|
पर्स हरवलेली बाई
Author: मंगला गोडबोले
Publisher: नवचैतन्य प्रकाशन
|
|
Price: $6.16 $4.92 20% OFF ( ~180 Pages, R180)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: ई-सकाळ रविवार जून ४ २००६ स्त्री विश्वाचा विनोदी छेद ( डॉ. प्रल्हाद वडेर )
मराठी साहित्यात कथा, कविता, कादंबरी या वाङ्मयप्रकारांत लक्षणीय कामगिरी करणार्या अनेक लेखिका आहेत; पण त्यांच्यात एखादा "पु.ल.' का नसावा? लक्ष्मीबाई टिळकांचा सेन्स ऑफ ह्यूमर आणि स्वत-लाच हसण्याची त्यांची ताकद विलक्षण होती. त्यामुळेच आज विनोदातील लेखिकांचा अभाव खटकतो. मंगला गोडबोले यांनी "पर्स हरवलेली बाई' या पुस्तकातील विनोदाच्या अंगानं जाणार्या ललित लेखांतून ही उणीव दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. पु.लं.ची गद्य विडंबने आज इतिहासजमाच झाली आहेत आणि मुकुंद टाकसाळेही फार लिहीत नाहीत. मंगला गोडबोले यांचा विनोद गद्य विडंबनाच्या अंगाने जाणारा नाही की विनोदी कथेच्या वाटेनेही जाणारा नाही. स्वत-ला मध्यवर्ती भूमिका कल्पून त्यांनी स्त्रीजीवनातील काही स्त्रियांच्या स्वभावावर, आवडीनिवडीवर येथे लिहिले आहे. हे जीवन प्रामुख्याने मध्यम व उच्च मध्यम थरातील आहे. टीव्ही, टेलिफोन, मोबाईल, ओव्हनच्या रूपानं एक नवं जग घरात व स्वयंपाकघरात आलं आहे; पण जुन्या हरवलेल्या जगाचीही आठवण स्त्रीला व्यथित करते. शेवटच्या "अनेक लग्नांच्या गोष्टी' या दीर्घ लेखात लग्न या विषयासंबंधीच्या जुन्या व नव्या बदलांचा काहीसा जंत्रीवजा आढावा आहे. त्यावर आजवर अन्य विनोदी लेखकांनीही लिहिले आहे.
"पर्स हरवलेली बाई' या पहिल्याच ललित लेखात जुन्या पर्सच्या आठवणी आहेत. पर्समध्ये काय आहे यापैकी काय नाही, अशा होल्डालची कळा तिला आहे. गेलेल्या पर्सबरोबर आपली जी तीन-चार वर्षे गहाळ झाली ती कुठून कशी भरून काढायची, हा तिचा प्रश्न "पर्सभोवती' निगडित नसून भावनेशी अतूट नातं सांगतो. मध्यंतरी पुरुष विनोदी लेखकांनी प्रेमपत्रे कशी लिहावीत, अमुक कसे करावे, तमुक कसे करावे, अशा जंत्रीवजा विनोदाचा एक कलमवार बाज रूढ केला होता. "कामं कशी टाळावीत' या लेखात मंगलाबाईंनी त्याला उजाळा दिला आहे. लग्नानंतरच्या पहिल्या वर्षात कमीतकमी कामं करणं, आलेच फोन करून म्हणणं, एका कामासाठी दहांना नाचविणं, फडशा तंत्र, शंका काढून कामं टाळणं अशा अनेक कलमी सूचना लेखिका करते. "माझा सुपर वुमनारीस' या लेखात अनेक कामं एकाच वेळी कशी लावून घ्यावीत, याबद्दल मोलाचा सल्ला आहे. तर "काही अनिष्ट ग्रहदशा'मध्ये घर रंगवणं, घरी पाहुणे येणं, त्यांच्या मुलांचे उच्छाद, नवर्यानं व्हीआरएस घेणं, या डोकेदुखी आहेत. नवे वस्तुशास्त्र ही नवी गृहदशा- फेंगशुईची. त्यातल्या अफाट आणि अव्यवहार्य अटी, त्या आग्नेय नैरृत्य वगैरे दिशांचं महत्त्व, हे सगळं ऐकूनही डोकं गरगरणारं आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे आजच्या जीवनात झालेली स्थित्यंतरं लेखिकेनं "उरलंसुरलं'मध्ये टिपले आहेत. घरातल्या उरलेल्या अन्नाचं करायचं काय, हा यक्षप्रश्न गृहिणीपुढं उभा राहतो. जेवणाबाबत पाहुण्याइतके घरचेही कहारी असतात. कसलाही उणेपणा त्यांना खपत नाही. त्यात गृहिणीची होणारी फरफट लेखिका सांगते. "स्त्रियांच्या गप्पांचं अगम्य गणित', "आमचे पुराण भांडी संग्रहालय', "गेली करमणूक कुणीकडे', "टीव्हीवरच्या खरीददार स्त्रिया, समझदार स्त्रिया', "जाहिरातींचं जग', "हरवलेल्या जगतातल्या आता आठवणार्या अनेक गोष्टी' अशा विषयांवरच्या अनेक लेखांत लेखिकेनं जुन्या-नव्या जगाचा वेध घेतला आहे. त्यात "नॉस्टॉल्जिया'चा भाग मोठा आहे. तिची भाषा व शैलीही मार्मिक व मिश्कील आहे. स्वत-ला हसण्याचाही माफक गुण तिच्यात आहे. त्यामुळे हे लेख रंजक झाले आहेत.
मात्र मराठीतील पूर्वसूरींच्या विनोदाची चाकोरी व छाप सर्वच लेखांवर कमी-अधिक प्रमाणांत आहे. यामुळे या लेखांतील विनोद मराठीतल्या प्रथितयश विनोदी लेखकांना वाट पुसतच चाललेला जाणवतो. त्यात विषयाचे नावीन्य फारसे नाही. मराठी मध्यम व उच्च मध्यमवर्गीयांच्या जीवनातील स्त्रियांच्या विश्वाचा एक छेद काहीशा कोमटपणे त्यातून व्यक्त होतो; पण त्यातून तिची विनोदाची ताकदही बर्याच प्रमाणात जाणवते.
- डॉ. प्रल्हाद वडेर
Other Links:
|
 |
 |
|