|
गोठलेल्या वाटा
Author: शोभा चित्रे
Publisher: श्रीविद्या प्रकाशन
|
|
Price: $6.85 $5.48 20% OFF ( ~172 Pages, R225)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: आधीचं थोडंसं करडे आकाश. त्यातून एका लयीत होणारा हिमवर्षाव. तो मनाला सुखावतोय. घरात बसून ते रूप डोळा भरून नुसतं पाहणं मनाला पटत नाही. त्या हिमवर्षावात नहायला मन अतुर होऊन उठतं. क्षण दोन क्षण मनाची चलबिचल होते. नाही म्हटलं तरी घराची उब सोडणं जिवावर आलंय. वाटतंय तितकं घराबाहेर पडणं सुखावह होईल का ? आणि नाही झालं तर ? पण तिकडे तो हिमवर्षाव खुणावतोय. मग मात्र आपण निर्धार करून उठतो. घराबाहेर पडतो. अरे, हा हिमवर्षाव अंगावर घेण्यात किती मजा आहे. पावलं घसरत आहेत, पण तरीही स्वत:ला सावरता येतंय. अंग अंग मोकळे होतंय. चित्तवृती प्रफुल्लित होताहेत हा काही वेगळाच अनुभव. पूर्वी न मिळालेला हवा हवासा वाटणारा. या आनंदानं वेडावून आपण आपल्याच तालात चालत राहतो. किती मजा येतेय, किती प्रसन्न वाटतंय, किती मोकळं वाटतंय हे स्वत:ला पुन्हा पुन्हा सांगत. एकदम लक्षात येतं, आता हिमवर्षाव थांबलाय. मघाच्या त्या हिमाच्या आता थंडगार शिळा झाल्यात. मागे वळून बघावं तर आपल्या मागं उमटलेल्या पाऊलखुणा अदृश्य झाल्यात. पुढच्या आणि मागच्या वाटा गोठून गेल्यात. अचानकपण. आपण दचकतो, भांबावतो. असं कसं झालं ? इतकं होईपर्यंत भान कसं हरपलं ? की भूल पडली ? आता या गोठलेल्या वाटांवरून पुढे जाणं धोक्याचं आहे असं मागं राहिलेले लोक सांगताहेत. पण कळतंय की मागं फिरणंही तितकं सोपं नाही. काय करावं काही सुचत नाही. मागं जावं की पुढं जावं ? मागं की पुढे ? मागं की पुढं ? डोक्यात नुसता पिंगा. मन घोटाळतंय. ते मागं जायला उत्सुक आहे, पण पाऊल मात्र मागं पडत नाही. देश सोडून वर्षानुवर्षे परदेशी वास्तव्य करणारी आम्ही माणसं. मागील पिढीत आमच्या वाडवडिलांनी पोटासाठी गाव सोडला. शहराकडे धाव घेतली. आम्ही त्याहीपुढे पाऊलभर गेलो. देश सोडून परदेशी उड्डाण केलं. कृती म्हटली तर एकच. कोणी स्वत:च्या उन्नतीसाठी गाव सोडला, कोणी देश. तरीही एकदम कबूल की गाव सोडणं आणि देश सोडणं यातलं अंतर जमीन अस्मानाचं. गाव सोडून शहराकडे धावराण्यांना ज्या समस्यांना तोंड द्यावं लागलं त्यापेक्षा वेगळ्या समस्यांना आम्हाला तोंड द्यावं लागलं. चार भिंतींत, आई-वडिलांच्या आणि नातलगांच्या गराड्यात वावरणारे आम्ही तिथून बाहेर पडलो आणि आलो ते एका अपरिचित विश्वात. जिथं भाषा, वेष, चालीरीती, रीतिरिवाज सगळं कसं अनोळखी. थोडंसं बुजत, बिचकत, घाबरत आम्ही इथं पाऊल टेकलं. घसरता घसरता स्वत:ला सावरलं, कधी धडपडलो, कधी भांबावलो, कधी भोवंडलो. तरीही पाय घट्ट रोवून उभे राहिलो. या अनोळखी रस्त्यांनी एकटं चालण्यात भीती होती तसाच साहसाचा आनंदही. भारत, अमेरिका हे दोन देश. पृथ्वीच्या पाठीवर एकमेकांच्या विरुद्ध टोकाला असलेले. त्यामुळेही असेल, या दोन देशांत प्रत्येक बाबतीत असलेलं अंतरही दोन टोकांचं. जेव्हा इथं रात्र होते तेव्हा तिथे चक्क दिवस असतो, इथपासून या दोन देशांची दोन टोकं गाठण्याची शर्यत सुरू होते. आम्हाला ते टोक सोडवत नाही, हे टोक धरवत नाही. ही दोन टोकं कशी जवळ आणता येतील, कशी साधता येतील या प्रयत्नात सतत आम्ही. कधी यात आमची फरफट होते, कधी आम्ही हताश होतो, तर कधी आमचा आम्हालाच सुवर्णमध्य साधल्याचा क्षणैक आनंदही मिळतो. | मातृभूमीपासून दूर राहिलेल्या संवेदनाक्षम मनानं आजूबाजूच्या जीवनातल्या गोष्टी टिपल्या. त्या मनात दाटल्या. त-हेत-हेचे अनुभव आले. चांगले आणि वाईटही. एकदा इथल्या आयुष्याची सवय झाल्यावर मागे वळून पाहताना काही गोष्टी नव्याने जाणवल्या तर काहींची जाणीवही नकोशी झाली. इथे राहिल्याने आयुष्य फक्त समृद्ध, सुखासीन झालं असं नाही. या नवीन दुनियेनं आम्हाला बरंच काही शिकवलं. आमच्या बाळबोध, पुस्तकी आणि दिखाऊ जगातून आम्ही बाहेर पडलो. काही प्रश्न सुटले. काही नवे उभे ठाकले. हे सर्व मनात धुमसत होतं. वाटलं हे शब्दांकित केलं पाहिजे. काही वर्षांपूर्वी, माझे यजमान दिलीप वि. चित्रे यांनी भारताबाहेरील भारतीयांनी लिहिलेल्या, त्या त्या देशातील अनुभवांवर आधारीत असलेल्या कथांचा प्रातिनिधिक संग्रह काढायची योजना हाती घेतली. या निमित्ताने मी भीतभीतच आयुष्यातली पहिली कथा लिहिली. आठ, दहा वर्षांच्या प्रयत्नानंतर चौर्याऐशी साली कुंपणापलिकडले शेत ' हा तो संग्रह श्रीविद्या प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाला. त्यातली माझी ती पहिलीवहिली कथा आवडल्याची बहुसंख्य वाचकांकडून पावती मिळाली. त्यामुळे अनेक वर्षे मनात दाटलेल्या विचारांना कागदावर उतरण्याला वेग आला. त्यानंतरच्या काळात लिहिले गेलेले हे लेख ते ज्या क्रमाने लिहिले गेले त्याच क्रमाने या पुस्तकात अंतर्भूत केलेले आहेत. ते लिहिले जात असतानाच्या काळात त्यातील काही वेळोवेळी लोकसत्ता, मुंबई सकाळ, मानिनी, मौज, गावकरी इत्यादी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. उरलेले प्रथमच या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर येत आहेत. हे लेख लिहिता लिहिता 'गोठलेल्या वाटा'चे चित्र माझ्या मनात अधिकाधिक स्पष्ट होत गेले. या अर्थातच कथा नाहीत. यात येथील भारतीय जनतेच्या जीवनाचे दर्शन घडवण्याचा किंवा अमेरिकन जीवनाची आपल्याकडील जीवनाशी बरी-वाईट तुलना करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न नाही. यातल्या अनुभवांची प्रामाणिकता जरी वाचकांना जाणवली तरी या गोठलेल्या वाटांवरचा प्रवास सार्थकी लागल्याचं समाधान मला मिळेल. श्रीविद्या प्रकाशनाचे मधुकाका कुलकर्णी यांनी हा संग्रह प्रकाशित करण्यासाठी सतत तगादा लावला नसता तर कदाचित इतक्या लवकर माझ्या हातून लिहिण्याचं हे काम एवढ्या नेटानं झालं नसतं. कल्पना मुद्रणालयाचे चिं. स. लाटकर यांनी पुस्तकाची सुबक छपाई केली. वॉशिंग्टनमधील आमचे जुने स्नेही नरेश शहा यांचे वेष्टन पुस्तकावर हवेच होते, ते त्यांनी थोडक्या वेळात करून दिले. श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांच्याशी वेळोवेळी पत्ररूपाने आणि प्रत्यक्ष झालेल्या चर्चेतून अत्यंत मोलाचे मार्गदर्शन झाले. या सगळ्यांचे मनापासून आभार. वॉशिंग्टन, १ नोव्हेंबर १९८६ शोभा चित्रे ललित साहित्य विभागात महाराष्ट्र राज्य पुरस्कार
|
 |
 |
|