काही प्रमाणात, किंबहुना बर्‍याच प्रमाणात खरे आहे.'' (न्यूयॉर्क ते जिनिव्हा, पृ. १७३).
भारताचे उच्चपदस्थ केंद्रमंत्री या नात्याने यशवंतरावांनी जेथे जातील तेथे राजकारणी, पत्रकार, सत्ताधारी, कलाकार, इत्यादिकांना मेजवान्या दिल्या. त्याप्रमाणे शेकडो मेजवान्यांना आणि समारंभांना ते उपस्थित राहिले. खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था होतीच. या संदर्भात यशवंतराव म्हणतात, ''आम्ही पिणारे नाही, हे पाहून आमची व्यवस्था ठेवण्यासाठी येथे हजर असलेल्या लोकांची फारच निराशा झाली.''
त्या त्या राष्ट्रातील प्रधानमंत्री किंवा अन्य मंत्री सपत्नीक हजर असायचे. गप्पांचा कलकलाट व अधूनमधून हास्याची उडणारी कारंजी, अशा तर्‍हेचे मोहक वातावरण असायचे. हातात हात घालून आणि गळयात गळा घालून मोकळेपणाने नाचत व हिंडत असणारी जोडपी त्यांना भेटायची. असा आनंदसमारोह रात्री अकरापर्यंत चालू असायचा. त्यात यशवंतराव एकाकी पडायचे आणि सलगी करणारे उच्चपदस्थ त्यांच्या एकाकीपणावर नेमके बोट ठेवत असत.
कोणत्याही शहरात गेले, की तेथे न चुकता तीन स्थलांना ते भेट देत असत. वस्तुसंग्रहालय, पुस्तकांचे दुकान आणि नाटयमंदिर. कंटाळा आला म्हणजे आपल्या निवासस्थानी विश्रांति घेत. सभासंमेलनांच्या उपस्थितीची तयारी करीत. त्यांचे निवासस्थान म्हणजे त्या त्या नगरीतील भव्य व अद्ययावत शैलीची सगळयात महाग अशी हॉटेलची इमारत बहुतेक असायची. एकांतपणे कामाची कागदपत्रे वाचीत आणि टिपणे करीत वेळ निघून जायचा. गरमगरम चहा हे त्यांचे प्रसन्न करणारे पेय होय. त्याचा ते या पत्रसंग्रहात वारंवार उल्लेख करतात.
या विदेश-यात्रांमध्ये राजकारणाबरोबरच तत्त्वचिंतनालाही धार येत असे. या पत्रव्यवहाराच्या शेवटी त्यांच्या मनात गर्दी केलेल्या अनेक प्रश्नांचा आढावा ते घेत आहेत. या प्रश्नांसंबंधी ते म्हणतात की, ''गेले अनेक महिने व काही वर्षे म्हटले तरी चालेल, हे प्रश्न मनात जमलेले आहेत. काही प्रश्न उभे रहात गेले आणि त्या त्या वेळी उत्तरे मिळत गेली. परंतु उत्तरांची सुसंगत आखणी झालेली नाही. पुढल्या वर्षी तीस वर्षे होतील, मी पहिली निवडणूक जिंकून सरकारमध्ये आलो. सत्ता हस्तगत करण्याकरता लोक प्रयत्न करतात, सत्ता माझ्या हातात आपोआप आल्या. समाजाच्या परिवर्तनासाठी मी त्या वापरल्या. दलितांबद्दल कणव ठेवून सामाजिक न्याय प्रस्थापित केला पाहिजे ही माझी प्रेरणा प्रथमपासूनची होती. सत्तेच्या केंद्रस्थानी असताना उच्च उद्दिष्टांसाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. पण आज मी जेव्हा राजकारणातले चित्र पाहतो, तेव्हा माझे मन अस्वस्थ होते.
खरोखरीच आपण काही नव्या कामाचा पाया घातला होता का? खरी जिव्हाळयाची माणसे अवतीभोवती होती का? झाले हे पुरे नाही का? असाच खेळ पुढे किती दिवस, कुणासाठी आणि काय म्हणून चालू ठेवायचा, असा प्रश्न माझ्यापुढे आहे. मी काही राजकारण-संन्यास घेण्याचा विचार करत नाही. विचार येतो निवडणुकांचा आणि सत्तास्थानांचा. आज सत्तास्थानांवर राहण्याची अनेकांची धडपड चालू आहे. आहेत ते तेथेच कसे राहता येईल यासाठी साधनशुचितेचा कसलाही विचार न करता, अगदी क्रूरपणे कारस्थाने करताहेत. त्या कारस्थानाचे बळी होण्यापूर्वीच योग्य वेळी, योग्य निर्णय घेऊन बाजूला झाले, तर बरे नाही का? असा प्रश्न मनात घोळत आहे.'' (माटेंगो बे-जमेका- दि. ४ मे १९७५) हे प्रश्न लिहून झाल्यावर दहा वर्षांनी निसर्गानेच यशवंतरावांना बाजूला केले.
अशा तर्‍हेचे लेखन यशवंतरावांनी जी सत्तास्थाने भूषविली त्या सत्तास्थानांवरील कोणत्याही भारतीय व्यक्तींनी केलेले नाही याचे कारण इतका उच्च दर्जाचा ध्येयवाद, तात्त्विक चिंतन, साहित्य कुशलता, यांचा त्यांच्या ठिकाणी अभावच होता हे सूचित होते.
हा पत्रसंग्रह भारताच्या गेल्या ४० वर्षांतील राजकीय इतिहासामध्ये एक महत्त्वाची अशी देणगी आहे. ही देणगी यशवंतरावांच्या कायमच्या, अत्यंत विश्वासातील श्रीर्‍आमभाऊ जोशी यांनी जनतेला प्राप्त करून दिली यात त्यांचे ऋण जनतेने लक्षात घेणे आवश्यक आहे.
हा पत्रसंग्रह _ 'विदेश-दर्शन' _ मराठी साहित्यातील एक उच्च दर्जाची साहित्यकृती म्हणून विराजमान होईल यात शंका नाही.
लक्ष्मणशास्त्री जोशी
वाई
दिनांक १८ मे, १९८८

Other Links:

Write your review for this book

Other works of यशवंतराव चव्हाण
   कृष्णाकाठ ( जन-आवृत्ती )
   भूमिका ( जन आवृत्ती )
   कृष्णाकाठ खंड १
   युगांतर
   सह्याद्रीचे वारे

Similar books:
  प्रवास
   अपूर्वाई
   पृथ्वी प्रदक्षिणा आणि साहसी प्रवास
   पूर्वरंग
   जावे त्यांच्या देशा
   पाकिस्ताननामा
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.