|
मराठी नाट्यसंगीतः स्वरूप आणि समीक्षा
Author: विजया टिळक
Publisher: त्रिदल प्रकाशन
|
|
Price: $7.61 $6.08 20% OFF ( ~205 Pages, R250)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Review courtesy of Maharashtra Times: २८मे२००० अस्सल नाटयसंगीताच्या रूपातील वेगळेपण - श्रीकृष्ण दळवी
संगीत नाटक हे मराठी रंगभूमीचे एक खास आणि वेगळे वैशिष्टय आहे. ती मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली एक श्रेष्ठ देणगी आहे, असेही म्हटले गेलेले आहे. नाटयसंगीत हा मराठी रंगभूमीवरून विकसित झालेला एक खास गानप्रकार आहे आणि मराठी रसिक जगाच्या पाठीवर कुठेही गेला, तरी संगीत नाटकाचे, नाटयसंगीताचे वेड बरोबर घेऊनच वावरत असतो, असेही म्हटले गेलेले आहे.
याउलट संगीत ही एक शुद्ध कला आहे आणि ती कला, आणि नाटक हा साहित्यप्रकार यांना कलात्मकरित्या एकत्र आणणे अयोग्य आहे, अशासारखे विचारही व्यक्त झालेले आहेत. परिणामी, संगीत नाटकाच्या बाबतीत प्रशंसेचे सूर ऐकू येतात; तसेच विरोधी सूरही ऐकू येतात. साहजिकच संगीत नाटक हा स्वतंत्र कलाप्रकार मानावा का, चांगल्या संगीत नाटकाचे निकष कोणते, एखाद्या नाटकात केवळ संगीत आहे म्हणून त्याला संगीत नाटक म्हणावे का, नाटकातून येणार्या कोणत्याही गानप्रकाराला नाटयसंगीत म्हणावे का, असे प्रश्न उभे राहतात. नेमकी उत्तरे न सापडल्यामुळे काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. यातून मार्ग काढण्यासाठी संगीत आणि नाटक यांच्या अनुबंधांवर लक्ष केंद्रित करून संशोधन करण्याची गरज होती. सुमारे सात वर्षांपूर्वी पुण्याच्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनने या संदर्भात वेध : संगीत नाटक आणि नाटयसंगीत हा ग्रंथ प्रकाशित केला, तेव्हा त्यांनीही अशा संशोधनाकडे लक्ष वेधले होते.
डॉ. विजया टिळक यांच्या मराठी नाटयसंगीत-स्वरूप आणि समीक्षा या पुस्तकाने त्यांनी परिश्रमपूर्वक केलेले संशोधन आणि संशोधनाच्या आधारे काढलेले निष्कर्ष रसिकांसमोर ठेवले आहेत. सुमारे दहा वर्षांपूर्वी डॉ. विजया टिळक यांनी या विषयावर, डॉ. प्रभा अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री. ना. दा. ठा. महिला विद्यापीठाला प्रबंध सादर केला होता. त्या प्रबंधाच्या आधाराने हा ग्रंथ सिद्ध झाला आहे. डॉ. टिळक यांनी शास्त्रीय संगीताचा अभ्यास केला आहे. मराठी साहित्य हा त्यांचा अध्यापनाचा विषय आहे. त्यामुळे नाटक हा साहित्यप्रकार व संगीत नाटकातील संगीताचे स्थान या दोहोंचीही उत्तम जाण त्यांना आहे. ही जाणीव त्यांच्या संशोधनातून व त्यांनी काढलेल्या निष्कर्षांतून लक्षात येते.
तर्कसंगत खंडन
नाटक व संगीत यांच्या मिश्रणातून सिद्ध होणारे संगीत नाटक ही एक अशक्य व अयोग्य गोष्ट आहे, असा विरोधी सूर लावणार्या मान्यवरांच्या मतांचे तपशीलवार दाखले देऊन विजयाबाईंनी त्या मतांचे तर्कसंगत असे खंडन केले आहे. हे खंडन करता करता पदरचना नाटयनिष्ठ असली आणि पदाचे गायन शुद्ध संगीताच्या अंगाने नव्हे, तर नाटयनिष्ठ शैलीने केले की, संगीत नाटक आकारते हा निष्कर्ष त्या काढतात. या मार्गाने जर संगीत नाटक आकाराला आले, तर संगीत नाटकांच्या शक्याशक्यतेचा, योग्यायोग्यतेचा प्रश्नच उपस्थित होऊ नये, असेही त्यांनी म्हटले आहे. नाटकातील पदांकडे नाटयदृष्टीने पाहायचे म्हणजे नेमक्या कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात, याचे विवेचनही त्यांनी केले आहे.
नाटयसंगीत या नवीन कलाप्रकाराच्या निर्मितीमागील क्रियेचा छान वेध विजयाबाईंनी एका प्रकरणात घेतला आहे. रसिक आणि कलावंत यांच्यातील परस्परसंबंधाबाबत कलावंताला मिळणारी रसिकांची अनुकूल दाद म्हणजे संवाद; तर प्रतिकूल दाद म्हणजे विसंवाद हे सांगताना अप्रगल्भ दाद म्हणजे कलावंताला कलाकृतीचे विडंबन निर्माण करायला लावणारी चुकीची वाट, असे त्या स्पष्टपणे मांडतात. रसिक जेवढा अधिक जाणकार, अधिक संवेदनक्षम; तेवढी कलाकृतीही अशा रसिकाच्या सहवासात श्रीमंत होत जाते, हा निष्कर्ष त्या काढतात. या संदर्भात अनेक मान्यवरांचे, त्यांच्या निष्कर्षाला पुष्टी देणारे, विचार त्यांनी उदधृत केले आहेत. मुख्य म्हणजे नाटयसंगीतामुळे चांगले काय घडले, तसेच नाटयसंगीतात अयोग्य काय घडले, या दोन्ही बाजूंचा विचार मांडल्यामुळे विजयाबाईंच्या विवेचनाला समतोलपणा आला आहे.
बोलके अभिप्राय
संगीत नाटक हा एक निराळाच कलाप्रकार आहे. कसा ते स्पष्ट करणारे अनेकांचे अभिप्राय विजयाबाईंनी दिले आहेत. ते भरपूर बोलके आहेत. नाटयसंगीत हे संगीत नाटक या प्रकारातील नवे भाषिक रूप आहे, असा विचार त्यांनी मांडला आहे आणि तो घेऊनच आपण नाटयसंगीत हा स्वतंत्र गानप्रकार आहे, या विचाराप्रत जातो. संगीत नाटकातील काव्याचे स्वरूप, त्याचे आशय स्वरूपाचे स्थान यावर एक स्वतंत्र प्रकरणच आहे. अण्णासाहेब किर्लोस्करांच्या संगीत शाकुंतल या १८८० साली रंगभूमीवर आलेल्या नाटकापासून आजतागायत नाटयसंगीतात जी स्थित्यंतरे घडत आली, त्याचे कालखंडानुसार चार वेगवेगळे टप्पे विजयाबाईंनी केले आहेत. किर्लोस्कर, देवलांपासून ते विद्यावर गोखले, वसंतराव कानेटकरांपर्यंत, अशा शंभर वर्षांचा काळ विचारात घेऊन ही स्थित्यंतरे उदाहरणांसह दर्शविली आहेत. या बाबतीत सद्यस्थिती काय आहे, याचा निर्देश करून अनेक मान्यवर रसिकांच्या, समीक्षकांच्या, कलावंतांच्या नाटयसंगीतावरील आस्वादात्मक प्रतिक्रिया, काही जाणकरांची सुस्पष्ट मते, काहींची संदिग्ध मते, काही मुलाखती यांचा समावेश पुस्तकात केला आहे. या भागांतून विषय सहज स्पष्ट होत जातो.
एकूण पुस्तकातून नाटयसंगीत या गानप्रकाराची जात व प्रत कशी वेगळी व वैशिष्टयपूर्ण आहे आणि नाटकातील काव्यात्म आशयाचा शास्त्रीय संगीताच्या आधाराने केलेला सांगीतिक आविष्कार हे अस्सल नाटयसंगीताचे रूप आहे, या निष्कर्षाप्रत विजयाबाई आपल्याला नेतात. भालचंद्र पेंढारकरांनी या पुस्तकाला लिहिलेली प्रस्तावनाही वैशिष्टयपूर्ण आहे.
|
 |
 |
|