Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


सानेगुरुजी पुनर्मुल्यांकन
Author: भालचंद्र नेमाडे
Publisher: साहित्य अकादमी
Add to Shopping Cart
Price: $4.72 $3.77 20% OFF ( ~197 Pages, R90)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Review courtesy of Maharashtra Times:
११जून२०००
सखोल विश्लेषणाचा अभाव
- यशवंत जोशी

साने गुरुजी जन्मशताब्दीनिमित्त साहित्य अकादमीने २४ व २५ डिसेंबर १९९८ रोजी दापोली येथे राष्ट्रीय चर्चासत्र घेतले होते. प्रस्तुत पुस्तक म्हणजे त्यात वाचलेल्या निबंधांचे संकलन आहे. वाचलेले सर्वच निबंध संग्रहात नाहीत. काही निबंधांचे पुनर्लेखन केले आहे. तर बालवाङ्मय व कादंबरी या दोन विषयांवरील निबंध स्वतंत्रपणे लिहून घेऊन संग्रहात समाविष्ट केले आहेत.

साने गुरुजी लोकप्रिय लेखक होते. परंतु मराठी साहित्य समीक्षकांनी सुरुवातीस त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि नंतर सान्यांचे लेखन हे साहित्यच नव्हे, त्यांच्या साहित्यांत कलागुणच नाहीत, येथपर्यंत टोकाची भूमिका घेऊन त्यांच्यावर टीका झाली जन्मशताब्दीच्या निमित्ताने गुरुजींच्या सर्व साहित्याचे पुन्हा वाचन झाले. नव्याने समीक्षा झाली व जुन्या समीक्षेचीही समीक्षा झाली. त्याचे प्रत्यंतर प्रस्तुत संग्रहांत येते.

प्रस्तुत संग्रहांत एकूण सोळा निबंध आहेत. सुरुवातीस भालचंद्र नेमाडेंचे प्रास्ताविक आणि राजाभाऊ गवांदेचे उदघाटनपर भाषण दिले आहे. हीएं दोन्ही भाषणे संक्षिप्त आहेत. वसंत पळशीकरांचे बीज-भाषण, ‘साने गुरुजी : व्यक्तित्व, जीवन आणि वाङ्मय’ या विषयावर असून ते गुरुजींचे सम्यक दर्शन घडविणारे आहे. ‘साहित्यिकांच्या वर्तुळांत ना. ग. गोरे यांना जो स्वीकार होता; नव्हे मानही होता, तेवढाही गुरुजींना नव्हता,’ असे विधान करून समकालीन साहित्यिकांनी गुरुजींच्या लेखनाची उपेक्षा केली, अशी खंत ते व्यक्त करतात. वाङ्मयीन कलाकृती आपण निर्माण करीत आहोत, हे भान गुरुजींना नसे. त्यांचे जीवन, व्यक्तित्व व वाङ्मय या सर्वांचा एक प्रकारचा अभेद त्यांच्या लेखनात आढळतो. त्यामुळे कलात्मक अलिप्तता त्यांच्या साहित्यांत दिसत नाही, असे सांगून ते पुढे म्हणतात, गुरुजींचे बरेच लेखन सात्विक संतापापोटी, थोरामोठयांच्या गुणगौरवासाठी, लढाऊवृत्ती निर्माण करण्यासाठी झाले आहे. गुरुजींचे लेखन रडके आहे, हे त्यांना मान्य नाही.

नागनाथ कोत्तापल्ले यांनी तत्कालीन समीक्षकांच्या टीकेवर लिहून काही प्रमाणात गुरुजींना न्याय मिळवून दिला आहे. साहित्य हे श्रेष्ठ मूल्यांच्या उत्थापनासाठी असावे अशी, टॉलस्टायप्रमाणे, गुरुजींची दृष्टी होती. ती तत्कालीन केवळ कलावादी, रंजनवादी मराठी समीक्षकांना मान्य नव्हती. गुरुजींच्या पुस्तकांनी बहुजन समाजाच्या मनाची पकड घेतली होती. त्यांच्या एकेका पुस्तकाच्या आवृत्त्यांवर आवृत्त्या निघत होत्या. गांधी व कॉंग्रेस हे गुरुजींच्या पुस्तकांचे विषय होते. सर्वसामान्यत: बहुसंख्य मराठी लेखकांना या विषयांची अॅलर्जी होती. या पार्श्वभूमीवर प्रा. ना. सी. फडके आणि प्रा. श्री. के. क्षीरसागर यांची गुरुजींच्या वाङ्मयावरील टीका अनुदार होती, तसेच तिची भाषाही हिणकस होती, असे कोत्तापल्ले म्हणतात. रडणे आणि कारुण्य यांतला भेद ज्यांना कळत नाही, ते गुरुजींच्या वाङ्मयास गहिवर संप्रदायी साहित्य म्हणतात, असा टोला हाणून गुरुजींच्या जीवनावर भरभरून लिहिले गेले; पण त्यामानाने साहित्यावर फारसे कोणी लिहिले नाही, ही व्यथा ते नमूद करतात.
गुरुजींची भाषा ही तत्कालीन साहित्यिक भाषेपेक्षा वेगळी होती. त्यांच्या ललित कृतीतील आशय वेगळा होता. त्यांची प्रेरणा वेगळी होती. भारतीय संस्कृतीची आगळी-वेगळी मीमांसा ते करीत होते. वाचकांशी संवाद साधण्याची त्यांची वेगळी रीत होती. अनेक बारकावे ते सांगत, अशी गुरुजींच्या लेखनाची वैशिष्टये लेखक इथे नमूद करतो. आचार्य स. ज. भागवतांव्यक्तिरिक्त कुणालाही गुरुजींची साहित्यसंपदा समजून घ्यावीशी वाटली नाही, हे विधान बेछूट वाटते. आचार्य अत्रे, डॉ. ग. ना. जोशी यांनी तसा प्रयत्न केला आहे, हे नाकारता येणार नाही.

गुरुजींकडे विचारवंत म्हणून पाहिले जात नाही, म्हणून भास्कर लक्ष्मण भोळे यांनी आपल्या निबंधांत दु:ख व्यक्त केले आहे. गुरुजी पठडीबंद विचारवंत नव्हत;, तर स्वयंप्रज्ञ होते. गुरुजी खुल्या मनाने विचारास वाहू देत. त्यामुळे कोणताही पोथीनिष्ठ विचार त्यांनी आंधळेपणाने स्वीकारला नाही. त्यामुळेच साहित्यांत कुठल्याही एका गटात किंवा राजकारणात कुठल्याही एका पक्षात ते फिट्ट बसले नाहीत, हे विवेचन सत्य आहे.

भाषांतरित साहित्याची वैशिष्टये

गुरुजींनी भाषांतरे केली नाहीत, तर मूळ प्रादेशिक कथांवर, जडण-घडणीच्या काळांत मुलांच्या मनावर संस्कार व्हावेत म्हणून त्यांच्या रुचीनुसार गुरुजींनी केलेली ही संमिश्र निवेदने आहेत, असे या निबंधांत म. द. हातकणंगलेकर म्हणतात. ध्येयानुरूप पुस्तकांची निवड, अनुरूप शैली व हवे तेवढे स्वातंत्र्य ही गुरुजींच्या भाषांतरित साहित्याची वैशिष्टये आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषांतरित पुस्तकांनाही स्वतंत्र पुस्तकाचे स्थान लाभले आहे.

‘कादंबरीकार साने गुरुजी’ हा निबंध वासुदेव सावंत यांनी अभ्यासपूर्ण लिहिला आहे. इतर सामाजिक स्तरांतला वाचकवर्ग गुरुजींच्या कादंबर्‍यांना लाभला. त्यांचे कादंबरीलेखन सामाजिक जाणीवेतून झाले आहे. जीवन व ध्येयाला पूरक आदर्शवादी भूमिका, राष्ट्रीय कादंबरीची त्यांची कल्पना, स्वत: उच्चवर्णीय असूनही मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय मानसिकतेपासून मुक्त झालेले, ‘डीक्लास,’ लेखन यांत त्यांची ताकद होती. म्हणूनच ते शहरी कक्षा ओलांडून जनसामान्यांत लोकप्रिय झाले. त्यांची हीच लोकप्रियता समकालीन कादंबरीकारांना आवडली नाही.

विवेचनाच्या सोयीसाठी गुरुजींच्या कादंबर्‍यांचे ते तीन गट करतात आणि साने गुरुजी हे मराठीतील एक महत्त्वाचे व श्रेष्ठ कादंबरीकार आहेत, असे ठासून विधान करतात. प्रत्येक कादंबरीच्या गुण-दोषांचे विवेचनही ते निर्भीडपणे करतात. ह. ना. आपटे व साने गुरुजी या दोघांनीही मराठी कादंबरीत आदर्शवाद मांडला. आपटयांचा आदर्शवाद व्यक्तिकेंद्रित; तर गुरुजींचा व्यापक सामाजिक विषय अभिप्रेत असलेला आहे. गुरुजींची लेखनशैली कथनकलेतून व्यक्त होते. गुरुजींच्या श्यामविषयक कादंबर्‍यांना एका व्यक्तीच्या कथेऐवजी व्यापक सामाजिक आशयप्राप्त झाला आहे. तो ते उलगडून दाखवतात. श्यामला आपली गरिबी इतरांच्या सहानुभूतीचा विषय बनू नये, असे वाटते. प्रतिकूल परिस्थितीमुळे जीवनावर वैतागलेला, क्रांतीची पुस्तकी भाषा बोलणारा बंडखोर नायकही तो नाही. तर जीवनकलहांतून जीवन विकास साधण्यावर त्याची श्रद्धा आहे. गुरुजींच्या या कादंबर्‍यांना व्यापक समाजदर्शनाचे परिमाण लाभले आहे.

सोदाहरण विवेचन

कथालेखनावर लिहिताना रंगनाथ पठारे म्हणतात, गुरुजींनी संस्कारासाठी कथा लिहिल्या आहेत. जे झाले त्यापेक्षा जे व्हायला हवे होते असे गुरुजींना वाटे, तसे त्यांनी कथेत उतरविले आहे. गुरुजींचा बुजरेपणा, एकाकीपणा, मूकपणे सोसलेले हाल सृजनाच्या पातळीवर जाताना उदात्त बनतात, हे पठारेंनी सोदाहरण स्पष्ट केले आहे.
गुरुजींच्या वैचारिक लेखनाला व्यापक विश्वसाहित्याचा संदर्भ आहे, हा मुद्दा विलास खोले स्पष्ट करून सांगतात. तर गुरुजींच्या लेखनशैलीत देशी भाषेचा जो पोत आहे, त्याचे रहस्य ‘साने गुरुजींचे लोकवाङ्मयाशी नाते’ या निबंधात मधुकर वाकोडे उलगडून दाखवितात.

‘गुरुजींच्या बालवाङ्मयाचे स्वरूप’ या लेखात नितीन रिंढे यांनी फडके, क्षीरसागरांचीच री ओढली आहे. भावनांना आवाहन, बुद्धिनिष्ठ विचारांची मांडणी नसणे वगैरे वगैरे. पंडितजींच्या ‘इंदिरेस पत्रे’ या ग्रंथाशी गुरुजींनी ‘सुधास लिहिलेल्या गोड पत्रे’ची तुलना करणे हा मोठा विनोद आहे. गुरुजींचे बालवाङ्मय आजची बालके वाचणे कठीण, हे त्यांचे मत मर्यादित अर्थाने खरे असले आणि गुरुजींच्या कथांतील तत्कालीन तपशील आज कालबाहय झाला असला, तरी शाश्वत मूल्यांचे गुरुजींनी लोककथेतून केलेले कथन नष्ट होणारे नाही. ते आजची बालके नाकारतील, असा अनुभव नाही.

अपेक्षाभंग

गुरुजींच्या काव्यावर लिहिताना वसंत आबाजी डहाके म्हणतात, तत्कालीन कवींच्या वैयक्तिक व सामाजिक विश्वाहून गुरुजींचे विश्व निराळे होते. गणिती-पद्धतीने ‘पत्री’ कविता संग्रहाचा हिशेब ते मांडतात. संपूर्ण लेखात लुप्तप्राय ‘सत्याग्रही’ खंडकाव्यावर लिहिताना ते एक विचारकाव्य असल्याचे मत ते मांडतात. याच संग्रहातील गुरुजींचे भावकाव्य, भक्तिकाव्य व नंतर लिहिलेल्या स्फुर्तीगीतांवर आजच्या आघाडीच्या कवीने अभ्यास करून लिहिले असते, तर गुरुजींच्या कवितेला न्याय मिळाला असता. हा लेख अपेक्षाभंग करणारा वाटला.

गुरुजींनी भारतीय संस्कृती अगदी सोप्या शब्दांत आबालवृद्धांना सहज समजावून दिली. पण त्या विषयावरील प्रा. गो. पु. देशपांडे यांचा लेख दुर्बोध आणि क्लिष्ट रचनेचा एक इरसाल नमुना आहे. पीठ म्हणजे स्कूल ऑफ थॉट, ज्ञानप्रक्रिया म्हणजे एपिस्टेमॉलॉजिकल प्रोसेस इत्यादि हायब्रिड शब्दांचा बेसुमार मारा करून प्राध्यापक मजकुरांनी आपल्या अगाध विद्वतेचे प्रदर्शन मांडून साने गुरुजींची गंगौघसारखी पवित्र भारतीय संस्कृती शबलांकित करून टाकली आहे.

संग्रहातील लेख निरनिराळया लेखकांचे असल्याने विवेचनांत पुनरुक्ती येणे स्वाभाविक आहे. फडके-क्षीरसागरांची टीका, टालस्टॉयचे कला म्हणजे काय? यावरील विवेचन, गुरुजींची भाषाशैली, मांडणी, संस्कृतीरक्षण हे मुद्दे वारंवार आले आहेत. संपादनात ही पुनरुक्ती टाळणे शक्य नव्हते. तेव्हा ती क्षम्य आहे. सर्वच निबंध गुरुजींचे संबंधित सर्व साहित्य वाचून लिहिल्याचे वाटत नाही. काही उथळ व वेळ मारून नेण्यासाठी लिहिल्याचे स्पष्ट जाणवते. विचारवंत, निबंधकार, राजकीय विचार हे वर्गीकरण सदोष असून तीन लेखकांत वाटल्याने गुरुजींच्या वैचारिक साहित्याचे योग्य समीक्षण झालेले नाही. गुरुजींनी लिहिलेली नाटके, प्रबंध, चरित्रे; तसेच संकलन व संपादक व साने गुरुजी हे विषय अस्पर्श राहिले. आहेत. गुरुजींची आंतरभारतीची कल्पना, विनोबांच्या गीता प्रवचनांचे कार्य याचा साधा उल्लेखही कोठे नाही.

साहित्य अकादमीने साने गुरुजींच्या साहित्यावर राष्ट्रीय चर्चासत्र घेतले, यात गुरुजींचा व अकादमीचा गौरव आहे. परंतु राष्ट्रीय चर्चासत्र असूनही गुरुजींच्या समग्र वाङ्मयाचा सांगोपांग विचार झालेला दिसत नाही. त्याचप्रमाणे चर्चा सखोल झाल्याचे जाणवत नाही. त्यामुळे एका उत्तम विषयाचे बौद्धिक खाद्य मिळेल ही आशा फोल ठरली आहे.

Write your review for this book

Other works of भालचंद्र नेमाडे
   कोसला
   हूल
   बिढार
   हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ
   साहित्याची भाषा

Similar books:
  निबंध
   तेजाची पाऊले
   जीएंची निवडक पत्रे: खंड ३
   हास्यतुषार
   जीएंची निवडक पत्रे: खंड १
   विचारशिल्प
   More ...  
  समीक्षा
   सर्व सुर्वे
   दुनिया तुला विसरेल!
   धार आणि काठ
   साहित्यगंगेच्या काठी
   कुमार गंधर्व: मुक्काम वाशी
   More ...  
  संदर्भग्रंथ
   मुस्लिम मनाचा शोध
   यमुनापर्यटन
   शोध महात्मा गांधींचा - १
   ब्रिटिश रियासत खंड १,२
   त्रिवेंद्रमची मराठी हस्तलिखिते
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.