Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fontsशून्य महाभारत - 1 - पुढे
प्रकरण - १

दुर्योधन कृष्णाच्या दालनात प्रवेशला. मंचकावर भगवान श्रीकृष्ण निद्रिस्त पहुडलेले होते. दुर्योधन उत्तरीय सावरत कृष्णाशेजारच्या उच्चासनावर विराजमान झाला आणि भगवंत जागे होण्याची शांतपणे वाट पाहात बसला.

काही क्षण गेले आणि अर्जुन घाईने आत प्रवेशला. प्रथम दुर्योधनावर दृष्टी जाताच अर्जुन गोंधळून थबकला. मग त्याची दृष्टी कृष्णावर गेली. कृष्ण अजूनही प्रगाढ निद्रेत होते.

आपल्याला उशीर झाला आहे याची त्याला जाणीव होऊन अर्जुन काही क्षण विचार करत तसाच उभा राहिला. मग आपल्याला योग्य असे दुसरे आसन दिसते काय हे पाहण्यासाठी त्याने कक्षावर नजर फिरवली, पण त्याला एकही आसन दिसले नाही. मग काही विचार करून तो पुढे झाला आणि दुर्योधनाच्या छद्मी हास्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करीत कृष्णाच्या पावलांशी गुडघे टेकून बसला आणि रात्रीने प्रभातेची वाट पाहावी त्या अधीरतेने कृष्ण जागृत होण्याची वाट पाहू लागला.

काही क्षण गेले. बाहेर प्रभातेचा पदचाप कानी पडताच मंगलवाद्यांचा गजर होऊ लागला. भगवंत जागे झाले. त्यांची नजर प्रथम आपल्या पायाशी विनमरपणे बसलेल्या अर्जुनावर पडली. मग त्यांनी दुर्योधनाकडे पाहिले. मंद हास्य करीत त्यांनी विचारले,

"एवढ्या लवकर आपण उभयता येथे कसे आलात? आपल्याला येऊन फार वेळ तर झाला नाही ना?"

"कृष्णा, तुला माहीतच आहे, की आम्हा कौरवांत आणि पांडवांत सख्य नाही. आमच्यामध्ये रीतसर समेट होणे असंभव आहे. त्यामुळे आम्ही युद्ध करून आर्यावर्तावर कोणी राज्य करावे याचा निर्णय करावा असे ठरवले आहे. तू आम्हा उभयतांचा नातेसंबंधी आहेस. या युद्धात तू आमचा पक्ष घेऊन युद्ध करावे अशी माझी इच्छा आहे." दुर्योधन म्हणाला.

"मी तुला मदत करावी असे तुला का वाटते दुर्योधना? मी पूर्वीपासून पांडवांचा पक्षपाती आहे असे सारे म्हणत असतानाही, आणि तू माझी त्यासाठी नेहमीच निंदा करत असतानाही, माझी मदत मागायला यावे याचे मला आश्चर्य वाटते आहे"

दुर्योधन यावर मंद हसला.

"कृष्णा, मी क्षत्रिय आहे आणि उच्चकुलीन आहे. राजनीतीचा मी चांगला अभ्यास केला आहे. राजनीतीत कोणीही कायमचा मित्र नसतो की शत्रू नसतो. त्यामुळे मी तुला मुळीच शत्रू मानत नाही. शिवाय तू माझा नातेसंबंधी असल्याने माझा तुझ्यावर काही अधिकार आहेच. तू मला मदत केल्याने तुझ्यावरचा पक्षपातीपणाचा आरोप दूर होईल आणि तुझी कीर्ती अधिक धवल होईल, असे मात्र खात्रीने वाटते. शिवाय तुझ्यासारखा ज्ञानी मनुष्य आमच्या बाजूला असला तर आमचा मोठाच नैतिक विजय होईल. केवळ तुझ्यामुळे, पांडवांची बाजू लंगडी असली तरी त्यांना जे मदत करायला उभे राहिले आहेत तेही माघार घेतील. त्यामुळे मी तुझी मदत मागायला आलो आहे."

"दुर्योधना, केवळ एवढ्यामुळेच मी तुला मदत करायला तयार होईन असे तुला वाटले तरी कसे? तू माझा नातेसंबंधी आहेस हे खरे, पण तेवढे पुरेसे नाही. ज्या कंसाला मी ठार मारले तोही माझा नातेवाईकच होता, हा इतिहास तुला माहीतच आहे."

"होय कृष्णा, मला इतिहास चांगलाच माहीत आहे. पण ती वेळ वेगळी होती. कारणे वेगळी होती. येथे परिस्थिती वेगळी आहे. वेळ वेगळी आहे. आपण आर्यावर्ताचे भवितव्य ठरविण्यासाठी येथे बसलो आहोत. तू नसलास तर आम्हाला विजयच मिळणार नाही असे नाही. तू स्वत:सुद्धा अनेक युद्धे हरला आहेस, हाही एक इतिहासच आहे. पण तू स्वत:ला धर्मनिष्ठ समजतोस, म्हणून धर्माची बाजू घ्यायला का होईना तू माझ्या बाजूने युद्ध करावेस असे मला वाटते."

कृष्णाच्या चेहर्‍यावरचे हास्य अधिक विस्तारले. मग त्याने अर्जुनाकडे पाहिले आणि मृदू स्वरात विचारले,

"यावर तुझे काय म्हणणे आहे, अर्जुना?"

आपली बाजू पटवून देण्यासाठी शब्द खर्चण्यापेक्षा नम्रता स्वीकारणे अनेकदा हितावह ठरते हे माहीत असलेला अर्जुन शिर झुकवून म्हणाला,

"भगवंता, तू माझा मित्रच नव्हेस तर सखा आहेस. तू जे ठरवशील ते मला मान्य आहे."

"तुम्ही माझ्यासमोर मोठा बिकट प्रश्न उभा केला आहे." कृष्ण म्हणाला. ""तुम्ही दोघेही माझे आप्त आहात हे खरे. त्यामुळे मला पक्षपाती धोरण स्वीकारणे योग्य वाटत नाही. जेव्हा दोन्ही बाजू धर्म आणि न्याय आपल्याच बाजूला आहेत असे गृहीत धरतात तेव्हा फक्त युद्धानेच धर्म आणि न्याय कोणाच्या बाजूने आहे हे ठरवावे लागते हेही खरे. त्यामुळे युद्ध होणार आणि मला कोणाचीतरी बाजू घ्यावी लागणार हे सुद्धा तेवढेच खरे आहे आणि मी एकाच वेळी सर्वांची बाजू घेऊ शकत नाही हेही उघड आहे. तेव्हा मला यावर थोडा विचार करावा लागेल."

"कृष्णा, मी तुझ्याकडे सर्वप्रथम आलो आहे आणि जो प्रथम मदत मागायला येतो त्यालाच मदत करणे ही पुरातन रीत आहे. तुझ्यासारखा सज्जन हा परिपाठ तोडेल असे मला वाटत नाही. त्यामुळे तू मलाच मदत करायला हवीस."

"दुर्योधना, तू प्रथम आला आहेस हे खरे आहे. पण मी अर्जुनास प्रथम पाहिले हेही तेवढेच खरे आहे. त्यामुळे माझ्यापुढचा प्रश्न अधिकच बिकट झाला आहे. पण मी यावर एक तोडगा सुचवतो. जर तो तुम्हा उभयतांना मान्य झाला तर मी उभयतांना मदत केल्यासारखीच होईल."

"सांग कृष्णा." अर्जुन अधीरतेने म्हणाला.

"एकीकडे मी आहे आणि दुसरीकडे माझी दोन अक्षौहिणी सेना आहे. या युद्धात मी स्वत: शस्त्र हाती धरणार नाही. कारण माझ्याच हस्ते माझ्या आप्तांवर वार व्हावा हे मला योग्य वाटत नाही. माझी सेना मात्र कोणाचीही आप्त नसल्याने ती मात्र युद्ध करेल.

"आता युद्ध न करणारा मी हवा, की शस्त्रास्त्राने सिद्ध अशी अक्षौहिणी सेना हवी याचा निर्णय तुम्ही मला द्यायला हवा. हे दुर्योधना, तू प्रथम आलास म्हणून आणि ज्येष्ठ आहेस म्हणून तू मला प्रथम सांग, तुला काय हवे आहे?"

दुर्योधन काही क्षण स्तब्ध बसला. अर्जुन अनिवार उत्कंठेने दुर्योधन काय उत्तर देतो याची वाट पाहू लागला.

"हे जनार्दना, तू माझा आप्त आहेस, आणि तरीही आजवर तूच माझा विरोध केला आहेस. पण मी फक्त तुझी आणि फक्त तुझी मदत मागायला आलो होतो, त्यामुळे मला फक्त तूच हवा आहेस." दुर्योधन उत्तरला.

कृष्णाचा चेहरा आश्चर्याने विस्फारला गेला. जणू दुर्योधन त्याची मागणी करेल अशी त्याची अपेक्षाच नव्हती. पण आता त्याने शब्द दिला होता आणि त्याच्यासारखा धर्मवेत्ता दिलेला शब्दलणे शक्य नव्हते.

"तथास्तु! अर्जुना, तुझ्या वाटयाला आता माझी सेना आली आहे. तिचा योग्य विनियोग कर आणि युद्धात जय मिळव" कृष्ण म्हणाला.

अर्जुनाच्या नेत्रांत अश्रू उभे राहिले. सर्व आशा संपलेल्या मनुष्यासारखा तो प्रतिमावत बसून राहिला. नंतर रुद्ध कंठाने तो म्हणाला,

"जनार्दना...का एवढा तू निष्ठूर झालास? का तू माझा असा त्याग केलास? मी आता द्रौपदीला काय सांगू? तिची तुझ्यावर अनन्यसाधारण भक्ती आहे. तुझ्या आशेवर तिने वनवासातील दु:सह्य कष्ट सहन केले. केवळ तुझ्यावर श्रद्धा ठेवून अपमानांच्या अगणित राशी तिने भोगल्या. मी धर्मराजास काय सांगू? आमच्या हृदयात सदैव वसणार्‍या परमात्म्याने आमचा त्याग केला आहे असे सांगू? तो धीरगंभीर ज्ञानी मनुष्य ही वेदना कशी सहन करेल? हा आघात त्याला कोलमडून टाकण्यास पुरेसा आहे. हे भगवंता, जर तू आमच्या बाजूस नसशील तर हे युद्ध करण्यात तरी काय अर्थ आहे? जा दुर्योधना, तुझे राज्य तुला लखलाभ असो. आम्ही पाच बंधू द्रौपदीसह या आर्यावर्तात कोठेही जाऊन राहू."

कृष्णाची मुद्रा गंभीर झाली होती.

"हे अर्जुना, जर तुला तुझी बाजू न्यायाची वाटत असेल तर तुझी बाजू सिद्ध करण्यासाठी तुला युद्ध करणे भाग आहे. जर तू खरेच धर्मनिष्ठ आहेस तर मी तुझ्या बाजूने आहे की नाही यामुळे तुझ्या युद्धाच्या निर्णयावर फरक पडता कामा नये. धर्म आणि न्याय भावनांच्या तुलेत तोलता येत नाहीत. धर्म सूक्ष्म आहे आणि त्याचे अनंत पैलू आहेत. धर्म हा सामान्य बुद्धीच्या मनुष्यांच्या पकडीबाहेरचा आहे. हे अर्जुना, धर्माला कोणतीच बाजू नसते. धर्म सर्वत्र आहे आणि शाश्वत आहे. एका भूमीच्या तुकडयावर उभे राहून एका पर्वताकडे पाहात असता तो पर्वत वेगळाच भासतो तर अन्य ठिकाणावरून पाहिले असता तो अजून वेगळा दिसतो. हे नरपुंगवा, धर्म हा असाच आहे. मी आजवर धर्माकडे तुझ्यावरील प्रेमापोटी, तुझ्या हिताच्या दृष्टीने पाहात होतो. आता माझी बाजूलली आहे. आणि मी ज्या नव्या बाजूने आहे त्याच बाजूने धर्माकडे पाहीन, हे आता उघड आहे.

"हे पांडवा, केवळ मी तुझ्या बाजूने आहे म्हणून धर्मही तुझ्या बाजूने आहे किंवा मी तुझ्या बाजूने नाही म्हणून धर्म तुझ्या बाजूने नाही, असे काही नाही, धर्म केव्हाही कोणाच्याच बाजूने नसतो. तो आपल्या बाजूने असल्याचा भरम मात्र निश्चयाने असतो. या भरमापार जर तू जाशील, तर तुझे हेतू धर्मनिष्ठ नाहीत हे सुद्धा तुझ्या लक्षात येईल."

"कृष्णा, तू परस्परविरुद्ध लढतो आहेस. हे परमात्मस्वरूपा, केवळ बाजू बदलताक्षणी शब्दलणे हे केवळ सामान्य प्रतीच्या मनुष्यासच शक्य आहे. आजवर मी तुझ्यावर श्रद्धा ठेवली. कारण तू पुरुषश्रेष्ठ आहेस, आत्मस्वरूप आहेस अशी माझी भावना होती. परंतु आता असे वाटते आहे की मी काहीतरी चूक केली आहे. तू माझ्या बाजूने नाहीस तर ठीक आहे. आम्ही तरीही हे युद्ध करू आणि या युद्धात जय मिळवू."

एवढे बोलून अर्जुन उठून उभा राहिला. आता त्याच्या मुद्रेवर निश्चयाची आभा झळकत होती.

ही सृष्टी एक विजात्र खेळ असल्याची पूर्ण जाणीव असलेला कृष्ण मंद हास्य करीत म्हणाला,

"अर्जुना, सारे मानव सामान्य आहेत. सारे मानव स्वार्थी आहेत. आपल्या श्रद्धेशी ठाम नसणे हे त्याच्या क्षुद्रपणाचेच लक्षण आहे. असो. तू माझा सैन्यसंभार घेऊन परत जा. द्रौपदी आणि युधिष्ठिरास माझे अभीष्ट कळव."

अर्जुन किंचित वाकून, दुर्योधनावर एक तिरस्काराचा कटाक्ष टाकत वळाला आणि त्या दालनातून निघून गेला.

"दुर्योधना, तू माझे एवढे बलाढ्य सैन्य न मागता युद्ध न करणार्‍या, नि:शस्त्र अशा मला का मागितलेस?"

कृष्णाने काही क्षणानंतर विचारले.

आपल्या मुद्रेवर नेहमीच आपल्या श्रेष्ठत्वाची प्रौढी मिरवणारा दुर्योधन म्हणाला,

"हे कृष्णा, केवळ सैन्यबलाने युद्धे जिंकली जात असती तर अनार्यांचा विनाश अल्पसंख्य आर्यांना कसा करता आला असता? विजयाची दुंदुभी संख्येने अधिक असलेले नव्हे तर श्रेष्ठ नेतृत्व असलेले लोकच फुंकू शकतात. हे जनार्दना, सैन्य तर मजजवळ पुष्कळ आहे. रथी आणि महारथींचीही मजजवळ कमतरता नाही. कमतरता होती ती फक्त तुझी. केवळ तू माझ्या बाजूस आहेस हे समजले तर माझा सामान्य सैनिकही महारथीच्या आत्मबलाने लढेल. आणि आता तू माझ्या बाजूस आहेस. हे कृष्णा, त्यामुळे माझा विजय निश्चित आहे."

"दुर्योधना, तू बुद्धिवंत आहेस यात शंका नाही. पण मी तुझ्या बाजूने येऊन तुझे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करून पांडवांचा विजय सुकर करणार नाही असा विश्वास तुला का वाटतो? मी पांडवांना नेहमीच आपला स्नेही मानले आहे. तू त्यांच्यावर अनंतदा अन्याय केला आहेस. कपटाचरण करून त्यांना वनवासी केले आहेस. तू मलाही मी शिष्टाई करण्यास आलो असता बंदी बनवण्याचा अधम प्रयत्न केला आहेस. याबद्दल माझ्या मनात राग नसेल हा विश्वास तुला का वाटतो?"

दुर्योधन म्हणाला,

"हे कृष्णा, तू तसे करणार नाहीस याबद्दल मला विश्वास आहे; पण समजा, जरी तू माझ्यावर राग धरून बिभीषणाप्रमाणे माझ्या पराजयासाठी पांडवांना मदत केलीस तरीही तो माझाच विजय आहे, हे निश्चयाने समजून अस.

"हे पंडिता, तू स्वत:स नारायणाचा अवतार समजतोस. तू सर्वत्र व्यापून राहिला असून केवळ मानवाच्या हितासाठी हा नरजन्म घेतला आहेस असे म्हणतोस.

"भीष्म व द्रोणही तुला परमात्मस्वरूप मानून भजतात. असा तू, जर अधर्माचरणी झालास तर तुझ्या चेहर्‍यावरील हा भगवत्तेचा मुखवटा गळून पडेल. या जगात अढळ श्रद्धा ठेवावी असे काहीही नाही हे सर्व मानवजातीस कळून येईल आणि सारे अधर्म करू लागतील. तू परमात्मा नसलास, तरी सारे तुला परमात्मा मानतात आणि तशी श्रद्धा ठेवतात. तुझ्यावरची ही श्रद्धा भंगली तर हे कृष्णा, या पृथ्वीतलावर पुन्हा कोणी कोणावर श्रद्धा ठेवणार नाही. पती पत्नीवर विश्वास ठेवणार नाही, की पिता पुत्रावर. सार्‍या जगात संशयाचे बीज रोवले जाईल व त्याचा फोफावणारा वृक्ष सारे जीवन व्यापून उरेल. ही भूमी वीराण बनेल.

"हे कृष्णा, हे युद्ध झाले तर मोठी हानी होईल असे नाही. यात माझा पराजय झाला तर फार तर माझी बाजूच अन्यायाची होती असे जग समजेल आणि माझा द्वेष करेल. आणि जर मी विजयी झालो तर मग पांडव अधम होते याचा साक्षात्कार जगाला होईल. जेत्यांची तळी उचलणे हा मानवी स्वभाव आहे. त्यामुळे विजयाने माझ्यावर काही विशेष फरक पडेल असे नाही. पण जर तू बदललास तर मग ही पृथ्वी नि:शेष होईल.

"हे कृष्णा, मी माझे जीवन पूर्ण सामर्थ्यासह जगलो आहे. मी क्षत्रियास शोभेल अशाच पुरुषार्थाने जगलो आहे. मी कधीही कोणासमोर शिर झुकवले नाही. पण मी कोणावर अन्यायही केला नाही. हे कृष्णा, हे राज्य माझे आहे अशी माझी श्रद्धा आहे, आणि ज्यावर माझी श्रद्धा आहे, त्यासाठी मी माझे प्राणही देऊन टाकीन. माझ्या श्रद्धा या परिस्थिती पाहून पाठ वळवणार्‍या क्षुद्र मानवाच्या श्रद्धा नव्हेत. या दुर्योधनाच्या श्रद्धा आहेत. त्या मेरुपर्वताइतयाच अचल आणि दृढ आहेत.

"हे कृष्णा, तू ज्ञानी आहेस. तुला सारे कळते; पण तू मानव आहेस आणि मानवास शोभेलसे रागद्वेषही तुझ्यात आहेत. पण सर्वांनी तुझ्यावर देवत्व लादले आहे आणि तू आता त्या देवत्वाचा गुलाम आहेस. तुला देवासारखेच वागावे लागेल आणि माझी दृढ बाजू घ्यावी लागेल. कारण तू तुझ्या शब्दांनी आता माझ्याशी बांधला गेला आहेस.

"हे कृष्णा, काय सांगावे, तरीही कदाजात तूलशील. माझ्याबद्दल उरात द्वेष ठेवून माझ्या पराजयाचा मार्ग उघडशील. पण मला त्याची पर्वा नाही. तू माझ्या बाजूने असतानाही जर माझा पराभव झाला तर मी तो दुर्दैव म्हणून स्वीकारेनही; पण मग या जगात तुझी नालस्ती होईल. आणि तोच माझा खरा विजय असेल.

"हे कृष्णा, ही भूमी तशी कोणाचीही नव्हे, आम्ही केवळ प्रजेचे प्रतिपालक. मी प्रतिपाल केला नाही तर अन्य कोणी करेल. मला राज्याची हाव आहे असे सर्वांना वाटते; पण जनार्दना, तसे असते तर एका सुतपुत्रास मी एखादे राज्य दान दिले नसते. जे दान मी एखाद्या अपरिजातास देऊ शकतो ते पांडवांस देऊ शकत नाही असे तुला वाटते तरी कसे? पण दान घेणारा विनमरच असला पाहिजे. दान घेणार्‍याला कोणताही अधिकार नसतो. कोणी नमरपणे प्राणदान मागितले तर मी प्राणही देईन, पण जर अधिकाराने कोणी मजजवळ तृणपाते मागितले तर ते मी काही केल्या देणार नाही, हे नीट समजावून घे. कारण ज्यावर माझाही अधिकार नाही, त्यावर अन्य कोण अधिकार सांगणार?

"प्रत्येक प्राणी स्वभावाने बांधला आहे. आणि त्याचा स्वभाव हाच त्याचा धर्म आहे. माझा स्वभाव असा आहे आणि त्या स्वभावानेच मी जगणे यातच माझा धर्म सामावला आहे.

"कृष्णा, तू माझ्या बाजूने आहेस, एवढेच मला पुरेसे आहे. पण तू मुक्त आहेस. तू शस्त्र हाती घेण्याचीही मला गरज नाही. मी राजा म्हणून, माझ्याशी एकनिष्ठच राहिले पाहिजे याचेही तुजवर बंधन नाही. तू या मुक्त वायूप्रमाणेच स्वतंत्र आहेस"

कृष्ण मंचकावर उठून बसला आणि म्हणाला.

"हे वीरा, नि:शंक रहा. तुझा विजय निश्चित आहे. सारेच विजय रणभूमीवर मिळत नसतात. काही विजय श्रेष्ठ मनुष्यांच्या ंतरातच असतात. सुखाने जा दुर्योधना, मी तुझ्याबरोबर आहे."

दुर्योधन उठला. श्रीकृष्णास वंदन केले आणि गजराजाच्या डौलाने बाहेर पडला.
 

पुढे

 
Home Help Desk FAQ Your Comments
 

1998 - Rasik Enterprises.