|
गंगाधर बाळकृष्ण सरदार
Author: डॉ. हे. वि. इनामदार
Publisher: राज्य मराठी विकास संस्था
|
|
Price: $2.25 $1.8 20% OFF ( ~94 Pages, R60)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Review courtesy of Maharashtra Times: ६ऑगस्ट२००० गं. बा. सरदारांच्या कार्यकर्तृत्वाचा वेधक आलेख - मीना वैशंपायन
अर्वाचीन महाराष्ट्राची जडणघडण या पुस्तकमालेद्वारा ज्या व्यक्तींचा महाराष्ट्रातील सांस्कृतिक, सामाजिक, वैचारिक क्षेत्रांवर ठसा उमटला आहे, अशा व्यक्तींच्या कार्याचा परिचय करून देण्याचे उद्दिष्ट राज्य मराठी विकास संस्थेने आपणापुढे ठेवले आहे. व्यक्तींप्रमाणेच प्रभावी संस्था व विचारप्रवाह यांचीही ओळख या मालिकेद्वारे होत आहे.
समाजसन्मुख विचारवंतांमध्ये, संतवाङ्मयाच्या अभ्यासकांमध्ये ज्यांचं नाव वारंवार घेतलं जातं, त्या गंगाधर बाळकृष्ण सरदारांचा परिचय हे. वि. इनामदार यांनी ग. बा. सरदार - व्यक्ती आणि कार्य या पुस्तकातून करून दिला आहे. हे. वि. इनामदारांनी गं. बा. सरदारांना फार जवळून पाहिलं, त्यांच्या सौजन्याचा, विशाल अंत:करणाचा, साक्षेपाचा आणि व्यासंगाचा अनुभव घेतला. सरदारांजवळील वैचारिक सचोटी आणि शैक्षणिक मूल्यांविषयीची तळमळ या लक्षणीय गुणांचा प्रत्यय लेखकाने घेतला. सरदारांविषयी आदरभाव असूनही, योग्य त्या स्पष्टतेने, पण सौम्य, मृदू भाषेत लेखकाने त्यांच्या लेखनाबद्दल कोठेकोठे जाणवलेल्या मर्यादा, अपुरेपणा दाखवून दिला आहे. सरदारांच्या लेखनाची योग्य अशी चिकित्सा करून, सरदारांचं महाराष्ट्राच्या वैचारिक घडणीतील महत्त्वाचं स्थान नेमकेपणानं अधोरेखित केलं आहे.
ऐंशी वर्षांचं दीर्घ आयुष्य लाभलेल्या सरदारांनी संतवाङ्मय, समाजप्रबोधन आणि दलित साहित्य हे आपल्या चिंतनाचे व लेखनाविष्काराचे प्रमुख विषय आयुष्यभरासाठी ध्येयरूपाने मनात बाळगले. आपल्या लेखणीबरोबरच वाणीच्या माध्यमातूनही याच विषयांवरचे चिंतन ते प्रकट करीत गेले. साहित्य आणि समाज यांच्यामधील प्रेरणा, प्रवृत्ती, ध्येये याविषयी ते आपली मते मांडीत राहिले. त्यामुळेच संवेदनशील मनाचे हे समाजचिंतन महाराष्ट्राच्या वैचारिक व सामाजिक क्षेत्रांवर आपला ठसा उमटवत राहिले.
साक्षेपी विचारवंत
आपल्या आयुष्यात सरदारांनी मराठीचे अध्यापन केले. एस.एन.डी.टी.च्या मराठी विभागाचे प्रमुखपद सांभाळले. त्याचबरोबर इतर अनेक मंडळांवर सल्लागार, अनेक संमेलनांचे अध्यक्ष, प्रमुख वक्ते, म्हणून यशस्वी कामगिरी बजावली. विविध पुरस्कारांचे ते मानकरी ठरले. साधे व सत्त्वसंपन्न बाह्यरूप असणारे सरदार बाणेदार व स्वाभिमानी होते. आणि समाजमनस्कता हा त्यांचा समग्र साहित्याचा पृथगात्म गुणविशेष होता. वडिलांची व्यावसायिक नीती, गावगाडयातल्या विविध जातीजमातींमधला मित्रपरिवार, स्वा. सावरकर, म. गांधी व कार्ल मार्क्स यांच्या वैचारिक वाङ्मयाचे वाचन, व्यावसायिक स्थैर्य आणि संसारातील मन:स्वास्थ्य या सर्वांचा मेळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची एक सहृदय, समाजसन्मुख समतोल व साक्षेपी विचारवंत अशी प्रतिमा सिद्ध झाली, असे लेखक म्हणतात. त्यांच्या बाणेदार वृत्तीच्या द्योतक अशा दोन-तीन घटना लेखकाने येथे वर्णिल्या आहेत.
अर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका हा सरदारांचा संशोधनपर एकमेव ग्रंथ. अव्वल इंग्रजीच्या काळात प्रसिद्ध झालेल्या ग्रंथाचा परामर्श यात घेतला आहे. या ग्रंथांचे मूल्यमापन द. वा. पोतदारांनीही केले होते. मराठी गद्याचा इंग्रजी अवतार हे पोतदारांचे पुस्तक सरदारांच्या पुस्तकाआधी पंधरा वर्षे आलेले असूनही त्यांनी त्याची नोंद आपल्या मूळ पुस्तकात वा पुनर्मुद्रणावेळीही घेतली नाही. ही त्रुटी लेखकाने येथे नोंदवली आहे. त्याचबरोबर दुसर्या आवृत्तीत नवीन विचार-साहित्य प्रवाहाची दखल त्यांनी घेतली नाही. तेथे अगदीच मोघम भूमिका घेऊन ते हात झटकून मोकळे झाले, असे लेखकाचे म्हणणे आहे. तरीही अव्वल इंग्रजीतील ग्रंथांनी पुढीलांसाठी जो पाया रचिला, त्याचे साधार, सविस्तर व सुसूत्र विवेचन सरदारांनी केले आहे, असे लेखक म्हणतात.
सरदारांनी सामाजिक विषयांवरील ग्रंथांची संपादने केली, तशीच काही विद्यापीठीय उपयुक्ततेची शैक्षणिक संपादने केली. मात्र ही कामे करताना सरदारांची दृष्टी कायम समाजकल्याणाची, समाजसन्मुख अशीच राहिली.
संतांची सामाजिक कामगिरी
संतसाहित्याची सामाजिक फलश्रुती हे सरदारांचे लोकप्रिय पुस्तक. यामध्ये त्यांनी सामाजिकतेच्या अंगाने जाणारी संतसाहित्याची मीमांसा केली आहे. राजवाडे, आचार्य भागवत, पु. ग. सहस्त्रबुद्धे इत्यादींना संतसाहित्य वा संतविचार म्हणजे समाजप्रगतीतील अडथळा आहे असे वाटते. पण सरदारांनी मात्र संतांनी सांस्कृतिक प्रबोधनाचे महत्त्वाचे कार्य केले, असे नि:संदिग्धपणे म्हटले आहे. संतसाहित्याचा विचार करीत असताना तत्कालिन समाजपरिस्थितीचा संदर्भ जराही दुर्लक्षून चालणार नाही, असे त्यांनी वारंवार सांगितले आहे. त्या संदर्भात संतसाहित्याचे मूल्यमापन करून त्यांनी संतांची सामाजिक कामगिरी वर्णिली आहे.
याबरोबरच दलित साहित्याविषयीचे त्यांचे विवेचन महत्त्वाचे आहे. दलित साहित्याच्या आविष्काराकडे त्यांनी एका व्यापक दृष्टीने पाहिले, त्यात त्यांना नवीन समाजरचनेची चिन्हे दिसली. त्याचबरोबर दलित साहित्याची डोळस समीक्षा झाली पाहिजे, असा आग्रहही धरला. दलितांच्या साहित्याविष्कारातील भावनिक उत्कटता त्यांनी समजून घेतली; पण त्याला शास्त्रशुद्ध ज्ञानाची व वस्तुनिष्ठ विचारांची जोड दिली पाहिजे, असे ते आग्रहाने सांगत राहिले. सुमारे वीस-पंचवीस वर्षांपूर्वीच त्यांनी केलेल्या या विवेचनाचे महत्त्व आपल्याला जाणवले नाही. आज दलित साहित्याला ज्या मर्यादा पडलेल्या दिसतात, त्यासंबंधीचा इशारा त्यांनी त्यावेळीच दिला होता, हे पाहिले की, सरदारांचे वैचारिक क्षेत्रातले मोठेपण अधिकच पटते.
सरदारांच्या साहित्यदृष्टीनेही खरं म्हणजे आपण अंतर्मुख व्हायला हवं. साहित्याच्या सर्वांगीण विकासाच्या दोन कसोटया त्यांनी मानल्या. एक म्हणजे विश्वसाहित्यातील कृतींशी बरोबरी करू शकतील अशा काही साहित्यकृती मराठीत असायला हव्यात आणि दुसरी म्हणजे ते साहित्य समाजाच्या तळातल्या माणसापर्यंत पोचलं पाहिजे. म्हणजेच त्याचं प्रभावक्षेत्र विशाल व विमुक्त असेल, तर विविध स्वरूपाचं श्रेष्ठ साहित्य निर्माण होईल, असं सरदारांचं म्हणणं आहे.
सरदारांचं वक्तृत्व अमोघ होतं आणि त्यांची जीवननिष्ठा त्यांच्या लेखनातून तसेच वाणीतून सदैव जाणवत असे, असं लेखक म्हणतात. या पुस्तकमालिकेतील इतर पुस्तकांप्रमाणेच याही पुस्तकाला सूची, परिशिष्टं यांचा भक्कम आधार व त्यामुळे संदर्भमूल्य लाभलं आहे.
|
 |
 |
|