Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


एकविसाव्या शतकातील समग्र शिक्षण
Author: सुनीलकुमार लवटे
Publisher: सह्याद्री प्रकाशन
Add to Shopping Cart
Price: $3.42 $2.73 20% OFF ( ~115 Pages, R100)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
प्रहार ८ सप्टेंबर २०१३
बदलत्या शिक्षणव्यवस्थेचा कॅलिडोस्कोप
-- संजीवकुमार कांबळे
भारतीय शिक्षणव्यवस्थेत आज आमूलाग्र बदल होत आहेत. नव्या बदलांचा स्वीकार करतानाच पारंपरिक शिक्षणव्यवस्थेला अनेकदा दुय्यम स्थान दिलं जातं. वरवर पाहता हे बदल शिक्षणव्यवस्थेत मोठी क्रांती घडवून आणतील, असं वाटत असलं तरीही ते किती फोल आहेत, याची जाणीव हे पुस्तक वाचताना होते.
पुण्यातील सह्याद्री प्रकाशनने नुकतंच प्रकाशित केलेलं डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या एकविसाव्या शतकातील समग्र शिक्षण या पुस्तकाच्या माध्यमातून १९८२ ते २०१२ या तीस वर्षाच्या कालावधीत झालेल्या शिक्षणक्षेत्रातील विविध बदलांचं समग्र दर्शन डॉ. लवटे यांनी घडवलं आहे. हे पुस्तक तीस वर्षामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रात झालेले बदल टिपून त्यांची सांगड आताच्या आभासी ज्ञानरंजन अथवा वर्गखोली शिक्षण प्रणालीशी घालतं. तीन दशकांतील हे बदल अद्यापही काहींच्या पचनी पडलेले नाहीत, त्यामुळे ते ब-याच जणांना जमणं आणि समजून घेणं कठीण असतं, कारण अजूनही बहुतेक शिक्षणतज्ज्ञ आपल्या पारंपरिक कोषाच्या बाहेर पडलेले नाहीत. अशा वेळी जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळू किंवा पुरून टाका या कवितेप्रमाणे जुन्या पारंपरिक आणि कालबाह्य ठरलेल्या शिक्षणव्यवस्थेला बाद करण्याचं आवाहन डॉ. लवटे या पुस्तकातून करताना दिसतात. त्यासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारचा आव न आणता अथवा सरकारच्या विरोधात आगपाखड न करता आपल्या पुस्तकात ते सहजशक्य केलेलं आहे. यामुळेच शिक्षणाच्या क्षेत्रात रुची असलेल्या प्रत्येकासाठी हे पुस्तक एक दिशादर्शन करणारं आणि नवे मार्ग चोखाळण्यासाठी प्रवृत्त करणारं निश्चितच ठरणार आहे. डॉ. लवटे यांनी शिक्षणक्षेत्रातील अनेक त्रुटींवर कडक शब्दांत आपल्या खास शैलीत ताशेरे ओढत असताना या चक्रव्यूहातून कसं बाहेर पडता येईल, याचा तितकाच योग्य मार्गही दाखवला आहे. लेखक एका मासिकाच्या संपादक मंडळाचे सदस्य असल्याने त्यांच्या लिखाणाची एक विशिष्ट शैली या पुस्तकातला प्रत्येक लेख वाचताना लक्षात येतं.
डॉ. लवटे यांचा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणव्यवस्थेविषयीचा दांडगा व्यासंग आहे. त्यामुळे ते देशातील, प्राथमिक ते उच्च अशी शिक्षणव्यवस्थेची योग्य प्रकारे मांडणी या पुस्तकातील लेखांमधून करू शकले आहेत. पूर्व प्राथमिक ते उच्च आणि आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा त्यांचा अभ्यास आणि त्यासाठी देश-विदेशातील चर्चासत्रात आणि कार्यक्रमात त्यांनी मांडलेली शिक्षणाविषयीची भूमिका ही या पुस्तकातील अनेक लेखांमधून वाचायला मिळते. आपल्या देशात आणि राज्यातही शिक्षणाविषयी अनास्था, सत्तापालट, शैक्षणिक धोरणांमधील बदल यामुळे शिक्षणाचा विकास होऊ शकलेला नाही. काळ बदलत असला तरी भारतातील शिक्षणपद्धती ही त्याच त्याच पारंपरिक चौकटीत अडकली आहे. एकीकडे जगभरातील अनेक प्रगत देशांमध्ये अध्यापन पद्धतीत तंत्रज्ञानाचा वापर मोठय.अ प्रमाणात वाढल्यामुळे विद्यार्थ्यांच्या हाती आता लॅपटॉप, टॅब आले असताना अजूनही आपण गुंडाळी फळे वापरण्यापलीकडे मजल मारू शकत नाही. अशीच बाब शिक्षकांच्या संगणक साक्षरतेची आहे. काही केंद्रिय?शाळांचा अपवाद सोडला, तर सर्व प्रकारच्या शाळांमधील शिक्षक हे अजूनही एखादं नियतकालिक वाचून त्याचा उपयोग आपल्या ज्ञानात भर पाडून घेण्याच्या मानसिकतेत दिसतात. मुंबईसारख्या ठिकाणी असलेल्या सर्व शाळांमध्ये शिक्षण विभागाकडून निघणारी नियतकालिकं येतात, परंतु अनेक शिक्षक त्यांना हातही लावत नाहीत. यामुळे शाळेत येऊन केवळ दिवस भरायचा यापलीकडे त्यांची मानसिकता दिसत नाही. यामुळे आपल्या देशात एकूण शिक्षणक्षेत्रात समग्र बदल होणे आवश्यक आहे.
शिक्षणाच्या क्षेत्रात नव्याने येत असलेली भांडवली व्यवस्था देशाला एका मोठय.अ संकटात पाडू शकते. भारतीय संविधानाने दिलेला शिक्षणाचा मूलभूत अधिकार या व्यवस्थेमुळे हिरावला जात असून देशात श्रीमंत आणि गरिबांच्या शिक्षणामध्ये एक नवी दरी निर्माण होत आहे. सरकारने सुरू केलेलं विनाअनुदानित शिक्षणाचं धोरण हे भारतात शैक्षणिक अराजकता निर्माण करत आहे. देशात विदेशी संस्था आणि विद्यापीठांचं एकीकडे आगमन होत असतानाच राज्यात स्वयंर्थसहाय्यित शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठांच्या माध्यमातून नवी अनिर्बंध व्यवस्था निर्माण केली जात आहे. पैसे मोजून शिक्षण देणा-या या दुकानांमुळे येत्या काळात गरिबांच्या मुलांना शाळेचा आणि महाविद्यालयाचा दरवाजाही ओलांडणं शक्य होणार नाही. यामुळे भविष्यातील शिक्षण हे विशिष्ट वर्गाचं हित जपणारं ठरत आहे, परिणामी देश शिक्षणक्षेत्रात एका भयाण अराजकतेकडे जात असल्याचं डॉ. लवटे या पुस्तकातून सूचित करू पाहत आहेत.
शिक्षण संस्थाचालकांच्या धंदेवाईकपणाचीही डॉ. लवटे यांनी आपल्या शैलीत दखल घेतली आहे. सामाजिक पैशांवर आणि प्रत्येक विद्यार्थ्यांला ग्राहक बनवून आपली संपत्ती वाढवणा-या आणि त्याच संपत्तीच्या नावाखाली प्रतिष्ठा मिळवणा-या संस्थाचालकांवर ताशेरे ओढत असतानाच विद्यार्थ्यांची क्षमता लक्षात न घेता त्यांच्यावर अनेक प्रकारच्या अपेक्षा लादणा-या पालकांचीही चूक त्यांनी दाखवून दिली आहे, तर समांतर शिक्षणव्यवस्था म्हणून रूढ झालेले कोचिंग क्लास कल्चर ही शिक्षणव्यवस्थेची नामुष्की असल्याचं ते आग्रहाने नमूद करतात. देशातील शिक्षणव्यवस्थेत प्रयोगशीलता आणि संशोधन ही पोकळी राहिल्याने विद्यार्थ्यांच्या सृजनास वाव तर मिळत नाहीच, शिवाय आनंदही मिळत नसल्याचं ते नमूद करतात.
पुस्तकाच्या प्रत्येक लेखातून वाचकांना शिक्षणव्यवस्थेकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन लेखक देतात. पहिल्याच प्रकरणात त्यांनी शिक्षण गुणवत्ता संवर्धनासंदर्भात मांडलेले विचार खूप महत्त्वाचे आहेत. जागतिकीकरणामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात आलेल्या व्यवसायाच्या विरोधात जाऊन चालणार नाही, तर त्यासाठी बालवाडीपासून ते विद्यापीठाच्या स्तरावर आंतरराष्ट्रीय दर्जा आणि गुणवत्ताही आत्मसात करण्याची गरज असल्याचं ते सांगतात. शिक्षणातून हळूहळू अंग काढून घेण्याचं धोरण हे उदारीकरणाचं जसं आहे, तसं ते गुणवत्ता वाढीस वाव देण्याचंही आहे, हे त्यांचं पहिल्या लेखातील वाक्य थोडं अनाकलनीय वाटतं. शिक्षणातून सरकार अंग काढून घेत आहे, याचं ते उघडपणे समर्थन करत असल्यासारखे वाटतात. सरकारने अंग काढून घेतलं तर देशातील तब्बल ८० टक्के जनता ही शिक्षणापासून दूर फेकली जाईल, याचंही त्यांना भान आहे. याविषयीची त्यांची भूमिका त्यांनी मनोगतात मांडलेली आहे.
एकविसाव्या शतकातील उच्च शिक्षण धोरण : पुनर्विचाराची गरज या लेखात त्यांनी खासगी क्षेत्राच्या विकासातून जर स्वयंपूर्ण आर्थिक पाठयक्रम राबवले जाऊ लागले तर समाजात परत एकदा नववर्गव्यवस्था प्रस्थापित होईल व ती कॅन्सरसारखी देशाला आतून पोखरून टाकल्याशिवाय राहणार नाही. आर्थिकदृष्टया सबलांना, धनदांडग्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे निकष धाब्यावर बसवून पैशाच्या जोरावर प्रवेश देणं सुरू झालं तर गरीब वर्गातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे दरवाजे कायमचे बंद होतील. त्यामुळे ज्ञानाधिष्ठित, अर्थोत्पादन करणा-या समाजनिर्मितीची प्रक्रियाच खंडित होईल, असेही नमूद करतात. तर शिक्षणाच्या राष्ट्रीयीकरणाची भूमिकाही तितक्याच तन्मयतेने मांडतात आणि निकोप शैक्षणिक वातावरणाच्या निर्मितीसाठी शिक्षणाच्या राष्ट्रीयीकरणाची गरजही तितक्याच प्रभावीपणे मांडतात. त्यासाठीचे स्वरूप आणि निर्णयांची आवश्यकताही स्पष्ट करतात. यात काही अडचणी असल्या तरी त्या कोणत्या प्रकारे सुटू शकतात, यावरील उपाय ते सांगतात.
उत्कृष्ट शिक्षण घडण : जग आणि आपण हे प्रकरण शिक्षक आणि एकूणच देश-विदेशातील शिक्षणव्यवस्थेतील फरक दाखवणारं आहे. तसंच भारतीय शिक्षणव्यवस्थेवर बोट ठेवून त्यातील उणिवा आणि शिक्षकांच्या उदासीनतेवर छडी मारणारं आहे. शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांचा गंभीर प्रश्न असला तरी त्यांच्या होणा-या नियुक्तीत सरकारने आपल्या धोरणातूनच एक चातुर्वण्र्य राबवला असल्याचं ते स्पष्टपणे सांगतात. तर जगभरात शिक्षणासाठी राबवण्यात येणा-या धोरणांचा ऊहापोह करून इंग्लंड, सिंगापूर, फिनलॅंड, चीन, अमेरिका इत्यादी देशांतील शिक्षकांसाठी असलेल्या कार्यक्रमांची माहिती देऊन आपल्या देशासमोर कार्यक्रम ठेवतात. भारतात उत्कृष्ट शिक्षक घडवण्यासाठी ही एक निरंतर प्रक्रिया म्हणून विकसित करण्याचे उपाय सुचवतात. प्राथमिक शिक्षणातील अनंत प्रश्न त्यांनी अत्यंत मार्मिक आणि अनेक मुद्यांच्या आधारे मांडलेले आहेत. तसंच वंचितांच्या शिक्षणाचा मुद्दाही त्यांनी प्रभावीपणे मांडला आहे. यासाठी सर्वाधिक पानं त्यांनी वंचितांच्या शिक्षणावर खर्ची घातली आहेत. ग्रामीण आणि स्त्रीशिक्षणातील आपली अधोगतीही रेखाटताना ते कधी सरकारी यंत्रणेवर, तर कधी एकूणच व्यवस्था कशी जबाबदार यावर मार्मिक टिप्पणी करतात.
युरोपात होत असलेल्या शैक्षणिक क्रांतीसाठी संपूर्ण एक प्रकरण या पुस्तकात असलं तरी अनेक प्रकरणांतून तिथल्या व्यवस्थेच्या बदलांचं आव्हान भारतीय शिक्षणव्यवस्थेने स्वीकारण्याचं आवाहन ते करतात, तर दुसरीकडे एकविसाव्या शतकातील नव्या जगाचं स्वागतही करतात. हे सर्व बदल आणि त्यातील नवंक्षितिजांचा झालेला उदय आपण कुठे आहोत हे दाखवून देतात.
डॉ. लवटे यांच्या या पुस्तकातील बहुतेक लेख हे विविध नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले असले तरी काही अप्रकाशित लेख एकत्रित करून हे पुस्तक तयार करण्यात आलं आहे. मात्र प्रत्येक लेखाचं शिक्षणाच्या संदर्भात वेगळं महत्त्व आहे. डॉ. लवटे यांनी १९७५नंतर शिक्षकी पेशा स्वीकारला असला तरी त्यांच्या संपूर्ण लिखाणातून समाजहित आणि त्यासाठी धडपडणारा आणि त्यासाठी बदलाची अपेक्षा ठेवून दिशा दाखवणारा कार्यकर्ता अधिक दिसतो. या पुस्तकातील प्रत्येक पानावर नजर टाकली तरी शिक्षणाच्या क्षेत्रात नवनवीन विकासाच्या वाटा चोखाळण्याचं आवाहन करणारा शिक्षक दिसतो. या पुस्तकातल्या सर्वच चौदा प्रकरणांतून शिक्षणक्षेत्रातल्या विविध विषयांचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. आशावाद डोळ्यासमोर ठेवून त्यांचं हे पुस्तक वाचताना हे लिखाण नकारात्मक आहे की काय, असं वाटतं. परंतु हे पुस्तक भारतातील शिक्षणव्यवस्थेत नव्या बदलांसाठी दिशादर्शक आहे.

Other Links:

Write your review for this book

Other works of सुनीलकुमार लवटे
   शब्द सोन्याचा पिंपळ
   खाली जमीन वर आकाश
   दु:खहरण
   आत्मस्वर
   एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न

Similar books:
  शैक्षणिक
   मुस्लिम मनाचा शोध
   उद्यमशलाका
   यमुनापर्यटन
   धार आणि काठ
   भाषणरंग: व्यासपीठ आणि रंगपीठ
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.